निकालपत्र
(दि.07.08.2015)
(घोषीत द्वारा- मा. श्री. आर.एच.बिलोलीकर, सदस्य)
1. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेविरुध्द सेवेत त्रुटीच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे.
अर्जदार यांचे तक्रारीतील कथन थोडक्यात खालील प्रमाणेः-
2. अर्जदार शरद सटवाजी वाघमारे राहणार देगांव,तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड हा दिनांक 04.02.2013 रोजी आपली मोटार सायकल क्रमांक एमएच 26/एए 8867 वर रात्री 8.30 वाजता मालेगांव ते नांदेड रोडवर जात असतांना रानडूक्करशी धडक होऊन अपघात झाल्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला आणि त्याचा दात पडून त्यास 21 टक्के कायमचे अपंगत्व आले. सदर अपघाताची तक्रार दिनांक 26.02.2013 रोजी अर्जदाराने अर्धापूर पोलीस स्टेशनला दिली. अर्जदाराने अपघातग्रस्त वाहनाचा विमा गैरअर्जदार यांचेकडे काढलेला होता. ज्याचा पॉलिसी क्रमांक 280600/31/12/01/00003040 असा असून त्याचा कालावधी दिनांक 06.07.2012 ते दिनांक 05.07.2013 असा आहे. सदर पॉलिसीत वाहनाचे मालकाची रक्कम रु. एक लाखाची जोखीम गैरअर्जदार यांनी घेतलेली आहे. त्यामुळे अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडे नुकसान भरपाई मागणेसाठी दिनांक 15.07.2014 रोजी गेला असता त्यास क्लेम फॉर्म देण्यास गैरअर्जदार यांनी टाळाटाळ केली. म्हणून गैरअर्जदार यांनी सदरील तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारीमध्ये अर्जदार यांनी मंचास अशी विनंती केली आहे की, गैरअर्जदाराने अर्जदारास त्रुटीची सेवा दिल्याबद्दल विमा रक्कमेपोटी रक्कम रु.50,000/- दिनांक 04.02.2013 पासून रक्कम वसुल होईपर्यंत द.सा.द.शे.12 टक्के व्याजासह गैरअर्जदार यांनी अर्जदारास द्यावे. तसेच तसेच मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम रु. 25,000/- व दावा खर्च रु.5,000/- इत्यादी रक्कमेची मागणी गैरअर्जदार यांचेकडून तक्रारीव्दारे केलेली आहे.
3. गैरअर्जदार यांना मंचाची नोटीस तामील झाल्यानंतर गैरअर्जदार हे वकीलामार्फत हजर होऊन त्यांनी आपला लेखी जबाब दाखल केलेला आहे.
गैरअर्जदार यांचे लेखी जबाबातील म्हणणे थोडक्यात पुढील प्रमाणेः-
4. अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडे सदर वाहनाचा विमा काढलेला होता हे म्हणणे बरोबर आहे. परंतु अर्जदाराचे सदर म्हणणे पुर्ण चुकीचे आहे की, अर्जदाराला अंशतः किंवा कायमचे अपंगत्व आल्यास गैरअर्जदार यांनी नुकसान भरपाई देण्याची जोखीम स्विकारलेली आहे. अर्जदाराचे हेही म्हणणे चुकीचे आहे की, अर्जदाराने दिनांक 15.07.2014 रोजी दावा दाखल करणेसाठी फॉर्म मागीतला असता गैरअर्जदार यांनी त्यास नकार दिला. अर्जदाराने वाहनाची विमा पॉलिसी काढलेली होती त्यात तिस-या व्यक्तीला गंभीर दुखापत झाल्यास किंवा कायमचे अपंगत्व आल्यास त्या व्यक्तीला नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी गैरअर्जदार यांनी स्विकारलेली आहे. प्रस्तुत प्रकरणात अर्जदार सदर वाहनाचा मालक असून तो स्वतः वाहन चालवित असतांना तो जखमी झालेला असल्याने त्यास नुकसान भरपाई देण्याची सदर पॉलिसीमध्ये गैरअर्जदार यांनी जोखिम स्विकारलेली नाही. म्हणून गैरअर्जदार हे अर्जदारास काहीही देणे लागत नाही. गैरअर्जदार यांनी मंचास अशी विनंती केलेली आहे की, अर्जदाराची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी अशी आपल्या लेखी जबाबाव्दारे मागणी केलेली आहे.
5. अर्जदार व गैरअर्जदार यांनी पुराव्याकामी आपले शपथपत्र व कागदपत्रे दाखल केलेली आहेत. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकला. दोन्ही बाजूंनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता खालील गोष्टी स्पष्ट होतात.
6. अर्जदाराची मुख्य तक्रार अशी आहे की, अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडे त्यांच्या वाहनाचा विमा काढलेला होता त्यात त्याची स्वतःचीही जोखीम गैरअर्जदार विमा कंपनीने स्विकारलेली होती. अर्जदारास अपघातात गंभीर दुखापत होऊन देखील गैरअर्जदाराने विम्यातील अटी व शर्तीप्रमाणे अर्जदारास नुकसान भरपाई दिलेली नाही. अर्जदार शरद वाघमारे यांनी रक्कम रु.945/- भरुन त्याचे वाहन मोटार सायकल क्रमांक एमएच 26/एए 8867 चा विमा गैरअर्जदार यांचेकडे काढला होता. सदर पॉलिसीचा क्रमांक 280600/31/12/01/00003040 असा असून त्याचा कालावधी दिनांक 06.07.2012 ते दिनांक 05.07.2013 पर्यंत होता. हे अर्जदार यांनी दाखल केलेल्या पॉलिसीच्या प्रतीवरुन स्पष्ट आहे. सदर पॉलिसीचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, owner-driver साठी रक्कम रु.1,00,000/- ची जोखीम गैरअर्जदार यांनी घेतलेली आहे. अर्जदार हा अपघातग्रस्त वाहनाचा मालक असल्यामुळे त्याची रक्कम रु.1,00,000/- ची जोखीम गैरअर्जदार यांनी घेतलेलली आहे हे स्पष्ट आहे सदर पॉलिसीत Limits of Liability under Section –II-(i) death or bodily injury in respect of one accident: As per Motor Vehicle Act,1988 असे नमुद केलेले आहे यावरुन हे स्पष्ट आहे की, गैरअर्जदाराने अर्जदारास होणा-या injury ची देखील जोखीम घेतलेली आहे. अर्जदारास दिनांक 04.02.2013 रोजी त्याचे मालकीची मोटार सायकल क्रमांक एमएच 26/एए 8867 वरुन जात असतांना अपघात झाला हे अर्जदार यांनी दाखल केलेल्या पोलीस पेपर्सवरुन स्पष्ट आहे. सदर अपघातामुळे अर्जदारास 21 टक्के कायमचे अपंगत्व आलेले असल्याचे अर्जदाराने दाखल केलेल्या Form Comp.”B” वरुन स्पष्ट आहे.
सदर अपंगत्वामुळे अर्जदार हा विम्याच्या पॉलिसीत उल्लेखीत अटी व शर्तीप्रमाणे नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहे अर्जदारास सदरील अपघातामुळे दवाखान्यात खर्च रक्कम रु.14,050/- व रक्कम रु.18,900/- आलेला आहे हे अर्जदार यांनी दाखल केलेल्या पावत्यावरुन स्पष्ट आहे. अर्जदार यांनी आपल्या म्हणणेच्या पृष्टयर्थ मा. राज्य आयोगाचा निकाल First Appeal No. 389 of 2012 चा संदर्भ दिलेला आहे जेकी, प्रस्तुत प्रकरणात लागू होतो. अर्जदारास 21 टक्के कायमचे अपंगत्व आलेले आहे. 100 टक्के अपंगत्वासाठी रक्कम रु.1,00,000/- ची नुकसान भरपाई देण्याची जोखीम गैरअर्जदार यांनी स्विकारलेलीआहे. हयाच प्रमाणात अर्जदारास 21 टक्के कायमचे अपंगत्व आलेले असल्यामुळे अर्जदार हा रक्कम रु.25,000/- मिळणेस पात्र आहे. अर्जदारास नुकसान भरपाई न देऊन गैरअर्जदार यांनी सेवेत त्रुटी दिलेली आहे असे मंचाचे मत आहे.
वरील विवेचनावरुन मंच खालील आदेश देत आहे.
आ दे श
1. अर्जदार यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. गैरअर्जदार यांनी अर्जदारास रक्कम रु.25,000/- आदेश तारखेपासून तीस दिवसाच्या आत द्यावे.
3. गैरअर्जदार यांनी अर्जदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु.1500/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु. 1000/- आदेश तारखेपासून तीस दिवसाच्या आत द्यावे.
4. आदेशाची पूर्तता झाल्याबद्दलचा अहवाल दोन्ही पक्षांनी 45 दिवसानंतर मंचात दाखल करावा. प्रकरण 45 दिवसानंतर पुन्हा आदेशाच्या पूर्ततेच्या अहवालासाठी ठेवले जाईल.
5. दोन्ही पक्षकारास निकालाच्या प्रती मोफत पुरविण्यात याव्यात.