जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 152/2019. तक्रार दाखल दिनांक : 05/07/2019 तक्रार निर्णय दिनांक : 02/12/2021.
कालावधी : 02 वर्षे 04 महिने 28 दिवस
डॉ. मंगेश संतराम सेलुकर, वय 40 वर्षे,
धंदा : वैद्यकीय, रा. देशपांडे कॉलनी, लातूर, जि. लातूर.
जि.प. पाठीमागे, गंगोत्री निवास, लातूर. तक्रारकर्ता
विरुध्द
युवराज हणमंतराव पाटील, वय सज्ञान, धंदा : व्यापार,
व्यवस्थापक, योदा बिल्डर्स ॲन्ड डेव्हलपर्स, चाकूर,
योदा चेंबर्स, विश्वशांतीधाम मंदीरासमोर, लातूर-नांदेड रोड,
चाकूर, ता. चाकूर, जि. लातूर. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : मा. श्री. कमलाकर अ. कोठेकर, अध्यक्ष
मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
मा. श्रीमती रेखा जाधव, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- एम.बी. सुरवसे
विरुध्द पक्ष : एकतर्फा
न्यायनिर्णय
मा. श्री. कमलाकर अ. कोठेकर, अध्यक्ष यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाच्या प्लॉट विक्री स्कीममध्ये सहभागी होऊन त्या प्लॉटची किंमत हप्त्या-हप्त्याने अदा करण्याचे मान्य केले. संपूर्ण किंमत अदा केल्यावर प्लॉटच्या विक्रीसंबंधीचा व्यवहार पूर्ण होणार होता. त्याप्रमाणे तक्रारकर्त्याने दरमहा रु.1,500/- प्रमाणे 48 हप्त्यांची रक्कम रु.72,000/- विरुध्द पक्षाकडे जमा केली. परंतु त्याच्या असे लक्षात आले की, विरुध्द पक्ष करारनामा करुन देण्याचे टाळत आहे. त्याचा फसवणुकीचा उद्देश आहे आणि म्हणून तक्रारकर्त्याने करारनामा करुन देण्याची मागणी केली अथवा जमा केलेल्या हप्त्यांचे पैसे परत देण्याचीही त्याने मागणी केली. परंतु विरुध्द पक्षाने त्यास प्रतिसाद दिला नाही. अशाप्रकारे विरुध्द पक्षाने त्याची फसवणूक केली. तक्रारकर्त्याने याबाबत कायदेशीर नोटीस पाठविली. तरीही विरुध्द पक्षाने पूर्तता केली नाही. म्हणून तक्रारकर्त्याने ही तक्रार सादर केली आहे. त्याने जमा केलेली रक्कम रु.72,000/- 18 टक्के व्याजासह मिळावी; शारीरिक व मानसिक त्रासापोटी व खर्चापोटी रक्कम मिळावी, यासाठी ही तक्रार सादर केली आहे.
(2) या तक्रारीची सूचना विरुध्द पक्षाला मिळून देखील विरुध्द पक्ष गैरहजर राहिला. त्यामुळे तक्रार एकतर्फा चालविण्यात आली. तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीपृष्ठयर्थ पुरावा सादर केला. त्याच्या वकिलांचे म्हणणे एकूण घेतले.
(3) उपलब्ध कागदपत्रे व पुरावा यावरुन हे स्पष्ट होते की, विरुध्द पक्ष हा बिल्डर असून त्याने प्लॉट विक्रीबाबतची एक स्कीम जाहीर केली. त्या स्कीमनुसार रु.1,500/- प्रतिमहा याप्रमाणे हप्ता भरावयाचा होता. पूर्ण हप्ते भरुन झाल्यावर प्लॉट विक्रीचा व्यवहार पूर्ण होणार होता. त्या स्कीममध्ये तक्रारकर्ता सहभागी झाला व त्याने 48 हप्त्यांची रक्कम भरली होती. विरुध्द पक्षाने त्याला करारनामा करुन दिला नाही व भरलेले पैसे देखील परत केले नाहीत. अशाप्रकारे विरुध्द पक्षाने फसवणूक करुन तक्रारकर्त्याला चुकीची व दोषपूर्ण सेवा पुरवली.
(4) एकंदरीत पुराव्यावरुन असे दिसते की, विरुध्द पक्षाच्या स्कीममध्ये सभासद होण्यासाठी तक्रारकर्त्याने रु.500/- भरले व रु.1,500/- प्रतिमहा याप्रमाणे 48 हप्ते भरले. अशाप्रकारे एकूण रु.72,000/- तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाला अदा केले. ठरल्याप्रमाणे विरुध्द पक्षाने करारनामा करुन दिला नाही अथवा तक्रारकर्त्याकडून घेतलेले पैसे परत केलेले नाहीत. म्हणून तक्रार मान्य करणे योग्य आहे.
आदेश
(1) तक्रार खालीलप्रमाणे मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला त्याच्याकडून घेतलेले रु.72,000/- या आदेशापासून 30 दिवसाच्या आत अदा करावेत. जर विरुध्द पक्षाने ही रक्कम या मुदतीत अदा केली नाही तर विरुध्द पक्षाला या रकमेवर तक्रार दाखल तारखेपासून द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज देखील द्यावे लागेल.
(3) विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व या कार्यवाहीच्या खर्चापोटी रु.2,000/- द्यावेत.
(4) उभय पक्षकारांना या निवाड्यांच्या प्रती विनामुल्य त्वरीत देण्यात याव्यात.
(श्रीमती रेखा जाधव) (श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्री. कमलाकर अ. कोठेकर)
सदस्य सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
(संविक/श्रु/301221) -०-