जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, उस्मानाबाद.
ग्राहक तक्रार क्रमांक : २५१/२०१७. तक्रार दाखल दिनांक : ११/१०/२०१७. तक्रार निर्णय दिनांक : १८/०६/२०२१.
कालावधी : ०३ वर्षे ०८ महिने ०७ दिवस
श्री. महादेव रामा लोहकरे, वय ७४ वर्षे,
व्यवसाय : शेती, रा. कसबे तडवळे, ता. जि. उस्मानाबाद. तक्रारकर्ता
विरुध्द
(१) रणदिवे ज्ञानदेव श्रीमंतराव, वय सज्ञान, व्यवसाय : शेती व चेअरमन,
मांजरा मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटी, उस्मानाबाद,
रा. तुळजापूर-औरंगाबाद बायपास रोड, हॉटेल साई कमलच्या
पश्चिमेस, विजय नगर, उस्मानाबाद, ता. जि. उस्मानाबाद.
(२) सूर्यवंशी संभाजी दिलीप, वय सज्ञान, व्यवसाय : शेती,
रा. सांजा, ता. जि. उस्मानाबाद.
(३) सौ. रणदिवे विद्या ज्ञानदेव, वय सज्ञान, व्यवसाय : घरकाम,
रा. तुळजापूर-औरंगाबाद बायपास रोड, हॉटेल साई कमलच्या
पश्चिमेस, विजय नगर, उस्मानाबाद, ता. जि. उस्मानाबाद.
(४) सूर्यवंशी प्रदीप पंडीत, वय सज्ञान, व्यवसाय : शेती,
रा. सांजा, ता. जि. उस्मानाबाद.
(५) रणदिवे श्रीकृष्ण मारुती, वय सज्ञान, व्यवसाय : शेती,
रा. सारोळा (बु.), ता. जि. उस्मानाबाद.
(६) टेकाळे सुधाकर प्रल्हाद, वय सज्ञान, व्यवसाय : शेती,
रा. टेकाळे वस्ती, पिंपळगाव (डोळा), ता. कळंब, जि. उस्मानाबाद.
(७) रणदिवे प्रशांत श्रीमंतराव, वय सज्ञान, व्यवसाय : शेती,
रा. सारोळा (बु.), ता. जि. उस्मानाबाद.
(८) आदमिले निखिल गजानन, वय सज्ञान, व्यवसाय : शेती,
रा. गुळवे वस्ती, जवळा (दुमाला), ता. जि. उस्मानाबाद.
(९) सौ. पवार वैशाली अनिल, वय सज्ञान, व्यवसाय : घरकाम,
रा. वाघोली, ता. जि. उस्मानाबाद. विरुध्द पक्ष
(१०) जकाते आकाश राजेंद्र, वय सज्ञान, व्यवसाय : शेती,
रा. सांजा, ता. जि. उस्मानाबाद.
(११) पवार अमित अनिल, वय सज्ञान, व्यवसाय : शेती,
रा. वाघोली, ता. जि. उस्मानाबाद.
(१२) मुख्याधिकारी / चेअरमन, मांजरा मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि.,
गाळा क्र.२, छत्रपती संभाजी राजे कॉप्लेक्स, जुने अग्नीशमन दल,
राजमाता डिजीटलजवळ, उस्मानाबाद, ता. जि. उस्मानाबाद.
(१३) संतोष शंकर पवार, वय सज्ञान, व्यवसाय : नोकरी,
मांजरा मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटी,
रा.कसबे तळवळे, ता. जि. उस्मानाबाद.
(१४) शाखाधिकारी, मांजरा मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि.,
शाखा कसबे तडवळे, ता. जि. उस्मानाबाद. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : मा. श्री. किशोर दत्तात्रय वडणे, अध्यक्ष
मा. श्री. मुकुंद भगवान सस्ते, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- महेश पी. निंगुळे
विरुध्द पक्ष अनुपस्थित
आदेश
मा. श्री. किशोर दत्तात्रय वडणे, अध्यक्ष यांचे द्वारा :-
(१) तक्रारकर्ता यांच्या ग्राहक तक्रारीचा आशय असा आहे की, विरुध्द पक्ष हे मांजरा मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि., उस्मानाबाद नांवे वित्तीय संस्था चालवितात. विरुध्द पक्ष यांच्या वित्तीय संस्थेच्या कसबे तडवळे, ता. जि. उस्मानाबाद येथील शाखेमध्ये त्यांनी दि.३१/१०/२०१४ रोजी रु.२,५०,०००/- मुदत ठेवीमध्ये गुंतवणूक केले. मुदत ठेव पावती क्र. १०३ असून द.सा.द.शे. १४.४० टक्के दराने प्रतिमहा रु.३,०००/- व्याज देण्याचे विरुध्द पक्ष यांनी मान्य केले होते. विरुध्द पक्ष यांनी त्यांना दि.१/९/२०१५ ते १/२/२०१६ कालावधीकरिता प्रतिमहा रु.३,०००/- अदा केलेली व्याज रक्कम त्यांच्या बचत खाते क्र.००१६१ मध्ये जमा करण्यात आली. दि.३०/६/२०१६ रोजी ठेव पावतीची मुदत पूर्ण झाल्यानंतर तक्रारकर्ता यांनी ठेव रकमेची मागणी केली असता विरुध्द पक्ष यांनी ठेव रक्कम परत करण्यास टाळाटाळ केली. विरुध्द पक्ष क्र.१ यांना विधिज्ञांमार्फत नोटीस पाठविली असता नोटीस परत आली. उपरोक्त वादकथनाच्या अनुषंगाने ठेव रक्कम रु.२,५०,०००/- व्याजासह देण्याचा; मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.१०,०००/- देण्याचा व तक्रार खर्चाकरिता रु.१०,०००/- देण्याचा विरुध्द पक्ष यांना आदेश करण्यात यावा, अशी तक्रारकर्ता यांनी विनंती केली आहे.
(२) ग्राहक तक्रारीच्या अनुषंगाने विरुध्द पक्ष क्र. १ ते १४ यांना जिल्हा मंचाने सूचनापत्र पाठविले. सूचनापत्राची बजावणी झाल्यानंतर उचित संधी देऊनही विरुध्द पक्ष क्र. १ ते १४ जिल्हा आयोगापुढे उपस्थित राहिले नाहीत आणि स्वत:चे लेखी निवेदन सादर केले नाही. त्यामुळे त्यांच्याविरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश पारीत करुन सुनावणी पूर्ण करण्यात आली.
(३) तक्रारकर्ता यांची तक्रार व अभिलेखावर दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केल्यानंतर तक्रारीतील उपस्थित वादविषयाचे निवारणार्थ उपस्थित होणा-या खालील वाद-मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
१. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना ठेव रक्कम परत न करुन
त्रुटीयुक्त सेवा दिल्याचे सिध्द होते काय ? होय.
२. तक्रारकर्ता अनुतोषास पात्र आहेत काय ? होय.
३. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
कारणमीमांसा
(४) मुद्दा क्र. 1 व 2 :- अभिलेखावर दाखल ठेव प्रमाणपत्राचे अवलोकन केले असता तक्रारकर्ता यांनी मांजरा मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि., उस्मानाबाद यांच्याकडे ठेव पावती क्र.१०३ अन्वये रु.२,५०,०००/- गुंतवणूक केल्याचे दिसून येते आणि ठेव पावतीचा कालावधी दि.३०/६/२०१६ रोजी पूर्ण झालेला आहे.
(५) जिल्हा आयोगाद्वारे पाठविण्यात आलेले सूचनापत्र विरुध्द पक्ष क्र.१ ते १४ यांना बजावणी झाले; परंतु विरुध्द पक्ष क्र.१ ते १४ हे जिल्हा आयोगापुढे उपस्थित राहिले नाहीत आणि लेखी निवेदन सादर केले नाही. वास्तविक पाहता, ग्राहक तक्रारीमध्ये नमूद वादकथनांचे खंडण करण्यासाठी त्यांना उचित संधी होती. अशा स्थितीत तक्रारकर्ता यांच्या वादकथनांस व त्यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांस आव्हानात्मक लेखी निवेदन व विरोधी पुरावा नाही. त्यामुळे तक्रारकर्ता यांच्या ग्राहक तक्रारीतील वादकथने व तक्रारीपृष्ठयर्थ दाखल केलेली कागदपत्रे विरुध्द पक्ष यांना मान्य आहेत, असे अनुमान काढणे न्यायोचित वाटते.
(६) तक्रारकर्ता यांची वादकथने व दाखल कागदपत्रांवरुन तक्रारकर्ता यांनी मांजरा मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि., उस्मानाबाद यांच्याकडे मुदत ठेव पावतीद्वारे रक्कम गुंतवणूक करुन वित्तीय सेवा घेतल्याचे स्पष्ट आहे. मुदत ठेव पावतीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर विरुध्द पक्ष यांनी ठेव रक्कम परत केली नाही, असा तक्रारकर्ता यांचा वाद आहे. विरुध्द पक्ष क्र.१ ते १४ हे यांनी मांजरा मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि., उस्मानाबाद यांचे पदाधिकारी व अधिकारी आहेत. तक्रारकर्ता यांच्या ठेव पावतीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर ठेव रक्कम परत करण्याचे दायित्व विरुध्द पक्ष यांच्यावर येते; किंबहुना ती त्यांची करारात्मक जबाबदारी व कर्तव्य आहे.
(७) तक्रारकर्ता यांची ठेव रक्कम परत का केली नाही ? याचे उत्तर देण्याचा विरुध्द पक्ष क्र.१ ते १४ यांनी कोणताही प्रयत्न केलेला नाही किंवा तक्रारकर्ता यांची ठेव रक्कम परत करण्यासाठी ते जबाबदार नाहीत, असे स्पष्टीकरण देणारे उत्तर किंवा कागदपत्रे अभिलेखावर दाखल नाहीत. आमच्या मते, विरुध्द पक्ष क्र.१ ते १४ हे तक्रारकर्ता यांची ठेव रक्कम परत करण्यासाठी जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत आहेत, असे अनुमान काढणे न्यायोचित आहे. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांची ठेव रक्कम परत न करुन सेवेमध्ये त्रुटी निर्माण केलेली आहे आणि तक्रारकर्ता हे ठेव रक्कम व्याजासह परत मिळविण्यास पात्र आहेत.
(८) विरुध्द पक्ष क्र.१ ते १४ यांच्याकडून तक्रारकर्ता हे ठेव रक्कम मिळण्यास हक्कपात्र आहेत. तसेच ठेव पावतीवर नमूद द.सा.द.शे. १४.४० टक्के व्याज दराने ठेव रक्कम मिळण्यास तक्रारकर्ता पात्र ठरतात. तक्रारकर्ता यांना ठेव रक्कम न मिळाल्यामुळे त्यांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला, असे त्यांचे कथन आहे. तक्रारीच्या वस्तुस्थितीनुसार त्यांची मानसिक व शारीरिक त्रासाकरिता नुकसान भरपाईची मागणी अमान्य करता येणार नाही. तसेच ठेव रक्कम मिळविण्याकरिता तक्रारकर्ता यांना प्रस्तुत तक्रार दाखल करणे भाग पडले आहे. त्याचा विचार करुन तक्रार खर्च व नुकसान भरपाई मंजूर करणे न्याय्य आहे. वरील विवेचनाअंती आम्ही मुद्दा क्र.१ व २ चे उत्तर होकारार्थी देऊन खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
ग्राहक तक्रार क्र.२५१/२०१७.
आदेश
(1) विरुध्द पक्ष क्र.१ ते १४ यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारकर्ता यांना ठेव प्रमाणपत्र क्र.१०३ अन्वये गुंतवणूक केलेली रक्कम रु.२,५०,०००/- (रुपये दोन लक्ष पन्नास हजार फक्त) परत करावी.
तसेच रु.२,५०,०००/- (रुपये दोन लक्ष पन्नास हजार फक्त) रकमेवर दि.३१/१०/२०१४ पासून संपूर्ण ठेव रक्कम परत करेपर्यंत द.सा.द.शे. १४.४० टक्के दराने व्याज द्यावे.
(2) विरुध्द पक्ष क्र.१ ते १४ यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारकर्ता यांना मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.५,०००/- नुकसान भरपाई व तक्रार खर्चापोटी रु.३,०००/- द्यावेत.
(9) उपरोक्त आदेशांची अंमलबजावणी विरुध्द पक्ष क्र.१ ते १४ यांनी यांनी आदेश प्राप्तीपासून ४५ दिवसाचे आत करावी.
(श्री. मुकुंद भगवान सस्ते) (श्री. किशोर दत्तात्रय वडणे)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, उस्मानाबाद (महाराष्ट्र)
-०-
(संविक/स्व/३५२१)