::निकालपत्र:: (पारीत द्वारा- श्री सतिश गोपाळराव देशमुख, मा.सदस्य ) (पारीत दिनांक – 29 एप्रिल, 2013 ) 1. ग्रा.सं. कायदा-1986 चे कलम-12 अंतर्गत तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
2. तक्रारकर्तीने, विरुध्दपक्षा सोबत, विरुध्दपक्षाचे मौजे वागदरा, तालुका नागपूर (ग्रामीण) जिल्हा नागपूर येथील खसरा क्रमांक’108 व 109, प.ह.नं. 46 या जमीनीवर बांधण्यात येणा-या प्रस्तावित कन्हैया सिटी फेज-1 या योजनेमधील ट्वीन डयूप्लेक्स क्रं 267, “ ओपल ” भूखंड क्षेत्रफळ 1220 चौरसफूट व त्यावरील बांधकाम क्षेत्रफळ 1075 चौरसफूट रुपये-16,99,000/- एवढया किंमतीत विकत घेण्याचा करारनामा दि.12/02/2011 रोजी केला.
3. करारनाम्या नुसार, तक्रारकर्तीने, विरुध्दपक्षास, बुकींगपोटी किंमतीचे 15% रक्कम रुपये-2,54,850/-, चेक क्रं 0059065, चेक दि.17.02.2011 नुसार अदा केली. विरुध्दपक्षाने, तक्रारकर्तीस सदर रक्कम प्राप्त झाल्या बाबत पावती क्रं 3432, पावती दि.12/02/011 दिली. 4. करारनाम्या नुसार विरुध्दपक्षाने अडीच वर्षाचे कालावधीत बांधकाम पूर्ण करुन देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु विरुध्दपक्षाने विहित कालावधीत बांधकाम पूर्ण केले नाही. तक्रारकर्तीने विरुध्दपक्षास या बद्यल विचारणा केली असता, विरुध्दपक्षाने दि.10/03/2012 रोजीचे पत्राद्वारे मार्च-2012 पासून प्रकल्पाचे काम सुरु होऊन 18 ते 20 महिन्यात ताबा मिळेल असे आश्वासन दिले. विरुध्दपक्षाने, तक्रारकर्तीस पुन्हा दि.11/08/2012 रोजीचे पत्र पाठवून त्याद्वारे अडचणी कळवून बांधकाम 60 ते 90 दिवसात सुरु करुन 15 ते 17 महिन्यात ताबा देण्याचे आश्वासन दिले. 5. परंतु त्यानंतर सदरचा कालावधी उलटून गेल्यानंतरही विरुध्दपक्षाने बांधकाम सुरु केले नाही म्हणून, तक्रारकर्तीने विरुध्दपक्षास दि.08.11.2012 रोजी कायदेशीर नोटीस पाठवून त्याद्वारे विरुध्दपक्षाने अद्यापही बांधकाम सुरु
केलेले नाही व नजीकच्या भविष्यात ते सुरु होण्याची शक्यता दिसत नाही म्हणून तक्रारकर्तीने, बुकींगपोटी विरुध्दपक्षास दिलेली रक्कम व्याजासह परत करण्याची मागणी केली परंतु सदर नोटीस प्राप्त होऊनही विरुध्दपक्षाने नोटीसला उत्तर दिले नाही. 6. म्हणून शेवटी तक्रारकर्तीने विरुध्दपक्षा विरुध्द प्रस्तुत तक्रार मंचा समक्ष दाखल केली असल्याचे तक्रारकर्तीने नमुद केले. 7. तक्रारकर्तीची प्रार्थना- अ) तक्रारकर्तीने, विरुध्दपक्षाकडे डयुप्लेक्सच्या बुकींगपोटी भरलेली रक्कम रु.2,54,850/- रक्कम, स्विकारल्याचे दिनांका पासून ते प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.24% दराने व्याजासह तक्रारकर्तीस परत करण्याचे विरुध्दपक्षास आदेशित व्हावे. ब) तक्रारकर्तीस झालेल्या शारिरीक, मानसिक त्रासा बद्यल तसेच आर्थिक नुकसान भरपाई म्हणून रुपये-1,00,000/- विरुध्दपक्षा कडून देण्याचे आदेशित व्हावे. क) प्रस्तुत तक्रारीचा खर्च रुपये-20,000/- विरुध्दपक्षाने तक्रारकर्तीस देण्याचे आदेशित व्हावे. या शिवाय योग्य ती दाद तक्रारकर्तीचे बाजूने मिळावी. 8. तक्रारकर्तीने तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली. सोबत पान क्रं 6 वरील यादी नुसार एकूण-09 दस्तऐवज दाखल केले, ज्यामध्ये प्रामुख्याने विरुध्दपक्षाची जाहिरात/योजनेचे माहितीपत्रक, विक्रीचा करारनामा, रकमेची पावती, बँकेचा खातेउतारा, विरुध्दपक्षाने तक्रारकर्तीस पाठविलेली 02 पत्रे, तक्रारकर्तीने विरुध्दपक्षास वकीला मार्फत पाठविलेली रजि.नोटीस, पोस्टाची पावती, पोच पावती इत्यादीचा समावेश आहे. तक्रारकर्तीने पान क्रं 27 वरील यादी नुसार मूळ एग्रीमेन्ट टू सेल, बुकींगपोटी दिलेल्या रकमेची मूळ पावती व अन्य दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात. 9. प्रस्तुत तक्रारीचे अनुषंगाने, या न्यायमंचाचे मार्फतीने विरुध्दपक्षास नोंदणीकृत डाकेने नोटीस पाठविली असता, सदर नोटीस रजिस्टर पोस्टाने
पाठविल्या बद्यलची पोस्टाची पावती पान क्रं-25 वर उपलब्ध आहे. तसेच सदर रजिस्टर नोटीस विरुध्दपक्षास प्राप्त झाल्या बद्यल पोस्टाचा Track Result for……. पान क्रं- 26 वर उपलब्ध आहे. परंतु रजि.नोटीस प्राप्त होऊनही विरुध्दपक्षा तर्फे कोणीही न्यायमंचा समक्ष उपस्थित झाले नाही वा आपले लेखी निवेदनही न्यायमंचा समक्ष सादर केले नाही. म्हणून सदरची तक्रार विरुध्दपक्षा विरुध्द एकतर्फी चालविण्याचा आदेश न्यायमंचाने दि.25/03/2013 रोजी प्रकरणात पारीत केला. 10. प्रस्तुत प्रकरणात तक्रारकर्ती तर्फे त्यांचे वकीलांचा युक्तीवाद ऐकण्यात आला. कारणे व निष्कर्ष -
11. तक्रारकर्तीची प्रतिज्ञालेखावरील तक्रार, प्रकरणातील उपलब्ध कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करण्यात आले असता, न्यायमंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे- 12. प्रस्तुत प्रकरणात न्यायमंचाचे निर्णयार्थ उपस्थित होणारे मुद्ये व त्यावरील निष्कर्ष खालील प्रमाणे आहेत-
मु्द्ये उत्तर (1) करारा प्रमाणे वि.प.ने, त.क.ला विहित मुदतीत डयुप्लेक्सचे बांधकाम पूर्ण न करता व ताबा न देता वा रक्कम परत न करता आपले सेवेत त्रृटी ठेवली आहे काय?.................होय. (2) काय आदेश?.............................................अंतिम आदेशा नुसार ::कारण मिमांसा::
मु्द्या क्रं 1 बाबत- 12. तक्रारकर्तीने विरुध्दपक्षा विरुध्दची प्रस्तुत तक्रार (यातील “विरुध्दपक्ष” म्हणजे-मे.झाम बिल्डर्स व डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड तर्फे प्रबंध संचालक श्री हेमंत झाम) प्रतिज्ञालेखावर दाखल केलेली आहे. 13. तक्रारकर्तीने आपले म्हणण्याचे पुष्टयर्थ विरुध्दपक्षाचे प्रस्तावित डयुप्लेक्स बांधकाम माहितीपत्रक, डयूप्लेक्स खरेदी संबधाने उभय पक्षांमध्ये दि.12.02.2011 रोजी झालेला करारनामा प्रत (पान क्रं 09 ते 11) दाखल केली. करारा नुसार बुकींग पोटी, प्रस्तावित डयुप्लेक्सचे किंमतीचे 15% रक्कम रुपये-2,54,850/- तक्रारकर्तीने विरुध्दपक्षास दिल्या बाबत विरुध्दपक्षाने निर्गमित केलेली पावती क्रं 3432, पावती दि.12/02/011 प्रत (पान क्रं-12 ) दाखल केली. तसेच बांधकामास एन.आय.टी. प्रोसिजर मुळे 06 महिने उशिर झाल्या बद्यल आणि 18 ते 20 महिन्यात ताबा देत असल्या बाबतचे विरुध्दपक्षाने तक्रारकर्तीस दिलेले दि. 10.03.2012 रोजी दिलेले पत्र (पान क्रं-14) दाखल केले. त्यानंतरही बांधकामास उशिर झाल्या बद्यल आणि 60 ते 90 दिवसात बांधकाम सुरु होत असल्या बद्यल विरुध्दपक्षाने तक्रारकर्तीस दिलेले दि.11.08.2012 रोजीचे पत्र (पान क्रं 15)दाखल केले. तक्रारकर्तीने विरुध्दपक्षास रजिस्टर पोस्टाने पाठविलेली दि.08.11.2012 रोजीची कायदेशीर नोटीसची प्रत (पान क्रं-17 व 18), रजि.पोस्टाची पावती (पान क्रं-19 ), पोच पावतीप्रत (पान क्रं-20) इत्यादी दस्तऐवजाच्या प्रती अभिलेखावर दाखल केल्यात.
14. तक्रारकर्तीने कथन केल्या प्रमाणे, विरुध्दपक्षा सोबत सदर सदनीकेचे खरेदी बाबत करारनामा केल्याची व प्रस्तावित डयुप्लेक्सचे बुकींगपोटी किंमतीचे 15% रक्कम रु.2,54,850/-/- चेकद्वारे विरुध्दपक्षास दिल्या बद्यलची बाब अभिलेखावरील पान क्रं-12 वरील विरुध्दपक्षाद्वारे निर्गमित पावती क्रमांक-3432 दि.12/02/2011 रोजीचे प्रती वरुन सिध्द होते. सदर चेकची रक्कम विरुध्दपक्षास प्राप्त झाल्या बद्यल तक्रारकर्तीने तिचे सेंट्रल बँक, सेवाग्राम येथील खाते उता-याची प्रत पान क्रं 13 वर दाखल केली असून त्याद्वारे रक्कम रुपये-2,54,850/- विरुध्दपक्षाचे खात्यात ट्रान्सफर झाल्याची बाब पूर्णतः सिध्द होते. 15. तक्रारकर्तीने दाखल केलेल्या दस्तऐवजांचे काळजीपूर्वक अवलोकन केले असता, विरुध्दपक्षाने तक्रारकर्तीस दि.10/03/2012 रोजीचे पत्र (पान क्रं -14) पाठवून त्यात नमुद केले की, एन.आय.टी.प्रोसिजर मुळे 06 महिने झालेल्या उशिरा बद्यल ते दिलगिर असून मार्च, 2012 पासून काम पूर्ण सुरु होऊन, 18 ते 20 महिन्यात ताबा देण्यात येईल. त्यानंतर सुध्दा विरुध्दपक्षाने,
तक्रारकर्तीस दि.11/08/2012 रोजीचे पत्र (पान क्रं-15 व 16) पाठवून त्याद्वारे काही अडचणींमुळे ते बांधकाम पूर्ण करु शकले नाही परंतु आता 60 दिवसानंतर काम सुरु करण्यात येऊन फेज-1 चे काम 15 ते 17 महिन्यात पूर्ण करण्यात येईल असे नमुद केले. 16. परंतु त्यानंतर सदरचा कालावधी उलटून गेल्यानंतरही विरुध्दपक्षाने बांधकाम सुरु केले नाही म्हणून, तक्रारकर्तीने विरुध्दपक्षास दि.08.11.2012 रोजी (पान क्रं 17 व 18) कायदेशीर नोटीस पाठवून त्याद्वारे विरुध्दपक्षाने अद्यापही बांधकाम सुरु केलेले नाही व नजीकच्या भविष्यात ते सुरु होण्याची शक्यता दिसत नाही म्हणून तक्रारकर्तीने, बुकींगपोटी विरुध्दपक्षास दिलेली रक्कम व्याजासह परत करण्याची मागणी केली परंतु सदर नोटीस प्राप्त होऊनही विरुध्दपक्षाने नोटीसला उत्तर दिले नाही. 17. करारनामा करुनही विरुध्दपक्षाने त्याचे पालन केले नाही. विहित मुदतीत तक्रारकर्तीला डयुप्लेक्सचा ताबा दिला नाही. तसेच तक्रारकर्तीने रजिस्टर नोटीसद्वारे मागणी करुनही तिने डयुप्लेक्सपोटी विरुध्दपक्षा.कडे जमा केलेली रक्कमही परत केली नाही वा रजिस्टर नोटीस विरुध्दपक्षास प्राप्त होऊनही नोटीसचे साधे उत्तरही दिले नाही.
18. विरुध्दपक्षाचा मोठया प्रमाणावर बांधकामाचा व्यवसाय आहे. विरुध्दपक्षाने, तक्रारकर्तीशी, डयुप्लेक्स विक्री संबधाने दि.12 फेब्रुवारी, 2011 रोजी केलेल्या करारनाम्यातील परिच्छेद क्रं (8) मध्ये असेही नमुद केलेले आहे की- “ That, if by any means the purchaser wants to cancel this agreement, the payment made by him will be returned to him/her after deducting 20% of the total consideration amount” सदर विरुध्दपक्षानेच स्वतः तयार केलेल्या करारनाम्यातील उपरोक्त नमुद अटीचे वाचन केले असता, विरुध्दपक्षाने स्वतःचे फायद्यासाठीच लागू असलेल्या अटींचा समावेश करारनाम्यात केला. परंतु विरुध्दपक्षाने जर स्वतः
अटीचा भंग केल्यास, विरुध्दपक्ष, करार करणा-या ग्राहकास/तक्रारकर्तीस काय नुकसान भरपाई देतील? याचा मात्र कोठेही उल्लेख करारात केल्याचे दिसून येत नाही. 19. उपरोक्त नमुद सर्व घटनाक्रम पाहता, विरुध्दपक्षाचे सेवेतील कमतरता सिध्द होते आणि विरुध्दपक्षाने अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला असल्याचे न्यायमंचाचे स्पष्ट मत आहे. 20. विरुध्दपक्षाने विहित मुदतीत बांधकाम पूर्ण करुन तक्रारकर्तीस डयुप्लेक्सचा ताबा न देणे व तक्रारकर्तीने नोटीसद्वारे मागणी करुनही तिने बुकींगपोटी विरुध्दपक्षा कडे भरणा केलेली रक्कम परत न करणे, या सर्व प्रकारामुळे तक्रारकर्तीस निश्चीतच शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास, मनःस्ताप होणे स्वाभाविक आहे, असे न्यायमंचाचे स्पष्ट मत आहे. मु्द्या क्रं 2 बाबत- 21. विरुध्दपक्षाने करारा नुसार, तक्रारकर्तीस ठरलेल्या मुदतीत डयुप्लेक्सचे बांधकाम पूर्ण करुन दिले नाही व ताबा दिलेला नाही. तसेच नोटीसद्वारे मागणी करुनही तक्रारकर्तीस तिने डयुप्लेक्सचे बुकींगपोटी जमा केलेली रक्कम परत केली नाही. त्यामुळे तक्रारकर्तीने, विरुध्दपक्षाकडे, प्रस्तावित डयुप्लेक्सचे बुकींगपोटी जमा केलेली रक्कम रुपये-2,54,850/- तक्रार दाखल दि.-26/12/2012 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.12% दराने व्याजासह परत मिळण्यास तक्रारकर्ती पात्र आहे. तक्रारकर्तीला झालेल्या शारिरीक, मानसिक त्रासा बद्यल आणि नुकसान भरपाई बद्यल रुपये-5000/- आणि तक्रारखर्चा बद्यल रुपये-2000/- तक्रारकर्ती, विरुध्दपक्षा कडून मिळण्यास पात्र आहे, असे न्यायमंचाचे स्पष्ट मत आहे. 22. वरील सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन, प्रकरणात खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो. ::आदेश:: 1) तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2) विरुध्दपक्षाने, तक्रारकर्तीस तिने डयुप्लेक्स बुकींगपोटी जमा केलेली रक्कम रुपये-2,54,850/-(अक्षरी रु. दोन लक्ष चौपन्न हजार आठशे पन्नास फक्त) तक्रार दाखल दि.-26/12/2012 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे. 12% दराने व्याजासह परत करावी. 3) विरुध्दपक्षाने , तक्रारकर्तीस झालेल्या शारिरीक, मानसिक त्रासा बद्यल व आर्थिक नुकसानी बद्यल रु.-5000/-(अक्षरी रु. पाच हजार फक्त) आणि तक्रारखर्च म्हणून रु.-2000/-(अक्षरी रु. दोन हजार फक्त) द्यावेत. 4) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्षाने सदर निकालपत्राची प्रत प्राप्त झाल्या पासून 30 दिवसाचे आत करावे. 5) तक्रारकर्तीने प्रस्तुत तक्रारीमध्ये दाखल केलेल्या मूळ पावत्या, परत कराव्यात व ते मिळाल्या बद्यल कार्यालयाने पोच घ्यावी. 6) निकालपत्राची प्रमाणित प्रत उभय पक्षांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात यावी. |