::निकालपत्र:: (पारीत द्वारा- श्री अमोघ श्यामकांत कलोती, मा.अध्यक्ष ) (पारीत दिनांक –30 एप्रिल, 2013 ) 1. तक्रारकर्तीने आममुखत्यारद्वारे, विरुध्दपक्षा कडून भूखंडाचे विक्रीपत्र करुन मिळावे किंवा तसे करणे शक्य नसल्यास, आजचे बाजारभावाने भूखंडाचे पैसे परत करण्याचे आदेशित व्हावे किंवा भूखंड खरेदी पोटी, वि.प.ला दिलेली रक्कम व्याजासह परत मिळण्यासाठी व नुकसान भरपाईसाठी ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 अंतर्गत प्रस्तुत तक्रार न्यायमंचा समक्ष दाखल केलेली आहे. 2. तक्रारर्तीचे संक्षीप्त कथन खालील प्रमाणे- 3. तक्रारकर्ती ही मूळची नागपूर येथील रहिवासी असून सध्या मुंबई येथे खाजगी नौकरी निमित्य वास्तव्यास आहे. यातील विरुध्दपक्ष भूखंड विक्रीचा व्यवसाय करतात. तक्रारकर्तीने विरुध्दपक्षाचे मौजा सुराबर्डी, तालुका जिल्हा नागपूर येथील खसरा नं.27, प.ह.नं.26 येथील भूखंड क्रमांक-7 खरेदी करण्याचे ठरविले. त्यानुसार विरुध्दपक्ष श्री वंजारी यांनी भूखंडाची एकूण किंमत रुपये-1,62,030/- अशी राहिल असे सांगितले. तक्रारकर्तीने टोकन म्हणून दि.30.03.2007 रोजी नगदी रुपये-1000/- विरुध्दपक्षास दिले व डाऊन पेमेंट म्हणून रुपये-39,511/- सिंडीकेट बँकेचा धनादेश क्रं 823789 द्वारे विरुध्दपक्षास दिले. अशारितीने रुपये-40,511/- करारनामा करताना भरले. उर्वरीत रक्कम प्रतीमाह रुपये-4050/- प्रमाणे पुढील 30 महिन्यात देण्याचे उभयतां मध्ये ठरले.
4. तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, तिने दि.30.04.2007 पासून ते दि.14.08.2009 या कालावधीत नियमित किस्ती भरल्यात. तक्रारकर्तीने सुरुवातीस रुपये-40,511/- आणि किस्तीद्वारे रुपये-1,09,350/- असे एकूण रुपये-1,49,861/- विरुध्दपक्षाकडे भूखंडाचे खरेदीपोटी भरलेत.
5. तक्रारकर्तीने पुढे असेही नमुद केले की, भूखंड विक्री संबधाने सतत विरुध्दपक्षाकडे तगादा लावला असता, विरुध्दपक्षाने दि.15.12.2010 रोजी भूखंडाची विक्री करुन देण्याचे आश्वासन दिले परंतु विरुध्दपक्षाने आश्वासनाची पुर्तता न करता, तक्रारकर्तीस परत पाठविले. त्यानंतर तक्रारकर्तीचे वडीलां मार्फतीने विरुध्दपक्षास दि.08.07.2011 रोजीचे पत्र पाठवून भूखंड विक्रीपत्र करुन देण्याची मागणी केली असता विरुध्दपक्षाने दि.05.02.2012 रोजी पैसे परत करण्याची तयारी दर्शविली, त्यानुसार तक्रारकर्तीने सदर दिनांकास वि.प.ची भेट घेतली असता पैसे देण्यास टाळाटाळ केली. विरुध्दपक्षाची कृती पाहता तक्रारकर्तीस आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
6. तक्रारकर्तीने असेही नमुद केले की, विरुध्दपक्षाचे सदरचे कृतीमुळे तक्रारकर्तीस शारीरीक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे तसेच आर्थिक नुकसान झालेले आहे आणि त्यामुळे ती विरुध्दपक्षा कडून नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे. 7. म्हणून तक्रारकर्तीने, विरुध्दपक्षा विरुध्द प्रस्तुत तक्रार मंचा समक्ष दाखल केली व प्रार्थने प्रमाणे दिलासा मिळणेची विनंती केली. 8. तक्रारकर्तीने पान क्रं 08 वरील यादी नुसार दस्तऐवज दाखल केले. ज्यामध्ये प्रामुख्याने भूखंडाचे बयाणापत्र, त.क.ने भूखंडापोटी मासिक किस्ती भरल्या बाबत विरुध्दपक्षाचे पासबुक मधील नोंदी, तक्रारकर्तीने विरुध्दपक्षाकडे रक्कम भरल्याच्या पावत्या, तक्रारकर्तीचे वडीलांनी विरुध्दपक्षास लिहिलेले पत्र, तक्रारकर्तीचे आईचे नावे आममुख्यत्यारपत्र इत्यादी प्रतींचा समावेश आहे. 9. प्रस्तुत तक्रार प्रकरणात मंचाचे मार्फतीने उभय विरुध्दपक्षांचे नावे नोंदणीकृत डाकेने पोच पावतीसह नोटीस पाठविली असता, यातील विरुध्दपक्ष क्रं 1 धमेंद्र वंजारी यांचे नोटीसवर “Intimation 17/09/12, 22/09/12, 24/09/12” तर विरुध्दपक्ष क्रं 2 वंदना तरारे यांचे नोटीसवर “Intimation 17/09, 18/09” असा पोस्टखात्याचा शेरा असून, सदर नोटीसचे पॉकिटे विरुध्दपक्षानी न स्विकारता न्यायमंचात परत आलीत. उभय विरुध्दपक्षास न्यायमंचाचे मार्फतीने नोटीसची सुचना मिळूनही त्यांनी न्यायमंचाची नोटीस स्विकारली नाही. अशाप्रकारे उभय वि.प.नां नोटीस प्राप्त होऊनही ते न्यायमंचा समक्ष उपस्थित झाले नाही वा आपले लेखी निवेदनही दाखल केले नाही म्हणून उभय वि.प.विरुध्द प्रस्तुत तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश वि.न्यायमंचाने प्रकरणात दि.02.02.2013 रोजी पारीत केला.
10. प्रस्तुत प्रकरणात तक्रारकर्तीचे वकीलांनी युक्तीवादाचे दिवशी म्हणजे दि.15.04.2013 रोजी पुरसिस दाखल करुन त्यांची प्रतिज्ञालेखावरील तक्रार हाच लेखी युक्तीवाद समजावा असे नमुद केले. 11. प्रस्तुत प्रकरणात न्यायमंचाचे निर्णयार्थ उपस्थित होणारे मुद्ये व त्यावरील निष्कर्ष खालील प्रमाणे आहेत- मु्द्ये उत्तर (1) करारा प्रमाणे वि.प.ने, तक्रारकर्तीस विहित मुदतीत भूखंडाचे विक्रीपत्र करुन न देता वा भूखंडापोटी त.क.ने भरलेली रक्कम परत न करता आपले सेवेत त्रृटी ठेवली आहे काय?................. होय. (2) काय आदेश?.............................................अंतिम आदेशा नुसार ::कारण मिमांसा::
मु्द्या क्रं 1 बाबत- 12. तक्रारकर्तीने आममुखत्यार पत्रा द्वारे प्रस्तुत तक्रार विरुध्दपक्षा विरुध्द (यातील “विरुध्दपक्ष” म्हणजे- मे.संकल्प डेव्हलपर्स गृह निर्माण सहकारी संस्था, सांस्कृतीक संकूल, सीताबर्डी नागपूर तर्फे- 1) भागीदार धमेंद्र वंजारी व 2) भागीदार श्रीमती वंदना तरारे) प्रतिज्ञालेखावर दाखल केलेली आहे. त.क.ने आपले म्हणण्याचे पुष्टयर्थ उभय पक्षांमध्ये भूखंडाचे खरेदी संबधाने उभय पक्षांमध्ये दि.30.03.2007 रोजी झालेला करारनामा प्रत पान क्रं 09 व 10 वर दाखल केली. तसेच भूखंडा पोटी मासिक किस्ती भरल्या बाबत विरुध्दपक्षाचे पासबुक मधील नोंदीचा दस्तऐवज (पान क्रं 11 व 12) तसेच भूखंडापोटी विरुध्दपक्षाकडे टोकन म्हणून रक्कम भरल्या बाबत व डाऊन पेमेंटची रक्कम भरल्या बाबत, आणि मासिक किस्त भरल्या बाबत पावत्यांच्या प्रती (पान क्रं 13 व 14), तक्रारकर्तीचे वडीलांनी भूखंडाची रक्कम परत करण्या बाबत विरुध्दपक्षास दि.08.07.2011 रोजी दिलेले पत्र (पान क्रं 15 व 16) त.क.ने आपले आईचे नावे करुन दिलेले आममुख्यत्यार पत्र (पान क्रं 17 ते 23 वर) अशा दस्तऐवजाच्या प्रती अभिलेखावर दाखल केल्यात.
13. तक्रारकर्तीने कथन केल्या प्रमाणे, विरुध्दपक्षा सोबत मौजे सुराबर्डी, तालुका जिल्हा नागपूर येथील खसरा क्रं 27, भूखंड क्रं 07 चे खरेदीपोटी दि.30/03/2007 रोजी करारनामा केल्याची व त्याचे मोबदला रकमे पैकी पावती क्रं 257, पावती दि.30.03.2007 नुसार विरुध्दपक्षाकडे टोकन म्हणून रुपये-1000/- भरल्या बाबत तसेच पावती क्रं-277, पावती दि.02.04.2007 नुसार विरुध्दपक्षाकडे डाऊन पेमेंट म्हणून रक्कम रुपये-39,511/-(डी.डी. क्रं 823789, डी.डी.दि.02.04.2007, सिंडीकेट बँक) भरल्या बाबत पावत्यांच्या प्रती पान क्रं 13 व 14 वर दाखल केल्यात. अशारितीने तक्रारकर्तीचे म्हणण्या नुसार तीने विरुध्दपक्षाकडे टोकन आणि डाऊन पेमेंट म्हणून रुपये-40,511/- एवढी रक्कम भरल्याची बाब दाखल पावत्यांच्या प्रतीवरुन पूर्णतः सिध्द होते. 14. या व्यतिरिक्त तक्रारकर्तीचे म्हणण्या नुसार तिने उर्वरीत रक्कम मासिक किस्तीद्वारे विरुध्दपक्षाकडे जमा केल्या बाबत नोंदीचा दस्तऐवज पान क्रं 12 वर दाखल केला, त्यावरुन तक्रारकर्तीने रुपये-4050/- मासिक किस्त या प्रमाणे एकूण-27 मासिक किस्तीद्वारे रक्कम रुपये-1,09,350/- विरुध्दपक्षाकडे भरल्याची बाब त्यावरील नोंदी वरुन पूर्णतः सिध्द होते. 15. अशारितीने तक्रारकर्तीने विरुध्दपक्षाकडे भूखंडापोटी टोकन व डाऊन पेमेंट म्हणून रुपये-40,511/- (+) रुपये-4050/- प्रतीमाह किस्ती प्रमाणे एकूण-27 मासिक किस्तीची रक्कम रुपये-1,09,350/- (=) एकूण रक्कम रुपये-1,49,861/- भरल्याची बाब पूर्णतः सिध्द होते. 16. करारनामा करुनही विरुध्दपक्षाने त्याचे पालन केले नाही. विहित मुदतीत तक्रारकर्तीस भूखंडाचे विक्रीपत्र करुन देऊन ताबा दिला नाही. तसेच त.क.ने मागणी करुनही तिने भूखंडा पोटी वि.प.कडे जमा केलेली रक्कमही परत केली नाही, हा सर्व घटनाक्रम पाहता, विरुध्दपक्षाचे सेवेतील कमतरता सिध्द होते, असे न्यायमंचाचे स्पष्ट मत आहे. 17. तक्रारकर्तीचे वडीलांनी, त.क. तर्फे विरुध्दपक्षास दि.08.07.2011 रोजी दिलेल्या पत्राची प्रत पान क्रं 15 व 16 वर दाखल केली, सदर पत्रावरील नोंदी वरुन ते त्याच दिवशी विरुध्दपक्षास मिळाल्या बाबत विरुध्दपक्षाची पोच शिक्क्यासह व स्वाक्षरीसह त्यावर आहे तसेच त्यावर “Refund Date 08/08/2011, Cash Refund Date 05/02/2012” अशा विरुध्दपक्षाच्या नोंदी आहेत. यावरुन सुध्दा सिध्द होते की, विरुध्दपक्षाने पैसे परत करण्याचे आश्वासन देऊन त्याची पुर्तता केलेली नाही. 18. विरुध्दपक्षाने विहित मुदतीत तक्रारकर्तीला भूखंडाचे विक्रीपत्र व ताबा करुन न देणे तसेच तक्रारकर्तीने मागणी करुनही तीने वि.प.कडे भूखंडापोटी जमा केलेली रक्कम परत न करणे, या सर्व प्रकारामुळे त.क.ला निश्चीतच शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास, मनःस्ताप होणे स्वाभाविक आहे, असे न्यायमंचाचे स्पष्ट मत आहे. मु्द्या क्रं 2 बाबत- 19. वि.प.ने करारा नुसार, तक्रारकर्तीस ठरलेल्या मुदतीत भूखंडाचे विक्रीपत्र करुन दिले नाही. तसेच मागणी करुनही त.क.ला तीची जमा रक्कम परत केली नाही. त.क.ने आपले तक्रारीचे विनंती कलमा मध्ये तक्रारकर्तीचे नावे मौजा सुराबर्डी, तालुका जिल्हा नागपूर येथील योजनेतील भूखंड क्रं 07 चे विक्रीपत्र करुन देण्याचे विरुध्दपक्षास आदेशित व्हावे व असे करणे विरुध्दपक्षास शक्य नसल्यास आजचे बाजार भावाने भूखंडाची किंमत परत मिळावी किंवा भूखंडापोटी त.क.ने विरुध्दपक्षा कडे जमा केलेली रक्कम रुपये-1,49,861/- वार्षिक 18% दराने व्याजासह मिळावे अशी मागणी केलेली आहे. 20. परंतु सदर प्रकरणात विरुध्दपक्ष न्यायमंचा समक्ष हजर झालेले नाहीत व त्यांनी आपली कोणतेही बाजू न्यायमंचा समक्ष मांडलेली नाही, त्यामुळे करारानुसार वादातील भूखंडाची आजचे दिनांकास काय स्थिती आहे? ही बाब न्यायमंचा समक्ष आलेली नाही. तक्रारकर्तीने सुध्दा भूखंडाचे सद्य स्थिती बाबत कोणताही पुरावा न्यायमंचा समक्ष दाखल केलेला नाही अशापरिस्थितीत त.क.ने भूखंडा पोटी वि.प.कडे जमा केलेली रक्कम रुपये-1,49,861/- तक्रार दाखल दिनांक-04.09.2012 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.12% दराने व्याजासह विरुध्दपक्षाकडून परत मिळण्यास त.क. पात्र आहे. तसेच तक्रारकर्तीस झालेल्या शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास आणि मनःस्ताप-गैरसोयी बद्यल रुपये-5000/- तसेच तक्रारखर्चा बद्यल रु.-2000/- वि.प.कडून नुकसान भरपाई मिळण्यास तक्रारकर्ती पात्र आहे, असे न्यायमंचाचे स्पष्ट मत आहे. 21. वरील सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन, प्रकरणात खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो. ::आदेश:: 1) तक्रारकर्तीची, उभय विरुध्दपक्षा विरुध्दची तक्रार वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या अंशतः मंजूर करण्यात येते. 2) विरुध्दपक्षाने, तक्रारकर्तीस रक्कम रुपये-1,49,861/- (अक्षरी रुपये एक लक्ष एकोणपन्नास हजार आठशे एकसष्ठ फक्त) तक्रार दाखल दि.-04.09.2012 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे. 12% दराने व्याजासह परत करावी. 3) विरुध्दपक्षाने, तक्रारकर्तीस झालेल्या शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रासा बद्यल नुकसानी दाखलरु.-5000/-(अक्षरी रु. पाच हजार फक्त) आणि तक्रारखर्च म्हणून रु.-2000/-(अक्षरी रुपये दोन हजार फक्त) द्यावेत. 4) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्षाने सदर निकालपत्राची प्रत प्राप्त झाल्या पासून 30 दिवसाचे आत करावे. 5) तक्रारकर्तीच्या अन्य मागण्या या नामंजूर करण्यात येतात. 6) निकालपत्राची प्रमाणित प्रत उभय पक्षांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात यावी. |