तक्रारदारांतर्फे - अॅड. श्री. भोसले
जाबदार क्र. 1 व 2 - एकतर्फा
जाबदार क्र. 3 व 4 - स्वत: *****************************************************************
// निकालपत्र //
पारीत दिनांकः- 30/07/2013
(द्वारा- श्रीमती. अंजली देशमुख, अध्यक्ष )
तक्रारदारांची तक्रार संक्षिप्त स्वरुपात खालीलप्रमाणे :-
तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार जाबदार बिल्डर आणि सोसायटी यांचेविरुध्द त्यांना पार्कींगची जागा दिली नाही म्हणून दाखल केली आहे. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार तक्रारदार या विवाहापूर्वी नोकरीच्या निमीत्ताने पुणे येथे राहत होत्या. दि. 18/3/2007 रोजी तक्रारदारांनी पार्कींगसहित सदनिकेची नोंदणी केली होती. सदनिका क्र. 604, सहावा मजला, विंग सी, साई अथर्व को. ऑप्. हौ. सोसायटी, पिंपळे सौदागर, ता. हवेली पुणे 27 बाबत नोंदणीकृत करारनामा झाला. त्या सदनिकेची एकूण किंमत रु.19,95,000/- ठरली होती. सदनिकेचे एकूण क्षेत्रफळ 926.75 चौ. फुट एवढे होते. या सदनिकेची संपूर्ण किंमत तक्रारदारांनी जाबदार क्र. 1 व 2 यांना दिलेली आहे. त्यानंतर जाबदार क्र. 1 व 2 यांनी सदनिकेचा ताबा दिला आहे. कार पार्कींगसाठीची रक्कम देऊनही तक्रारदारांना करारनाम्यामध्ये नमुद केल्याप्रमाणे कार पार्कींगची जागा देण्यात आली नाही. त्यासाठी तक्रारदारांनी बिल्डर आणि सोसयटीचे चेअरमन यांच्याबरोबर पत्रव्यवहार केला. त्यावर जाबदार क्र. 3 व 4 यांनी जाबदार क्र. 1 व 2 यांच्याकडून कार पार्कींग घ्यावे असे त्यांना उत्तर दिले. दि. 13/6/2012 रोजी तक्रारदारांनी जाबदार क्र. 3 व 4 यांना कार पार्कींगची जागा निश्चित करण्याबाबत विचारणा केली होती, तरीही त्यांना जाबदारांनी कार पार्कींग दिले नाही. तक्रारदाराची ही हक्काची कार पार्कींगची जागा जाबदार क्र. 1 ते 4 यांनी दिली नाही म्हणून त्यांनी दि 13/6/2012 रोजी वकीलांमार्फत नोटीस पाठविली. जाबदार क्र. 1 व 2 यांनी त्याचे उत्तरही दिले नाही आणि पार्कींगही दिलेले नाही. तक्रारदार पुढे असे म्हणतात की, जाबदार क्र. 1 ते 4 यांनी सर्व सदनिकाधारकांना पार्कींग दिले आहे परंतु तक्रारदारालाच दिले नाही त्यामुळे तक्रारदाराची गैरसोय होत आहे. तक्रारदार या ठाणे येथे राहतात. पार्कींग नसल्यामुळे त्यांच्या सदनिकेची किंमतही कमी होत आहे. जाबदार क्र. 1 व 2 यांनी पार्कींगची रक्कम घेऊनसुध्दा पार्कींगची जागा दिली नाही म्हणून सदरील तक्रार. तक्रारदारांनी जाबदार क्र. 1 ते 4 यांचेकडून कार पार्कींग दयावे, मनस्तापाबद्दल व मानसिक त्रासाबद्दल रु.80,000/- व गाडीभाडयाचा खर्च रु. 20,000/- व तक्रारीचा खर्च आणि इतर दिलासा मागतात. तक्रारदारांनी तक्रारीसोबत शपथपत्र आणि कागदपत्रे दाखल केली आहेत.
2. जाबदार क्र. 1 आणि 2 यांना मंचाची नोटीस मिळूनसुध्दा ते हजर राहिले नसल्यामुळे त्यांचेविरुध्द एकतर्फा सुनावणीचा आदेश करण्यात आला.
3. जाबदार क्र. 3 आणि 4 यांनी त्यांचा संयुक्तिक लेखी जबाब दाखल केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, तक्रारदार यांनी सदनिका क्र. 604, सहावा मजला, विंग सी, साई अथर्व को. ऑप्. हौसींग सोसायटी ही सदनिका पार्कींगसहित विकत घेतलेली आहे. सदर सदनिका पार्कींगचा व्यवहार हा बिल्डर आणि तक्रारदार यांच्यामध्ये झाला आहे. बिल्डर श्री. नरेश ठाकुरदास वाधवानी यांनी सदनिका क्र. सी. 604 व एक कार पार्कींग कायदेशीररित्या तक्रारदारास सुपूर्त केला आहे, असे असताना तक्रारदार सोसायटीकडे पार्कींगचा ताबा व नुकसानभरपाई मागू शकत नाहीत. तक्रारदार यांनी ज्यावेळेस सदनिकेची नोंदणी केली त्यावेळेस सोसायटी अस्तित्वात नव्हती, त्यामुळे सोसायटी पार्कींगची जबाबदारी घेऊ शकत नाही. सदर साई अथर्व सहकारी गृहरचना संस्था मर्या. ही सोसायटीच्या दैनंदिन कामकाज व व्यवहार सुरळीतपणे पार पाडण्यासाठी स्थापन झाली आहे. सदर सोसायटीचे चेअरमन, सेक्रेटरी व कमिटी सदस्य हे स्वेच्छेने सेवाभावी वृत्तीने व कुठल्याही प्रकारचा आर्थिक मोबदला न घेता स्वत:चा मुल्यवान वेळ खर्चून सोसायटीचे कामकाज पाहत आहेत. इतर सर्व आरोप अमान्य करत पार्कींगची जागा देणे ही बिल्डरची जबाबदारी आहे असे म्हणतात. वरील सर्व कारणांवरुन सोसायटी व चेअरमन यांना मुक्त करावे अशी मागणी जाबदार करतात.
4. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदनपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदाराची केवळ एवढी मागणी आहे की करारनाम्याप्रमाणे त्यांनी त्यांची सदनिका पार्कींगसहित खरेदी केली होती. साई अथर्व सहकारी गृहरचना संस्था ही सोसायटी सन 2009 मध्ये नोंदणीकृत स्थापन करण्यात आली आहे. तक्रारदारास त्यांच्या पार्कींगची जागा अदयापपर्यत दिली नाही ही त्यांची तक्रार आहे. जाबदार क्र. 1 व 2 बिल्डर यांनी सन 2009 मध्ये नोंदणीकृत सोसायटी करुन दिलेली आहे. त्यानंतर सर्व सदनिकाधारकांसाठी सोसायटीचा दैनंदिन व्यवहार आणि कामकाज हे सोसायटीकडे सुपूर्त केलेले आहे. तक्रारदार त्यांच्या तक्रारीत असे म्हणतात की सर्व सदनिकाधारकांना पार्कींग मिळाले आहे, परंतु त्यांनाच पार्कींग मिळालेले नसल्यामुळे त्यांची गैरसोय होत आहे. साहजिकच त्यांना जर त्यांची गाडी पार्कींग करायची असेल तर किंवा त्यांनी भाडेकरु ठेवला असेल तर त्यांना त्यांची गाडी लावण्यास गैरसोय होत असेल. बिल्डर डेव्हलपर यांनी सोसायटी स्थापन करुन दिल्यामुळे पार्कींगची जागा देण्याची जबाबदारी सोसायटीवर येते. ती कशी दयावी त्यास क्रमांक कसे देण्यात यावेत ही सर्व जबाबदारी सोसायटीवर असते म्हणून मंच जाबदार क्र. 1 व 2 यांचेविरुध्द कुठलेही आदेश पारीत करीत नाही. यासाठी मंच मा. राज्य आयोग, मुंबई यांच्या CC/10/153Mr. Dilip Anant Joshi V/s. M/S Vardhaman Homes या निवाडयाचा आधार घेत आहे. मा.राज्य आयोग, मुंबई त्यांच्या निवाडयात असे नमुद करतात की, “ एकदा सोसायटी झाल्यानंतर सोसायटीच्या व्यवहारात म्हणजे सोसायटी व सदनिकाधारक यांच्या कुठल्याही वादामध्ये बिल्डर डेव्हलपर ढवळाढवळ करु शकत नाहीत. पार्कींगसंबंधीचा निर्णय सोसायटीने जनरल बॉडी मिटींगमध्ये घ्यावयाचा असतो. सोसायटी ही त्यांच्या सदनिकाधारकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी असते”. वरील निवाडयानुसार मंच जाबदार क्र 3 व 4 सोसायटी यांना असा आदेश देते की, त्यांनी तक्रारदारास त्यांची पार्कींगची जागा दयावी आणि त्यावर त्यांचे नाव व क्रमांक लिहून दयावे, जेणेकरुन इतर कोणी त्यांच्या पार्कींगचा वापर करु शकणार नाही. त्यामुळे बिल्डर / डेव्हलपर हे पार्कींग अॅलॉटमेंटसाठी जबाबदार ठरत नाहीत. तक्रारदार सोसायटीचे सभासद / सदनिकाधारक म्हणून फक्त सोसायटीकडेच यासाठी दाद मागू शकतात, तक्रारदारांनी जाबदार क्र. 1 ते 4 यांचेकडून नुकसानभरपाई मागितली आहे. जाबदार क्र. 1 व 2 बिल्डर असल्यामुळे त्यांच्याविरुध्द कुठलाही आदेश नाही. परंतु जाबदार क्र. 3 आणि 4 हे तक्रारदारांच्या सोसायटीतील सभासद आहेत त्यांचेविरुध्द खर्चाचा आदेश केल्यास तक्रारदारासही सभासद म्हणून त्यामध्ये त्यांचा हिस्सा दयावा लागेल. म्हणून मंच खर्चाचा आदेश करत नाही.
वरील सर्व विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
// आदेश //
1. तक्रारदारांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2. जाबदार क्र. 3 व 4 यांनी तक्रारदारांना चार आठवड्यांच्या
आंत त्यांची पार्कींगची जागा दयावी आणि त्यावर त्यांचे
नाव व क्रमांक लिहून दयावे,
3. जाबदार क्र. 1 व 2 यांच्याविरुध्द कुठलाही आदेश नाही.
4. निकालाच्या प्रती उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात
याव्यात.