-निकालपत्र–
(पारित व्दारा- सौ.चंद्रिका किशोरसिंह बैस, मा.सदस्या.)
( पारित दिनांक-23 जानेवारी, 2017)
01. तक्रारकर्त्याची ही तक्रार ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली विरुध्दपक्ष विमा कंपनी विरुध्द विमित वाहनाचे अपघाता संबधाने विमा दावा मिळण्यासाठी दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालील प्रमाणे-
तक्रारकर्ता उपरोक्त नमुद पत्त्यावर राहत असून तो व्यवसायाने डॉक्टर आहे. यातील विरुध्दपक्ष क्रं-1) ही विमा कंपनी असून तिचे कडे कारचा विमा उतरविलेला आहे. विरुध्दपक्ष क्रं-2) हा कारचा पूर्वीचा मालक असून याचेच नावावर कारचा विमा आहे आणि विरुध्दपक्ष क्रं-3) याचे कडून सदर कार तक्रारकर्त्याने विकत घेतलेली आहे. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं-3) कडून फीयेस्टा कार क्रं-MH-31/C.P.-1628, जिचा चेसिस क्रं-7-K-49066 दिनांक-28/10/2011 रोजी विकत घेतली. कार विकत घेते वेळी दस्तऐवजा वरुन ती कार विरुध्दपक्ष क्रं-2) याचे मालकीची होती व ती विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनी कडे विमाकृत असल्याचे दिसून आले. सदर कारचे विमा पॉलिसीचा क्रं-110001208130 असा असून विम्याचा कालावधी हा दिनांक-10/03/2011 ते दिनांक-09/03/2012 असा होता आणि सदर कार ही युनियन बँक ऑफ इंडीया यांचेकडे गहाण होती. कागदपत्रांची शहानिशा केल्या नंतर तक्रारकर्त्याने ती कार दिनांक-28/10/2011 रोजी खरेदी केली.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, सदर कारला नवेगाव (साधू) उमरेड भिवापूर रोड, तहसिल व जिल्हा नागपूर येथे दिनांक-08/11/2011 रोजी अपघात झाला आणि त्यात संपूर्ण कार नष्ट झाली. तक्रारकर्त्याने अधिवक्ता श्री अंबरवेले यांचे मार्फतीने विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनीने दिनांक-25/09/2012 रोजी काढलेली किम्मत रुपये-3,33,900/- प्रमाणे नुकसान भरपाई मिळण्यासाठी विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनीला नोटीस पाठविली, सदर नोटीस प्राप्त होऊनही विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनीने उत्तर दिले नाही वा नुकसान भरपाईची रक्कमही दिली नाही. सदर कार ही पूर्वीचे मालक श्री अशोक पत्नी यांचे नावे युनियन बँक ऑफ इंडीया यांचेकडे गहाण असल्याने व बँकेचे ना-हरकत-प्रमाणपत्र मिळण्या करीता उशिर झाल्यामुळे कारची ट्रॉन्सफर तक्रारकर्त्याचे नावे होऊ शकली नाही व त्या दरम्यान कारला
अपघात झाला. म्हणून तक्रारकर्त्याने विमाकृत कारला झालेल्या नुकसानी संबधी भरपाई मिळण्या करीता ग्राहक मंचात तक्रार दाखल करुन पुढील प्रमाणे मागण्या केल्यात-
विमाकृत फीयेस्टा कार क्रं-MH-31/C.P.-1628, चेसिस क्रं-7-K-49066 ला झालेल्या अपघातामुळे नुकसान भरपाई म्हणून रुपये-3,33,900/- वार्षिक-18 टक्के व्याजासह विरुध्दपक्षा कडून देण्याचे आदेशित व्हावे. याशिवाय त्याला झालेल्या मानसिक त्रासा बद्दल रुपये-50,000/- व तक्रारखर्च रुपये-5000/- मिळावा अशा मागण्या केल्यात.
03. मंचाचे मार्फतीने यातील विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनीचे नावे दैनिक लोकमत दिनांक-05/04/2016 रोजी जाहिर नोटीस प्रसिध्द करण्यात आली परंतु विरुध्दपक्ष क्रं-1) गैरहजर असल्याने त्याचे विरुध्द तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश मंचाने दिनांक-17/06/2016 रोजी पारीत केला.
04. विरुध्दपक्ष क्रं-2) व क्रं-3) यांना अनुक्रमे नि.क्रं-6 व 7 प्रमाणे मंचाची रजिस्टर नोटीस मिळाल्याच्या पोच अभिलेखावर दाखल आहेत परंतु तरीही ते गैरहजर असल्याने त्यांचे विरुध्द तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश मंचाने दिनांक-20/12/2014 रोजी पारीत केला.
05. तक्रारकर्त्या तर्फे दाखल दस्तऐवजांचे अवलोकन करण्यात आले. तसेच तक्रारकर्त्याचे वकीलांचा मौखीक युक्तीवाद यावरुन मंचाचा निष्कर्ष पुढील प्रमाणे-
:: निष्कर्ष ::
06. तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीचे पुष्टयर्थ खालील प्रमाणे दस्तऐवजाच्या प्रती दखल केल्यात. पान क्रं-7) वर कार रसीदची पावती असून त्यावरुन असे दिसून येते की, सदर कार ही विरुध्दपक्ष क्रं-2) अशोक विठ्ठलराव पत्की याने तक्रारकर्त्याला दिनांक-28/10/2011 रोजी विक्री केल्याचे आणि सदर रसीदवर खरेदीदार व विक्री करणारा यांच्या सहया असल्याचे दिसून येते. दस्तऐवज क्रं-9) व 10) प्रमाणे सदर कारची विमा पॉलिसी ही विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनी कडून जारी असून सदर पॉलिसी विरुध्दपक्ष क्रं-2) अशोक पत्की याचे नावे असून विम्याचा कालावधी हा दिनांक-10/03/2011 ते दिनांक-09/03/2012 असा आहे. दस्तऐवज क्रं-11) वर तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनीला दिनांक-25/09/2012 रोजीची पाठविलेली कायदेशीर नोटीसची प्रत तर दस्तऐवज क्रं-13) वर रजिस्टर पोस्टाची पावती व पोच आहे. दस्तऐवज क्रं-14) वर एफआयआरची प्रत असून त्यावरुन सदर कारचा अपघात हा दिनांक-08/11/2011 रोजही नवेगाव साधू शिवारा जवळील रोडवर झाला व अपघाताचे वेळी त्यात तक्रारकर्त व त्याचे मित्र होते असे नमुद आहे. पान क्रं-17 वर घटनास्थळ पंचनामा आहे.
07. यात महत्वाचा प्रश्न असा उपस्थित होतो की, विमाकृत कार ही अपघाताचे वेळी तक्रारकर्त्याचे नावे आर.टी.ओ. कार्यालया कडून ट्रान्सफर झाली होता किंवा कसे-
सदर कारची विमा पॉलिसी ही विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनी कडून जारी असून ही विमा पॉलिसी विरुध्दपक्ष क्रं-2) अशोक पत्की (पूर्वीचे कार मालक) याचे नावे असून विम्याचा कालावधी हा दिनांक-10/03/2011 ते दिनांक-09/03/2012 असा असल्याचे विमा पॉलिसीचे प्रतीवरुन दिसून येते. सदर विमाकृत कारचा अपघात हा दिनांक-08/11/2011 रोजही नवेगाव साधू शिवारा जवळ रोडवर झाला. अपघात हा विमा कालावधीत झाला ही बाब जरी खरी असली तरी अपघात तारखे पर्यंत विमा पॉलिसी आणि आर.टी.ओ.कार्यालयातील अभिलेखात कारचे मालकीची नोंद मात्र पूर्वीचेच मालक विरुध्दपक्ष क्रं-2) अशोक पत्की याचे नावे होती, तसेच अपघात तारखे पर्यंत तक्रारकर्त्याचे नावे आर.टी.ओ. कार्यालया कडून कारची मालकी हस्तांतरीत झालेली नव्हती ही सत्य वस्तुस्थिती या प्रकरणातील आहे.
08. तक्रारकर्त्याचे असे म्हणणे आहे की, त्याने कार विकत घेताना ती कार युनियन बँक ऑफ इंडीया यांचेकडे विरुध्दपक्ष क्रं-2) अशोक पत्की याचे नावे गहाण होती आणि युनियन बँक ऑफ इंडीया यांचे कडून त्याला ना-हरकत-प्रमाणपत्र मिळण्यास उशिर झाल्यामुळे ती कार तक्रारकर्त्याचे नावे अपघाताचे तारखे पर्यंत आर.टी.ओ. कार्यालयातील अभिलेखात हस्तांतरीत होऊ शकली नव्हती. तक्रारकर्त्याच्या म्हणण्या प्रित्यर्थ प्रत्यक्ष्य कायद्दातील तरतुदी काय आहेत हे पाहणे येथे महत्वाचे आहे.
09. सदर तक्रारीचे संदर्भात हे मंच मा.राष्ट्रीय ग्राहक आयोग, न्यु दिल्ली यांनी REVISION PETITION NO.118 OF 2013 National Insurance Co. Ltd. Versus Jai Bhagwan & others या पारीत निवाडयावर आपली भिस्त ठेवीत आहे. सदर निवाडयामध्ये मोटर वाहन कायदा, 1988 चे कलम-157 च्या तरतुदी कडे लक्ष वेधले, त्यातील तरतुद खालील प्रमाणे आहे-
Section 157 of the Motor Vehicles Act, 1988 which reads as under: -
Transfer of Certificate of Insurance:
(1) Where a person in whose favour the certificate of insurance has been issued in accordance with the provisions of this Chapter transfers to another person the ownership of the motor vehicle in respect of which such insurance was taken together with the policy of insurance relating thereto, the certificate of insurance and the policy described in the certificate shall be deemed to have been transferred in favour of the person to whom the motor vehicle is transferred with effect from the date of its transfer. [Explanation.-For the removal of doubts, it is hereby declared that such deemed transfer shall include transfer of rights and liabilities of the said certificate of insurance and policy of insurance.]
उपरोक्त (1) मध्ये नमुद केले आहे की, विमा पॉलिसी ही तेंव्हाच नविन वाहन मालकाचे नावे हस्तांतरीत होईल, ज्या दिवशी ते वाहन त्याचे नावे हस्तांतरीत झालेले आहे.
(2) The transferee shall apply within fourteen days from the date of transfer in the prescribed form to the insurer for making necessary changes in regard to the fact of transfer in the certificate of insurance and the policy described in the certificate in his favour and the insurer shall make the necessary changes in the certificate and the policy of insurance in regard to the transfer of insurance.
उपरोक्त (2) मध्ये असे नमुद केलेले आहे की, वाहन विकत घेणा-याने वाहन हस्तांतरीत झाल्याचे दिनांका पासून 14 दिवसात विहित नमुन्यात विमा पॉलिसी हस्तांतरीत करण्या बाबत विमा कंपनीकडे अर्ज करावयास पाहिजे.
As per rule Section 157 (2) of Motor Vehicles Act, 1988,GR 17, of Indian Motor Tariff Regulations the transferee of the vehicle is required to apply for transfer of insurance policy in writing and that too along with consent of the previous owner of the vehicle.
तसेच असेही नमुद आहे की मोटर वाहन कायदा-1988 चे कलम 157 (2) प्रमाणे वाहन विकत घेण्या-याने पूर्वीचे मालकाची सहमती घेऊन विमा हस्तांतरीत करण्या बाबत लेखी अर्ज करावयास पाहिजे.
10. तक्रारकर्त्याचे वकीलांनी आपली भिस्त मा. केरला राज्य ग्राहक तक्रार आयोग यांनी-2007 (1) CPR 305 “The Branch Manager-Versus-T.K. Hussain” या प्रकरणातील निवाडयावर आपली भिस्त ठेवली.
आम्ही उपरोक्त निवाडयाचे काळजीपूर्वक वाचन केले, त्यामध्ये सुध्दा खालील प्रमाणे नमुद केलेले आहे-
Under Section 157 of the Motor Vehicle Act the certificate together with the policy described therein shall be deemed to have been transferred in favour of the the new owner of the vehicle with effect from the date of transfer.
उपरोक्त तरतुदी प्रमाणे मोटर वाहन कायद्दातील कलम 157 प्रमाणे ते वाहन नविन मालकाच्या नावे हस्तांतरीत झाले पाहिजे अशी मुख्य अट आहे आणि असे वाहन हस्तांतरीत झाल्याचे दिनांका पासून विमा पॉलिसी ही नविन मालकाचे नावे हस्तांतरीत होईल, त्यामुळे तक्रारकर्त्याला या निवाडयाचा लाभ मिळू शकत नाही.
11. तक्रारकर्त्याने विकत घेतलेले वाहन पूर्वीचे मालक विरुध्दपक्ष क्रं-(2) अशोक पत्की याचे स्वाक्षरीसह विहित नमुन्यात आर.टी.ओ.अभिलेखात त्याचे नावे हस्तांतरीत केले असते तसेच हस्तांतरीत झाल्याचे दिनांका पासून 14 दिवसात विहित नमुन्यात विमा पॉलिसी हस्तांतरीत करण्या बाबत विमा कंपनीकडे अर्ज करावयास पाहिजे होता परंतु या प्रकरणात तक्रारकर्त्याने तसे काहीही केल्याचे दिसून येत नाही, त्यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष विमा कंपनी कडून कोणतीही नुकसान भरपाई मिळण्यास पात्र नाही कारण तक्रारकर्ता आणि विरुध्दपक्ष विमा कंपनी यांचे मध्ये कोणताही विमा करार झालेला नसल्याने तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष विमा कंपनीचा ग्राहक होत नाही आणि त्यामुळे तो विरुध्दपक्ष विमा कंपनी कडून विमा दावा मिळण्यास पात्र नाही, त्यामुळे तक्रार खारीज होण्यास पात्र आहे.
12. वरील सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन, आम्ही, तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-
:: आदेश ::
(01) तक्रारकर्ता श्री महेश सदाशिव सोळंकी यांची विरुध्दपक्ष क्रं-1) रिलायन्स जनरल इन्शुरन्स तर्फे विभागीय व्यवस्थापक, नागपूर तसेच इतर-2 यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
(02) खर्चा बद्दल कोणतेही आदेश नाहीत.
(03) प्रस्तुत निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारांना निःशुल्क
उपलब्ध करुन देण्यात याव्यात.