निकालपत्र
(घोषीत द्वारा- मा. सौ. स्मिता बी.कुलकर्णी, अध्यक्षा )
अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्या विरुध्द सेवेत त्रुटी दिल्याच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे आहे.
अर्जदार यांनी कार्यालयीन कामासाठी व खाजगी कामासाठी टॅबलेटची आवश्यकता असल्याने गैरअर्जदार नं. 1 यांच्याकडून इनटेक्स कंपनीचा टॅबलेट दिनांक 17/10/2013 रोजी 5,500/- रुपयाला खरेदी केला ज्याचा पावती क्र. 158 असून टॅबलेटचा मॉडल Tab buddy असून EMEI नं. 2104200304123401540 असा आहे. अर्जदाराने खरेदी केलेला टॅबलेट दिनांक 21/12/2013 पासून पूर्णपणे बंद झाला होता परंतू अर्जदार त्याच्या कार्यालयात कामामध्ये व्यस्त असल्याने 2-3 दिवस बाहेरगावी गेलेले होते. त्यानंतर दिनांक 02/01/2014 रोजी सदर टॅबलेट घेवून गैरअर्जदार 1 कडे गेले असता गैरअर्जदार 1 ने टॅबलेट वॉरंटी काळामध्ये असल्याने सदर टॅबलेटमध्ये आलेले कोणतेही बिघाड गैरअर्जदार 2 या सर्व्हीस सेंटरकडे दुरुस्ती करुन मिळेल असा सल्ला दिला. अर्जदाराने कंपनीच्या सर्व्हीस सेंटरकडे नादुरुस्त टॅबलेट दिनांक 02/01/2014 रोजी दुरुस्तीसाठी दिला. त्यानंतर 8 दिवसांनी अर्जदाराने सर्व्हीस सेंटरकडे टॅबलेट दुरुस्ती झाल्याची चौकशी केली असता गैरअर्जदार 2 ने प्रतिसाद दिला नाही व दिनांक 18/03/2014 रोजी अर्जदार गैरअर्जदार 2 सर्व्हीस सेंटर यांच्याकडे गेला असता त्यांनी तुमचा टॅबलेट IME नंबर चुकीचा लिहिलेला असल्यामुळे कंपनीने IME नंबर कनेक्ट लिहून पाठविण्यासाठी परत केलेला आहे, असे कळविलेले आहे. पावतीवर IME नंबर हा गैरअर्जदार 2 ने चुकीचा लिहिला होता त्यामध्ये अर्जदाराची कोणतीही चुक नव्हती त्यामुळे दिनांक 02/01/2014 ते 18/03/2014 पर्यंत अर्जदाराचा वेळ विनाकारण वाया गेला. गैरअर्जदार 2 ने सुधारीत IME नंबर लिहून टॅबलेट दुरुस्तीसाठी जमा करुन घेतला. अर्जदाराने त्यानंतर वेळोवेळी टॅबलेट दुरुस्ती झाला आहे काय अशी विचारणा केली परंतू गैरअर्जदार 2 यांच्याकडून कुठलेही समाधानकारक उत्तर मिळालेले नाही व अर्जदार हे गैरअर्जदार 2 यांच्याकडे गेले असता त्यांनी तुमचा टॅबलेट दुरुस्त होवून आला होता परंतू ट्रान्सपोर्टमध्ये टॅबलेट फुटला असून तो पुन्हा दुरुस्तीसाठी पाठवलेला आहे, असे सांगितले व फुटलेल्या टॅबलेटचे फोटोग्राफ अर्जदारास दाखवले. सदर फोटोग्राफ कंपनीस व्हॉटस अॅपवर पाठवलेले आहेत, असेही सांगितले. अर्जदाराने सदरचा टॅबलेट कार्यालयीन कामकाजासाठी व वैयक्तीक कामासाठी खरेदी केला होता परंतू खरेदी केल्यानंतर 2 महिन्याच्या आतच टॅबलेट नादुरुस्त झाल्यामुळे अर्जदारास कोणताही उपयोग करता आलेला नाही. अर्जदारास मानसिक त्रास सहन करावा लागलेला आहे त्यामुळे प्रस्तुतची तक्रार अर्जदाराने दाखल केलेली आहे. तक्रारीमध्ये अर्जदाराने गैरअर्जदार 3 यांना आदेश देण्यात यावा की, त्यांनी अर्जदारास टॅबलेटची रक्कम रु.5,500/- दिनांक 17/10/2013 पासून 12 टक्के व्याजासह देण्याचा आदेश करावा. तसेच गैरअर्जदार 2 यांनी अर्जदाराचा टॅबलेट दुरुस्तीसाठी निष्काळजीपणा दाखविल्याने अर्जदारास मानसिक त्रास झालेला आहे त्यामुळे मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 10,000/- व गैरअर्जदार 3 यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्यामुळे रक्कम रु. 20,000/-, अर्जदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 10,000/- व दावा खर्चापोटी रक्कम रु. 5,000/- ची मागणी तक्रारीद्वारे केलेली आहे.
गैरअर्जदार 1 व 3 तर्फे अॅड. माधव पाटील यांनी वकीलपत्र दाखल केले. गैरअर्जदार 2 तर्फे अॅड. जांबकर यांनी आपले वकीलपत्र दाखल केले. गैरअर्जदार 1 यांनी आपला लेखी जबाब दाखल केलेला आहे. त्यांचा लेखी जबाब थोडक्यात खालील प्रमाणे.
गैरअर्जदार 1 यांच्याकडे अर्जदार टॅबलेट दुरुस्तीकरिता आले होते. त्यावेळी गैरअर्जदार यांनी अर्जदाराचा टॅबलेट वॉरंटी काळामध्ये असल्याने सर्व्हीस सेंटरकडे संपर्क साधा असे सांगितले. बाकी सर्व तक्रारीतील कथन गैरअर्जदार 1 यांनी अमान्य केलेले आहे. गैरअर्जदार 1 यांनी दाखल केलेल्या शपथपत्राचे अवलोकन केले असता शपथपत्र करणा-या व्यक्तीचे नांव शपथपत्रामध्ये नमूद नाही त्यामुळे सदरील शपथपत्र मंच ग्राहय धरु शकत नाही.
गैरअर्जदार 2 व 3 यांना अनेक संधी देवूनही त्यांनी लेखी जबाब दाखल केलेला नाही त्यामुळे अर्जदाराचा युक्तीवाद ऐकला. दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता खालील बाबी दिसून येतात.
अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्याकडून दिनांक 17/10/2013 रोजी रक्कम रु. 5,500/- चा गैरअर्जदार 3 यांनी उत्पादित केलेला टॅबलेट खरेदी केलेला असल्याचे दाखल पावतीवरुन व इन्व्हाईसवरुन दिसून येते. अर्जदार यांनी दिनांक 17/10/2013 रोजी टॅबलेट खरेदी केल्यानंतर दिनांक 02/01/2014 रोजी सदरील टॅबलेट नादुरुस्त झालेला आहे त्यामुळे नादुरुस्त टॅबलेट हा गैरअर्जदार 2 या अधिकृत सर्व्हीस सेंटर यांच्याकडे दुरुस्तीसाठी टाकलेला असल्याचे दाखल जॉबकार्डवरुन दिसून येते. सदरील जॉबकार्डाचे अवलोकन केले असता त्यावर टॅबलेटचा IME नंबर नमूद केलेला आहे. अर्जदार यांनी दिनांक 02/01/2014 नंतर टॅबलेट दुरुस्ती झाला का अशी विचारणा गैरअर्जदार 2 यांच्याकडे केली असता त्यांनी पावतीवर IME नंबर चुकीचा लिहिलेला असल्यामुळे IME नंबर दुरुस्तीकरुन पुन्हा टॅबलेट कंपनीकडे पाठवलेला असल्याचे सांगितले. सदर बाब ही अर्जदाराने दाखल केलेल्या दिनांक 18/03/2014 रोजी दिलेल्या पावतीवरुन सिध्द होते. त्यानंतर अर्जदाराने विचारणा केल्यानंतरही गैरअर्जदार 2 यांनी अर्जदाराचा टॅबलेट दुरुस्ती करुन दिलेला नाही त्यामुळे अर्जदाराने सदरील तक्रार दाखल केलेली आहे. गैरअर्जदार 1 यांनी अर्जदाराचा टॅबलेट नादुरुस्त झालेला होता व नादुरुस्त झालेला टॅबलेट गैरअर्जदार 1 कडे घेवून गेले असता गैरअर्जदार 1 यांनी अधिकृत सर्व्हीस सेंटरकडे म्हणजेच गैरअर्जदार 2 यांच्याकडे जाण्यास सांगितले. यावरुन अर्जदाराचा टॅबलेट नादुरुस्त झालेला होता ही बाब सिध्द होते. गैरअर्जदार 2 व 3 यांना अनेक संधी देवूनही त्यांनी आपले म्हणणे मंचासमोर दिलेले नाही. याउलट युक्तीवादाच्यावेळी गैरअर्जदार 3 यांनी अर्जदारास नवीन टॅबलेट देण्यास तयार आहेत असे सांगितले. परंतू लेखी म्हणणे दिलेले नाही यावरुन गैरअर्जदार 2 व 3 यांनी अर्जदाराची तक्रार मान्य असल्याचे दिसून येते. गैरअर्जदार 3 यांनी उत्पादित केलेला टॅबलेट हा वॉरंटी कालावधीमध्ये नादुरुस्त झालेला असून गैरअर्जदार 2 अधिकृत सर्व्हीस सेंटरने अर्जदाराचा टॅबलेट दुरुस्त करुन दिलेला नाही. त्यामुळे गैरअर्जदार 3 व 4 यांनी अर्जदारास सेवेत त्रुटी दिलेली आहे. तसेच अर्जदाराने तक्रार दाखल केल्यानंतर गैरअर्जदार 2 व 3 यांनी अर्जदाराच्या तक्रारीवर आपले लेखी म्हणणे देण्याची तसदीही घेतलेली नाही यावरुन गैरअर्जदार 2 व 3 यांना अनुचित व्यापारी पध्दतीचा अवलंब केलेला आहे असे मंचाचे मत झालेले आहे. गैरअर्जदार यांच्या या कृत्यामुळे अर्जदारास निश्चितच मानसिक त्रास सहन करावा लागलेला आहे, असे मंचाचे मत आहे.
वरील विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1. अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2. गैरअर्जदार 3 यांनी अर्जदारास टॅबलेटची किंमत रक्कम रु. 5,500/- आदेश तारखेपासून 30 दिवसाच्या आत अदा करावेत.
3. गैरअर्जदार 2 यांनी अर्जदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- आदेश तारखेपासून 30 दिवसांच्या आत दयावेत.
4. गैरअर्जदार 3 यांनी अर्जदारास तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु. 2,500/- आदेश तारखेपासून 30 दिवसांच्या आत दयावेत.
5. आदेशाची पूर्तता झाल्याबद्दलचा अहवाल दोन्ही पक्षांनी 45 दिवसानंतर मंचात दाखल
करावा.प्रकरण 45 दिवसानंतर पुन्हा आदेशाच्या पूर्ततेच्या अहवालासाठी ठेवले जाईल.
6. निकालाच्या प्रती दोन्ही पक्षकारास मोफत देण्यात याव्यात.
(श्री आर. एच. बिलोलीकर ) (सौ. स्मिता बी.कुलकर्णी)
सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, नांदेड