तक्रारदार स्वत:
जाबदेणार एकतर्फा
द्वारा- मा. श्री. व्ही. पी. उत्पात, अध्यक्ष
:- निकालपत्र :-
दिनांक 18 फेब्रुवारी 2014
तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986, कलम 12 अंतर्गत जाबदेणार कंपनीविरुध्द सेवेतील त्रुटी संदर्भात दाखल केली आहे. यातील कथने थोडक्यात खालील प्रमाणे-
[1] तक्रारदार हे मंचर, ता. आंबेगांव येथील रहिवासी असून जाबदेणार क्र 1 अ व ब हे युरेका फोर्बज लि. या कंपनीचे प्रतिनिधी आहेत. जाबदेणार क्र 2 हे जाबदेणार क्र 1 चे विक्री प्रतिनिधी आहेत. तक्रारदार यांनी जाबदेणार यांच्याकडून पाणी शुध्दीकरण संसंयंत्र विकत घेतले होते. त्याची किंमत रुपये 6,250/- होती. सदर संयंत्र विकत घेतल्यापासून काही दिवसातच त्यात बिघाड निर्माण झाला. सदर यंत्रा सोबत कंपनीचे मॅन्युअल व एक वर्षाची वॉरंटी देण्यात आली होती. त्यानुसार तक्रारदार यांनी सदरचे संयंत्र दुरुस्त करण्यासंबंधी कंपनीला कळविले. परंतू कंपनीने जाण्यायेण्याचा खर्च म्हणून रुपये 150/- ची मागणी केली. सदरची रक्कम दिल्यानंतर कंपनी प्रतिनिधीने संयंत्र दुरुस्त करुन दिले. परंतू पुन्हा काही दिवसांनी त्यात बिघाड निर्माण झाला. त्यामुळे तक्रारदार यांनी कंपनीकडे पुन्हा तक्रार केली. जाबदेणार यांचे प्रतिनिधीने सदर संयंत्र रुपये 150/- घेऊन दोन वेळा दुरुस्त करुन दिले. त्यानंतर मात्र सदरचे संयंत्र नादुरुस्त झाल्यावर जाबदेणार यांचा प्रतिनिधी तक्रारदार यांच्याकडे आला नाही. त्यामुळे तक्रारदार यांचे आर्थिक नुकसान झाले व मन:स्ताप सहन करावा लागला. सदर संयंत्र बंद असल्यामुळे त्याचा वापर करता आला नाही. एक वर्षाच्या वॉरंटी कालावधीत संयंत्र नादुरुस्त झाल्यामुळे तक्रारदार यांनी वेळोवेळी मागणी करुन नवीन संयंत्र बसवून दयावे, अशी विनंती केली होती. जाबदेणार यांनी तक्रारदारांची मागणी मान्य केली नाही. जाबदेणार यांनी कमी प्रतीचे संयत्र विकून सेवेमध्ये त्रुटी निर्माण केली आहे, त्याचप्रमाणे वॉरंटी कालावधीत तक्रारदारांकडून रुपये 300/- वसूल केले म्हणून तक्रारदारांनी प्रस्तूतची तक्रार जाबदेणार यांच्याविरुध्द दाखल केली आहे. तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून संयंत्राची किंमत रुपये 6,250/- 18 टक्के व्याजासह परत मिळावी, जाबदेणार यांना अदा केलेले रुपये 300/- परत मिळावेत व नुकसान भरपाई पोटी रुपये 5,000/- मिळावेत अशी विनंती केली आहे.
[2] जाबदेणार यांना नोटीस बजावूनही गैरहजर. त्यामुळे जाबदेणार यांच्याविरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश पारीत करण्यात आले.
[3] तक्रारदारांनी तक्रारी सोबत शपथपत्र, वॉरंटी कार्ड, मॅन्युअल, जाबदेणार यांना पाठविलेल्या नोटीसची स्थळप्रत व ती मिळाल्याची पावती इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तक्रारदारांनी दाखल केलेल्या पुराव्यास निरुत्तर करण्यासाी जाबदेणार यांनी कोणत्याही प्रकारचे शपथपत्र/कागदपत्रे दाखल केलेले नाही. सबब तक्रारदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे व शपथपत्र पुराव्यात वाचण्यात येत आहेत. तक्रारदार यांच्या एकूण कथनावरुन असे स्पष्ट होते की, तक्रारदार यांनी जाबदेणार यांच्याकडून पाणी शुध्दीकरण संयंत्र खरेदी केले होते. त्यासाठी तक्रारदारांनी जाबदेणार यांना रक्कम रुपये 6,250/- अदा केले होते. सदर संयंत्र नादुरुस्त झाल्यामुळे वारंवार दुरुस्त करावे लागले, त्यासाठी तक्रारदार यांना रुपये 300/- भाडेखर्चासाठी दयावे लागले. तक्रारदारांनी आपल्या कथनांच्या पुष्टयर्थ कागदपत्रे व शपथपत्र दाखल केले आहे. तक्रारदारांनी वॉरंटी कालावधीतच संयंत्रामध्ये दुरुस्ती करुन घेतली होती. त्याचप्रमाणे संयंत्र बदलून दयावे अशी विनंतीही केली होती. परंतू ती विनंती जाबदेणार यांनी मान्य केली नाही. सदरचे संयंत्र बंद असल्यामुळे तक्रारदारांना त्याचा वापरही करता येत नाही. सबब जाबदेणार यांनी तक्रारदारांना निकृष्ट प्रतीचे संयंत्र दिले आहे असे मंचाचे मत आहे. सबब जाबदेणार हे संयंत्राची किंमत रक्कम रुपये 6,250/- देण्यास व तक्रारदारांना झालेल्या शारिरीक, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई देण्यास बांधील आहेत.
यासर्व बाबींचा विचार करुन मुद्यांचे निष्कर्ष काढण्यात येऊन खालील प्रमाणे आदेश देण्यात येत आहे-
:- आदेश :-
1. तक्रार अंशत: मंजूर करण्यात येत आहे.
2. जाबदेणार यांनी निकृष्ट प्रतीचे पाणी शुध्दीकरण संयंत्र
विकून सेवेमध्ये त्रुटी निर्माण केली आहे, असे जाहिर करण्यात येत आहे.
3. जाबदेणार क्र 1- अ, ब व जाबदेणार क्र 2 यांनी वैयक्तिकरित्या आणि संयुक्तिकरित्या तक्रारदारांना रक्कम रुपये 6,250/- [रुपये सहा हजार दोनशे पन्नास मात्र] आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावी.
4. जाबदेणार क्र 1- अ, ब व जाबदेणार क्र 2 यांनी वैयक्तिकरित्या आणि संयुक्तिकरित्या शारिरीक, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून तक्रारदारांना रक्कम रुपये 2,000/- [रुपये दोन हजार मात्र] व तक्रारीचा खर्च रक्कम रुपये 1,000/- [रुपये एक हजार मात्र] आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावा.
5. तक्रारदारांनी जाबदेणार यांना संयंत्र परत करावे.
6. उभय पक्षकारांनी मा. सदस्यांसाठी दिलेले संच आदेशाच्या दिनांकापासून एका महिन्यात घेऊन जावेत, अन्यथा संच नष्ट करण्यात येतील.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शूल्क पाठविण्यात यावी.