::निकालपत्र:: (पारीत व्दारा – श्री नितीन माणिकराव घरडे , मा.सदस्य ) (पारीत दिनांक – 20 जुलै, 2013 ) 1. तक्रारकर्तीने, तिचे पतीचे अपघाती मृत्यू संबधाने शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत विरुध्दपक्षा कडून विमा रक्कम मिळणेसाठी ग्राहक संरक्षण अधिनियम-1986 चे कलम-12 अन्वये प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
2. तक्रारकर्तीचे कथन थोडक्यात येणे प्रमाणे-
3. तक्रारकर्ती श्रीमती कल्पना इंद्रपाल भलावी यांचे पती श्री इंद्रपाल भिकराम भलावी यांचा दि.30.09.2010 रोजी नागपूर ते जबलपूर मार्गावर मोटरसायकलने जात असताना एका ट्रेलरने धडक दिल्याने अपघाती मृत्यू झाला. तक्रारकर्तीचे पती यांचे मालकीची मौजा बोथीया पालोरा, तालुका रामटेक, जिल्हा नागपूर शेती असून त्याचा सर्व्हे क्रं 109, व क्षेत्रफळ 2.46 हेक्टर आर आहे. सदर शेतीवरच संपूर्ण कुटूंबियांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे.
4. तक्रारकर्तीने पतीचे मृत्यू नंतर शेतकरी व्यक्तीगत अपघात योजने अंतर्गत विमा रक्कम रुपये-1,00,000/- प्राप्त होण्यासाठी आवश्यक दस्तऐवजांसह अर्ज विरुध्दपक्ष क्रं 3 तहसिलदार, रामटेक यांचे कार्यालयात दि.03.11.2010 रोजी केला. विरुध्दपक्षाने मागणी केल्या नुसार संपूर्ण दस्तऐवज तक्रारकर्तीने वि.प.क्रं 3 चे कार्यालयात सादर केले.
5. विमा दाव्या संबधाने आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण केल्या नंतरही, विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी तर्फे तक्रारकर्तीचा विमा दावा मंजूर केला किंवा नाही या बाबत कळविले नाही वा पत्र दिले नाही. म्हणून प्रस्तुत तक्रार तक्रारकर्तीने न्यायमंचा समक्ष दाखल करुन त्याद्वारे विरुध्दपक्षा कडून विमा दावा रक्कम रुपये-1,00,000/- द.सा.द.शे.18% दराने व्याजासह मिळावे तसेच शारिरीक, मानसिक त्रासा बद्यल रुपये-20,000/- व तक्रारखर्च रुपये-10,000/- मिळावेत अशी मागणी केली. 6. प्रस्तुत न्यायमंचा तर्फे यातील विरुध्दपक्ष क्रं 1 ते 3 यांना स्वतंत्ररित्या नोंदणीकृत डाकेने नोटीस पाठविण्यात आली. सदर न्यायमंचाची नोटीस संबधित वि.प.क्रं 1 ते 3 यांना प्राप्त झाल्या बद्यल रजिस्टर पोच अभिलेखावर दाखल आहेत. 7. विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने आपले लेखी उत्तर प्रतिज्ञालेखावर न्यायमंचा समक्ष सादर केले. त्यांनी आपले लेखी उत्तरामध्ये तक्रारकर्तीचे पती श्री इंद्रपाल भलावी हे दि.30.09.2010 रोजी मोटर सायकल क्रं-MH-40-S 8696 बजाज प्लॅटीनम चालवित होते व त्या दिवशी ट्रेलरला ठोस लागून अपघात झाल्या बाबत पुष्टी देणारे पोलीस दस्तऐवज असल्याने त्या बद्यल आक्षेप नसल्याचे नमुद केले. तक्रारकर्तीने वेळोवेळी विरुध्दपक्षाने मागणी केल्या नुसार दस्तऐवज पुरविल्याची बाब नाकबुल केली.
विरुध्दपक्ष क्रं 1 यांनी पुढे असे नमुद केले की, अपघाताचे वेळी तक्रारकर्तीचे पती हे मोटर सायकल चालवित असल्यामुळे त्यांचेकडे मोटर सायकल चालविण्याचा वैध परवाना असणे आवश्यक होते व त्या प्रमाणे मोटर सायकल चालक परवान्याची मागणी विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने तक्रारकर्ती व विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 यांचे कडे दि.30.12.2011 रोजीचे पत्रान्वये करुन 30 दिवसाचे आत वाहन परवाना जमा न केल्यास दावा बंद करण्यात येईल अशी सुचना केली होती. परंतु तक्रारकर्तीने तिचे मृतक पतीचा वाहन चालविण्याचा परवाना वि.प.क्रं 1 विमा कंपनीकडे विहित मुदतीत जमा केला नसल्याने दावा आपोआप बंद झाला, त्यामुळे विमा दावा मंजूर अथवा नामंजूर करण्याचा प्रश्नच उदभवत नाही. सदर परिस्थितीत विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने तक्रारकर्तीस कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नसल्याने, तक्रारकर्तीस शारीरीक व मानसिक त्रास होण्याचा प्रश्नच उदभवत नाही. त्यामुळे त्यांचे विरुध्दचे तक्रारीतून त्यांना मुक्त करण्यात यावे, अशी विनंती विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने केली. 8. विरुध्दपक्ष क्रं 2 कबाल इन्शुरन्स कंपनी तर्फे लेखी उत्तर प्रतिज्ञालेखावर न्यायमंचा समक्ष सादर करण्यात आले. त्यांनी लेखी उत्तरामध्ये ते केवळ मध्यस्थ सल्लागार म्हणून शासन आणि विमा कंपनी यांचे मध्ये कार्य करतात व शासनास विना मोबदला सहाय्य करीत असल्याने तक्रारकर्ती या त्यांच्या ग्राहक होऊ शकत नाहीत. संबधित तालुका अधिकारी यांचे कडून प्राप्त विमा प्रस्तावाची योग्य ती छाननी करुन, तसेच आवश्यक दस्तऐवजांची पुर्तता करुन विमा प्रस्ताव संबधित विमा कंपनीकडे मंजूरीसाठी ते पाठवितात. मृतक श्री इंद्रपाल भिकराम भलावी यांचे मृत्यू संबधाने विमा प्रस्ताव संबधित दस्तऐवजांसह जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, नागपूर यांचे मार्फतीने त्यांचे कार्यालयास दि.10.11.2011 रोजी प्राप्त झाला व त्यांनी सदरचा विमा प्रस्ताव विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीकडे दि.26.12.2011 रोजी पाठविला. सदरचा विमा प्रस्ताव विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे कार्यालयात प्रलंबित आहे. त्यांनी तक्रारकर्तीस कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नसल्याने त्यांना मुक्त करण्यात यावे, अशी विनंती केली. 9. विरुध्दपक्ष क्रं 3 तहसिलदार, रामटेक यांना या न्यायमंचाचे मार्फतीने नोंदणीकृत डाकेने नोटीस पाठविण्यात आली. सदर नोटीस वि.प.क्रं 3 यांना यदि.18.02.2013 रोजी प्राप्त झाल्या बाबत रजिस्टर पोच अभिलेखावर दाखल आहे . परंतु नोटीस प्राप्त होऊनही वि.प.क्रं 3 तर्फे कोणीही न्यायमंचा समक्ष उपस्थित झाले नाही वा लेखी निवेदनही दाखल केले नसल्यामुळे, वि.प.क्रं 3 विरुध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश मंचाने दि.03.07.2013 रोजी पारीत केला. 10. तक्रारकर्तीने पान क्रं 8 वरील यादी नुसार एकूण 10 दस्तऐवजाच्या प्रती सादर केल्यात, ज्यामध्ये तक्रारकर्तीने सादर केलेला विमा दावा, मृतक शेतकरी यांचे आईचा प्रतिज्ञालेख, 7/12 चा उतारा, गाव नमुना 8 अ, 6-क, फेरफार पत्रक, तक्रारकर्तीचे मृतक पतीचे अपघाता संबधाने एफ.आय.आर., घटनास्थळ पंचनामा, मृतकाचा शव विच्छेदन अहवाल इत्यादी दस्तऐवजाचा समावेश आहे. तक्रारकर्तीने स्वतःचे स्वतंत्र शपथपत्र दाखल केले तसेच श्री संजय नागोराव कोठाळे यांचे शपथपत्र दाखल केले. सोबत मोटर सायकल संबधीचे दस्तऐवज दाखल केले. लेखी युक्तीवाद व मा.वरिष्ठ न्यायालयांचे निकालपत्राच्या प्रती दाखल केल्यात. 11. विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने तक्रारकर्तीस पाठविलेल्या दि.30.12.2011 च्या पत्राची प्रत, विमा दाव्या संबधाने झालेल्या त्रिपक्षीय करारनाम्याची प्रत दाखल केली. तसेच लेखी युक्तीवाद दाखल केला. 12. प्रस्तुत प्रकरणात त.क. आणि वि.प.क्रं 1 विमा कंपनी यांचे तर्फे त्यांचे वकीलांचा युक्तीवाद ऐकण्यात आला. 13. तक्रारकर्तीची प्रतिज्ञालेखावरील तक्रार, विरुध्दपक्ष क्रं 1 युनायटेड इंडीया इन्शुरन्स कंपनी आणि वि.प.क्रं 2 कबाल इन्शुरन्स सर्व्हीसेस यांचे प्रतिज्ञालेखावरील लेखी उत्तर आणि प्रकरणातील उपलब्ध दस्तऐवज व उभय पक्षांचे अधिवक्ता यांचा युक्तीवाद यावरुन न्यायमंचाचे निर्णयार्थ उपस्थित होणारे मुद्दे व त्यावरील निष्कर्ष खालील प्रमाणे नोंदविलेले आहेत. मुद्दा उत्तर
(1) विरुध्दपक्षकाराने, त.क.ला दिलेल्या सेवेत कमतरता सिध्द होते काय? ………………होय.
(2) काय आदेश? ………………………………….... अंतीम आदेशा प्रमाणे :: कारण मीमांसा :: 14. प्रकरणातील उपलब्ध तलाठी 7/12 व गाव नमुना-08 क व 6 क इत्यादी प्रतींचे उता-यावरुन तक्रारकर्तीचे पती मृतक श्री इंद्रपाल भिकराम भलावी यांचे मालकीची मौजा बोथीया पालोरा, तालुका रामटेक, जिल्हा नागपूर शेती असून त्याचा सर्व्हे क्रं 109, व क्षेत्रफळ 2.46 हेक्टर आर आहे. यावरुन मृतक हे शेतकरी होते या बाबी स्पष्ट होतात. 15. प्रकरणातील उपलब्ध पोलीस दस्तऐवज एफ.आय.आर., घटनास्थळ पंचनामा, आणि डॉक्टरांचे शवविच्छेदन अहवाल, यावरुन तक्रारकर्तीचे मृतक पती श्री इंद्रपाल भिकराम भलावी यांचा दि.30.09.2010 रोजी नागपूर ते जबलपूर मार्गावर मोटरसायकलने जात असताना एका ट्रेलरने निष्काळजीपणाने धडक देऊन अपघाती मृत्यू झाल्याची बाब स्पष्ट होते. 16. तक्रारकर्तीचे मृतक पती श्री इंद्रपाल भिकराम भलावी हे शेतकरी असून त्यांचा विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीकडे शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा उतरविलेला होता तसेच त्यांचा दि.30.09.2010 रोजी अपघातामुळे झालेला मृत्यू या संबधाने उभय पक्षांमध्ये कोणताही विवाद नाही.
17. विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचा (वि.प. क्रं 1 विमा कंपनी म्हणजे- “युनायटेड इंडीया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड तर्फे डिव्हीजनल मॅनेजर, नागपूर”) महत्वाचा विवाद असा आहे की, अपघाताचे वेळी तक्रारकर्तीचे पती श्री इंद्रपाल भिकराम भलावी हे मोटर सायकल बजाज प्लॅटीनम क्रं-MH-40-S-8696 चालवित असल्यामुळे त्यांचेकडे मोटर सायकल चालविण्याचा वैध परवाना असणे आवश्यक होते व त्या प्रमाणे मोटर सायकल चालक परवान्याची मागणी विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने, तक्रारकर्ती व विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 यांचे कडे दि.30.12.2011 रोजीचे पत्रान्वये करुन 30 दिवसाचे आत वाहन परवाना जमा न केल्यास दावा बंद करण्यात येईल अशी सुचना केली होती. परंतु तक्रारकर्तीने तिचे मृतक पतीचा वाहन चालविण्याचा परवाना वि.प.क्रं 1 विमा कंपनीकडे विहित मुदतीत जमा केला नसल्याने, दावा आपोआप बंद झालेला आहे. विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने आपले म्हणण्याचे समर्थनार्थ आपली भिस्त पोलीस घटनास्थळ पंचनामा इत्यादी दस्तऐवजांवर ठेवली. सदर पोलीस घटनास्थळ पंचनाम्यात अपघातामध्ये रवि उर्फ इंद्रपाल भिकराम भलावी (त.क.चे पती) अपघातामध्ये मरण पावला तसेच त्याचे पाठीमागे मोटरसायकवर बसलेला संजय नागोराव कोठाळे हा गंभीर जख्मी झाला असे नमुद केलेले आहे. 18. या संदर्भात तक्रारकर्तीने आपल्या तक्रारी सोबत पुराव्या दाखल शपथपत्र दाखल केले असून त्यामध्ये दि.30.09.2010 रोजी अपघाताचे वेळी तिचे पतीचा मित्र श्री संजय नागोराव कोठाळे हे बजाज प्लॅटीना क्रमांक- MH-40-S-8696 मोटर सायकल चालवित होते आणि तक्रारकर्तीचे पती हे सदर मोटर सायकलवर मागे बसले होते. पोलीस दस्तऐवजात तक्रारकर्तीचे पती हे घटनेचे वेळी सदर मोटर सायकल चालवित होते असे जे नमुद केलेले आहे, ते चुकीचे आहे. त्यामुळे मृतक तक्रारकर्तीचे पतीचे मोटर सायकल परवान्याची विमा दाव्यासाठी गरजच नसल्याचे नमुद केले.
19. तक्रारकर्तीने पुराव्या दाखल दुसरे शपथपत्र त्यांचे मृतक पती श्री इंद्रपाल भलावी यांचे मित्र श्री संजय नागोराव कोठाळे यांचे दाखल केले. सदर शपथपत्रामध्ये श्री संजय नागोराव कोठाळे यांनी नमुद केले की, घटनेचे दिवशी म्हणजे दि.30.09.2010 रोजी नागपूर ते जबलपूर रोडने ते त्यांचेच मालकीचे बजाज प्लॅटीना क्रमांक- MH-40-S- 8696 मोटर सायकलने जात असताना व सदरचे वाहन ते स्वतः चालवित असताना व तक्रारकर्तीचे पती श्री इंद्रपाल भिकराम भलावी हे सदर वाहनावर मागच्या सीटवर बसले असताना एका ट्रेलरने धडक दिल्याने तक्रारकर्तीचे पतीचा मृत्यू झाला आणि ते जख्मी झाले. पोलीस एफ.आय.आर.आणि अन्य दस्तऐवजामध्ये तक्रारकर्तीचे पती सदर मोटर सायकल घटनेचे वेळी चालवित होते आणि ते मागच्या सीटवर बसले होते असे जे नमुद केलेले आहे, ते चुकीचे असल्याचे नमुद केले. 20. तक्रारकर्तीने बजाज प्लॅटीना क्रमांक- MH-40-S 8696 मोटर सायकल संबधीचे दस्तऐवज दाखल केले असून त्यावरुन सदरचे वाहन हे श्री संजय कोठाळे यांचे मालकीचे असल्याचे दिसून येते. 21. उपरोक्त नमुद दोन्ही शपथपत्रे, वाहनाचे मालकी संबधीचे दस्तऐवज इत्यादी पाहता, पोलीस घटनास्थळ पंचनाम्यामध्ये अपघाताचे वेळी सदर बजाज प्लॅटीना क्रमांक- MH-40-S-8696 मोटर सायकल तक्रारकर्तीचे मृतक पती इंद्रजीत भिकराम भलावी चालवित होते असे जे नमुद केलेले आहे, ते दोन्ही शपथपत्रावरुन चुकीचे असल्याचे स्वयंस्पष्ट होते. अपघाताचे वेळी वाहन हे तक्रारकर्तीचे मृतक पती श्री इंद्रजीत भलावी यांचे मित्र श्री संजय कोठाळे चालवित होते ही बाब स्वयंस्पष्ट होते. 22. अपघाताचे वेळी तक्रारकर्तीचे पती श्री इंद्रजीत भलावी यांचा मृत्यू झाल्याने तसेच त्यांचा मित्र श्री संजय कोठाळे हा गंभीर जख्मी झाला होता अशी स्थिती पाहता त्यानंतर पोलीसानीं तयार केलेला पंचनामा विचारात घेतला तर, पंचनामा करते वेळी घटनेचा प्रत्यक्ष्यदर्शी साक्षीदार-1 म्हणजे तक्रारकर्तीचा पती हा मृत झालेला होता तर प्रत्यक्ष्यदर्शी साक्षीदार-2 म्हणजे त.क.चे पतीचा मित्र हा गंभिर जखमी झालेला होता, त्यामुळे तक्रारकर्तीचे शपथपत्र व त.क.चे पतीचे मित्राचे शपथपत्र हे न्यायमंच ग्राहय धरते. 23. या संदर्भात तक्रारकर्ती तर्फे खालील मा.वरिष्ठ न्यायालयांचे निकालपत्रांवर भिस्त ठेवण्यात आली.
(I) IV (2011) CPJ 243 (N.C.) New India Assurance Co.Ltd.–V/s- M.S. Venkatesh Babu सदर प्रकरणात मा.राष्ट्रीय ग्राहक आयोग दिल्ली यांनी पोलीसांनी नोंदविलेला एफ.आय.आर. चा उपयोग विमा कंपनी आपले बचावासाठी करु शकत नाही. एफ.आय.आर. आणि पोलीसांनी नोंदविलेला जाब-जबाब हा पुराव्यासाठी ग्राहय होऊ शकत नाही असे नमुद केलेले आहे. आमचे समोरील प्रकरणात सुध्दा विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी आपले समर्थनार्थ पोलीस घटनास्थळ पंचनाम्याचा आधार घेत आहे, त्यामुळे उपरोक्त निवाडया वरुन त्याचा लाभ विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीस घेता येणार नाही असे न्यायमंचाचे स्पष्ट मत आहे. (II) 2007 (3) CPR 142 Hon’ble Mumbai State Consumer Disputes Redressal Commission Aurangabad The New India Assurance Co.Ltd., –V/s- Smt. H.P.Dhoka सदर प्रकरणात सुध्दा पोलीसांनी घटना तपासाचे वेळी सी.आर.पी.चे कलम 161 नुसार नोंदविलेला जाब-जबाब हा पुराव्याचे दृष्टीने तो पर्यंत ग्राहय धरण्यात येऊ नये जो पर्यंत त्या व्यक्तीस मंचा समक्ष तपासल्या जाऊ शकत नाही असे मत मा.राज्य ग्राहक आयोग, खंडपिठ औरंगाबाद यांनी सदर निर्णयात नोंदविलेले आहे. आमचे समोरील प्रकरणात मा.आयोगाचा सदर निर्णय तंतोतंत लागू पडतो. कारण आमचे समोरील प्रकरणात सुध्दा केवळ पोलीसांनी नोंदविलेल्या घटनास्थळ पंचनामा व इतर दस्तऐवजाचा आधार विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी घेत आहे. परंतु उपरोक्त नमुद निर्णय पाहता असा आधार वि.प.क्रं 1 विमा कंपनी घेऊ शकत नाही, असे मंचाचे स्पष्ट मत आहे. विरुध्दपक्ष क्रमांक-1 विमा कंपनीने केवळ पोलीस दस्तऐवजांचा आधार घेऊन आणि तक्रारकर्तीचे क्लेम संबधाने प्रत्यक्ष्य कोणतीही चौकशी न करता, विनाकारण तक्रारकर्तीचा विमा क्लेम एवढे दिवस निर्णय न घेता प्रलंबित ठेवला. 24. विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे असेही म्हणणे आहे की, त्यांनी तक्रारकर्तीचे मृतक पतीचे संबधाने मोटर सायकल चालक परवान्याची मागणी तक्रारकर्ती व विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 यांचे कडे दि.30.12.2011 रोजीचे पत्रान्वये करुन 30 दिवसाचे आत वाहन परवाना जमा न केल्यास दावा बंद करण्यात येईल अशी सुचना केली होती. परंतु तक्रारकर्तीने आपले पुराव्या दाखल शपथपत्रात सदरचे विधान पूर्णपणे नाकारलेले असून तक्रारकर्तीला सदर तक्रार ग्राहक मंचात दाखल होई पर्यंत असे कोणतेही पत्र मिळाले नसल्याचे नमुद केले. वि.प.क्रं 1 विमा कंपनीने असे पत्र पाठविल्या बद्यल केवळ पत्राची प्रत दाखल केली परंतु पाठविल्याचा कोणताही पुरावा दाखल केला नाही, त्यामुळे वि.प.क्रं 1 विमा कंपनीचे सदरचे म्हणणे मंच ग्राहय धरत नाही. 25. अशाप्रकारे उपरोक्त नमुद केल्या नुसार वि.प.क्रं 1 विमा कंपनीने तक्रारकर्तीचे विमा क्लेम संबधाने कोणतीही सखोल चौकशी न करता केवळ पोलीस दस्तऐवजांचा आधार घेऊन विनाकारण तक्रारकर्तीचा क्लेम प्रलंबित ठेवला व तक्रारकर्तीस दोषपूर्ण सेवा दिली असे न्यायमंचाचे स्पष्ट मत आहे. त्यामुळे तक्रारकर्ती तिचे मृतक पती श्री इंद्रजीत भलावी यांचे अपघाती मृत्यू संबधाने शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत रक्कम रु.-1,00,000/- मंचात तक्रार दाखल दिनांका पासून व्याजासह तसेच झालेल्या शारीरीक व मानसिक त्रासा बद्यल रुपये-5000/- व तक्रारखर्च म्हणून रुपये-2000/- विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी कडून मिळण्यास पात्र आहे, असे न्यायमंचाचे स्पष्ट मत आहे. 26. वरील वस्तुस्थितीचा विचार करुन, आम्ही, प्रकरणात खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत- ::आदेश:: 1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2) विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीस निर्देशित करण्यात येते की, तक्रारकर्तीस तिचे पतीचे अपघाती मृत्यू संबधाने शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत रक्कम रुपये-1,00,000/-(अक्षरी रुपये- एक लक्ष फक्त ) प्रस्तुत तक्रार मंचात दाखल दि.-26.12.2012 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.9% दराने व्याजासह द्यावी. 3) तक्रारकर्तीस झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्यल रुपये-5000/- (अक्षरी रु.पाच हजार फक्त) आणि तक्रारीचे खर्चा बद्यल रुपये-2000/- (अक्षरी रु. दोन हजार फक्त ) वि.प.क्रं 1 विमा कंपनीने तक्रारकर्तीस द्यावेत. 4) विरुध्दपक्ष क्रं 2 व 3 यांना सदर तक्रारीतून मुक्त करण्यात येते. 5) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने सदर निकालपत्राची प्रत प्राप्त झाल्या पासून 30 दिवसाचे आत करावे.. 6) निकालपत्राची प्रमाणित प्रत सर्व पक्षांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात यावी. |