(आदेश पारीत व्दारा - श्रीमती चंद्रिका किशोरसिंह बैस, मा.सदस्या)
(पारीत दिनांक : 12 ऑक्टोंबर, 2017)
तक्रारकर्त्याने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अंतर्गत दाखल केली असून, तक्रारकर्त्याच्या तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालील प्रमाणे आहे.
1. विरुध्दपक्ष क्र.2 हे वास्तु विहार डेव्हलपर्स या नावाने व्यवसाय करतात आणि सदर कंपनीचे संचालक आहे. विरुध्दपक्ष क्र.1 हे त्याच्या संस्थेचे नाव असून ते खाजगी कामे करतात. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडे भूखंड क्रमांक 67 ज्याचे एकूण क्षेत्रफळ 1984.433 चौरस फुट असून त्याचा खसरा नंबर 66/1, 2, 3, 4 आहे व मौजा – कालडोंगरी, प.ह.क्र.40-अ, तहसिल व जिल्हा नागपुर असा आहे. तक्रारकर्त्याने सदर भूखंड खरेदी करण्याचा करार रुपये 140/- प्रती चौरस फुटा प्रमाणे म्हणजेच एकूण रक्कम रुपये 2,77,821/- मध्ये खरेदी करण्याचे ठरविण्यात आले होते. तक्रारकर्त्याने सदरचा भूखंड खरेदी करतेवेळी भूखंड हा मासिक किस्तीने प्रती मासिक किस्त रुपये 5,791/- असे ठरले होते व ते 36 किस्तीमध्ये देण्याचा करारनामा व्दारे ठरले होते. सदरच्या भूखंडाचा करारनामा करतेवेळी तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष यांना एकूण रुपये 69,455/- दिले, याचा उल्लेख अग्रीम करारामध्ये करण्यात आला आहे. तक्रारीसोबत जोडपत्र 1 मध्ये सदर करारपत्र संलग्नीत आहे. तक्रारकर्त्यास सदर भूखंडाचा करारनामा झाल्यानंतर मासिक किस्त पुस्तिका देण्यात आली, त्यात तक्रारकर्त्याने वेळोवेळी भरलेल्या किस्तीची नोंद करण्यात आली आहे व त्यात त्या भूखंडाचे संपूर्ण वर्णन, तारखा व सह्या दर्शविलेल्या आहे. तक्रारकर्त्याने सदरच्या मासिक किस्ती ज्या 36 किस्तीमध्ये पूर्ण करावयाची होती ते तक्रारकर्त्याने त्या किस्ती वेळे पूर्वीच म्हणजे एकूण 19 किस्तीमध्ये संपूर्ण पैशाचा भरणा विरुध्दपक्षाकडे नगदी व धनादेशाव्दारे भरणा केला होता व विरुध्दपक्षाचे याबाबत कुठलाही आक्षेप नाही. विरुध्दपक्षाकडे या रकमेचा भरणा केल्याचा उल्लेख किस्त पुस्तिकेत नमूद आहे. तसेच, तकारकर्त्याने विरुध्दपक्षाकडे भूंखडासंबंधीत पैशाचा भरणा केल्याबाबतचे बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेचे स्टेटमेंटमधे दर्शविले असून त्याची प्रत तक्रारकर्त्याने तक्रारीत दाखल केली आहे. तक्रारकर्त्याने ज्या-ज्या वेळेस भरणा विरुध्दपक्षाकडे केला आहे त्या प्रत्येक वेळेस विरुध्दपक्ष कार्यालयातून संगणक रसिद प्रदान करण्यात आली आहे व त्यावर संपूर्ण विवरणासहीत कार्यालयीन व्यक्तीची स्वाक्षरी व कंपनीचा शिक्का इत्यादी सर्व दर्शविलेले आहे. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडे भूखंडापोटी मासीक किस्ती पुस्तिकाप्रमाणे वेळोवेळी खालील ‘परिशिष्ठ–अ’ मध्ये दर्शविल्याप्रमाणे रक्कम जमा केली आहे.
‘परिशिष्ठ – अ’
अ.क्र. | रसिद/पावती नंबर | तारीख | रक्कम (रुपये) | नगदी/धनादेश |
1) | टी 007440 | 30.04.2007 | 3,000/- | नगदी |
2) | 55737 | 15.05.2007 | 64,700/- | नगदी |
3) | 56633 | 28.05.2007 | 7,991/- | धनादेश |
4) | 63374 | 31.08.2007 | 5,791/- | नगदी |
5) | 63666 | 04.09.2007 | 17,973/- | धनादेश |
6) | 67119 | 25.10.2007 | 11,582/- | धनादेश |
7) | 74165 | 04.02.2008 | 5,791/- | धनादेश |
8) | 76365 | 11.03.2008 | 17,373/- | धनादेश |
9) | 81995 | 27.06.2008 | 11,582/- | धनादेश |
10) | 85200 | 08.09.2008 | 23,164/- | धनादेश |
11) | 89147 | 25.12.2008 | 11,582/- | धनादेश |
12) | 92663 | 09.03.2009 | 11,582/- | धनादेश |
13) | 92663 | 15.05.2009 | 23,164/- | धनादेश |
14) | 93837 | 21.07.2009 | 5,791/- | धनादेश |
15) | 94725 | 30.09.2009 | 23,164/- | धनादेश |
16) | 95579 | 29.12.2009 | 5,791/- | धनादेश |
17) | 95757 | 28.01.2009 | 5,791/ | धनादेश |
18) | 95886 | 18.02.2009 | 5,791/ | धनादेश |
19) | 96133 | 08.05.2010 | 11,127/- | धनादेश |
एकूण जमा केलेली रक्कम रुपये | 2,77,921/- | |
2. तक्रारकर्त्याने वरील ‘परिशिष्ठ–अ’ मध्ये दर्शविल्या प्रमाणे संपूर्ण रक्कम विरुध्दपक्षाकडे जमा करुन सुध्दा, विरुध्दपक्षाने संबंधीत भूखंडाचे कायदेशिर विक्रीपत्र तक्रारकर्त्यास करुन दिले नाही. विरुध्दपक्षाने प्रत्येकवेळी कोणते-न-कोणते कारण सांगून टाळाटाळ केली आहे. विरुध्दपक्षाच्या या व्यवहारामुळे तक्रारकर्त्यास मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रास सहन करावा लागला, करीता तक्रारकर्त्याने खालील प्रमाणे प्रार्थना केली आहे.
1) विरुध्दपक्षाने करारपत्राप्रमाणे भूखंड क्रमांक 67 चे विक्रीपत्र लावून देण्याचे आदेश व्हावे.
2) तक्रारकर्त्यास झालेल्या मानिकस, शारिरीक व आर्थिक त्रासाबद्दल रुपये 1,00,000/- व तक्रारीचा संपूर्ण तक्रारीचा खर्च देण्याचे आदेश व्हावे.
3. तक्रारकर्त्याच्या तक्रारीला अनुसरुन विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांना मंचाची नोटीस पाठविण्यात आली होती. त्यानुसार विरुध्दपक्ष क्र.1 व 2 च्या म्हणण्यानुसार विरुध्दपक्ष क्र.2 हा विरुध्दपक्ष क्र.1 च्या संस्थेचा डायरेक्टर नाही. विरुध्दपक्ष क्र.1 याचा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय नाही. दिनांक 30.4.2007 ला विरुध्दपक्ष व तक्रारकर्त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा करार झालेला नाही, त्यामुळे भूखंड क्रमांक 67 हा तक्रारकर्त्यास विकण्याचे काहीही कारण नाही. तक्रारकर्त्याकडून रुपये 2,77,821/- मिळाल्याचे विरुध्दपक्षास मान्य नाही. तक्रारकर्त्याने दरमहिन्यात भूखंडाचे किस्तीपोटी रुपये 5,791/- दर महिन्यात असे एकूण 36 किस्ती भरल्याचे अमान्य आहे. त्याचप्रमाणे, भूखंडाची अग्रीम रक्कम रुपये 69,455/- करारपत्र करतेवेळी अग्रीम रक्कम म्हणून मिळाल्याचे अमान्य केले आहे. त्यामुळे, सदरची तक्रार बेकायदेशिर असून खर्चासह ती खारीज करण्यात यावी.
4. विरुध्दपक्ष क्र.2 ने पुरसीस दाखल करुन विरुध्दपक्ष क्र.1 ने दाखल केलेले लेखीउत्तर मान्य असल्याचे नमूद केले आहे. सदर प्रकरणात दोन्ही पक्षाच्या वकीलांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला. दोन्ही पक्षानी अभिलेखावर दाखल केलेल्या दस्ताऐवजाचे अवलोकन करण्यात आले, त्याप्रमाणे खालील प्रमाणे निष्कर्ष देण्यात येते.
मुद्दे : निष्कर्ष
1) तक्रारकर्त्याची तक्रार मंजूर होण्यास पाञ आहे काय ? : होय.
2) अंतिम आदेश काय ? : खालील प्रमाणे
// निष्कर्ष //
5. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडे भूखंड क्रमांक 67 ज्याचे एकूण क्षेत्रफळ 1984.433 चौरस फुट असून त्याचा खसरा नंबर 66/1, 2, 3, 4 आहे व मौजा – कालडोंगरी, प.ह.क्र.40-अ, तहसिल व जिल्हा नागपुर येथे, भूखंड खरेदी करण्याचा करार रुपये 140/- प्रती चौरस फुटा प्रमाणे म्हणजेच एकूण रक्कम रुपये 2,77,821/- मध्ये केला होता. तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार त्याने सूपर्ण रक्कम करारपत्र दिनांक 30.4.2007 प्रमाणे संपूर्ण रक्कम वेळेच्या आत विरुध्दपक्षाकडे जमा केली होती. त्यांना रुपये 2,77,821/- भरावयाचे होते. परंतु, त्यांनी विरुध्दपक्षाकडे रुपये 2,77,921/- म्हणजेच विरुध्दपक्षाकडे रुपये 100/- जास्त भरले. निशाणी क्र.3 नुसार तक्रारकर्ता व विरुध्दपक्ष यांच्यामध्ये झालेल्या कराराची प्रत लावली आहे, त्याचप्रमाणे नकाशाची प्रत लावली आहे, तसेच मासिक किस्तीचे दस्ताऐवज लावले आहे व पान क्रमांक 12 वर पैशाचा भरणा झाल्या बद्दलचे विवरणपत्र लावले आहे व त्यानंतर तक्रारकर्त्यास विरुध्दपक्षाच्या कार्यालयातून प्रदान करण्यात आलेल्या एकूण 19 संगणक रसिदा तक्रारीत दाखल केल्या आहे. यावरुन, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडे निर्धारीत वेळेत विरुध्दपक्षाकडे पैशाचा भरणा केल्याचे दिसून येत आहे. परंतु, आजतागायत विरुध्दपक्षाने सदरच्या जमिनीचे शासनाकडून स्विकृतीपत्र मिळवू शकले नाही व त्याअनुषंगाने, तक्रारकर्त्याचा कायदेशिर विक्रीपत्र करुन देऊ शकले नाही. यावरुन विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यासोबत सेवेत त्रुटी केल्याचे दिसून येते व तक्रारकर्त्याकडून भूखंडाची करारपत्राप्रमाणे संपूर्ण रक्कम स्विकारुनही अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केल्याचे दिसून येत आहे. करीता, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
// अंतिम आदेश //
(1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्दपक्ष यांना आदेशीत करण्यात येते की, विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याचे नावे भूखंड क्रमांक 67 ज्याचे एकूण क्षेत्रफळ 1984.433 चौरस फुट चे कायदेशिररित्या विक्रीपत्र नोंदवून द्यावे व त्या भूखंडाचा ताबा द्यावा.
हे शक्य कायदेशिररित्या शक्य नसल्यास विरुध्दपक्षाने समाधान होईपर्यंत याच ले-आऊटमधील किंवा अन्य अकृषक ले-आऊटमधील भूखंड करारपत्राप्रमाणे निर्धारीत एकूण क्षेत्रफळा एवढे भूखंडाचे कायदेशिर विक्रीपत्रकरुन द्यावे व भूखंडाचा ताबा द्यावे.
हे देखील शक्य नसेल तर तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडे ‘परिशिष्ठ –अ’ मध्ये दर्शविल्याप्रमाणे एकूण जमा रक्कम रुपये 2,77,921/- (रुपये दोन लाख सत्यात्तर हजार नवशे एकवीस फक्त) ही रक्कम भरल्याचा शेवटचा हप्ता दिनांक 08.05.2010 पासून द.सा.द.शे. 15 % व्याजासह तक्रारकर्त्याच्या हातात पडेपर्यंत द्यावे.
(3) तसेच, विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्यास झालेल्या शारीरीक, मानसिक व आर्थिक त्रासापोटी रुपये 10,000/- (रुपये दहा हजार फक्त) व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 5,000/- (रुपये पाच हजार फक्त) द्यावे.
(4) विरुध्दपक्ष यांनी आदेशाची पुर्तता आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसाचे आत करावे.
(5) उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क पाठविण्यात यावी.
नागपूर.
दिनांक :- 12/10/2017