( आदेश पारित द्वारा- श्री नितीन घरडे, मा.सदस्य )
- आदेश -
(पारित दिनांक – 02 ऑगस्ट 2013)
1. यातील सर्व तक्रारदार ह्यांनी प्रस्तूत तक्रारी ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 च्या कलम 12 अन्वये मंचासमक्ष दाखल केलेल्या आहेत.
2. सदरच्या सर्व तक्रारी ह्या वेगवेगळ्या तक्रारदारांनी दाखल केलेल्या असल्या तरी, त्यातील गैरअर्जदार हे समान आहेत आणि या सर्व प्रकरणात तपशिलाचा भाग वगळता बहुतांश वस्तूस्थिती आणि कायदेविषयक मुद्दे हे सुध्दा समान आहेत. म्हणुन या सर्व तक्रारींचा एकत्रितपणे निकाल देण्यात येत आहे.
यातील सर्व तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे :-
3. यातील सर्व तक्रारकर्त्याचे विरुध्द पक्ष यांचेविरुध्द थोडक्यात निवेदन असे आहे
की, विरुध्द पक्ष हे “ वाटीका विहार अॅण्ड डेप्हलपर्स ” , या नावाने लेआऊट पाडुन भुखंड
विकण्याचा व्यवसाय करतात. त्यांचे ले-आऊट, मौजा-घोटी कोलार,प.ह.नं.75, खसरा नंबर
57, तह.नागपूर, जि.नागपूर येथे भुखंड घेण्याचे तक्रारकर्त्यानी ठरविले. भूखंडाची किंमत
ही रु.65 व 85 प्रती चौरस फुट.प्रमाणे ठेवली. त्याप्रमाणे काही तक्रारकर्त्यांनी बयाणा
रक्कम भरुन बयाणा पत्र करुन घेतले व उर्वरित रक्कम मुदतीअंती 24 महिन्यात देण्याचे
व अकृषक आदेश प्राप्त झाल्यानंतर विक्रीपत्र करण्याचे उभयपक्षात ठरले होते.
4. तक्रारकर्त्यांनी वेळोवेळी अकृषक आदेशाची मागणी केली असता, विरुध्द पक्ष तो
देण्यास टाळाटाळ करीत आले म्हणुन तक्रारकर्त्यानी उर्वरित रक्कम विरुध्द पक्षाकडे जमा केली नाही. त्यानंतर विरुध्द पक्षांकडे अनेकदा तक्रारकर्त्यानी संपर्क करुन पैसे परत मागीतले. परंतु विरुध्द पक्षाने नेहमीच टाळाटाळ केली. पुढे सर्व तक्रारकर्त्यानी माहितीच्या अधिकारांतर्गत तहसिलदार यांचेकडे सदर जागेसंबंधी माहिती मागीतली असता सदर जमिन ही सरकारने वडगाव धरणात संपादित केल्याने व विरुध्द पक्ष त्या जमिनीचे मालक नाहीत व तेथे सदर लेआऊट अस्तित्वात नाही असे कळले. म्हणुन तक्रारकर्त्यानी दिनांक 20.10.2012 रोजी आपल्या वकीलामार्फत विरुध्द पक्षास कायदेशीर नोटीस दिली. परंतु विरुध्द पक्षाने त्यांस उत्तर दिले नाही. म्हणुन तक्ररीकर्त्यांनी सदर तक्रारी दाखल करुन पुढील प्रमाणे मागणी केली आहे.
5. तक्रारकर्त्यानी घेतलेला भुखंड त्याचा तपशील, किंमत, दर,जमा रक्कम इत्यादींचा
तपशील खालीलप्रमाणे आहे.
परिशिष्ट ‘ अ ‘
तक्रार क्रमांक |
तक्रारदाराचे नांव |
तक्रार दाखल दिनांक |
भुखंडाची किंमत |
भुखंड क्रमांक |
क्षेत्रफळ |
प्रती चौरस फुट |
एकूण दिलेली रक्कम |
151/2012 |
श्री वसंत नारायण सराफ |
06/12/2013 |
5,24,875/ |
87,88,89,
90,91 |
8075 चौ.फु. |
65/- |
2,37,000/- |
152/2012 |
श्री राजन रामचंद्र गांजाखेतवाले |
6/12/2013 |
1,37,275/ |
76 |
1615 चौ.फु. |
85/ |
12,653/- |
154/2012 |
श्री संजय बाबुराव सोनकुसरे |
13/12/2013 |
1,37,275/- |
74 |
1615 चौ.फु. |
85/- |
46000/- |
155/2012 |
श्री प्रविण मनोहर खाडीलकर |
13/12/2013 |
1,37,275/- |
75 |
1615 चौ.फु. |
85/- |
77,000/- |
तक्रारकर्त्याची प्रार्थना-
1)विरुध्द पक्ष क्रं.1 व 2 ने तक्रारकर्त्यांनकडुन घेतलेली (परिशिष्ट-अ प्रमाणे)
रक्कम व सदर रक्कम विरुध्द पक्षाने वापरली म्हणुन तेवढीच अधिक रक्कम मिळावी.
2)तक्रारकर्त्यांना झालेल्या मानसिक, शारिरीक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून
प्रत्येकी रु.50,000/- मिळावे.
3) तक्रारीच्या खर्चापोटी प्रत्येकी रु.50,000/- मिळावे.
6. तक्रारकर्त्यानी आपली तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली असून, दस्तऐवजयादी
नुसार रक्कम जमा केल्याच्या पावत्या, बयाणापत्र व नोटीसची प्रत अभिलेखावर दाखल
केली आहे.
7. तक्रारीचे अनूषंगाने मंचाने विरुध्द पक्ष ला नोटीस पाठविली असता, नोटीस प्राप्त
होऊन विरुध्द पक्ष क्र.1 व 2 हजर झाले व आपला लेखी जवाब दाखल केला.
8. विरुध्द पक्ष आपले जवाबात नमुद शेतजमीन खरेदी केल्याची बाब मान्य करतात
परंतु सदर वाटीका विहार बिल्डर्स अॅन्ड डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर असल्याची बाब अमान्य करतात. विरुध्द पक्षाचे म्हणण्याप्रमाणे तक्रारकर्त्यानी कराराप्रमाणे मासिक किस्त देणे आवश्यक होते ते तक्रारकर्त्यानी भरले नाही. परंतु तक्रारकर्त्यानी रक्कम जमा केल्याची बाब मान्य केली.परतु भुखंड अकृषक करुन देण्यासंबंधी कोणत्याही प्रकारचे आश्वासन दिले नव्हते असे नमुद केले.
9. विरुध्द पक्षाचे म्हणण्यानुसार, तक्रारकर्त्यांनी भुखंड खरेदी करण्यापुर्वी जागेसंबंधी
संपूर्ण माहिती घेणे आवश्यक होते तसे तक्रारकर्त्यांनी केले नाही. तक्रारकर्त्यांनी कराराचे
पालन केले नाही. त्याकरिता विरुध्द पक्ष जबाबदार राहु शकत नाही. तक्रारकर्त्यांच्या
तक्रारी कालबाहय झालेल्या आहेत. तक्रारकर्त्यांनी विरुध्द पक्षाकडुन कुठलीही सेवा घेतली
नाही व तक्रारकर्ते विरुध्द पक्षाचे ‘ ग्राहक ’ नाही करिता सर्व तक्रारी खारीज करण्यात
याव्या असा उजर घेतला.
//*// कारण मिमांसा //*//
10. उभयपक्षकारांचे वकीलांनी मंचासमोर केलेला तोंडी युक्तीवाद व दाखल केलेली
कागदपत्रे व लेखी युक्तिवाद यांचे सुक्ष्म अवलोकन केले.
11. तक्रारीतील वस्तुसथितीवरुन असे दिसुन येते की, विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्या
कडुन भुखंडाचे खरेदी पोटी रक्कम स्विकारल्याची बाब दाखल पावत्या व बयाणापत्रावरुन
सिध्द होते. ( तक्रारकर्ता श्री राजन रामचंद्र गांजाखेतवाले व श्री संजय बाबुराव सोनकुसरे
यांचे बयाणापत्र अभिलेखावर दाखल नाही.) त्यामुळे तक्रारकर्ते विरुध्द पक्ष यांचे “ ग्राहक आहे ”. तसेच विरुध्द पक्ष यांनी सदरच्या रक्कमा अद्यापही परत केल्या नाही म्हणुन सदर तक्रारी हया कालमर्यादेत आहे. तसेच त्या चालविण्याचा या मंचाला अधिकार आहे असे या न्यायमंचाचे मत आहे.
12. तक्रारकर्त्यानी दाखल केलेले बयाणापत्र व सादर केलेल्या पावत्यावरुन
तक्रारकर्त्यांनी विरुध्द पक्ष कडे परिशिष्ट ‘ अ ’ नुसार भुखंड खरेदी करीता व रक्कम
जमा केल्याचे दिसुन येते.
13. विरुध्द पक्षाने आपले उत्तरात सर्व बाबी अमान्य केल्या परंतु रक्कम स्विकारल्याची बाब मान्य केल्याने तक्रारकर्त्याच्या सर्व तक्रारी मंजूर करण्यास हरकत वाटत नाही.
14. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यांना दिलेल्या सेवेत न्युनता ठेवलेली आहे ही बाब यावरुन स्पष्ट होते. करिता मंच खालील आदेश पारित करीत आहे.
- आदेश –
1) तक्रारकर्त्यांच्या सर्व तक्रारी (तक्रार क्र.151,152,154,155/2012) अंशतः मंजूर करण्यात येतात.
2) विरुध्द पक्ष ला आदेश देण्यात येतो की, वरील सर्व तक्रारकर्त्यांना त्यांच्या भुखंडांचे खरेदीपोटी दिलेली रक्कम जी परिशीष्ट ‘ अ ’ मध्ये शेवटचे रकान्यात दाखविलेली आहे ती द.सा.द.शे 10 टक्के व्याजासह तक्रार दाखल दिनांक 15/12/2012 पासुन रक्कमेच्या प्रत्यक्ष अदायगीपावेतो परत करावी.
3) विरुध्द पक्ष यांनी सर्व प्रकरणांतील तक्रारदारांना झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासाबद्दल प्रत्येकी रुपये 10,000/-आणि तक्रारीच्या खर्चाबद्दल प्रत्येकी रुपये 5,000/- याप्रमाणे एकूण रुपये 15,000/- प्रत्येकी (रुपये पंधरा हजार फक्त) एवढी रक्कम द्यावी.
4) सदर आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्षाने आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून
30 दिवसाचे आत करावी.