अॅड डी. जी. संत तक्रारदारांकरिता
अॅड एन. ए. महाजन जाबदेणारांकरिता
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
द्वारा- श्रीमती. अंजली देशमुख, मा. अध्यक्ष
निकालपत्र
दिनांक 31 ऑक्टोबर 2012
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे-
1. तक्रारदार सोसायटीतील सभासदांनी जाबदेणारांकडून सदनिका खरेदी केल्या होत्या. त्यावेळी झालेल्या करारनाम्यामध्ये जाबदेणार यांनी प्रत्येक सदनिका धारकाकडून एकरकमी देखभाल खर्च एकत्रित रुपये 11,35,000/- घेतलेला होता. जाबदेणार यांनी सदनिका धारकांना सोसायटी स्थापन करुन दिली नाही. कन्व्हेअन्स डीड करुन दिले नाही. शेवटी वाट पाहून सदनिका धारकांनीच स्वत: सोसायटी स्थापन करुन घेतली. मात्र त्यापोटी जाबदेणार यांनी प्रत्येक सदनिका धारकाकडून [41 सदनिका व 13 दुकाने] रुपये 5000/- घेतले होते. सोसायटी स्थापन झाल्यानंतर जाबदेणार यांनी तक्रारदार सोसायटीस रुपये 11,35,000/- परत केले नाहीत, तर फक्त रुपये 4,05,000/- परत केले उर्वरित रुपये 7,25,000/- सोसायटीस परत केले नाहीत. पत्र व्यवहार करुनही सोसायटीच्या नावे कन्व्हेअन्स डीड करुन दिले नाही. जाबदेणार यांनी मंजूर नकाशामध्ये बदल केले व पार्कींग विकले, सामाईक जागा विकली त्यामुळे पार्कींगची जागा कमी झाली. म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणारांकडून कन्व्हेअन्स डीड करुन मागतात. तसेच रुपये 7,25,000/- दिनांक 2/2/2007 पासून 18 टक्के व्याजासह मागतात. सोसायटी स्थापनेपोटी जाबदेणार यांनी घेतलेले रुपये 2,70,000/- दिनांक 2/2/2007 पासून 18 टक्के व्याजासह परत मागतात. मंजूर नकाशानुसार असलेली सामाईक व मोकळी जागा सोसायटीच्या नावे करुन मागतात. नुकसान भरपाई पोटी रुपये 5,00,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 50,000/- मागतात. तक्रारदारांनी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
2. जाबदेणार यांनी लेखी जबाब दाखल करुन तक्रारदारांच्या मागणीस विरोध दर्शविला. जाबदेणार यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदारांना रुपये 4,05,000/- परत केले हे तक्रारदारांचे म्हणणे बरोबर आहे. परंतू रुपये 7,25,000/- बेकायदेशिरपणे दिले नाही हे म्हणणे मान्य नाही. जाबदेणार यांनी तक्रारदार सोसायटीच्या नावे कन्व्हेअन्स डीड करुन देण्याचे नाकारलेले नाही. तर उलट तक्रारदारांनीच कुठलीही मदत व सहकार्य केलेले नाही. सोसायटी स्थापन करण्यापोटी जाबदेणार यांनी प्रत्येकी रुपये 5000/- घेतल्याचे जाबदेणार यांना मान्य नाही. करारनाम्यांमध्ये सोसायटी स्थापनेपोटी रुपये 3,000/- नमूद केलेले आहेत. यावरुन तक्रारदारांचे म्हणणे चुकीचे आहे असे जाबदेणार म्हणतात. सोसायटी ही सभासदांनी स्थापन केले हे जाबदेणार यांना मान्य नाही. तसा तक्रारदारांनी पुरावा दाखल केलेला नाही. कन्व्हेअन्स डीडच्या नावाखाली तक्रार मुदतबाहय असूनही तक्रारदार काही मागण्या मान्य करुन घेत आहेत. वरील कारणांवरुन तक्रार नामंजूर करावी अशी मागणी जाबदेणार करतात. जाबदेणार यांच्या म्हणण्यानुसार रुपये 7,25,000/- ची मागणी खोटी व बेकायदेशिर आहे. जाबदेणार तक्रारदारांकडून एकरकमी देखभाल खर्च रुपये 11,35,000/- प्राप्त झाल्याचे मान्य करतात. दिनांक 2/2/2007 रोजी सोसायटी स्थापन झाल्यानंतर दिनांक 26/5/2007 रोजी बैठक घेतली असता सोसायटी स्थापन होण्यापुर्वी जाबदेणार यांनी केलेल्या देखभालपोटीचा झालेला खर्च वजा जाता रुपये 11,35,000/- पैकी केवळ रुपये 8,50,000/- इतकीच रक्कम जाबदेणार यांनी तक्रारदारांना परत करावयाची असे ठरलेले होते. परंतू तक्रारदार सोसायटीचे पदाधिकारी बदलल्यामुळे तक्रारदारांनी बेकायदेशिरपणे जादा रक्कम वसूलीसाठी तगादा लावलेला आहे. रुपये 8,50,000/- पैकी जाबदेणार यांनी रुपये 4,05,000/- तक्रारदार सोसायटीस अदा केलेली आहे. तसेच उर्वरित रकमेपोटी जाबदेणारयांनी तक्रारदारांचे नावे रुपये 3,00,000/- व रुपये 1,50,000/- असे दोन चेक दिलेले होते. जाबदेणार रुपये 4,50,000/- देण्यात तयार होते व आहेत. जाबदेणार यांच्या म्हणण्यानुसार रुपये 4,50,000/- अदा केल्यानंतर जाबदेणार सर्व बिल्डींगवर ओव्हरहेड टँक बसवून देणार होते त्यासाठी नवीन पाईप लाईन टाकून देण्यासंदर्भातील प्राथमिक खर्च जाबदेणार यांनी करावयाचा असे ठरले होते. सदरचा खर्च नंतर सोसायटीतील सभासद जमा करुन जाबदेणार यांना देतील अशी हमी तक्रारदारांनी जाबदेणार यांना दिली होती. त्यानुसार जाबदेणार यांनी रुपये 1,35,000/- खर्च करुन सर्व बिल्डींगवर ओव्हरहेड टँक बसवून त्यासाठी दुसरी नवीन पाईप लाईन टाकून दिलेली आहे. परंतू तक्रारदार सोसायटीने मान्य करुनही रक्कम दिलेली नसल्यामुळे जाबदेणार यांनी चेकची रक्कम तक्रारदार सोसायटीस अदा केलेली नाही. तक्रारदारांनी सोसायटी स्थापनेपोटी घेतलेल्या रक्कम रुपये 2,70,000/- ची केलेली मागणी खोटी व बेकायदेशिर आहे. तक्रारदार सोसायटीतील खरेदीदार श्री. संजय धुमाळ यांचे परिचीत श्री. उदय धुमाळ हे साखर संकुल, पुणे येथे कामाला असल्यामुळे जाबदेणार यांनी सोसायटी स्थापन करणे कामी आवश्यक सोपस्कार पूर्ण करुन कागदोपत्री पूर्तता करुन घेण्यासाठी श्री. संजय धुमाळ व श्री. उदय धुमाळ यांना विनंती केली त्यास संमती दर्शविल्यानंतरच जाबदेणार यांनी सोसायटी स्थापनेत केवळ मदत घेतलेली होती व सोसायटी स्थापनेकामी येणारा सर्व खर्च हा जाबदेणार यांनीच त्या प्रयोजनासाठी खरेदीदारांकडून घेतलेल्या रकमेतून केलेला होता व आहे. त्यामुळे आता सदरची रक्कम वसूल करण्याचा वा मागण्याचा अधिकार तक्रारदारांना नाही. जाबदेणार यांनी मंजूर नकाशामध्ये बदल केलेले नाहीत. दिनांक 29/5/2003 रोजीच्य करारनाम्यातील कलम 18 मध्ये नमूद केल्याप्रमाणे इमारतीतील 40 टक्के पार्कींगची जागा, टेरेस लॉबीज तथा इमारतीलगतची मोकळी जागा त्रयस्थ इसमासह कोणासही, कोणत्याही किंमतीस, कोणत्याही अटी व शर्तीवर विकण्याचा, हवी तशी विल्हेवाट लावण्याचा अधिकार जाबदेणार यांना होता व आहे. जाबदेणार यांच्या सेवेत त्रुटी नाही. जाबदेणार कन्व्हेअन्स डीड करुन देण्यास तयार होते व आहेत. जाबदेणार रुपये 2,70,000/- तक्रारदारांना देणे लागत नाहीत. तसेच एकरकमी देखभाल खर्चापोटी रुपये 7,25,000/- देणे लागत नसून केवळ रुपये 4,50,000/- देणे लागतात. तक्रारदारांनी जाबदेणार यांना वर नमूद केल्याप्रमाणे रुपये 1,35,000/- अदा केल्यानंतर जाबदेणार तक्रारदारांना रुपये 4,50,000/- देण्यास तयार होते व आहेत असे नमूद करुन तक्रार नामंजुर करावी अशी मागणी जाबदेणार करतात. जाबदेणार यांनी शपथपत्र दाखल केले.
3. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदारांनी तक्रारीमध्ये जाबदेणार यांनी रुपये 11,35,000/- एकरकमी देखभाल खर्चापैकी रुपये 4,05,000/- दिले उर्वरित रुपये 7,25,000/- परत दिले नाही असे नमूद करतात. युक्तीवादाच्या वेळी तक्रारदारांनी जाबदेणार यांनी रुपये 3,00,000/- व रुपये 1,50,000/- चे चेक्स दिल्याचे मान्य करतात. दोन्ही चेक अनादरित झाले असे तक्रारदारांचे म्हणणे आहे. याबाबत जाबदेणार यांचे असे म्हणणे आहे की तक्रारदारांच्या पुर्वीच्या पदाधिका-यांनी ओव्हरहेड टँक बसविण्यासाठी रक्कम खर्च करण्यास परवानगी दिली होती. तक्रारदारांनी रुपये 1,35,000/- जाबदेणार यांना अदा केलेले नाहीत. परंतू तक्रारदार सोसायटीतील पुर्वीच्या पदाधिकारी व जाबदेणार यांच्यामध्ये ओव्हरहेड टँक बसविण्यासंदर्भात ठरले होते याबद्यलचा कागदोपत्री पुरावा जाबदेणार यांनी दाखल केलेला नाही. तक्रारदारांनी तक्रारीसोबत जाबदेणार यांच्याकडून प्राप्त झालेले दिनांक 11/4/2008 रोजीचा रुपये 1,50,000/- चा चेक व दिनांक 5/12/2007 रोजीचा रुपये 3,00,000/- चा चेकची प्रत दाखल केलेली आहे. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार हे दोन्ही चेक अनादरित झाले. ही रक्कम मागण्यासाठी जाबदेणार यांनी सन 2011 मध्ये तक्रार दाखल केलेली आहे ती मुदतबाहय आहे असे मंचाचे मत आहे. तसेच तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार जाबदेणार यांनी मंजूर नकाशामध्ये बदल केले, सामाईक पार्किंग विकले, त्यामुळे सामाईक जागा, पार्कींगची जागा कमी झाली. परंतू याबद्यलचा पुरावा तक्रारदारांनी दाखल केलेला नाही. ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 24 ए नुसार या दोन्ही मागण्यांसाठी तक्रारदारांना तक्रार दाखल करण्यास विलंब झालेला आहे असे मंचाचे मत आहे. तक्रारदारांची तक्रार फक्त कन्व्हेअन्स डीड संदर्भातच उरते. जाबदेणार कन्व्हेअन्स डीड करुन देण्यास तयार होते व आहेत. महाराष्ट्र ओनरशिप प्लॅट्स अॅक्ट नुसार सोसायटी स्थापनेपासून चार महिन्यांच्या आत कन्व्हेअन्स डीड करुन देणे जाबदेणार यांच्यावर बंधनकारक आहे. जाबदेणार यांनी कन्व्हेअन्स डीड करुन दिले नाही ही जाबदेणार यांच्या सेवेतील त्रुटी ठरते. म्हणून तक्रारदार सोसायटी नुकसान भरपाई मिळण्यास पात्र ठरते. तक्रारदारांनी नुकसान भरपाई पोटी रुपये 5,00,000/- ची मागणी केलेली आहे परंतू त्या संदर्भात पुरावा दाखल केलेला नाही. म्हणून मंच जाबदेणार यांनी तक्रारदार सोसायटीस नुकसान भरपाई पोटी रुपये 5,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 1,000/- दयावेत व कन्व्हेअन्स डीड जाबदेणार यांनी करुन दयावे असा आदेश देत आहे.
वरील विवेचनावरुन व दाखल कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश देण्यात येत आहे-
:- आदेश :-
[1] तक्रार अंशत: मान्य करण्यात येत आहे.
[2] जाबदेणार यांनी तक्रारदार सोसायटीस नुकसान भरपाई पोटी रुपये 5,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 1,000/- दयावेत व कन्व्हेअन्स डीड आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत करुन दयावे.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.