जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 214/2019. तक्रार दाखल दिनांक : 21/08/2019. तक्रार निर्णय दिनांक : 04/01/2023.
कालावधी : 03 वर्षे 04 महिने 14 दिवस
अनिल निवृत्तीराव गरड, वय 51 वर्षे,
व्यवसाय : शेती, रा. बोराळ, ता. देवणी, जि. लातूर. तक्रारकर्ता
विरुध्द
(1) राजमाता मोटार्स, दुकान नं. 9-10, अनम कॉम्प्लेक्स,
गट नं. 55, एम.आय.टी. कॉलेजजवळ, बीड बायपास रोड, औरंगाबाद.
(2) जनरल मॅनेजर, इंटरनॅशनल ट्रॅक्टर्स लि., सोनालिका इंटरनॅशनल
डी.आय. 730, आयआयएफई ट्रॅक्टर्स, व्हील चौक, गुजरन,
पी.ओ. पिपवालन, जालंधर रोड, होसियारपूर - 146 022 (पंजाब).
(3) संजय गोविंदराव डब्बे, रा. बोराळ, ता. देवणी, जि. लातूर.
ह.मु. राजमाता मोटार्स, दुकान नं. 9-10, अनम कॉम्प्लेक्स,
गट नं. 55, एम.आय.टी. कॉलेजजवळ, बीड बायपास रोड, औरंगाबाद. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- श्री. बी. ई. कवठेकर
विरुध्द क्र.1 व 3 :- अनुपस्थित / एकतर्फा चौकशी
विरुध्द पक्ष क्र.2 पक्ष यांचेकरिता विधिज्ञ :- श्री. अशोक म. काळे
आदेश
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी की, शेती सुधारणेसाठी त्यांना सोनालिका डी.आय. 730 ट्रॅक्टर खरेदी करावयाचा होता. विरुध्द पक्ष क्र.3 हे विरुध्द पक्ष क्र.1 यांचे प्रतिनिधी आहेत. ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी विरुध्द पक्ष क्र.3 यांना दि.5/3/2018 रोजी रु.1,50,000/- अनामत रोख रक्कम दिली आणि त्यासंबंधी पावती प्राप्त झाली. दि.20/6/2018 रोजी विरुध्द पक्ष क्र.1 यांना आर.टी.जी.एस. द्वारे रु.33,800/- पाठविले. कर्ज प्रकरण करुन उर्वरीत रु.2,76,200/- रक्कम विरुध्द पक्ष क्र.1 व 3 यांना दिली. त्यानंतर दि.7/3/2018 रोजी तक्रारकर्ता यांना सोनालिका डी.आय. 730 ट्रॅक्टर देण्यात आले आणि ट्रॅक्टरचा नोंदणी क्रमांक एम.एच. 24 ए.एस. 5429 आहे.
(2) तक्रारकर्ता यांचे पुढे कथन असे की, ट्रॅक्टरचा एक महिन्याकरिता वापर केला असता इंजीनमध्ये अचानक बिघाड होऊ लागला आणि ते व्यवस्थित चालत नव्हते. विरुध्द पक्ष क्र.3 यांना संपर्क केला असता 15 दिवसामध्ये ट्रॅक्टर औरंगाबाद येथे नेण्यात येईल, असे सांगण्यात आले. परंतु विरुध्द पक्ष क्र.3 यांनी त्याप्रमाणे कार्यवाही केली नाही. विरुध्द पक्ष क्र.1 यांना संपर्क साधला असता त्यांनी ट्रॅक्टर दुरुस्ती किंवा बदलून देण्यासंबंधी दखल घेतली नाही. तक्रारकर्ता यांनी एम.के. ॲटोमोबाईल्स, देवणी, जि. लातूर येथील मेकॅनिकला ट्रॅक्टर दाखविला असता पंप व इंजीन व्यवस्थित काम करीत नसल्यामुळे इंजीन खोलावे लागेल, असे सांगितले. विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी तक्रारकर्ता यांना सदोष ट्रॅक्टर विक्री करुन फसवणूक केली आणि सेवेमध्ये त्रुटी निर्माण केली आहे. वित्तीय संस्थेचे हप्ते थकल्यामुळे ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आले. उक्त वादकथनाच्या अनुषंगाने सोनालिका कंपनीचे ट्रॅक्टर बदलून नवीन ट्रॅक्टर देण्याचा किंवा ते शक्य नसल्यास रु.4,60,000/- व्याजासह देण्याचा; मानसिक त्रासाकरिता रु.10,000/- देण्याचा; आर्थिक नुकसान भरपाई रु.5,00,000/- देण्याचा व ग्राहक तक्रार खर्च रु.10,000/- देण्याचा विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती केली आहे.
(3) विरुध्द पक्ष क्र.1 व 3 यांना सूचनापत्र प्राप्त झाले. उचित संधी प्राप्त होऊनही ते जिल्हा आयोगापुढे उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश करण्यात आले.
(4) विरुध्द पक्ष क्र.2 यांनी लेखी निवेदनपत्र दाखल केले. त्यांचे निवेदन असे की, तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडून बीड येथे ट्रॅक्टर विकत घेतले आणि ग्राहक तक्रारीचे वादकारण लातूर जिल्हा आयोगाच्या कार्यकक्षेमध्ये घडलेले नसल्यामुळे तक्रार रद्द होण्यास पात्र आहे. तक्रारकर्ता हे त्यांचे ग्राहक नाहीत आणि वित्तीय संस्थेस पक्षकार केलेले नाही. विरुध्द पक्ष क्र.2 हे 'प्रकर्ता ते प्रकर्ता' तत्वावर मागणीनुसार वितरकांना ट्रॅक्टर विक्री करतात. त्यानंतर वितरक ग्राहकांना ट्रॅक्टर विक्री करतात आणि विक्रीपश्चात ट्रॅक्टर सेवा पुरविण्याचे काम अधिकृत विक्रेता करतात. त्यांच्या हमी धोरणाचे कलम 4 (डी)(सी, डी) नुसार गैरवापर, निष्काळजीपणा, फेरबदल, अपघात, अनियमीत वापर, नियमीत सेवा कालावधीमध्ये अनधिकृत सुटे भाग बदलणे इ. करिता हमी उपलब्ध नाही. ग्राहक तक्रारीमध्ये नमूद कथने अमान्य करुन त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी नसल्यामुळे व ट्रॅक्टर बदलून किंवा त्याची किंमत देण्याकरिता ते जबाबदार नसल्यामुळे ग्राहक तक्रार खर्चासह रद्द करण्यात यावी, अशी विनंती विरुध्द पक्ष क्र.2 यांनी केलेली आहे.
(5) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार, विरुध्द पक्ष क्र.2 यांचे लेखी निवेदनपत्र, उभय पक्षांनी दाखल केलेली कागदपत्रे इ. चे अवलोकन केले असता; तसेच विद्वान विधिज्ञांचा मौखिक युक्तिवाद ऐकल्यानंतर वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे वाद-मुद्दे निश्चित करण्यात येतात आणि त्या मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
(1) तक्रारकर्ता हे विरुध्द पक्ष यांचे 'ग्राहक' आहेत काय ? होय.
(2) ग्राहक तक्रार निर्णयीत करण्यासाठी जिल्हा आयोगास
प्रादेशिक अधिकारक्षेत्र आहे काय ? होय.
(3) वित्तीय संस्था आवश्यक पक्षकार आहे काय ? नाही.
(4) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना विक्री केलेल्या ट्रॅक्टर दोष निर्माण
झाल्याचे सिध्द होते काय ? नाही.
(5) मुद्दा क्र.1 च्या अनुषंगाने तक्रारकर्ता अनुतोषास पात्र आहेत काय ? नाही.
(6) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(6) मुद्दा क्र. 1 :- तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष क्र.3 यांच्याकडून वादकथित ट्रॅक्टर खरेदी केले आहे आणि विरुध्द पक्ष क्र.2 हे ट्रॅक्टरचे उत्पादक व विरुध्द पक्ष क्र.1 हे विरुध्द पक्ष क्र.3 यांचे प्रतिनिधी आहेत. विरुध्द पक्ष क्र.2 यांचे कथन असे की, ते 'प्रकर्ता ते प्रकर्ता' तत्वावर वितरकांना ट्रॅक्टर विक्री करतात आणि वितरक ग्राहकांना ट्रॅक्टर विक्री केल्यानंतर विक्रीपश्चात सेवा पुरविण्याचे काम करतात. विरुध्द पक्ष क्र.2 यांनी कथनापृष्ठयर्थ 'प्रकर्ता ते प्रकर्ता' दायित्वासंबंधी संविदालेख किंवा अन्य कागदपत्रे दाखल केलेले नाहीत. वाद-तथ्यानुसार तक्रारकर्ता हे विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांचे 'ग्राहक' ठरतात आणि मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
(7) मुद्दा क्र. 2 :- विरुध्द पक्ष क्र.3 यांनी विरुध्द पक्ष क्र.1 यांच्यामार्फत तक्रारकर्ता यांना ट्रॅक्टर विक्री केले आहे. विरुध्द पक्ष क्र.3 हे लातूर जिल्हा कार्यक्षेत्रात वास्तव्य करतात. ट्रॅक्टरमधील कथित दोष लातूर जिल्हा कार्यक्षेत्रामध्ये निर्माण झाला. अशा स्थितीत, तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार निर्णयीत करण्यासाठी लातूर जिल्हा आयोगास कार्यक्षेत्र आहे आणि त्या अनुषंगाने मुद्दा क्र.2 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
(8) मुद्दा क्र. 3 :- वादकथित ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी तक्रारकर्ता यांनी कोटक महिंद्रा बॅंक लि. यांच्याकडून वित्तसहाय्य घेतले आहे. ट्रॅक्टरमध्ये दोष असल्यासंबंधी तक्रारकर्ता यांचा वाद असल्यामुळे या ठिकाणी वित्तीय संस्थेची भुमिका महत्वपूर्ण नाही. वित्तीय संस्थेस पक्षकार नसल्यामुळे ग्राहक तक्रारीस बाध निर्माण होत नाही आणि मुद्दा क्र.3 चे उत्तर नकारार्थी देण्यात येते.
(9) मुद्दा क्र. 4 ते 6 :- शेती सुधारणेसाठी फक्त 1 महिना ट्रॅक्टरचा वापर केला आणि त्यानंतर ट्रॅक्टरच्या इंजीनमध्ये अचानक बिघाड होऊन ते व्यवस्थित चालत नव्हते, असे तक्रारकर्ता यांनी नमूद केले. त्यानंतर संपर्क साधूनही विरुध्द पक्ष क्र.1 व 3 यांनी ट्रॅक्टर दुरुस्तीसाठी नेले नाही किंवा बदलून दिले नाही, असे त्यांचे कथन आहे. तक्रारकर्ता यांनी अभिलेखावर एम.के. ॲटोमाबाईल्स, देवणी यांनी दि.23/12/2018 रोजी तक्रारकर्ता यांना दिलेली पावती दाखल केलेली आहे. त्या पावतीमध्ये '(1) पंपाची काम निघण्याची शक्यता आहे. (2) इंजीन खोलून बघावे लागते. इंजीनची वॉरंटी असल्यामुळे आम्ही खोलू शकत नाही. (3) गाडी नं. एम.एच.24 ए.एस.5419' असा मजकूर नमूद आहे. एम.के. ॲटो पार्टर्स शिक्का नमूद करुन प्रोप्रायटर यांनी स्वाक्षरी केल्याचे दिसून येते.
(10) निर्विवादपणे, ट्रॅक्टरमध्ये दोष असल्यासंबंधी तक्रारकर्ता यांनी वाद उपस्थित केला आहे. वस्तुत: ट्रॅक्टरच्या इंजीनमध्ये निश्चित काय दोष निर्माण होता ? यासंबंधी उचित स्पष्टीकरण नाही. पावतीमध्ये नमूद केलेल्या वर्णनानुसार ट्रॅक्टरच्या दोषासंबंधी केवळ अनुमान नमूद आहे. पावतीमध्ये नमूद केलेले अनुमान हे अभियांत्रिकी क्षेत्रातील तज्ञ व्यक्तीने दिले, असा पुरावा नाही. संबंधीत व्यक्तीचे शपथपत्र दाखल केलेले नाही. त्यामुळे तक्रारकर्ता यांच्या ट्रॅक्टरमध्ये दोष होता, हे पुराव्याद्वारे सिध्द होत नाही. ट्रॅक्टर खरेदी केल्यानंतर तक्रारकर्ता यांच्या गावी ट्रॅक्टरसंबंधी सेवा देण्यासंबंधी विरुध्द पक्ष यांनी करारात्मक दायित्व स्वीकारले, असा पुरावा नाही. आमच्या मते, विरुध्द पक्ष क्र.3 यांनी तक्रारकर्ता यांना विक्री केलेल्या ट्रॅक्टरमध्ये दोष असल्याचे सिध्द होत नाही आणि तक्रारकर्ता अनुतोषास पात्र ठरत नाहीत. मुद्दा क्र.4 व 5 चे उत्तर नकारार्थी देऊन मुद्दा क्र.6 करिता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) ग्राहक तक्रार नामंजूर करण्यात येते.
(2) खर्चासंबंधी आदेश नाहीत.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-