जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 345/2022. तक्रार नोंदणी दिनांक : 13/12/2022.
तक्रार दाखल दिनांक : 03/01/2023. तक्रार निर्णय दिनांक : 21/11/2024.
कालावधी : 01 वर्षे 11 महिने 08 दिवस
लक्ष्मीरमण रामदास पवार, वय 30 वर्षे, व्यवसाय : शेती,
रा. झिगणअप्पा गल्ली, लातूर, ता. जि. लातूर. :- तक्रारकर्ता
विरुध्द
रविराज लोणारी, रविराज मशिन टुल्स्,
कामदार रोड, लातूर, ता. जि. लातूर. :- विरुध्द पक्ष
गणपूर्ती : श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्यक्ष
श्रीमती वैशाली म. बोराडे, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- श्री. बी. ई. कवठेकर
विरुध्द पक्ष यांचेकरिता विधिज्ञ :- श्री. ऋषिकेश आर. देशपांडे
आदेश
श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्यक्ष यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी की, दि.22/10/2022 रोजी त्यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडे किटक नाशक फवारा दुरुस्त करुन घेतला आणि त्याचे शुल्क रु.610/- दिले. परंतु तो फवारा व्यवस्थित कार्य करीत नसल्यामुळे दि.26/10/2022 रोजी पुन्हा विरुध्द पक्ष यांच्याकडे दुरुस्तीसाठी दिला असता रु.1,015/- आकारण्यात आले. दि.27/10/2022 रोजी फवारणी करताना पुन्हा फवारा व्यवस्थित कार्य करीत नसल्यामुळे विरुध्द पक्ष यांच्याकडे नेला असता फवारा खराब झाल्याचे व दुरुस्त होणार नसल्याचे सांगण्यात आले. तक्रारकर्ता यांनी चुकीचे देयक घेतल्याबद्दल विचारणा करुन रु.1,625/- परत मागणी केले असता विरुध्द पक्ष यांनी अरेरावी भाषा वापरली. ज्यामुळे तक्रारकर्ता यांना शेतातील नुकसानीसह मानसिक त्रास सहन करावा लागला. त्यानंतर तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष यांना विधिज्ञांमार्फत सूचनापत्र पाठविले असता त्यास खोटे उत्तर देण्यात आले. अशाप्रकारे, उक्त कथनांच्या अनुषंगाने रु.1,625/- परत करण्याचा; मानसिक त्रासाकरिता रु.5,000/- देण्याचा; आर्थिक नुकसान रु.5,000/- देण्याचा व ग्राहक तक्रार खर्च रु.2,000/- देण्याचा विरुध्द पक्ष यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ता यांनी केली आहे.
(2) विरुध्द पक्ष हे जिल्हा आयोगापुढे उपस्थित राहिले; परंतु त्यांनी लेखी निवेदनपत्र दाखल केले नाही. त्यामुळे त्यांच्याविरुध्द 'विनालेखी निवेदनपत्र' आदेश करण्यात आले.
(3) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार व अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले. तसेच तक्रारकर्ता यांच्या विधिज्ञांचा युक्तिवाद ऐकला.
(4) वाद-तथ्ये व अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडून दि.22/10/2022 व 26/10/2022 रोजी फवा-याचे साहित्य खरेदी केल्याचे व मजुरीकरिता रक्कम दिल्याचे; वादकथित फवारा योग्य दुरुस्त न केल्याबाबत सूचनापत्र पाठविल्याचे व सूचनापत्राकरिता विरुध्द पक्ष यांनी उत्तर दिल्याचे निदर्शनास येते.
(5) विरुध्द पक्ष यांच्याद्वारे तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार व त्यांच्याद्वारे दाखल कागदपत्रांकरिता खंडन, प्रतिकथन व पुरावा नाही.
(6) तक्रारकर्ता यांच्या विधिज्ञांचा युक्तिवाद असा की, तक्रारकर्ता यांनी फवारा दुरुस्त करण्यासाठी विरुध्द पक्ष यांना शुल्क अदा करुनही फवारा दुरुस्त झाला नाही आणि विरुध्द पक्ष यांनी सेवेमध्ये त्रुटी निर्माण केलेली आहे.
(7) वाद-तथ्ये, विधिज्ञांचा युक्तिवाद व अभिलेखावर कागदपत्रांची दखल घेतली असता तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडून वादकथित फवारा दुरुस्त करुन घेतल्याचे मान्य करावे लागेल. प्रथमत: दि.22/10/2022 रोजी फवारा दुरुस्त करण्यात आला आणि त्यानंतर पुन्हा दि.26/10/2022 रोजी दुरुस्त केल्याचे दिसते. फवारा दुरुस्तीकरिता प्रत्येकवेळी सुटे भाग व मजुरीकरिता शुल्क आकारणी केल्याचे निदर्शनास येते. फवारा योग्य कार्य करीत नसल्यामुळे तक्रार केली असता दखल न घेतल्यामुळे तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष यांना विधिज्ञांमार्फत सूचनापत्र पाठविलेले आहे. उक्त स्थिती पाहता, फवारा दुरुस्त केल्यानंतर पुनश्च: दुरुस्त करावा लागला आणि त्यानंतरही तो नादुरुस्त राहिला, हे अनुमान काढणे न्यायोचित आहे. त्या अनुषंगाने विरुध्द पक्ष यांनी फवारा दुरुस्ती करण्याची सेवा देण्यामध्ये त्रुटी निर्माण केली, असा निष्कर्ष काढण्यात येतो.
(8) ग्राहक संरक्षण अधिनियम, 2019 चे कलम 2 (11) च्या अनुषंगाने वादकथित फवारा दुरुस्त करुन देण्याच्या सेवेमध्ये त्रुटी केल्याबद्दल कलम 39 अंतर्गत अनुतोष मिळण्यास तक्रारकर्ता पात्र ठरतात. तक्रारकर्ता यांनी फवारा दुरुस्तीकरिता आकारलेले शुल्क परत मिळण्याची विनंती केली असून ते परत करण्यासाठी विरुध्द पक्ष यांना आदेश करणे उचित राहील.
(9) तक्रारकर्ता यांनी मानसिक त्रासाकरिता रु.5,000/-, आर्थिक नुकसान रु.5,000/- व ग्राहक तक्रार खर्चाकरिता रु.2,000/- रकमेची मागणी केलेली आहे. नुकसान भरपाई निश्चित करताना त्या–त्या परिस्थितीनुसार गृहीतक निश्चित झाले पाहिजेत. शुल्क अदा करुनही फवारा दुरुस्त न झाल्यामुळे व ते शुल्क परत न केल्यामुळे तक्रारकर्ता यांना जिल्हा आयोगापुढे तक्रार दाखल करणे भाग पडले. त्याकरिता विरुध्द पक्ष यांच्याकडे तक्रारकर्ता यांना आवश्यक पाठपुरावा करावा लागलेला आहे. शिवाय, कायदेशीर कार्यवाहीकरिता सूचनापत्र पाठविणे, विधिज्ञांचा सल्ला व सहायता, विधिज्ञांचे शुल्क इ. खर्चाच्या बाबी आहेत. तसेच, ग्राहक तक्रार न्यायप्रविष्ठ असताना आर्थिक खर्च व वेळेचा अपव्यय होतो. उक्त स्थिती पाहता, तक्रारकर्ती यांना मानसिक त्रास होणे नैसर्गिक व स्वाभाविक आहे. योग्य विचाराअंती मानसिक त्रासाकरिता रु.3,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.2,000/- मंजूर करणे न्यायोचित राहील, या निष्कर्षाप्रत जिल्हा आयोग येत आहे. आर्थिक नुकसानीची मागणी पाहता त्यांना कोणते आर्थिक नुकसान सहन करावे लागले, याचे उचित स्पष्टीकरण नसल्यामुळे त्याची दखल घेता येणार नाही. उक्त विवेचनाअंती खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) ग्राहक तक्रार अशंत: मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना रु.1,625/- परत करावेत.
ग्राहक तक्रार क्र. 345/2022.
(3) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना मानसिक त्रासापोटी रु.3,000/- नुकसान भरपाई व ग्राहक तक्रार खर्चाकरिता रु.2,000/- द्यावेत.
(4) विरुध्द पक्ष यांनी प्रस्तुत आदेशाची अंमलबजावणी आदेश प्राप्तीपासून 45 दिवसाच्या आत करावी.
(श्रीमती वैशाली म. बोराडे) (श्री. अमोल बा. गिराम)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-