-निकालपत्र–
(पारित व्दारा- सौ.चंद्रिका किशोरसिंह बैस, मा.सदस्या.)
( पारित दिनांक-03 ऑक्टोंबर, 2016)
01. तक्रारकर्त्याने ही तक्रार, विरुध्दपक्ष क्रं-1) ते क्रं-3) विरुध्द ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली त्याने विरुध्दपक्षां कडून विकत घेतलेल्या भ्रमणध्वनी मध्ये दोष निर्माण झाल्याने दाखल केली आहे.
02. तक्रारीचे स्वरुप थोडक्यात खालील प्रमाणे-
विरुध्दपक्ष क्रं-3) मायक्रोमॅक्स कंपनी ही भ्रमणध्वनी निर्माता कंपनी आहे. तर विरुध्दपक्ष क्रं-1) हे त्या भ्रमणध्वनीचे विक्रेता आहेत. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं-1) विक्रेता यांचे कडून, विरुध्दपक्ष क्रं-3) कंपनी निर्मित भ्रमणध्वनी (Tablet Computer) दिनांक-02/11/2012 रोजी एकूण किम्मत रुपये-7499/- मध्ये विकत घेतला. सदर भ्रमणध्वनीचा मॉडेल क्रं-P-350 असा असून त्याचा IMEI No.-911235600140594 असा आहे, विरुध्दपक्ष क्रं-1) विक्रेता यांनी त्यावर एक वर्षाची हमी दिली होती व तो चांगला असल्या बद्दल आश्वासन दिले होते.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, विरुध्दपक्ष क्रं-3) ही ख्यातीप्राप्त निर्माता कंपनी असून तिचे दर्जेदार उत्पादने असल्याने भ्रमणध्वनी चांगला असेल अशी त्याला खात्री होती परंतु पहिल्या दिवसा पासूनच Tablet Computer मध्ये
Application Data नष्ट होणे, ऑडीयो रिसीव्ह न होणे व ऑडीयो न जाणे, लाऊडस्पीकर मध्ये आवाज न येणे अशा तक्रारी निर्माण झाल्यात. याचाच अर्थ असा होतो की, तक्रारकर्त्याला दुय्यम दर्जाचा भ्रमणध्वनी (Tablet Computer) दिला. या सर्व तक्रारीं मुळे तक्रारकर्त्याला भ्रमणध्वनीचा काहीच फायदा झाला नाही. पहिल्या दिवसा पासून भ्रमणध्वनी बंद पडल्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं-1) विक्रेता यांचेकडे संपर्क साधला असता, त्यांनी, विरुध्दपक्ष क्रं-2) यांचेशी संपर्क साधण्यास सांगितले, त्या प्रमाणे विरुध्दपक्ष क्रं-2) यांचेशी संपर्क साधला असता, त्यांनी भ्रमणध्वनी मध्ये उदभविलेल्या दोषांची व खरेदी बिलाची खात्री करुन तक्रारकर्त्यास भ्रमणध्वनी दुकानात दुरुस्तीसाठी ठेवण्यास सांगितले, त्याप्रमाणे तो ठेवण्यात आला व पंधरा दिवसा नंतर संपर्क करण्यास सांगितले. त्यानंतरही वारंवार संपर्क साधूनही विरुध्दपक्ष क्रं-2) यांनी भ्रमणध्वनी दुरुस्त करुन दिला नाही व तो आज पर्यंत विरुध्दपक्ष क्रं-2) यांचेच ताब्यात आहे, त्यामुळे त्याला पुन्हा नव्याने भ्रमणध्वनी विकत घ्यावा लागला.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, विरुध्दपक्षां तर्फे त्याच्या तक्रारीचे निराकरण न झाल्यामुळे त्याने विरुध्दपक्ष क्रं-1) ते 3) यांना दिनांक-22/02/2013 रोजी नोंदणीकृत डाकेने नोटीस पाठविली, त्या नोटीसच्या पोच तक्रारकर्त्याला प्राप्त झाल्यात परंतु विरुध्दपक्षांनी नोटीसला कोणतेही उत्तर दिले नाही.
म्हणून त्याने प्रार्थना केली की, त्याने वर्णनातीत केलेला दोषपूर्ण भ्रमणध्वनी बदलवून दुसरा नविन भ्रमणध्वनी देण्याचे विरुध्दपक्षांना आदेशित व्हावे. तसेच त्याला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-20,000/- आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-5000/- विरुध्दपक्षां कडून मिळावेत.
03. विरुध्दपक्ष क्रं-1) भ्रमणध्वनी विक्रेता यांनी लेखी उत्तरात त्यांचे कडून तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं-3) कंपनी निर्मित Computer Tablets रुपये-7499/- मध्ये दिनांक-02/11/2012 रोजी विकत घेतल्याची बाब मान्य केली. तक्रारकर्त्याचे म्हणण्या प्रमाणे पहिल्याच दिवसा पासून भ्रमणध्वनी मध्ये दोष निर्माण झालेत तर त्याने त्याच दिवशी विरुध्दपक्ष क्रं-1) विक्रेता आणि विरुध्दपक्ष क्रं-3) निर्माता कंपनीकडे तक्रार का केली नाही. तक्रारकर्त्याने प्रथम त्यांचेकडे दिनांक-28/12/2012 रोजी भेट दिली आणि त्याचे कडील टॅबलेट व्यवस्थित काम करीत नसल्याचे सांगितले त्यावरुन त्यांनी विरुध्दपक्ष क्रं 2 यांचेशी संपर्क साधण्यास सांगितले, जे नागपूर शहरा
करीता भ्रमणध्वनीचे डिलर्स आहेत व ते चांगल्या रितीने काय झाले आहे हे सांगू शकतील. तक्रारकर्त्याने दिनांक-22/02/2013 रोजीची नोटीस देण्या पूर्वी विरुध्दपक्ष क्रं-2) यांनी त्याला भ्रमणध्वनी कोणतेही शुल्क न घेता बदलवून देण्याचे सांगितले होते परंतु तक्रारकर्त्याने त्यास नकार दिला. विरुध्दपक्ष क्रं-1) फक्त विक्रेता आहेत, भ्रमणध्वनी मध्ये दोष निर्माण झाल्यास ते जबाबदार नसल्याने त्यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्याची विनंती केली.
04. विरुध्दपक्ष क्रं-2) ला मंचाची नोटीस मिळूनही ते गैरहजर राहिल्याने त्यांचे विरुध्द तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश मंचाने प्रकरणात दिनांक-18/03/2015 रोजी पारीत केला.
05. विरुध्दपक्ष क्रं-3) भ्रमणध्वनी निर्माता कंपनीने मंचा समक्ष उत्तर सादर केले. त्यांचे उत्तरा नुसार ते चांगल्या दर्जाचे भ्रमणध्वनीचे उत्पादन करतात. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं-1) विक्रेता यांचे कडून, त्यांचेव्दारा निर्मित भ्रमणध्वनी दिनांक-02/11/2012 रोजी रुपये-7499/- किंमती मध्ये विकत घेतल्याची बाब माहिती अभावी नाकबुल केली. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं-3) यांनी त्यास कशी दोषपूर्ण सेवा दिली याचा उल्लेख केलेला नाही. तक्रारकर्त्याची संपूर्ण तक्रार ही खोटी असून ती खारीज करण्याची विनंती केली.
06. तक्रारकर्त्याची तक्रार, विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-3) यांचे उत्तर आणि प्रकरणातील उपलब्ध दस्तऐवजांचे अवलोकन करण्यात आले, त्यावरुन खालील प्रमाणे मंचाचा निष्कर्ष देण्यात येतो-
::निष्कर्ष ::
07. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं-1) विक्रेता यांचे कडून, विरुध्दपक्ष क्रं-3) मायक्रोमॅक्स कंपनी निर्मित भ्रमणध्वनी (Tablet Computer) MICROMAX MODEL P-350 दिनांक-02/11/2012 रोजी एकूण किम्मत रुपये-7499/- मध्ये विकत घेतला असल्याची बाब दस्तऐवज क्रं-2) बिलाचे प्रतीवरुन सिध्द होते व ही बाब विरुध्दपक्षांना सुध्दा मान्य आहे. सदर भ्रमणध्वनीचा IMEI No.-911235600140594 असा असल्याचे दस्तऐवज क्रं 1 वरुन दिसून येते.
08. तक्रारकर्त्याचे असे म्हणणे आहे की, त्याने विकत घेतल्या पासून प्रथम दिवसां पासून Tablet Computer मध्ये Application Data नष्ट होणे, ऑडीयो रिसीव्ह न होणे व ऑडीयो न जाणे, लाऊडस्पीकर मध्ये आवाज न येणे अशा तक्रारी निर्माण झाल्यात, या सर्व तक्रारीं मुळे त्याने विरुध्दपक्ष क्रं-1) विक्रेता यांचेकडे संपर्क साधला असता त्यांनी विरुध्दपक्ष क्रं-2) यांचेशी संपर्क साधण्यास सांगितले, त्या प्रमाणे विरुध्दपक्ष क्रं-2) यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी भ्रमणध्वनी मध्ये उदभविलेल्या दोषांची व खरेदी बिलाची खात्री करुन भ्रमणध्वनी दुकानात दुरुस्तीसाठी ठेवण्यास सांगितले, त्याप्रमाणे तो ठेवण्यात आला व पंधरा दिवसा नंतर संपर्क करण्यास सांगितले परंतु त्यानंतरही वारंवार संपर्क साधूनही विरुध्दपक्ष क्रं-2) यांनी भ्रमणध्वनी दुरुस्त करुन दिला नाही व तो आज पर्यंत विरुध्दपक्ष क्रं-2) यांचेच ताब्यात आहे, त्यामुळे त्याला पुन्हा नव्याने भ्रमणध्वनी विकत घ्यावा लागला.
09. विरुध्दपक्ष क्रं-2) मे.मोबाईल एक्सपर्ट, मेडीकल चौक, नागपूर यांचेकडे भ्रमणध्वनी दुरुस्तीसाठी दिनांक-28/12/2012 रोजी जमा केल्याचे दस्तऐवज क्रं-1) वरुन दिसून येते.
10. तक्रारकर्त्याने भ्रमणध्वनी दिनांक-02/11/2012 रोजी विकत घेतल्या नंतर एक महिन्याचे आत म्हणजे दिनांक-28/12/2012 रोजी तो विरुध्दपक्ष क्रं-2) यांचेकडे दुरुस्तीसाठी जमा करावा लागला. तक्रारकर्त्याचा असाही आरोप आहे की, त्याला आज पर्यंत विरुध्दपक्ष क्रं-2) ने तो भ्रमणध्वनी परत केलेला नाही. तक्रारकर्त्याची तक्रार ही प्रतिज्ञालेखावर दाखल असून विरुध्दपक्ष क्रं-2) ला नोटीस मिळूनही ते मंचा समक्ष उपस्थित झाले नाहीत वा त्यांनी तक्रारकर्त्याची विधाने सुध्दा खोडून काढलेली नाहीत. विरुध्दपक्ष क्रं-2 आणि विरुध्दपक्ष क्रं-3) निर्माता यांचे कडूनही तक्रारकर्त्याची विधाने खोडून काढण्यासाठी कोणताही पुरावा मंचा समोर आलेला नाही. अशा परिस्थितीत भ्रमणध्वनी विकत घेतल्या पासून त्यामध्ये एक महिन्याचे आत दोष निर्माण झाल्यामुळे त्यामध्ये उत्पादकीय दोष (Manufacturing Defects) असल्याची बाब सिध्द होते. तक्रारकर्त्यास दिनांक-28/12/2012 पासून ते आज पर्यंत भ्रमणध्वनीचे उपयोगा पासून वंचित राहावे लागले. अशाप्रकारे विरुध्दपक्ष क्रं-2) व
क्रं-3) यांनी तक्रारकर्त्यास दोषपूर्ण सेवा दिल्यामुळे त्याला निश्चीतच शारिरीक, मानसिक त्रास व आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे, त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार विरुध्दपक्ष क्रं-2) व क्रं-3) निर्माता यांचे विरुध्द मंजूर होण्यास पात्र आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. विरुध्दपक्ष क्रं-1) हे विक्रेता असून त्यांनी योग्य ती सेवा तक्रारकर्त्याला दिलेली असल्यामुळे त्यांना तक्रारीतुन मुक्त करण्यात येते.
11. वरील सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन, आम्ही तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-
::आदेश ::
(01) तक्रारकर्त्याची, विरुध्दपक्ष क्रं-2) मेसर्स मोबाईल एक्सपर्ट, मेडीकल चौक, नागपूर (Tablet Computer Service Center) आणि विरुध्दपक्ष क्रं-3) मायक्रोमॅक्स इन्फरमेटीक्स, गुडगाव (Tablet Computer Manufacturer) यांचे विरुध्दची तक्रार “वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या” (Jointly & Severally) अंशतः मंजूर करण्यात येते.
(02) विरुध्दपक्ष क्रं-2) व क्रं-3) यांना आदेशित करण्यात येते की, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं-1) विक्रेता यांचे कडून विकत घेतलेला मायक्रोमॅक्स कंपनी निर्मित भ्रमणध्वनी (Tablet Computer) MICROMAX MODEL P-350/IMEI No.-911235600140594 यामध्ये उत्पादकीय दोष असल्याने त्याऐवजी त्याच कंपनीचा त्याच मॉडेलचा नविन MICROMAX(Tablet Computer) तक्रारकर्त्यास द्दावा व त्याचे बिल व वॉरन्टी कॉर्ड देऊन त्यावर नव्याने वॉरन्टी द्दावी.
(03) विरुध्दपक्ष क्रं-(2) व (3) यांना असा नविन (Tablet Computer) तक्रारकर्त्याला देणे शक्य नसल्यास त्या परिस्थितीत तक्रारकर्त्याने दोषपूर्ण MICROMAX(Tablet Computer) पोटी विरुध्दपक्ष क्रं-1) विक्रेता यांना दिलेली रक्कम रुपये-7499/-(अक्षरी रुपये सात हजार चारशे नव्व्याण्णऊ फक्त) रक्कम दिल्याचा दिनांक-28.12.2012 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-12% दराने व्याज यासह येणारी रककम विरुध्दपक्ष क्रं-(2) व (3) यांनी तक्रारकर्त्यास परत करावी.
(04) तक्रारकर्त्यास झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-2000/- (अक्षरी रुपये दोन हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च रुपये-2000/- (अक्षरी रुपये दोन हजार फक्त) विरुध्दपक्ष क्रं-2) व क्रं-3) यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या तक्रारकर्त्यास द्दावेत.
(05) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं-2) व क्रं-3) यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या (Jointly & Severally) निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत करावे.
(06) विरुध्दपक्ष क्रं-1) (Tablet Computer Seller) विक्रेता यांना या तक्रारीतून मुक्त करण्यात येते.
(07) प्रस्तुत निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.