तक्रारदारांतर्फे - अॅड.श्रीमती. जयश्री कुलकर्णी
जाबदारांतर्फे - अॅड. श्री. महाजन
// निकाल //
पारीत दिनांकः- 25/04/2013
(द्वारा- श्रीमती. अंजली देशमुख, अध्यक्ष )
तक्रारदारांनी जाबदेणारांकडून 7/7/2010 या तारखेस त्यांच्या टाटा इंडिका डी.एल्.एस्. या गाडीची पॉलिसी घेतली होती. पॉलिसीचा कालावधी दि.7/7/2010 ते दि. 6/7/2011 असा होता. दि. 11/1/2011 रोजी तक्रारदार हे त्यांच्या डयूटीवरुन काम करुन तातडीने त्यांना घरी बोलावले म्हणून सपकळवाडी येथे गेले. तेथे पोहोचल्यानंतर त्यांच्याच पाहुण्याने त्यांना तातडीने बोलावले असल्यामुळे ते गाडी घेऊन रात्री 10.45 वाजता तावशी, भवानीनगरच्या ड्रायव्हर कॉलनीजवळ रात्री 11.00 वाजता कारने चालले होते, त्यावेळेस तावशीकडे उसाच्या तीन रिकाम्या गाडया चालल्या होत्या, त्यासाठी साईडने गाडी घेऊन पुन्हा रोडवर गाडी घेत असताना अचानक तक्रारदाराची गाडी विरुध्द बाजूने जावून रोडकडे लगतच्या महादेव मंदिराच्या पिलरला जाऊन गाडी धडकली व त्या गाडीस अपघात झाला. अपघात झाल्यानंतर तक्रारदारांनी पोलीस ठाणे अंमलदार, वालचंदनगर पोलीस स्टेशन यांना दिली. त्यानुसार पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला व कारचे अतोनात नुकसान झाल्याचे पंचनाम्यात नमुद केले आहे. त्यानंतर तक्रारदारांनी जाबदेणारांकडे कागदपत्रे पाठवून क्लेम दाखल केला. इन्श्युरन्स कंपनीने घटनास्थळी येऊन पाहणी केली तसेच तक्रारदारांनी शिवसागर मोटर्स, मोरगाव रोड, कसबा बारामती यांच्याकडून कार दुरुस्त करुन घेतली. या दुरुस्तीच्या खर्चाचे कोटेशन देखील तक्रारदारांनी पाठविले. जाबदेणार इन्श्युरन्स कंपनीने हा क्लेम विश्वास ठेवण्याजोगा नाही (The claim lodged is unbelievable) असे नमुद करुन तक्रारदारांचा क्लेम नाकारला म्हणून तक्रारदारांनी दि.30/4/2012 रोजी वकीलांमार्फत नोटीस पाठविली. नोटीशीस उत्तर दिले नाही म्हणून सदरील तक्रारदार जाबदेणारांकडून क्लेमची पूर्ण रक्कम, शारीरिक, मानसिक त्रासासाठी नुकसानभरपाई म्हणून रक्कम रु.30,000/-, तक्रारीचा खर्च आणि इतर दिलासा मागतात.
तक्रारदारांनी शपथपत्र आणि कागदपत्रे दाखल केली आहेत.
(2) जाबदेणारांनी त्यांच्या लेखी जबाबाद्वारे तक्रारदाराच्या मागणीस विरोध दर्शविला. जाबदेणारांनी दि.22/9/2011 रोजी तक्रारादारास पत्र पाठवून तक्रारदारांचा क्लेम हा विश्वास ठवेण्याजोगा नाही या कारणावरुन नामंजूर केला कारण तक्रारदारांनी अपघात झाल्यानंतर दि.11/1/2011 रोजी अपघाताची माहिती जाबदेणारांना टेलिफोनवरुन दिली. त्यानंतर जाबदेणारांनी श्री. बेदमुथा यांची सर्व्हेअर म्हणून नेमणूक केली. सदरहू सर्व्हेअरने दि.15/1/2011 रोजी त्यांचा अहवाल दिला. मे. शिवसागर मोटर्स यांनी रक्कम रु.1,42,544/- चे गाडी दुरुस्तीचे कोटेशन तक्रारदारांना दिले. त्या कोटेशनवर कुणाचीही सही नव्हती. जाबदेणारांनी गरुले यांची सर्व्हेअर म्हणून नेमणूक केली. त्यांनी त्यांचा अहवाल दि.27/2/2011 रोजी दिला. त्यांनी नुकसानीची रक्कम रु.1,18,000/- एवढी नमुद केली आहे. जाबदेणारांनी श्री. विजय जावळे यांना इनव्हेस्टीगेटर म्हणून नियुक्त केले, त्यांचा रिपोर्ट दि.12/7/2011 रोजी दिला. जाबदेणारांचे असे म्हणणे आहे की, तक्रारदारांनी त्यांच्या गाडीचा अपघात झाल्याबद्दल पुरावा दाखल केला नाही. त्यांच्याच म्हणण्यानुसार, तक्रारीमधील पॅरा.नं. 2 मध्ये त्यांनी त्याचे वर्णन दिले आहे ते विश्वासार्ह नाही म्हणून जाबदेणारांनी तक्रारदारांचा क्लेम नामंजूर केला आहे.
जाबदेणारांनी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली आहेत.
(3) दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदारांच्या इंडिका कारला दि.11/1/2011 रोजी रात्री 11.00 वाजता अपघात होऊन तक्रारदाराची इंडिका गाडी विरुध्द बाजूने जावून रोडकडे लगतच्या महादेव मंदिराच्या पिलरला धडकली व गाडीचे नुकसान झाले त्याबाबत क्लेम मिळण्यासाठी तक्रारदारांनी जाबदेणार इन्श्युरन्स कंपनीकडे मागणी केली. जाबदेणारांच्या इनव्हेस्टीगेटर ऑफीसरने अशाप्रकारचा अपघात हा विश्वासार्ह नाही म्हणून त्यांचा क्लेम नाकारला. पोलीसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता, त्याच घटनास्थळी कार असताना त्याचा पंचनामा पोलीसांनी केल्याचे दिसून येते आणि गाडीचे जे नुकसान झालेले आहे त्याबद्दलचे वर्णन केल्याचे दिसून येते. हा पंचनामा दि.12/1/2011 रोजीच वेळ (सकाळी) 09.00 ते 10.00 या दरम्यान केल्याचा दिसून येतो. जाबदेणारांचे जे इनव्हेस्टीगेटर ऑफीसर आहेत, त्यांच्या म्हणण्यानुसार, अशाप्रकारचा अपघात विश्वास ठेवण्याजोगा नाही. परंतु याबाबत त्यांनी कुठलाही पुरावा दाखल केला नाही. अपघात विचित्रपणे झालेला आहे तरी तो अपघात झाला होता हे दिसून येते. अपघात कसा व्हावा याबद्दल कुठलेही निकष (norms) ठरलेले नाहीत असे मंचाचे म्हणणे आहे, म्हणूनच त्यास अपघात म्हणतात. केवळ इनव्हेस्टीगेटर यांना अपघात विचित्र वाटला, विश्वासार्ह वाटला नाही या कारणावरुन, व कुठलाही पुरावा त्यांच्याकडे उपलब्ध नसताना तक्रारदारांचा क्लेम नामंजूर केलेला आहे हे चुकीचे आहे. म्हणून मंच जाबदेणारांना असा आदेश देत आहे की, जाबदेणारांनी तक्रारदारांना सर्व्हेअरच्या मूल्यांकनानुसार, रक्कम रु.1,18,000/- घटना घडल्यापासून म्हणजेच दि.11/1/2011 पासून द.सा.द.शे. 9% व्याजदराने आणि तक्रारीचा खर्च रु.2,000/- दयावेत.
वरील सर्व विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
// आदेश //
1. तक्रारदारांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2. जाबदेणार यांनी तक्रारदारांना रक्कम रु.1,18,000/-
(रु. एक लाख अठरा हजार फक्त) द.सा.द.शे. 9%
व्याजदराने दि. 11/01/2011 ते संपूर्ण रक्कम अदा
करेपर्यंत, या आदेशाची प्रत मिळाल्यापासून सहा
आठवड्यांच्या आंत द्यावी.
3. जाबदेणार यांनी तक्रारदारांना रक्कम रु. 2000/-
(रक्कम रु. दोन हजार फक्त) नुकसान भरपाई
म्हणून या आदेशाची प्रत मिळाल्यापासून सहा
आठवड्यांच्या आंत द्यावी
4. निकालाच्या प्रती उभय पक्षकारांना नि:शुल्क
पाठविण्यात याव्यात.
(सुजाता पाटणकर) (अंजली देशमुख)
सदस्य अध्यक्ष
अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, पुणे