जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 228/2019. तक्रार दाखल दिनांक : 18/09/2019. तक्रार निर्णय दिनांक : 28/02/2023.
कालावधी : 03 वर्षे 05 महिने 10 दिवस
(1) मनिषा भ्र. धनंजय लटपटे, वय 36 वर्षे, व्यवसाय : घरकाम.
(2) नरेश पि. धनंजय लटपटे, वय 14 वर्षे, व्यवसाय : शिक्षण
तर्फे : अज्ञान पालनकर्ती आई मनिषा भ्र. धनंजय लटपटे.
(3) गंगाबाई भ्र. वाल्मिक लटपटे, वय 61 वर्षे, व्यवसाय : घरकाम,
सर्व रा. गांजूर, ता. जि. लातूर. तक्रारकर्ते
विरुध्द
(1) विभागीय व्यवस्थापक, दी ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी लि.,
विभागीय कार्यालय - 3, 321/ए-2, ओसवाल बंधू समाज बिल्डींग,
जे.एन. रोड, पुणे - 411 042.
(2) विभागीय व्यवस्थापक, दी ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी लि.,
विभागीय कार्यालय, लोखंडे कॉम्प्लेक्स, पहिला मजला, सिंध
टॉकीजच्या समोर, सुभाष चौक, लातूर, ता. जि. लातूर.
(3) व्यवस्थापक, दी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.,
लातूर, मुख्य कार्यालय, लातूर.
(4) चेअरमन व गटसचिव,
रामेश्वर विविध कार्यकारी सेवा सोसायटी लि., रामेश्वर.
(5) जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, लातूर,
प्रशासकीय इमारत, लातूर - 413 512. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ते यांचेकरिता विधिज्ञ :- श्री. नागनाथ बी. बद्दे
विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांचेकरिता विधिज्ञ :- श्री. काशिनाथ जी. देशपांडे (साताळकर)
विरुध्द पक्ष क्र.3 ते 5 :- अनुपस्थित / एकतर्फा चौकशी
आदेश
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ते यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी की, तक्रारकर्ती क्र.1 यांचे पती, तक्रारकर्ता क्र.2 यांचे पिता व तक्रारकर्ती क्र.3 यांचे पुत्र धनंजय लटपटे (यापुढे "मयत धनंजय") हे दि.21/7/2018 रोजी दुपारी 12 ते 12.30 च्या दरम्यान राहत्या घरावर गच्चीवर गेले असता घराच्या दक्षीण-पूर्व कोप-यालगत असलेल्या खांबाचा विद्युत धक्का बसल्यामुळे खाली पडून मृत्यू पावले. घटनेबाबत पोलीस ठाण्यामध्ये नोंद करण्यात आली. तसेच मयत धनंजय यांची शवचिकित्सा करण्यात आली. मयत धनंजय हे विरुध्द पक्ष क्र.4 (यापुढे "सोसायटी") यांचे सभासद होते. सोसायटी व विरुध्द पक्ष क्र.3 (यापुढे "जिल्हा बँक") यांच्यामार्फत व विरुध्द पक्ष क्र.5 (यापुढे "जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी") यांच्या अधिपत्याखाली मयत धनंजय यांचा अपघाती विमा उतरविलेला होता. मयत धनंजय यांच्या विमा रकमेसंबंधी सोसायटीने जिल्हा बँकेकडे प्रस्ताव सादर केला. त्यानंतर विरुध्द पक्ष क्र.2 (यापुढे विरुध्द पक्ष क्र.1 व 2 "विमा कंपनी") यांच्याकडे विमा दावा दाखल केला. परंतु विमा कंपनीने तक्रारकर्ते यांचा विमा दावा नामंजूर केला. उक्त वादकथनाच्या अनुषंगाने तक्रारकर्ते यांनी रु.2,00,000/- विमा रक्कम व्याजासह देण्याचा; मानसिक त्रासाकरिता रु.25,000/- व तक्रार खर्च रु.10,000/- देण्याचा आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ता यांनी केली आहे.
(2) विमा कंपनीने लेखी निवेदनपत्र दाखल केले. त्यांच्या कथनानुसार मयत धनंजय यांनी विमापत्रातील नियम, अटी व अपवादांचा भंग केल्यामुळे विमा दावा नामंजूर करण्यात आलेला आहे. त्यासंबंधी तक्रारकर्ते यांना लेखी पत्राद्वारे कळविण्यात आले. मयत धनंजय यांना विद्युत खांबावर चढण्याचा अधिकार नसताना विद्युत खांबावर चढून स्वत:च्या मृत्यूस कारणीभूत ठरले. त्यामुळे विमापत्राच्या नियम व अटीतील अपवाद क्र. 12 नुसार रक्कम देण्यास नकार देऊन दावा रद्द करण्यात आला. तक्रारकर्ते विमा रक्कम मिळण्याकरिता पात्र नाहीत आणि विमा कंपनीने सेवा देण्यामध्ये त्रुटी निर्माण केलेली नाही. अंतिमत: ग्राहक तक्रार रद्द करण्यात यावी, अशी विनंती केली आहे.
(3) सोसायटी, जिल्हा बँक व जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांना जिल्हा आयोगाचे सूचनापत्र प्राप्त झाले; परंतु ते जिल्हा आयोगापुढे उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश करण्यात आले.
(4) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार, विमा कंपनीचे लेखी निवेदनपत्र, उभय पक्षांनी दाखल केलेली कागदपत्रे इ. चे अवलोकन केले असता वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे वाद-मुद्दे निश्चित करण्यात येतात आणि त्या मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
(1) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी
केल्याचे सिध्द होते काय ? नाही.
(2) मुद्दा क्र.1 च्या अनुषंगाने तक्रारकर्ता अनुतोषास पात्र आहेत काय ? नाही.
(3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(5) मुद्दा क्र. 1 ते 3 :- मुद्दा क्र.1 ते 3 परस्परपुरक असल्यामुळे त्यांचे एकत्र विवेचन करण्यात येते. प्रामुख्याने, विमा कंपनीकडे मयत धनंजय यांचा अपघाती विमा उतरविला होता; मयत धनंजय यांचा विद्युत धक्क्यामुळे मृत्यू झाला; तक्रारकर्ते यांनी विमा कंपनीकडे विमा दावा सादर केला; विमा कंपनीने तक्रारकर्ते यांचा विमा दावा नामंजूर केला इ. बद्दल उभय पक्षांमध्ये मान्यस्थिती आहे.
(6) विमा दावा नामंजूर करणारे पत्र पाहता अधिकार नसताना व कायद्याचा भंग करुन मयत विद्युत खांबावर चढल्यामुळे स्वंय-इजेकरिता कारणीभूत ठरल्यामुळे दावा नामंजूर केल्याचे दिसून येते. विमा कंपनीने अभिलेखावर जनता वैयक्तिक अपघात विमापत्रासंबंधी माहितीपत्रक सादर केले आहे. त्यामध्ये हेतु:पुरस्सर स्वंय इजा, आत्महत्या, आत्महत्येचा प्रयत्न, गुन्हेगारी हेतुने कायद्याचा भंग इ. अपवर्जन दिसून येतात. विमा कंपनीने मयत धनंजय यांचे बंधू श्री. गोविंद, श्री. गोविंद यांच्या पत्नी सौ. आशा व मयत धनंजय यांच्या मातोश्री गंगाबाई यांचे पोलीस यंत्रणेने घेतलेले जबाब दाखल केले. सौ. आशा गोविंद लटपटे यांच्या जबाबामध्ये मयत धनंजय हे घरातील पाण्याची मोटार चालू नसल्यामुळे घराच्या पूर्वेस असलेल्या इले. पोलवर घराचे माळवदावरुन जाऊन पाहत असताना त्यांना अचानक इलेक्ट्रीक शॉक लागून घराचे पूर्वेस असलेल्या मोकळ्या जागेत पडले, असे नमूद आहे. पोलीस जबाब पाहता विद्युत मोटार चालू नसल्यामुळे मयत धनंजय हे विद्युत खांबाकडे गेलेले होते. यावरुन मयत धनंजय हे पूर्ण विचाराअंती विद्युत खांबाकडे गेले आणि त्यांना खांबाचा विद्युत धक्का बसला, हे स्पष्ट होते. त्यामुळे विमा कंपनीने दाखल केलेल्या विमापत्र माहितीपत्रकातील अपवर्जन कलमानुसार मयत धनंजय यांच्या मृत्यूनंतर विमा दावा नामंजूर करण्याचे विमा कंपनीचे कृत्य चूक किंवा अनुचित आहे, असे म्हणता येणार नाही. उक्त विवेचनाअंती विमा कंपनीने तक्रारकर्ते यांचा विमा दावा नामंजूर करुन सेवेमध्ये त्रुटी केल्याचे सिध्द होत नाही आणि तक्रारकर्ते अनुतोषास पात्र ठरत नाहीत, या निष्कर्षाप्रत येत आहोत. अंतिमत: मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर नकारार्थी देऊन मुद्दा क्र.3 करिता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
ग्राहक तक्रार क्र. 228/2019.
आदेश
(1) ग्राहक तक्रार नामंजूर करण्यात येते.
(2) खर्चासंबंधी आदेश नाहीत.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-