( आदेश पारित द्वारा- श्री नितीन घरडे, मा.सदस्य )
- आदेश -
(पारित दिनांक – 02 ऑगस्ट 2013)
1. तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अंतर्गत दाखल केली असुन, सदर तक्रारीचा थोडक्यात आशय असा आहे की, तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष यांचे मौजा कोलार प.ह.न.75,खसरा नं.231/1 वरील भुखंड क्र.4,5,6,7,8 एकूण क्षेत्रफळ 8075 चौ.फु, प्रति चौ.फुट, रुपये 70/- प्रमाणे एकुण किंमत रु.5,65,250/- मध्ये विकत घेण्याकरीता दि.07.06.2008 रोजी विरुध्द पक्षासोबत करारनामा केला व बयाणा रक्कम म्हणुन रुपये 1,25,000/- विरुध्द पक्षास दिले व वेळोवेळी करारनाम्यानुसार जुन 2010 पर्यत रु.18,344/- विरुध्द पक्षाला अदा केले.
2. उभय पक्षातील करारानुसार विरुध्द पक्ष अकृषक आदेश प्राप्त होताच तक्रारकर्त्यास
विक्रीपत्र करुन देणार होते. परंतु तक्रारकर्त्याने वेळोवेळी अकृषक आदेशाची मागणी केली असता, विरुध्द पक्ष तो देण्यास टाळाटाळ करीत आले म्हणुन तक्रारकर्त्याने उर्वरित रक्कम विरुध्द पक्षाकडे जमा केली नाही. पुढे विरुध्द पक्षाचे सांगण्यानुसार सदर जमीन सरकारने अधिग्रहण केली असल्याने त्यांचे नवीन लेआऊट मधे पैसे समाविष्ट करण्याची तयारी दर्शविली परंतु सदर करारनाम्याकरिता जास्त पैसे लागतील असे विरुध्द पक्षाने सांगीतले म्हणुन तक्रारकर्त्याने दिनांक 6.1.2012 रोजी विरुध्द पक्षाचे मौजा आलागोंदी प.ह.नं.84, ख.नं.110 मधील भुखंड क्रं.19,20, व 54 एकुण क्षेत्रफळ 5596 चौ.फुट, प्रति चौ.फुट 90/- प्रमाणे 5,03,640/-मध्ये विरुध्द पक्षासोबत सौदा केला व बयाणा म्हणुन रुपये 4,26,000/- अगोदर जमा केलेली रक्कम त्यात वळती करुन घेतली व उर्वरित रक्कम 3,235/- जानेवारी 2013 पर्यत भरले व बाकी विक्रीचे मुदती अंती 24 महिन्यात देण्याचे ठरले.
3. तक्रारकर्त्याने वारंवार मागणी करुनही पैसे परत मिळाले नाही व विरुध्द पक्षाने सदर भुखंडाचे विक्रीपत्रही करुन दिले नाही म्हणुन तक्रारकर्त्याने दिनांक 7.12.2012 रोजी आपल्या वकीलामार्फत विरुध्द पक्षास कायदेशीर नोटीस दिली. परंतु विरुध्द पक्षाने त्यांस उत्तर दिले नाही. म्हणुन तक्रारकर्त्याने मौजा आलागोंदी, प.ह.नं.84 ख.नं.110 वर 7/12 चा उतारा, पटवारी यांचेकडुन घेतला असता, सदर जागा विरुध्द पक्ष क्रं.1 व 2 चे नावे असुन ही शेतजमीन ग्रीन बेल्ट मधे आहे त्यावर लेआऊट पाडता येत नाही असे समजले. म्हणुन तक्रारकर्त्याने खालील प्रार्थनेसह सदर तक्रार या मंचासमोर प्रतिज्ञापत्रावर दाखल केलेली आहे.
तक्रारकर्तीची प्रार्थना-
1) विरुध्द पक्ष क्रं.1 व 2 ने रुपये 4,26,000/- व सन 2008 पासुन वापरले म्हणुन रु.4,26,000/- परत करावे.
2) तक्रारकर्त्यास झालेला मानसिक, शारिरीक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रु.50,000/- मिळावे.
3) तक्रारीच्या खर्चापोटी रु.50,000/- मिळावे.
4. तक्रारीचे अनूषंगाने मंचाने विरुध्द पक्ष ला नोटीस पाठविली असता, नोटीस प्राप्त
होऊन विरुध्द पक्ष क्र.1 व 2 हजर झाले व आपला लेखी जवाब दाखल केला.
5. विरुध्द पक्ष आपले जवाबात नमुद शेतजमीन खरेदी केल्याची बाब मान्य करतात
परंतु सदर वाटीका विहार बिल्डर्स अॅन्ड डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर असल्याची बाब अमान्य
करतात. विरुध्द पक्षाचे म्हणण्याप्रमाणे तकारकर्तीने कराराप्रमाणे मासिक किस्त देणे
आवश्यक होते ते तक्रारकर्त्याने भरले नाही. परंतु तक्रारकर्त्याने रक्कम जमा केल्याची
बाब मान्य केली. परंतु भुखंड अकृषक करुन देण्यासंबंधी कोणत्याही प्रकारचे आश्वासन
दिले नव्हते असे नमुद केले.
6. विरुध्द पक्षाचे म्हणण्यानुसार,तक्रारकर्त्याने भुखंड खरेदी करण्यापुर्वी जागेसंबंधी
संपूर्ण माहिती घेणे आवश्यक होते तसे तक्रारकर्त्याने केले नाही.तक्रारकर्त्याने कराराचे
पालन केले नाही. त्यास विरुध्द पक्ष जबाबदार राहु शकत नाही तक्रारकर्त्याची तक्रार
कालबाहय झालेली आहे. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडुन कुठलीही सेवा घेतली नाही व
तक्रारकर्ता विरुध्द पक्षाचा ग्राहक नाही करिता तक्रार खारीज करण्यात यावी असा उजर
घेतला.
//*// कारण मिमांसा //*//
7. उभयपक्षकारांचे वकीलांनी मंचासमोर केलेला तोंडी युक्तीवाद व दाखल केलेली कागदपत्रे व लेखी युक्तिवाद यांचे सुक्ष्म अवलोकन केले.
8. तक्रारीतील वस्तुस्थितीवरुन असे दिसुन येते की, विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याकडुन भुखंडाचे खरेदी पोटी रक्कम स्विकारल्याची बाब दाखल पावत्या व बयाणापत्रावरुन सिध्द होते. त्यामुळे तक्रारकर्ता विरुध्द पक्ष यांचा “ ग्राहक आहे ”. तसेच विरुध्द पक्ष यांनी सदरच्या रक्कमा अद्यापही परत केल्या नाही म्हणुन सदर तक्रार ही कालमर्यादेत आहे. तसेच ती चालविण्याचा या मंचाला अधिकार आहे असे या न्यायमंचाचे मत आहे.
9. तक्रारकर्त्याने दाखल केलेले बयाणापत्र व सादर केलेल्या पावत्यावरुन तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडे दिनांक 31/5/2008,पावती नं.309,रुपये 1000/-, दिनांक 7/6/2008, पावती नं.479, रुपये 1,25,000/-, दिनांक 10/02/2009, पावती नं.2477, रुपये 2,00,000/-, दिनांक 26/6/2010,पावती नं.7371, रुपये 25,000/- दिनांक 24/7/2010,पावती नं.7370, रुपये 25,000/-,दिनांक 18/9/2010, पावती नं.7688, रुपये 25,000/-, दिनांक 12/11/2010,पावती नं.7850,रुपये 25,000/-, नुसार एकुण 4,26,000/- एवढी रक्कम जमा केल्याचे दाखल पावत्यावरुन दिसुन येते. नंतर विरुध्द पक्षाने दिनांक 6/1/2012 रोजी नव्याने मौजा आलागोंदी, प.ह.नं.84,ख.नं.110 मधील भुखंड क्रं.19,20 व 54 चे तक्रारकर्त्याचे नावे बयाणापत्र केले व आधीच्या भुखंडांची रक्कम दुस-या भुखंडांचे बयाणापत्रात वळती केली.
10. विरुध्द पक्षाने आपले उत्तरात सर्व बाबी अमान्य केल्या परंतु रक्कम स्विकारल्याची बाब मान्य केल्याने तक्रारकर्त्याची तक्रार मंजूर करण्यास हरकत वाटत नाही. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास देऊ केलेल्या सेवेत न्युनता ठेवलेली आहे ही बाब यावरुन स्पष्ट होते. करिता मंच खालील आदेश पारित करीत आहे.
- आदेश -
1) तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2) विरुध्द पक्ष ला आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याकडून भुखंडाचेपोटी घेतलेली रक्कम रुपये 4,26,000/-,ही द.सा.द.शे 10 टक्के व्याजासह तक्रार दाखल दिनांक 10/01/2013 पासुन रक्कमेच्या प्रत्यक्ष अदायगीपावेतो परत करावी.
3) विरुध्द पक्ष ने तक्रारकर्त्याला मानसिक, शारिरीक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रु.10,000/- व तक्रारीच्या खर्चाबाबत रु.5,000/-, याप्रमाणे एकूण रुपये 15,000/- (रुपये पंधरा हजार फक्त) एवढी रक्कम द्यावी.
4) सदर आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्षाने आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसाचे आत करावी.