न्या य नि र्ण य
द्वारा – मा. श्रीमती भारती सं. सोळवंडे, अध्यक्ष
1. प्रस्तुतची तक्रार तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा 2019 चे कलम 35 अन्वये दाखल केली आहे.
2. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे –
तक्रारदार हे शेतकरी कुटुंबातील असून त्यांना शेतजमीन व मिळकती आहेत. जाबदार क्र.1 ही विमा कंपनी आहे. सन 2015-16 मध्ये शासनाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविलेली होती. सदर योजनेअंतर्गत तक्रारदार यांचा मुलगा कै.अभिजीत तानाजी माने याचा जाबदार क्र.2 मार्फत जाबदार क्र.1 यांचेकडे रक्कम रु.2 लाखचा विमा उतरविला होता. कै.अभिजीत तानाजी माने यांचा पॉलिसी क्र.3317/63697554/00/000 असा असून विमा कंपनीचा दावा क्र. सी.एल.22144126 असा आहे. तक्रारदार यांचा मुलगा कै.अभिजीत तानाजी माने यांचा दि.18/01/2022 रोजी रस्ता अपघातात मृत्यू झालेला आहे. म्हणून तक्रारदारांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन जाबदार क्र.1 यांचेकडे विमा रकमेची मागणी केली असता जाबदार क्र.1 यांनी कै.अभिजीत तानाजी माने याचा मृत्यू रस्ता अपघातात दुचाकी वाहनावरुन दोन्हीही प्रौढ प्रवासी (ट्रीपल सीट) प्रवास करताना झाला आहे असा निष्कर्ष काढून विमादावा नाकारला आहे. सदरचे बेकायदेशीर कारण सांगून जाबदार यांनी तक्रारदार यांना विमा रक्कम देण्यास नकार दिला आहे. अशा प्रकारे जाबदार यांनी तक्रारदारास सेवा देणेमध्ये त्रुटी केली आहे. म्हणून तक्रारदाराने प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. सबब, तक्रारदाराने याकामी जाबदार क्र.1 यांचेकडून विम्याच्या लाभाची रक्कम रु. 2 लाख मिळावेत, सदर रकमेवर विमादावा नाकारले तारखेपासून द.सा.द.शे. 15 टक्के दराने व्याज मिळावे, शारिरिक व मानसिक त्रासापोटी रु. 25,000/-, व अर्जाचा खर्च रु. 10,000/- जाबदारकडून मिळावेत अशी मागणी तक्रारदारांनी याकामी केली आहे.
3. तक्रारदारांनी तक्रारअर्जासोबत शपथपत्र तसेच कागदयादीसोबत तक्रारदार यांचे पतीचा मृत्यूचा दाखला, तक्रारदार यांचे ओळखपत्र, अपघातातील एफ.आय.आर., सातबारा उतारा, जाबदार क्र..1 यांचे क्लेम नाकारलेचे पत्र, इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारदाराने पुरावा शपथपत्र दाखल केले आहे.
4. जाबदार क्र.1 यांनी याकामी हजर होवून म्हणणे, शपथपत्र व कागदयादीसोबत त्रिपक्षीय कराराची प्रत दाखल केली आहे. तसेच पुरावा शपथपत्र दाखल केले आहे.
5. जाबदार क्र.1 यांनी त्यांचे म्हणण्यामध्ये, तक्रारदाराचे तक्रारअर्जातील कथने परिच्छेदनिहाय नाकारली आहेत. पोलिस पेपर्स पाहता कै.अभिजीत तानाजी माने हा त्याचे मित्र अक्षय राजाराम चव्हाण व हरीषचंद्र पोळ असे ट्रीपल सीट जात असताना हयगयीने, निष्काळजीपणे, अविचाराने व रस्त्याचे व वाहतुकीचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन अचानक ब्रेक लावल्याने पाठीमागून येणा-या फोर्ड कारने विमाधारकाचे गाडीस जोरात धडक दिल्याने तो मयत झाला आहे. यात विमाधारकाची चूक दिसून आलेने त्यांचेविरुध्द गुन्हा नोंद झालेला आहे. अशा प्रकारे क्षमतेपेक्षा जास्त व्यक्ती प्रवास करीत असले कारणाने विमाधारकाने कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन केले आहे. विमा पॉलिसीच्या अटी व शर्ती मधील अट क्र.12 नुसार “कोणत्याही कायद्याचे उल्लंघन किंवा गैरव्यवहारामुळे उद्भवणे” या दोन अटींचा भंग मयत विमाधारकाने केला असल्याने तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळणेस पात्र नाहीत. सबब, सेवेत कोणतीही त्रुटी देणेचा प्रश्न येत नाही. सबब तक्रारअर्ज फेटाळणेत यावा अशी मागणी जाबदार क्र.1 यांनी केली आहे.
6. जाबदार क्र.2 यांनी याकामी म्हणणे दाखल केले आहे. जाबदार क्र. 2 यांचे कथनानुसार, शासनाने स्वत:हून महसूल विभागाच्या नोंदीनुसार राज्यातील सर्व 7/12 धारक शेतकरी व त्यांचे कुटुंबातील 1 सदस्य यांचा विमा जाबदार क्र.1 यांचेकडे उतरविला आहे. माहे ऑक्टोबर 2021 मध्ये प्रस्तुत दावा जिल्हा सनियंत्रण समितीसमोर सादर केल्यानंतर मा. अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी, सातारा यांनी तो तात्काळ मंजूर करुन देय व्याजासह होणारी रक्कम दावेदारास देणेचा आदेश जाबदार क्र.1 यांना केला आहे. विमा रक्कम देणे जाबदार क्र.1 यांचेवर बंधनकारक आहे, त्यास जाबदार क्र.2 यांची कोणतीही हरकत नाही. तक्रारदार हे जाबदार क्र.2 यांचे ग्राहक ठरु शकत नाहीत. सदर योजनेनुसार शासनास प्रतिवादी करता येणार नाही तसेच शासनावर नुकसान भरपाईचे दायित्व निश्चित करता येणार नाही. सबब, जाबदार क्र.2 यांना या कामातून वगळणेत यावे अशी मागणी जाबदार क्र.2 यांनी केली आहे.
7. तक्रारदाराची तक्रार, शपथपत्र, दाखल कागदपत्रे व पुरावा शपथपत्र, तसेच जाबदार क्र.1 व 2 चे म्हणणे व शपथपत्र तसेच उभय पक्षांचा युक्तिवाद यांचे अवलोकन करता खालील मुद्दे निष्कर्षासाठी उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार हा जाबदार यांचा ग्राहक आहे काय ? | होय. |
2 | जाबदार क्र.1 ने तक्रारदारास सेवा देण्यामध्ये त्रुटी केली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार जाबदार क्र.1 यांचेकडून विमा रक्कम मिळणेस व नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहे काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालीलप्रमाणे |
कारणमिमांसा
मुद्दा क्र.1
8. तक्रारदारांचे तक्रारअर्जातील कथनानुसार, तक्रारदार हे शेतकरी कुटुंबातील असून त्यांना शेतजमीन व मिळकती आहेत. सदर कथनाचे पुष्ठयर्थ तक्रारदारांनी तक्रारदाराचे पतीचे नावचा सातबारा उतारा दाखल केलेला आहे. सबब, तक्रारदाराचे पती हे शेतकरी होते ही बाब शाबीत होते. सन 2015-16 मध्ये शासनाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविलेली होती. सदर योजनेअंतर्गत तक्रारदार यांचा मुलगा कै.अभिजीत तानाजी माने याचा जाबदार क्र.2 मार्फत जाबदार क्र.1 यांचेकडे रक्कम रु. 2 लाखचा विमा उतरविला होता. कै.अभिजीत तानाजी माने याचा पॉलिसी क्र.3317/63697554/00/000 असा असून विमा कंपनीचा दावा क्र. सी.एल.22144126 असा आहे. सदरची बाब जाबदार क्र.1 यांनी त्यांचे म्हणणेमध्ये नाकारलेली नाही. तक्रारदार ही कै.अभिजीत तानाजी माने याची, आई या नात्याने, कायदेशीर वारस आहे व ती आपल्या मुलाच्या विमा पॉलिसीची लाभधारक आहे असे या आयोगाचे मत आहे. सबब, तक्रारदार ही जाबदार क्र.1 यांची ग्राहक आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2
9. जाबदार क्र.1 यांनी त्यांचे म्हणणेमध्ये, पोलिस पेपर्स पाहता कै.अभिजीत तानाजी माने हा त्याचे मित्र अक्षय राजाराम चव्हाण व हरीषचंद्र पोळ असे ट्रीपल सीट जात असताना हयगयीने, निष्काळजीपणे, अविचाराने व रस्त्याचे व वाहतुकीचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन अचानक ब्रेक लावल्याने पाठीमागून येणा-या फोर्ड कारने विमाधारकाचे गाडीस जोरात धडक दिल्याने तो मयत झाला आहे. यात त्यांची चूक दिसून आलेने त्यांचेविरुध्द गुन्हा नोंद झालेला आहे. अशा प्रकारे क्षमतेपेक्षा जास्त व्यक्ती प्रवास करीत असले कारणाने विमाधारकाने कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन केले आहे. विमा पॉलिसीच्या अटी व शर्ती मधील अट क्र.12 नुसार “कोणत्याही कायद्याचे उल्लंघन किंवा गैरव्यवहारामुळे उद्भवणे” या दोन अटींचा भंग मयत विमाधारकाने केला असल्याने तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळणेस पात्र नाहीत असे कथन जाबदार क्र.1 यांनी केले आहे.
10. तथापि, जरी याकामी कै.अभिजीत तानाजी माने याचेविरुध्द एफ.आय.आर. दाखल झालेला असला तरी सदरचा गुन्हा अद्याप शाबीत झालेला नाही. मयताविरुध्द सदरचा गुन्हा शाबीत झाला असता तर शासन परिपत्रक क्र. शेअवी-2018/प्र.क्र.193/11अ मधील तसेच पॉलिसीच्या अटी व शर्ती मधील तरतुदी याकामी लागू झाल्या असत्या. तथापि मयताविरुध्द योग्य त्या न्यायालयात गुन्हा शाबीत झाल्याबाबत जाबदार क्र.1 यांनी कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. सबब, जाबदार क्र.1 यांनी घेतलेल्या बचावाशी हे आयोग सहमत नाही. कै.अभिजीत तानाजी माने याचा अपघाती मृत्यू झाला याबाबत कोणताही वाद नाही. सदरची बाब जाबदार यांनी मान्य केलेली आहे. कै. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा मूळ हेतू विचारात घेता शेतक-याचा अपघाती मृत्यू झाल्यास तो विम्याचा लाभ मिळण्यास पात्र ठरतो. प्रस्तुत प्रकरणात कै.अभिजीत तानाजी माने याचा अपघाती मृत्यू झालेला आहे. सदरचा अपघात हा मयताने कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे घडला हे शाबीत करणारा कोणताही पुरावा जाबदार क्र.1 यांनी दाखल केलेला नाही. सबब, पॉलिसीचा मूळ हेतू विचारात न घेता, जाबदार क्र.1 यांनी तक्रारदाराचा विमादावा नामंजूर केला आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
11. जाबदार क्र.2 यांनी आपले म्हणणेमध्ये, माहे ऑक्टोबर 2021 मध्ये प्रस्तुत दावा जिल्हा सनियंत्रण समितीसमोर सादर केल्यानंतर मा. अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी, सातारा यांनी तो तात्काळ मंजूर करुन देय व्याजासह होणारी रक्कम दावेदारास देणेचा आदेश जाबदार क्र.1 यांना केला आहे. विमा रक्कम देणे जाबदार क्र.1 यांचेवर बंधनकारक आहे, त्यास जाबदार क्र.2 यांची कोणतीही हरकत नाही असे कथन केले आहे. या सर्व बाबींचा विचार करता जाबदार क्र.1 यांनी तक्रारदाराचा विमादावा फेटाळून तक्रारदारास द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.3
12. जाबदार क्र.1 यांनी तक्रारदारास द्यावयाचे सेवेत त्रुटी केल्यामुळे तक्रारदार हे कै. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत रक्कम रु. 2,00,000/- मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. तसेच सदरचे रकमेवर तक्रारदार हे विमा दावा नाकारले तारखेपासून संपूर्ण रक्कम तक्रारदारास मिळेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. तसेच जाबदार क्र.1 यांनी विमादावा नाकारल्यामुळे तक्रारदारास मानसिक त्रास सहन करावा लागला तसेच या आयोगात तक्रारअर्ज दाखल करावा लागला. या बाबींचा विचार करता तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रु. 10,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रु. 5,000/- मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
13. प्रस्तुत कामी तक्रारदार यांनी जाबदार क्र.2 यांचेविरुध्द कोणतीही मागणी केलेली नाही. तसेच कै.अभिजीत तानाजी माने याचा जाबदार क्र.2 मार्फत जाबदार क्र.1 यांचेकडे रक्कम रु. 2 लाखचा विमा उतरविला होता. सबब, विमा रक्कम देण्याची जबाबदारी ही जाबदार क्र.1 यांची आहे. सबब, जाबदार क्र.2 यांना याकामी जबाबदार धरता येणार नाही असे या आयोगाचे मत आहे. सबब आदेश.
आदेश
- तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
- जाबदार क्र.1 यांनी तक्रारदारास कै. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत रक्कम रु.2,00,000/- अदा करावी तसेच सदर रकमेवर विमादावा नाकारले तारखेपासून संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज अदा करावे.
- जाबदार क्र.1 यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.5,000/- अदा करावेत.
- सदर आदेशाचे अनुपालन जाबदार क्र.1 यांनी निकाल तारखेपासून 45 दिवसांचे आत करावे.
- जाबदार क्र.1 यांनी विहीत मुदतीत सदर आदेशाचे अनुपालन न केल्यास तक्रारदार यांना ग्राहक संरक्षण कायदा, 2019 मधील तरतुदींनुसार योग्य ती दाद मागणेची मुभा राहील.
- जाबदार क्र.2 यांचेविरुध्द कोणतेही आदेश नाहीत.
- सदर आदेशाच्या प्रती विनाशुल्क उभय पक्षकारांना द्याव्यात.