न्या य नि र्ण य
द्वारा – मा. श्रीमती मनिषा हि. रेपे, सदस्य
1. प्रस्तुतची तक्रार तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली आहे.
2. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे –
तक्रारदार हे वर नमूद पत्त्यावरील रहिवासी असून व्यवसायाने डॉक्टर आहेत. जाबदार क्र.1 हे डाकघर बचत बँक म्हणून संपूर्ण भारतभर कार्यरत आहे. जाबदार क्र.2 हे जाबदार क्र.1 यांचे नोंदणीकृत एजंट आहेत. तक्रारदार यांनी स्वकष्टार्जित कमविलेले पैसे जाबदार क्र.1 यांचे बचत बँकेमध्ये सार्वजनिक भविष्य निधी या योजनेअंतर्गत गुंतवले आहेत. सदरची गुंतवणुक जाबदार क्र.2 यांचेमार्फत केली आहे. त्यामुळे तक्रारदार व सामनेवाले यांच्यामध्ये ग्राहक व सेवा पुरवठादार असे नाते निर्माण झाले आहे. तक्रारदार यांनी जाबदार क्र.2 यांचे मार्गदर्शनाप्रमाणे जाबदार क्र.1 यांचेकडे सन 2003 साली सार्वजनिक भविष्य निधी अंतर्गत खाते क्रमांक 1833171653 उघडले असून त्यामध्ये वेळोवेळी रकमा भरलेल्या आहेत. त्याची नोंद खाते पुस्तकावर जाबदार क्र.1 यांनी केलेली आहे. त्यानंतर सन 2008 साली तक्रारदारांनी जाबदार यांचेकडे सार्वजनिक भविष्य निधी (HUF) अंतर्गत खाते क्रमांक 0208198262 उघडले असून त्यामध्ये वेळोवेळी रकमा भरलेल्या आहेत. सन 2020 मध्ये तक्रारदार रक्कम भरण्यासाठी गेले असता त्यांना रक्कम भरण्यापासून रोखण्यात आले व त्यांना सांगण्यात आले की, तुमच्या नावाने या योजनेअंतर्गत नजरचुकीने दोन खाती उघडण्यात आलेली आहेत. अशाप्रकारे दोन खाती उघडण्यास आम्हाला परवानगी नाही, त्यामुळे तुम्हास एक खाते बंद करावे लागेल. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी जाबदार क्र.1 यांच्याकडे दिनांक 18/07/2020 रोजी अर्ज दिला व तक्रारदार यांनी सन 2003 साली उघडलेले खाते बंद करून त्यावरील आजअखेरचे व्याजाची मागणी केली. त्यावर जाबदार क्र.1 यांनी दि. 24/07/2020 रोजी तक्रारदारांना नोटीस पाठवली व सन 2003 साली उघडलेले खाते बंद करण्याऐवजी सन 2008 साली उघडलेले खाते बंद करण्यास तक्रारदारास सांगण्यात आले. तक्रारदारास सदरची नोटीस अमान्य असून तक्रारदाराने कोणत्याही कायद्याचे उल्लंघन केलेले नाही. याउलट सदरचे खाते हे जाबदार क्र.1 यांचेकडून चुकीने उघडण्यात आलेले आहे. म्हणून सदरचे खात्यातील रक्कम अन्य कोणत्या तरी योजनेमध्ये हस्तांतरित करण्यात यावी किंवा सदरचे खाते बंद करून त्यावर योग्य ते व्याज आकारून सदरची रक्कम तक्रारदार यांना देण्यात यावी अशा आशयाचे नोटीस उत्तर तक्रारदार यांनी जाबदार क्र.1 यांना दिनांक 11/08/2020 रोजी पाठवले. त्यावर जाबदार क्र.1 यांनी तक्रारदाराचे नोटीसीस प्रतिउत्तर दिनांक 24/08/2020 रोजी देवून सदरचे खाते बंद करुन बिनव्याजी रक्कम स्वीकारावी लागेल असे उत्तर दिले व तक्रारदारास मुद्दल रक्कम रुपये 13,67,500/- या रकमेचा चेक दिनांक 01/09/2020 रोजी पाठवून दिलेला आहे. त्यावरील व्याजाची रक्कम रुपये 7,80,164/- देणेस टाळाटाळ करुन जाबदार यांनी तक्रारदारास सेवा देण्यात त्रुटी केली आहे. म्हणून तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. सबब, तक्रारदारांनी सार्वजनिक भविष्य निधी अंतर्गत खाते क्रमांक 0208198262 या खात्यावरील होणारी व्याजाची रक्कम रुपये 7,80,164/- मिळावी, सदरच्या रकमेवर द.सा.द.शे.18 टक्के दराने व्याज मिळावे, मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु.2,00,000/- व तक्रारअर्जाचा संपूर्ण खर्च रु.50,000/- मिळावा अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
3. तक्रारदारांनी तक्रारअर्जासोबत शपथपत्र तसेच कागदयादीसोबत तक्रारदार यांनी सन 2003 मध्ये उघडलेल्या सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खात्याचे पासबुक, सन 2008 मध्ये उघडलेल्या खात्याचे पासबुक, जाबदार क्र.1 यांनी तक्रारदारांना पाठविलेली नोटीस, सदर नोटीसीस तक्रारदार यांनी दिलेले उत्तर, सदर उत्तराची पोचपावती, जाबदार क्र.1 यांनी दिलेले प्रतिउत्तर, जाबदार क्र.1 यांनी मुद्दल रक्कम पाठवले बाबतचे पत्र, सदर रक्कम तक्रारदाराने अंडर प्रोटेस्ट स्वीकारलेबाबतचे पत्र, तक्रारदार यांनी जाबदार यांना पाठवलेले पत्र इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारदाराने पुरावा शपथपत्र दाखल केला आहे.
4. जाबदार क्र.1 यांनी याकामी म्हणणे दाखल केले असून तक्रारदाराचे तक्रारीतील सर्व कथने नाकारली आहेत. जाबदार क्र.2 या सन 2010 पासून जाबदार क्र.1 यांच्या अधिकृत एजंट नाहीत. तक्रारदारांनी सन 2008 मध्ये दुसरे खाते उघडताना खाते उघडण्याच्या फॉर्मवर अशी घोषणा केली होती की, त्यांच्या नावावर इतर कोणत्याही डाकघरांमध्ये किंवा बँकेत कोणतेही सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खाते उघडलेले नाही. अशी खोटी घोषणा करून तक्रारदाराने पोस्ट खात्याची व भारत सरकारची दिशाभूल व फसवणूक केलेली आहे. तक्रारदारांनी दुसरे खाते उघडताना खाते उघडण्याचा फॉर्म म्हणजेच एस.बी.कार्डनुसार हे स्पष्ट झाले आहे की, खाते HUF खाते म्हणून उघडले गेले नाही. वित्त मंत्रालयाच्या पत्र क्र. 2/8/2005-NS-II दिनांक 13/05/2005 पासून HUF खाते उघडता येणार नाही. दिनांक 13/05/2005 नंतर खाते उघडले तर ते HUF मध्ये ग्राहय धरले जाणार नाही. तक्रारदारांनी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी पासबुकावर स्वतः HUF असे लिहिलेले आहे. त्याची कल्पना जाबदार क्र.1 यांना दिलेली नाही. तक्रारदारांनी दोन्ही खाती वेगवेगळया डाकघरांमध्ये उघडली आहेत. सदरची बाब जाबदार क्र.1 यांचे लक्षात आली तेव्हा त्यांनी तक्रारदारांना एक खाते बंद करण्यास सांगितले. दि.08/02/1979 च्या Directorate च्या पत्र क्र. 1-23/75-SB नुसार एखादी व्यक्ती त्याच्या नावावर फक्त एकच सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खाते उघडू शकते. तथापि तक्रारदाराने दोन खाती उघडली असून दुसरे खाते उघडताना चुकीचे घोषणापत्र देवून जाबदार क्र.1 यांना अंधारात ठेवले आहे. जेव्हा सदरची बाब जाबदार क्र.1 यांच्या लक्षात आली तेव्हा तक्रारदारांना पुढील व्यवहार करण्यापासून रोखण्यात आले. दि.08/02/1979 च्या Directorate च्या पत्र क्र. 1-23/75-SB नुसार जर ग्राहकाने चुकून त्याच्या नावाने दोन खाती उघडली तर दुसरे खाते अनियमित मानले जाईल आणि त्यावर कोणतेही व्याज देता येणार नाही आणि सीबीएस मॅन्युअल रुल 25 च्या तरतुदीनुसार अनियमित झालेले दुसरे खाते ठेवीदारास 30 दिवसांच्या कालावधीसाठी योग्य सूचना देवून ते बंद करणे आवश्यक आहे. जाबदार क्र.1 यांनी नियमांच्या तरतुदींनुसार तक्रारदारांचे एक खाते बंद करुन रक्कम रु. 13,67,500/- चा धनादेश पाठविला आहे. सदरची कृती ही नियमानुसारच आहे. दि.13/5/2025 नंतर उघडलेले खाते HUF मध्ये ग्राहय धरले जाणार नाही अशी वस्तुस्थिती असतानाही तक्रारदारांनी पीपीएफ पासबुकावर स्वतः HUF लिहिलेले आहे. सबब, जाबदार क्र.1 यांनी सेवेत कोणतीही त्रुटी केली नसल्याने तक्रारअर्ज फेटाळण्यात यावा अशी मागणी जाबदार क्र.1 यांनी केली आहे.
5. जाबदार क्र.1 यांनी याकामी शपथपत्र व कागदयादीसोबत तक्रारदाराने दुसरे खाते उघडताना भरुन दिलेला फॉर्म, वित्त मंत्रालयाचे पत्राची प्रत, तक्रारदार यांचा खाते बंद करण्याचा अर्ज, डायरेक्टोरेट यांचे पत्र, सीबीएस मॅन्युअलची प्रत, जाबदार क्र.1 यांनी तक्रारदारास पाठविलेले पत्र, तक्रारदारांनी जाबदार क्र.1 यांना पाठविलेली नोटीस, सदर नोटीसीस जाबदार यांनी दिलेले उत्तर, पोस्ट ऑफिस सेव्हिंग्ज बॅंक जनरल रुल 1981 ची प्रत इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच पुरावा शपथपत्र दाखल केले आहे.
6. जाबदार क्र.2 यांनी याकामी हजर होवून म्हणणे दाखल केले आहे. जाबदार क्र.2 या जाबदार क्र.1 यांचेकडे 1994 ते 2010 पर्यंत एजंट म्हणून काम पहात होत्या. तक्रारदारांनी सन 2003 मध्ये उघडलेले सार्वजनिक भविष्य निधीचे खाते हे नियमांचे पूर्णतः पालन करुन उघडलेले होते. त्यानंतर सन 2008 मध्ये तक्रारदारांनी उघडलेले खाते हे जाबदार क्र.1 यांचे सांगणेवरुन HUF अंतर्गत उघडलेले असून तेही नियमानुसार उघडलेले आहे. तक्रारदार व जाबदार क्र.2 यांचेमध्ये ग्राहक व सेवापुरवठादार असे नाते अस्तित्वात नव्हते. जाबदार क्र.1 यांचे कडील सर्व खात्यांची दरवर्षी तपासणी (Audit) केली जाते. त्यामुळे तक्रारदारांचे खात्याच्या वैधतेबाबतची तपासणी, पडताळणी करण्याची सर्वस्वी जबाबदारी जाबदार क्र.1 यांची होती. खाते उघडण्याबाबत जाबदार क्र.2 यांची कोणतीही जबाबदारी नाही. तक्रारदारांनी जाबदार क्र.1 यांचेकडून रकमेची मागणी केलेली आहे. जाबदार क्र.2 कडून कोणतीही मागणी केली नसल्यामुळे जाबदार क्र.2 यांचे नांव तक्रारअर्जातून वगळणेत यावे अशी मागणी जाबदार क्र.2 यांनी केली आहे.
7. तक्रारदाराची तक्रार, शपथपत्र, दाखल कागदपत्रे व पुरावा शपथपत्र, तसेच जाबदार क्र.1 व 2 यांनी दाखल केलेले म्हणणे, शपथपत्र, कागदपत्रे तसेच उभय पक्षांचा युक्तिवाद यांचे अवलोकन करता खालील मुद्दे निष्कर्षासाठी उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक आहेत काय ? | होय. |
2 | जाबदार यांनी तक्रारदारास सेवा देण्यामध्ये त्रुटी केली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे जाबदार क्र.1 यांचेकडील सार्वजनिक भविष्य निधी (HUF) अंतर्गत खाते क्र. 0208198262 मध्ये जमा केलेल्या रकमेवरील व्याजाची रक्कम रु.7,80164/- मिळणेस व नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालीलप्रमाणे |
कारणमिमांसा
मुद्दा क्र.1
8. जाबदार क्र.1 हे पोस्ट ऑफिस म्हणून संपूर्ण भारतभर कार्यरत आहेत. ते ठेवी स्वीकारणे, बचत खाते काढणे, सार्वजनिक भविष्य निधी, सुकन्या योजना अशा अनेक योजनांद्वारे ठेवी स्वीकारून त्यावर गुंतवणूकदारांना व्याज देत असतात. जाबदार क्र.2 या जाबदार क्र.1 यांच्या नोंदणीकृत एजंट असून त्यांचा नोंदणी क्रमांक SAS 1476/95 आहे. तक्रारदार यांनी जाबदार क्र.1 यांचेकडे सार्वजनिक भविष्य निधी या योजनेअंतर्गत भविष्यकालीन वृद्धकालावधीची तरतूद म्हणून रकमा गुंतविलेल्या आहेत. तक्रारदार यांनी जाबदार क्र.2 यांचे मार्गदर्शनाप्रमाणे जाबदार क्र.1 यांचेकडे दिनांक 24/02/2003 रोजी सार्वजनिक भविष्य निधी अंतर्गत खाते उघडले असून त्याचा खाते क्रमांक 1833171653 असा आहे. त्यानंतर तक्रारदारांनी जाबदार क्र.2 च्या मार्गदर्शनाप्रमाणे जाबदार क्र.1 यांचेकडे दिनांक 18/01/2008 रोजी सार्वजनिक भविष्य निधी (HUF) अंतर्गत खाते उघडले असून त्याचा खाते क्रमांक 0208198262 असा आहे. सदरील बाब जाबदार क्र.1 यांनी त्यांचे म्हणणेमध्ये मान्य केली आहे तसेच जाबदार क्र.2 हिने तक्रारदार यांचे खाते क्रमांक 1833171653 व 0208198262 ही दोन्ही खाती भविष्य निर्वाह निधी अंतर्गत जाबदार क्र.1 यांच्या नियमानुसार नियमांचे पालन करून उघडल्याची बाब तिचे म्हणणेमध्ये मान्य केली आहे. सबब, तक्रारदार व जाबदार यांचेमध्ये ग्राहक व सेवा पुरवठादार असे नाते निर्माण झालेले असल्याने तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक आहेत असे या आयोगाचे मत आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी देण्यात आलेले आहे.
मुद्दा क्र.2
9. तक्रारदाराचे कथनानुसार तक्रारदारांनी जाबदार क्र.2 यांचे मार्गदर्शनाप्रमाणे जाबदार क्र.1 यांचेकडे सन 2003 साली सार्वजनिक भविष्य निधी अंतर्गत खाते उघडलेले असून त्याचा क्रमांक 1833171653 असा आहे. सदर खात्याचे पासबुक जाबदार क्र.2 यांनी तक्रारदारांना दिले आहे. तेव्हापासून अर्जदार सदर खात्यामध्ये वेळोवेळी पैसे भरत होते व त्याप्रमाणे सदर खाते पुस्तकावर नोंद असून वेळोवेळी व्याजाची नोंद देखील जाबदार क्र.1 यांनी केलेली आहे. त्यानंतर सन 2008 मध्ये तक्रारदार यांनी जाबदार क्र.2 यांचे मार्गदर्शनाप्रमाणे जाबदार क्र.1 यांचेकडे सार्वजनिक भविष्य निधी खाते (HUF) उघडले असून त्याचा खाते क्र. 0208198262 असा आहे. जाबदार क्र.1 यांनी सदर खात्याचे पासबुक तक्रारदार यांना दिलेले असून त्यावर तक्रारदाराने वेळोवेळी भरलेल्या रकमेची नोंद आहे. तसेच सदरील पासबुकवर जाबदार क्र.1 यांनी वेळोवेळी व्याजाची नोंद केलेली आहे. त्यामुळे तक्रारदार यांची दोन्ही खाती जाबदार क्र.2 मार्फत जाबदार क्र.1 यांचेकडे उघडलेली असलेने दोन्ही खाती जाबदार क्र.1 यांच्या देखरेखीखाली असून त्यावर जाबदार क्र.1 यांनी वेळोवेळी व्याजाची नोंद केली आहे. तक्रारदाराने दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन करता तक्रारदाराने तक्रारीसोबत जाबदार क्र.1 यांचेकडील सन 2003 मधील सार्वजनिक भविष्य निधि खात्याचे खाते क्रमांक 1833171653 चे पासबुक व सन 2008 मधील सार्वजनिक भविष्य निधी अंतर्गत उघडलेले खाते क्रमांक 0208198262 चे पासबुक दाखल केल्याचे दिसून येते. सदरील दोन्ही पासबुकांचे अवलोकन केले असता सदरील दोन्ही खाती जाबदार क्र.1 यांचे वतीने जाबदार क्र.2 ने उघडल्याचे दिसून येत आहे. दोन्ही पासबुकावर जाबदार क्र.2 हिचे नांव जाबदार क्र.1 यांचे अधिकृत एजंट म्हणून नमूद केलेले आहे. सबब, तक्रारदारांची भविष्य निर्वाह निधी अंतर्गत दोन्ही खाती जाबदार क्र.1 यांचे वतीने जाबदार क्र.2 हिने उघडलेली आहेत ही बाब पूर्णपणे शाबीत होत आहे तसेच सदर दोन्ही खात्यावर तक्रारदार वेळोवेळी रक्कम भरत आले आहेत व त्यावर जाबदार क्र.1 यांनी वेळोवेळी व्याजाची नोंद केली आहे हे स्पष्टपणे दिसून येत आहे.
10. तक्रारदाराचे कथनानुसार, तक्रारदार सार्वजनिक भविष्य निधी (HUF) अंतर्गत उघडलेल्या खाते नंबर 0208198262 मध्ये सन 2020 मध्ये पैसे भरण्यास गेले असता त्यांना सदरचे खात्यामध्ये पैसे भरणेपासून रोखण्यात आले व सार्वजनिक भविष्य निधी योजनेअंतर्गत नजरचुकीने दोन खाती उघडण्यात आलेली आहेत. त्यामुळे सदर योजनेअंतर्गत दोन खाती उघडण्यास जाबदार यांना परवानगी नसल्यामुळे दोन्ही खात्यापैकी एक खाते तक्रारदारास बंद करावे लागेल असे सूचित करण्यात आले आणि तशा प्रकारच्या अर्जाची मागणी तक्रारदार यांच्याकडे करण्यात आली. त्याप्रमाणे तक्रारदारांनी दिनांक 18/07/2020 रोजी जाबदार क्र.1 यांना अर्ज देऊन खाते क्रमांक 1833171653 बंद करून त्यावरील व्याजाची मागणी केली. त्यानंतर जाबदार क्र.1 यांनी तक्रारदारांना दिनांक 24/07/2020 रोजी नोटीस पाठवून खाते क्रमांक 1833171653 बंद करण्याऐवजी 2008 साली सार्वजनिक भविष्य निधी अंतर्गत उघडलेले खाते नंबर 0208198262 बंद करण्यास सांगितले. सदरील नोटीसला तक्रारदारांनी उत्तर देऊन पोस्ट ऑफिस सेव्हींग्ज बँक जनरल रूल 1981 चे रुल 16(1) प्रमाणे तक्रारदाराचे खाते दुसऱ्या कोणत्या तरी योजनेमध्ये हस्तांतरण करावे अथवा रुल 16(2) प्रमाणे खाते बंद करून त्यावर योग्य ते व्याज आकारून रक्कम द्यावी अशी मागणी केली. परंतु जाबदार क्र.1 यांनी दि.1/09/2020 रोजी खाते क्रमांक 0208198262 बंद करून सदर खात्यावरील व्याज वजा करून फक्त मुद्दल रुपये 13,67,500/- चा चेक तक्रारदारास रजि.पोस्टाने पाठवून दिला आणि व्याजाची रक्कम रुपये 7,80,164/- देण्यास टाळाटाळ करून सेवा देण्यात गंभीर त्रुटी केली आहे. तक्रारदारांनी व जाबदार क्र.1 यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारदारांनी खाते क्रमांक 1833171653 व खाते क्रमांक 0208198262 वर खाते उघडलेल्या तारखेपासून नियमित सन 2020 अखेर रक्कम भरलेली दिसून येत आहे. तसेच जाबदार क्र.1 यांनी संबंधित दोन्ही खात्यावर नियमितपणे सन 2020 अखेर व्याजाची आकारणी केल्याचे दिसून येत आहे. तसेच खाते क्रमांक 0208198262 च्या पासबुकावर HUF असे नमूद केल्याचे दिसून येत आहे. सदरील दोन्ही खाती जाबदार क्र.2 हिने जाबदार क्र.1 च्या वतीने जाबदार क्र.1 चा एजंट या नात्याने उघडलेली आहेत. जाबदार क्र.2 जाबदार क्र.1 यांची एजंट असल्याची बाब जाबदार क्र.1 यांनी त्यांचे म्हणणेमध्ये मान्य केली आहे. तसेच जाबदार क्र.2 यांनी संबंधित दोन्ही खाती जाबदार क्र.1 यांचेच सांगण्यावरून नियमांचे पालन करून उघडलेली आहेत असे तिचे म्हणणेमध्ये नमूद केले आहे. जाबदार क्र.1 चे कथनानुसार दिनांक 18/01/2018 रोजी खाते क्रमांक 0208198262 उघडताना तक्रारदारांनी दिनांक 24/02/2003 रोजी सातारा शहर पोस्ट ऑफिसमध्ये काढलेल्या खाते क्रमांक 1833171653 ची माहिती जाणीवपूर्वक लपवून चुकीचे व खोटे घोषणापत्र देऊन जाबदार क्र.1 ची फसवणूक केली आहे. तक्रारदारांनी खाते क्रमांक 0208198262 नियमांचा भंग करून फसवून उघडले असल्याने ते अनियमित असल्यामुळे बंद करण्यात आलेले आहे. जाबदारांनी बचावाचे पुष्ठयर्थ तक्रारदाराने कसे खोटे घोषणापत्र दिले आहे ही बाब पुराव्यानिशी शाबीत केलेली नाही. जाबदार क्र.1 ने तक्रारदार यांचा दि.18/01/2008 रोजीचा फॉर्म दाखल केलेला आहे. सदर फॉर्मवरील घोषणापत्रामधील हस्ताक्षर हे तक्रारदाराचे असून ते घोषणापत्र तक्रारदाराने लिहिले आहे हे जाबदार क्र.1 यांनी सिद्ध केलेले नाही. वस्तुतः जाबदार क्र.2 हिला तक्रारदाराने तिचेमार्फत सन 2003 मध्ये उघडलेल्या भविष्य निर्वाह निधी खाते क्रमांक 1833171653 ची संपूर्ण माहिती होती. त्यामुळे तक्रारदाराचे सन 2008 मध्ये HUF खाते उघडताना संबंधित खाते नियमानुसार उघडता येणार नाही याची संपूर्ण माहिती व नियमांची माहिती जाबदार क्र.2 हीस असताना सुध्दा जाबदार क्र.1 यांनी जाबदार क्र.2 हिचेमार्फत तक्रारदारास सन 2008 मध्ये खाते क्रमांक 0208198262 उघडण्यास परवानगी दिली. यावरून जाबदार क्र.1 व 2 यांनी बेजबाबदारपणे नियमांचे उल्लंघन करून तक्रारदाराचे खाते क्रमांक 0208198262 उघडले ही बाब पूर्णपणे शाबीत होत आहे असे आयोगाचे मत आहे. तक्रारदाराचे खात्याचे वैधतेबाबतच्या कागदपत्रांची तपासणी व पडताळणी करण्याची सर्वस्वी जबाबदारी ही जाबदार क्र.1 व 2 यांची होती. तसेच जाबदार क्र.1 यांचे दरवर्षीचे ऑडिटमध्ये तक्रारदाराने नियमांचे उल्लंघन करून खोटे घोषणापत्र देऊन चुकीच्या पद्धतीने खाते क्रमांक 0208198262 उघडले आहे ही बाब का निदर्शनास आली नाही याचे कोणतेही स्पष्टीकरण जाबदारांनी दिलेले नाही. केवळ तक्रारदार यांनी जाबदार क्र.1 यांची फसवणूक करून खाते उघडले आहे असे भासवून जाबदार क्र.1 यांनी स्वतःची नैतिक व कायदेशीर जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न केला आहे. वस्तुतः तक्रारदाराला भविष्य निर्वाह निधी अंतर्गत खाते उघडताना नियमांची माहिती करून देण्याची संपूर्ण कायदेशीर जबाबदारी जाबदार क्र.1 व 2 यांच्यावर होती. परंतु ती जबाबदारी त्यांनी पार पाडलेली नाही. तक्रारदाराला नियमांची माहिती दिलेली असतानाही त्याने चुकीच्या पद्धतीने, नियमांचे उल्लंघन करून फसवणूक करून खाते उघडले अशा प्रकारचा बचाव जाबदार यांनी घेतलेला नाही. त्यामुळे तक्रारदाराने फसवणूक करुन चुकीचे पध्दतीने खाते क्रमांक 0208198262 उघडले आहे ही बाब कागदोपत्री पुराव्यानिशी शाबीत झालेली नाही या निष्कर्षाप्रत हा आयोग येत आहे.
11. जाबदार क्र.1 यांनी फॉर्मवर घोषणापत्र लिहून घेत असताना तक्रारदाराचे खाते क्रमांक 1833171653 भविष्य निर्वाह निधी अंतर्गत उघडले आहे ही बाब जाबदार क्र.2 हीस माहीत असताना जाबदार क्र.2 हिने तक्रारदार यांचेकडून सन 2009 अखेर खाते क्रमांक 1833171653 व 0208198262 वर गुंतवलेल्या रकमा स्वीकारलेल्या आहेत व जाबदार क्र.1 यांनी संबंधीत खात्यावर जमा करुन घेतलेल्या आहेत. तसेच सन 2009 नंतर तक्रारदाराने स्वतः वेळोवेळी संबंधित खात्यावर गुंतवलेल्या रकमा जाबदार क्र.1 यांनी स्वीकारलेल्या आहेत व त्यावर व्याजाची आकारणी केलेली आहे. तक्रारदाराने दि.18/07/20 रोजी खाते क्रमांक 1833171653 बंद करण्याबाबत अर्ज देईपर्यंत जाबदार यांनी तक्रारदार यांनी चुकीच्या पद्धतीने फसवणूक करून व नियमांचे उल्लंघन करून खाती उघडले आहेत अशी हरकत घेतलेली नव्हती. यावरून तक्रारदारांचे खाते क्रमांक 0208198262 हे 2020 अखेर नियमित होते ही बाब स्पष्ट होते. त्यामुळे तक्रारदाराचे खाते बंद करण्यास पात्र नव्हते या निष्कर्षाप्रत की आयोग येत आहे.
12. तक्रारदार यांचे खाते उघडण्याच्या फॉर्मवर घोषणापत्र लिहून घेत असताना तक्रारदार यांचे सातारा शहर पोस्ट ऑफिस मध्ये दि.24/02/2003 रोजी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी अंतर्गत जाबदार क्र.2 मार्फत खाते क्रमांक 1833171653 काढले आहे ही बाब जाबदार क्र.2 हिस माहित होती. परंतु सदरील बाब जाबदार क्र.2 हिने जाबदार क्र.1 यांच्या निदर्शनास आणून दिली नाही आणि सदर बाब लपवून ठेवली. त्यामुळे जाबदार क्र.1 यांचे फसवणुकीस सर्वस्वी जाबदार क्र.2 ही जबाबदार आहेत असे या आयोगाचे मत आहे. तसेच खाते क्रमांक 0208198262 उघडल्यापासून जाबदार क्र.2 हीने तिचा परवाना सन 2010 साली रद्द होईपर्यंत सदरील खात्याबाबतची माहिती जाबदार क्र.1 यांना दिली नाही व तद्नंतरही दिलेली नाही आणि त्यामुळे अव्याहतपणे तक्रारदारांचे खाते क्रमांक 0208198262 दिनांक 1/09/20 पर्यंत चालू होते. यावरुन तक्रारदाराचे खाते क्रमांक 0208198262 नियमांचे उल्लंघन करून चुकीच्या पद्धतीने उघडण्यास जाबदार क्र.1 यांचा गैरकारभार आणि निष्काळजीपणा कारणीभूत आहे हे स्पष्ट होते. त्यामुळे जाबदार यांनी तक्रारदार यांना सदोष व त्रुटीयुक्त सेवा दिलेली आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. जाबदारांनी स्वतःच्या चुकीचे खापर तक्रारदार यांचे माथी मारुन तक्रारदारास सन 2008 साली भविष्य निधी (HUF) अंतर्गत उघडलेल्या खाते क्र. 0208198262 वरील व्याजाची रक्कम अदा न करुन तक्रारदारास ग्राहक म्हणून सेवा देण्यात गंभीर त्रुटी निर्माण केली आहे. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर होकारार्थी देण्यात आले आहे.
मुद्दा क्र.3
13. तक्रारदाराने जाबदार क्र.1 यांचेकडे सन 2008 साली सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी HUF अंतर्गत खाते क्र. 0208198262 वर सन 2008 सालापासून ते सन 2020 पर्यंत रक्कम गुंतविली आहे. तक्रारदाराने दाखल केलेल्या खाते क्र. 0208198262 चे पासबुकाचे अवलोकन करता सदर पासबुकावर दि. 1/09/2020 अखेर रक्कम रु.21,47,664/- इतकी रक्कम जमा असल्याचे दिसून येते. तसेच जाबदार क्र.1 यांनी तक्रारदाराने खाते क्र.0208198262 वर गुंतविलेल्या रकमेवर सन 2020 अखेर व्याजाची आकारणी करुन व्याज जमा केल्याचे दिसून येते. तक्रारदाराला जाबदार क्र.1 यांनी सार्वजनिक भविष्य निधी या योजनेअंतर्गत दोन्ही खाती उघडण्यास परवानगी नाही. त्यामुळे तक्रारदारास दोन्हीपैकी एक खाते बंद करावे लागेल असे सांगितले व तशा प्रकारची अर्जाची मागणी तक्रारदाराकडे केली. त्यामुळे दि.18/07/2020 रोजी जाबदार यांचेकडे तक्रारदाराने अर्ज देवून तक्रारदाराने 2003 साली भविष्य निर्वाह निधी अंतर्गत उघडलेले खाते क्र. 1833171653 बंद करुन त्यावरील रकमेची मागणी केली. त्यानंतर जाबदार क्र.1 यांनी तक्रारदारास दि. 24/07/2020 रोजी नोटीस पाठवून खाते क्र. 0208198262 हे नियमांचे उल्लंघन करुन उघडले असल्यामुळे बंद करण्यास सांगितले. त्यास तक्रारदाराने दि. 11/08/2020 रोजी नोटीस उत्तर देवून पोस्ट ऑफिस सेव्हिंग्ज बॅंक जनरल रुल्स 1981 रुल 16(1) नुसार तक्रारदार यांचे सदरचे खाते दुस-या कोणत्या तरी योजनेमध्ये हस्तांतरण करण्यात यावे अथवा रुल 16(2) प्रमाणे खाते क्र. 0208198262 बंद करुन त्यावर योजनेप्रमाणे योग्य ते व्याज आकारुन सदरची रक्कम तक्रारदारास द्यावी अशी मागणी केली. परंतु जाबदार क्र.1 यांनी तक्रारदारांच्या सदरच्या प्रस्तावाचा विचार न करता मनमानीपणा करुन तक्रारदार यांचे खाते क्र. 0208198262 बंद करुन त्यावरील जमा झालेली व्याजाची रक्कम तक्रारदारास अदा केली नाही. वस्तुतः जाबदार याने दाखल केलेल्या पोस्ट ऑफिस सेव्हिंग्ज बॅंक जनरल रुल 1981 मधील रुल 16(1) व 16(2) नुसार एखादे खाते चुकीच्या पध्दतीने उघडले गेले असेल तर ते दुस-या योजनेअंतर्गत हस्तांतरण करण्याचे अथवा संबंधीत खाते बंद करुन त्यावर योजनेप्रमाणे योग्य ते व्याज आकारुन सदरची रक्कम खातेदारास देण्याचे अधिकार जाबदार क्र.1 यांना आहेत. परंतु सदरील अधिकारांचा वापर करुन जाबदार क्र.1 यांनी तक्रारदाराचे संबंधीत खाते क्र. 0208198262 दुस-या योजनेअंतर्गत हस्तांतरण करण्याऐवजी व्याजाची रक्कम देण्याची टाळाटाळ केली आहे हे स्पष्टपणे दिसून येते. तक्रारदारांचे खाते क्र. 0208198262 चे खाते नियमांचे उल्लंघन करुन चुकीचे पध्दतीने जाबदार क्र.1 व 2 यांनी उघडलेले असल्याने ते दुस-या योजनेत हस्तांतरण करुन ते खाते नियमित करुन देण्याची संपूर्ण कायदेशीर जबाबदारी सेवापुरवठादार म्हणून जाबदार यांचीच होती व आहे. परंतु सदरील जबाबदारी जाबदार यांनी पार पाडलेली नाही व पोस्ट ऑफिस सेव्हिंग्ज बॅंक जनरल रुल 1981 चे कलम 17 चा नियम लागू करुन तक्रारदारास गुंतवणूकीवरील व्याजाची रक्कम देण्याचे टाळले आहे. वस्तुतः तक्रारदाराचे खाते क्र. 0208198262 हे चुकीच्या पध्दतीने नियमांचे उल्लंघन करुन उघडण्यास सर्वस्वी जाबदार क्र.1 व 2 हे जबाबदार असून त्यामध्ये तक्रारदाराचा काहीही संबंध नाही. त्यामुळे पोस्ट ऑफिस सेव्हिंग्ज बॅंक जनरल रुल 1981 चे कलम 17 च्या तरतुदी तक्रारदारास गैरलागू आहेत असे आयोगाचे मत आहे. त्यामुळे तक्रारदार जाबदार क्र.1 यांचेकडील सार्वजनिक भविष्य निधी HUF अंतर्गत खाते क्र. 0208198262 मध्ये जमा केलेल्या रकमेवरील व्याजाची रक्कम रु.7,80,164/- मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
14. जाबदार यांनी दाखल केलेल्या दी पब्लीक प्रॉव्हिडंड फंड स्कीम 1968 चे नोटीफिकेशनचे कलम 9 नुसार जर चुकीने दोन खाती उघडली गेली तर ती वित्त मंत्रालयाकडून एकत्रित करुन गुंतवणूकदारास व्याज देण्याचा अधिकार दिलेला आहे. परंतु सदरील अधिकाराची माहिती जाबदार क्र.1 यांनी तक्रारदारास दिलेली नाही. यावरुन जाबदार क्र.1 यांनी स्वतःचे गैरकारभाराकडे दुर्लक्ष करुन तक्रारदारास चुकीचे ठरवून व्याजाची रक्कम तक्रारदारास देण्यास टाळाटाळ केली आहे. ही बाब पूर्णतः जाबदार क्र.1 व 2 यांचे वर्तनावरुन शाबीत होत आहे असे या आयोगाचे मत आहे. वस्तुतः गुंतवणुकदारास नियमांची माहिती करुन देण्याची कायदेशीर जबाबदारी सर्वस्वी जाबदार यांची आहे. त्यासाठी हा आयेाग खालील न्यायनिवाडयाचा आधार घेत आहे.
- WP No. 2042/2023 before the High Court of Karnataka
Sri K. ShankarlalVs. The Post Master Hsg.I
In the light of unequivocal facts as narrated hereinabove and the judgment of the Apex Court in the case of BHAGWATI VANASPATHI TRADERS (supra), the petition deserves to succeed, albeit, in part. The petitioner would be entitled to interest under the Scheme, only up to the date on which the communication comes to the petitioner i.e. 23-09-2021. On and from 23-09-2021, the account of the petitioner till its maturity shall carry interest at the scheduled Banks lending rate and not the rate of interest under the Scheme. Parting observation in the facts and circumstances of the case would not be inapt. The 1st and 2nd respondents should set their house in order. In this digital age, it is necessary that 1st and 2nd respondents update themselves with regard to such accounts and not wake up from slumber after several years and penalize the investors. The investor, as in the case at hand, is a common man and would not know the prevailing law. He was only interested in investment and in return wants to have interest on such investment. It is for the Authorities to detect such accounts which are opened irregularly as soon as they are opened, on intermittent scrutiny of the accounts and inform such investors immediately, failing which, the Officers who manage such accounts should be held responsible and accountable for such dereliction of duty. It is necessary for the respondents to issue these instructions to all the Post Offices who handle such accounts, so that the common man does not bear the brunt of unnecessary litigation.
सदरचा निवाडा प्रस्तुत प्रकरणास तंतोतंत लागू होतो असे या आयोगाचे मत आहे.
15. तक्रारदार यांनी स्वकमाईतून कमावलेले पैसे जाबदार क्र.1 यांचेकडे भविष्य निधी योजनेअंतर्गत भविष्यकालीन वृध्दकालावधीची तरतूद म्हणून गुंतवलेली आहे व जाबदार यांनी सदरील रक्कम सव्याज परतफेडीच्या हमीने भविष्य निर्वाह निधीमध्ये गुंतवलेली आहे व जाबदार यांनी तक्रारदाराचे खाते क्र. 0208198262 वरील रक्कम सन 2020 अखेर वापरलेली आहे. जाबदार क्र.1 यांनी तक्रारदारास दि. 1/09/2020 च्या चेक नं. 46646 ने खाते क्र. 262 वर गुंतवलेली रक्कम रु.13,67,500/- अदा केलेली आहे. परंतु व्याजाची रक्कम रु.7,80,164/- अदा केलेली नाही. त्यामुळे सदरील खात्यावरील रक्कम व्याजासहीत देण्याची कायदेशीर जबाबदारी जाबदार यांचेवर आहे.
16. सबब, तक्रारदार हे व्याजाची रक्कम रु.7,80,164/- मिळणेस पात्र आहेत तसेच तक्रारदार सदर रकमेवर दि. 1/09/2020 पासून संपूर्ण रक्कम तक्रारदारास मिळेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज मिळणेस पात्र आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. तसेच जाबदार यांनी व्याजाची रक्कम देणेचे नाकारल्यामुळे तक्रारदारास मानसिक त्रास सहन करावा लागला व त्याला आयोगात तक्रारअर्ज दाखल करावा लागला. या बाबींचा विचार करता तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रु. 25,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रु. 5,000/- मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब आदेश.
आदेश
- तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
- जाबदार क्र.1 यांनी तक्रारदारास व्याजाची रक्कम रु.7,80,164/- अदा करावी तसेच सदर रकमेवर दि. 1/09/2020 पासून संपूर्ण रक्कम तक्रारदारास मिळेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज अदा करावे.
- जाबदार क्र.1 यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु.25,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.5,000/- अदा करावेत.
- सदर आदेशाचे अनुपालन जाबदार क्र.1 यांनी निकालाची प्रत मिळालेपासून 45 दिवसांचे आत करावे.
- जाबदार यांनी विहीत मुदतीत सदर आदेशाचे अनुपालन न केल्यास तक्रारदार यांना ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदींनुसार योग्य ती दाद मागणेची मुभा राहील.
- सदर आदेशाच्या प्रती उभय पक्षकारांना नि:शुल्क देण्यात याव्यात.