तक्रारदार स्वत: हजर.
जाबदेणार गैरहजर (एकतर्फा)
द्वारा मा. श्रीमती. गीता. एस. घाटगे, सदस्य
** निकालपत्र **
(12/12/2013)
तक्रारदारांनी सदरहू तक्रार कुरिअर कंपनीविरुद्ध दाखल केलेली आहे. याबाबत थोडक्यात हकीकत खालीलप्रमाणे :
1] तक्रारदारांनी राहूचा जप करुन त्याचा प्रसाद असोला नारळ जाबदेणार कुरिअर कंपनी मे. ट्रॅकॉन कुरिअर्स प्रा. लि. मार्फत सुरत येथे पाठविला. तथापी, ते पार्सल ज्यांना पाठविले होते त्यांना प्राप्त झाले नाही व ते पार्सल पुन्हा तक्रारदारांनाही परत मिळाले नाही. तक्रारदारांनी ज्या दुकानातुन (मे. माधव डिपार्टमेंटल स्टोअर्स) पार्सल पाठविले होते तेथे, तसेच जाबदेणार कुरिअर कंपनीकडे याबाबत लेखी व फोनद्वारे चौकशी केली असता, जाबदेणार कंपनीने सदरहू पार्सल तक्रारदारांना परत पाठविण्यात आले असल्याचे सांगितले. तथापी ते त्यांना अद्यापी परत मिळाले नाही. म्हणून् तक्रारदारांनी जाबदेणार कुरिअर कंपनीला त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याने नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु. 4,267/- मिळावेत अशी दि. 23/5/2013 रोजीच्या पत्राने मागणी केली. या पत्रास उत्तर म्हणून कुरिअर कंपनीने तक्रारदारांना रक्कम रु. 1000/- देण्याबाबत लेखी मान्यता दिली. परंतु तक्रारदारांन ही रक्कम अमान्य असल्याने त्यांना रक्कम रु. 4,267/- नुकसान भरपाई मिळावी म्हणून हा अर्ज दाखल केलेला आहे. तक्रार अर्जाच्या पुष्ठ्यर्थ तक्रारदारांनी प्रतिज्ञापत्र व आवश्यक कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
2] मंचाच्या नोटीसीची बजावणी जाबदेणारांचेवर होवूनही ते प्रस्तुत प्रकरणी हजर न झाल्याने त्यांचेविरुद्ध एकतर्फा आदेश करणेत आले.
3] तक्रारदारांच्या तक्रार अर्जाचे अवलोकन करता, त्यांनी कुरिअरने पाठविलेला प्रसादाचा असोला नारळ गुजरात येथील त्यांचे नातेवाईकांना मिळाला नाही व तो तक्रारदारांकडे परतही आला नाही, अशी तक्रारदारांची तक्रार असून या तक्रारीच्या पुष्ठ्यर्थ त्यांनी जाबदेणार मे. ट्रॅकॉन कुरिअर कंपनीची गुजराथ येथे पाठविण्यात आलेल्या पार्सलची पावती प्रस्तुत प्रकरणी दाखल केलेली आहे. या पावतीचे अवलोकन करता तक्रारदारांनी गुजरात येथे पार्सल पाठविल्याचे दिसून येते.
4] जाबदेणारांनी तक्रारदारांना दि. 25/5/2013 रोजी जे पत्र पाठविलेले आहे, ते तक्रारदारांनी प्रस्तुत प्रकरणी दाखल केलेले आहे. या पत्रात जाबदेणारांनी तक्रारदारांना झालेल्या मन:स्तापाबाबत दिलगिरी व्यक्त करुन रक्कम रु. 1,000/- इतका परतावा देवू शकतो असे नमुद केले आहे. यावरुन तक्रारदार कथन करतात त्याप्रमाणे त्यांचे जाबदेणार कुरिअर कंपनीमार्फत पाठविलेले पर्सल त्यांचे नातेवाईकांना, तसेच तक्रारदारांना मिळालेले नाही, हे शाबीत होते, असा मंचाचा निष्कर्ष निघतो आणि अशा परिस्थितीत जाबदेणार कुरिअर कंपनी, तक्रारदारांना पुरविलेल्या दुषित सेवेमुळे तक्रारदारांना झालेल्या मानसिक त्रासापोटी तसेच त्यांच्या धर्मिक भावना दुखावल्या म्हणून नुकसान भरपाई देणे लागतात, असेही मंचाचे स्पष्ट मत पडते.
5] तक्रारदारांनी नुकसान भरपाईपोटी एकुण रक्कम रु. 4267/- ची मागणी केलेली आहे. परंतु तक्रारदारांना नारळाचे पार्सल पाठविण्यास रक्कम रु. 70/- इतका खर्च झाल्याचे दाखल पावतीवरुन दिसून येते. त्यामुळे तो खर्च तक्रारदारांना मंजूर करणेत येत आहे. त्याचप्रमाणे जाबदेणार कुरिअर कंपनीने तक्रारदारांना दिलेल्या दुषित सेवेमुळे तक्रारदारांना जो मानसिक त्रास झाला व त्यांच्या ज्या धार्मिक भावना दुखावल्या त्याची नोंद घेवून, तसेच प्रस्तुत प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या, जाबदेणारांनी तक्रारदारांना पाठविलेल्या पत्रातील रक्कम रु. 1000/- इतका परतावा देवू शकतो या मजकुराची नोंद घेवून, त्यांना नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु.1000/- मंजूर करण्यात येत आहेत. सबब मंचाचा आदेश की,
** आदेश **
1. यातील जाबदेणार कुरिअर कंपनीने तक्रारदारांना
रक्कम रु. 1,070/- (रु.एक हजार सत्तर मात्र)
नुकसान भरपाईपोटी आदेशाची प्रत मिळाल्या
पासून चार आठवड्यांच्या आंत अदा करावी.
2. आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क
पाठविण्यात यावी.
3. पक्षकारांना असे आदेश देण्यात येतात की
त्यांनी आदेशाची प्रत मिळाल्यापासून एक
महिन्याच्या आंत सदस्यांकरीता दिलेले तक्रारीचे
संच घेऊन जावेत, अन्यथा सदरचे संच नष्ट
करण्यात येतील.
स्थळ : पुणे
दिनांक : 12/डिसे./2013