(पारीत व्दारा श्री भास्कर बी. योगी, मा.अध्यक्ष)
01. तक्रारकर्तीने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 2019 च्या कलम 35 खाली विरुध्दपक्ष युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी आणि इतर यांचे विरुध्द तिचा मृतक पती याचे अपघाती मृत्यू संबधाने शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा दाव्याची रक्कम मिळण्यासाठी आणि इतर अनुषंगीक मागण्यांसाठी दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारकर्तीचे तक्रारी प्रमाणे तिचा पती श्री जितेंद्र सुरजलाल राठोड हा दिनांक-25.01.2020 रोजी अपघातात मरण पावला. तिचा मृतक पती श्री जितेंद्र सुरजलाल राठोड याचे वडील श्री सुरजलाल भरतलाल राठोड यांचे नावे मौजा सोरना, तालुका तुमसर, जिल्हा भंडारा येथे शेती असून त्याचा भूमापन क्रं 80/1 असा आहे. तक्रारकर्तीचे पती व त्याचे वडील म्हणजेचे तक्रारकर्तीचे सासरे हे दोघे मिळून शेतीचा व्यवसाय पाहत होते आणि विम्याचे वैध कालावधीत तिचे पतीचा अपघाताने मृत्यू झाल्याने मृतकाची पत्नी आणि कायदेशीर वारसदार या नात्याने विमा दाव्याची रक्कम मिळावी यासाठी तक्रारकर्तीने जिल्हा ग्राहक आयोगा समोर प्रस्तुत तक्रार दाखल केली. तक्रारी मध्ये नमुद केल्या प्रमाणे तिचे मृतक पतीची माहिती खालील विवरणपत्रामध्ये देण्यात येते-
मृतक शेतक-याचे नाव | श्री जितेंद्र सूरजलाल राठोड |
मृतकाचे नावे असलेल्या शेतीचा तपशिल | मृतक शेतकरी श्री जितेंद्र सूरजलाल राठोड हा श्री सूरजलाल भरतलाल राठोड यांचा मुलगा असून त्याचे वडीलांचे नावे मौजा सोरना, तालुका तुमसर, जिल्हा भंडारा येथे शेती असून त्याचा भूमापन क्रं 80/1 असा आहे |
अपघात दिनांक व अपघात मृत्यूचा दिनांक | अपघात दिनांक-24.01.2020 व अपघाती मृत्यू दिनांक-25/01/2020 |
मृत्यूचे कारण | मृतक वाहन चालविताना अपघाती मृत्यू |
तालुका कृषी अधिकारी यांचे कडे विमा दावा सादर केल्याचा दिनांक | 14/02/2020 |
त.क.चे विमा दाव्या संबधात सद्द स्थिती काय आहे | विरुध्दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी यांनी तक्रारकर्तीचे नोटीसला दिनांक-16.09.2021 रोजी लेखी उत्तर पाठवून त्याव्दारे विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने त्यांचे दिनांक-16 ऑगस्ट, 2020 रोजीचे पत्राव्दारे तक्रारकर्तीचा विमा दावा हा मृतकाने निष्काळजीपणामुळे वाहन चालविल्यामुळे झालेला अपघात असल्याने रद्द केला असे कळविल्याचे नमुद केले. |
| |
तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, यातील विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी आहे . तर विरुध्दपक्ष क्रं 2 जयका इन्शुरन्स ब्रोकरेज प्रायव्हेट सर्व्हीसेस लिमिटेड हे प्राप्त विमा दाव्यांची तपासणी करुन त्रृटींची पुर्तता करवून घेऊन पुढे तो विमा दावा प्रस्ताव निश्चीतीसाठी विमा कंपनी कडे दाखल करतात. विरुध्दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी हे महाराष्ट्र शासनाचे वतीने विमा दावे स्विकारुन ते विमा दावे निर्णयार्थ जयका इन्शुरन्स सर्व्हीसेस तर्फे विमा कंपनी कडे पाठवितात. सदर विमा पॉलिसी प्रमाणे अपघाती मृत्यू संबधात कायदेशीर वारसदारास रुपये-2,00,000/- एवढी रक्कम मिळणार होती. परंतु तक्रारकर्ती हिचा विमा दावा विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने मृतकाने निष्काळजीपणामुळे वाहन चालविल्याने अपघात झाल्याचे कारणावरुन नामंजूर करुन दोषपूर्ण सेवा दिली, त्यामुळे तिला शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. म्हणून शेवटी तिने प्रस्तुत तक्रार जिल्हा ग्राहक आयोगा समोर दाखल करुन त्याव्दारे विरुध्दपक्षां विरुध्द खालील मागण्या केल्यात-
1. विरुध्दपक्षांनी तक्रारकर्तील विमा दाव्याची रक्कम रुपये-2,00,000/- विमा दावा प्रस्ताव दाखल केल्याचा दिनांक-14.02.2020 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो वार्षिक-18 टक्के दराने व्याजासह देण्याचे आदेशित व्हावे
2. तक्रारकर्तीला झालेल्या शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रासा बद्दल रुपये-50,000/- आणि तक्रारीचा खर्च रुपये-20,000/- विरुध्दपक्षां कडून मिळावा. या शिवाय योग्य ती दाद त्यांचे बाजूने मंजूर करण्यात यावी.
03. विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीला संधी देऊनही त्यांनी शेवट पर्यंत लेखी उत्तर जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केले नाही करीता विरुध्दपक्ष क्रं 1 विरुध्द तक्रारी मध्ये त्यांचे लेखी उत्तरा शिवाय तक्रार पुढे चालविण्याचा आदेश जिल्हा ग्राहक आयोगाने दिनांक-30 ऑगस्ट, 2022 रोजी पारीत केला.
04 विरुध्दपक्ष क्रं 2 जयका इन्शुरन्स ब्रोकरेज सर्व्हीसेस प्रायव्हेट लिमिटेड यांनी आपले लेखी उत्तर जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केले. त्यांचे लेखी उत्तरा प्रमाणे यातील तालुका कृषी अधिकारी यांना शासनाचे मार्फतीने विमा दाव्या संबधीचे कामकाज करण्यासाठी सक्षम अधिकारी म्हणून प्राधिकृत केलेले आहे. ते शासन आणि विमा कंपनी यांचे मध्ये मध्यस्थाची भूमीका बजावतात. तालुका कृषी अधिकारी यांचे कडून प्राप्त विमा दाव्याची छाननी करुन संबधितां कडून विमा दाव्यातील त्रृटींची पुर्तता संबधितां कडून ते करवून घेतात. विमा दावा निश्चीतीचे अधिकार हे विमा कंपनीला आहेत. तक्रारकर्ती हिने तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयात दिनांक-15.02.2020 रोजी विमा दावा दाखल केला होता. सदर विमा दावा प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालया कडून जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी,भंडारा यांना दिनांक-24.02.2020 रोजी प्राप्त झाला होता. पुढे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांचे मार्फतीने त्यांना विमा दावा दिनांक-31.07..2020 रोजी प्राप्त झाला होता. विमा दाव्याची छाननी करुन त्यांनी पुढे तो विमा दावा दस्तऐवजासह विरुध्दपक्ष् क्रं 1 विमा कंपनी कडे दिनांक-13.08.2020 रोजी पाठविला होता. विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने अपघाताचे वेळी मृतकाने निष्काळजीपणाने वाहन चालविल्याने अपघात झाला या कारणा वरुन त्यांचे दिनांक-16.08.2020 रोजीचे पत्रान्वये तक्रारकर्ती हिचा विमा दावा नामंजूर केला. अशाप्रकारे त्यांनी अशा प्रकारे त्यांनी त्यांचे कर्तव्य योग्यरितीने पार पाडलयामुळे त्यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्याची विनंती केली.
05. तालुका कृषी अधिकारी, मोहाडी यांनी लेखी उत्तर जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केले. तक्रारकर्तीचा पती श्री जितेन्द्र सूरज राठोड, मौजा सोरणा तहसिल तुमसर जिल्हा भंडारा हा श्री सूरजलाल भरतलाल राठोड या शेतक-याचा मुलगा होता व त्याचा अपघातामुळे दिनांक-25.01.2020रोजी अपघाती मृत्यू झाला होता. त्याचे मृत्यू नंतर त्याचे पत्नीने तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयात विमा दावा प्रस्ताव दिनांक-14.02.2020 रोजी दाखल केला होता, त्यांनी त्वरीत त्यांचे कार्यालयाचे पत्र कं 729 अन्वये दिनांक-15.02.2020 रोजी सदर विमा दावा प्रस्ताव त्यांचे वरिष्ठ अधिकारी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, भंडारा यांचे कडे सादर केला होता. मा. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भंडारा यांनी कळविल्यानुसार त्रृटीची पुर्तता पोलीस अधिका-याने साक्षांकीत केलेला मरणोत्तर पंचनामा त्यांचे कार्यालयाचे पत्र क्रं 919, दिनांक-04.03.2020 नुसार करण्यात आलेली आहे. विरुध्दपक्ष क्रं 1 सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनीने विमा दावा प्रस्ताव रद्द केल्या बाबतचे पत्र त्यांचे कार्यालयास प्राप्त होताच त्यांचे कार्यालयाचे पत्र क्रं 2175 दिनांक-05.11.2020 अनुसार तक्रारकर्ती श्रीमती प्रिती जितेन्द्र राठोड गाव सोरणा यांना कळविलेले आहे असे नमुद केले.
06. तक्रारकर्तीची तक्रार, शपथे वरील पुरावा व लेखी युक्तीवाद विरुध्दपक्ष क्रं 2 जयका इन्शुरन्स ब्रोकरेज प्रायव्हेट सर्व्हीसेस प्रायव्हेट लिमिटेड यांचे शपथे वरील उत्तर, विरुध्दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी यांचे लेखी उत्तर आणि प्रकरणातील उपलब्ध दस्तऐवजांचे अवलोकन करण्यात आले, त्यावरुन जिल्हा ग्राहक आयोगाचा निष्कर्ष खालील प्रमाणे आहे-
::निष्कर्ष::
07 विरुध्दपक्ष क्रं 1 युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनीचे दिनांक-16.08.2020 रोजीचे तक्रारकर्तीचे नावे दिलेले विमा दावा रद्दचे पत्र अभिलेखावर दाखल आहे त्यामध्ये विमा दावा रद्द केल्याचे कारण नमुद केलेले आहे ते पुढील प्रमाणे-
आपण सादर केलेल्या विमा दाव्याच्या कागदपत्रा नुसार दिनांक-24.01.2020 रोजी वरील शेतक-याचा रस्ता अपघात होऊन दिनांक-25.01.2020 रोजी मृत्यू झाला होता. दिनांक-24.01.2020 रोजी सायंकाळी 6.00 वाजताचे सुमारास विमाधारक हा बांधकामाच्या विटा पाहण्यासाठी सोरना वरुन जांब या गावी गेला होता. विटा पाहून सोरना कडे परत येत असताना तलावा जवळ कच्चया पाऊल वाटेने बेपर्वाइने व निष्काळजीपणाने गाडी चालवून तसेच अंधाराकडे रोडचा अंदाज न आल्याने गाडीवरुन पडून तो स्वतःच त्याच्या मरणास कारणीभूत ठरला आहे.
वरील निरिक्षणाच्या आधारे हा दावा योजनेच्या खालील अटी नुसार नाकारल्या जात आहे-
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना प्रक्रिया व मार्गदर्शक सुचना नुसार- शासन परिपत्रक क्रमांक-शेअवि-2018/प्र.क्रं-193/11-अ विमा कंपनीचा कलम क्रमांक 18 असे नमुद करतो की, अपघातग्रसत वाहन चालकाच्या चुकीमुळे शेतक-याचा मृत्यू झालयास / अपंगत्व आल्यास दोषी वाहन चालक वगळता सर्व अपघातग्रस्त शेतक-यांचे केवळ अपघात झाला या कारणास्तव विम्याचे दावे मंजूर करावे. आपल्या निष्काळजीपणामुळे अपघातास कारणीभूत ठरलेल्या ड्रायव्हरचा दावा अमान्य करत आहोत.
08. पोलीस स्टेशन, आंधळगाव जिल्हा भंडारा यांनी दिनांक-25.01.2020 रोजी नोंदविलेल्या एफ.आय.आर. मध्ये मृतकाचा नातेवाईक श्री घनश्याम भरतलाल राठोड याने पोलीसांना दिलेल्या बयानात असे नमुद केलेले आहे की, मृतक हा स्वतःची मोटर सायकल क्रं CG-08/AF-5807 ने दिनांक-24.01.2020 रोजी सायंकाळी 6.00 वाजताचे समारास सोरणा येथून जांब येथे विटा पाहण्यासाठी गेला असता तो परत आला नाही. दुसरे दिवशी सोरणा येथील सरपंचाचे पती श्रीप्रेमलाल धोंडू राठोड याने फोन करुन सांगितले की, मृतक हा तलावा जवळ त्याची मोटर सायकल पडून जागीच मरण पावला आहे. माहिती मिळाल्या नंतर मोक्यावर गेले असता मृतक हा तोंडाचे भारावर पडलेला असून त्याचे नाकातून व तोंडातून रक्त निघालेले होते व तो मृत झाला होता. सोरणा जवळ शॉर्टकट रस्ता असून बरेच लोक त्या पायवाट रस्त्याने मोटर सायकलने जाणे येणे करतात. मृतकाने आपली मोटर सायकल हयगयीने व निषकाळजीपणाने चालवून आंधारात बॅलन्स बिघडून मोटर सायकलने खाली पडून त्याचे डोक्याला मार लागला व तो स्वतःचे मरणास कारणीभूत झालेला आहे.
09. या ठिकाणी जिल्हा ग्राहक आयोगाव्दारे स्पष्ट करण्यात येते की, मृतकाचा नातेवाईक श्री घनश्याम भरतलाल राठोड याची बयाना खाली सही घेतलेली नाही. तर बयाना खाली पोलीस जमादार सुरेश लांजेवार बक्कल क्रं 785 यांची सही आहे. दुसरी महत्वाची बाब अशी आहे की, मृतकाचा मृत्यू हा रात्रीचे आंधारात झालेला आहे आणि मृतकाचा ज्यावेळी मोटर सायकलवरुन तलावा जवळ पडून मृत्यू झाला त्यावेळी सदर घटना ही कोणीही पाहिलेली नाही म्हणजे अपघाती घटनेच्या वेळी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार कोणीही नव्हता. अशा परिस्थितीत पोलीसांनी एफ.आय.आर. मध्ये नोंदविले की, मृतकाचे आपली मोटर सायकल हयगीने व निष्काळजीपणाने चालवून आंधारात बॅलन्स बिघडल्याने अपघात होऊन मृतकाचा मृत्यू झाला ते कोणत्या आधारावर नोंदविले हे समजून येत नाही. थोडकयात पोलीसांनी नोंदविलेला एफ.आय.आर. विश्वार्साह वाटत नाही. दुसरी बाब अशी आहे की, ग्रामीण भागात ब-याच ठिकाणी अजूनही लाईट लावलेले नाहीत व बहुतांश ठिकाणी आंधाराचे साम्राज्य असते अशावेळी एखाद्दा व्यक्तीला महत्वाचे काम पडले व तो आंधारात गेला व त्याचा आंधारामुळे अपघात झाला तर तो स्वतः त्यासाठी जबाबदार आहे असे म्हणता येणार नाही. ग्रामीण भागातील बरेच लोक हे दिवसा शेतातील काम करुन रात्रीला ईतर घरगुती कामे करतात असे दिसून येते. मृतक हा आंधारात गेला होता व त्यामुळे स्वतःचे मृत्यूसाठी तो जबाबदार आहे अशी जी भूमीका विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने घेतलेली आहे, तीच मूळात चुकीची दिसून येते.
10. जिल्हा सामान्य रुग्णालय तुमसर, जिल्हा भंडारा यांनी केलेल्या शवविच्छेदन अहवाला मध्ये मृतकाचे मृत्यूचे कारण हे “Hemorrhagic Shock due to Head Injury” असे स्पष्टपणे नमुद केलेले आहे. यावरुन मृतकाचा मृत्यू हा अपघाता मुळे झाला ही बाब सिध्द होते. परंतु विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने पोलीसांनी नोंदविलेलया एफ.आय.आर.चे आधारे तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजूर करुन दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब सिध्द होते.
11. जिल्हा ग्राहक आयोगाचे मते, अपघाताचे वेळी मृतक हा दारु पिऊन नशेमध्ये होता व वाहन चालवित होता असे पोलीस पेपर्स मध्ये कुठेही आलेले नाही. दुसरी महत्वाची बाब अशी आहे की, शेतकरी अपघात विमा योजना ही शासना मार्फतीने सुरु केलेली एक कल्याणकारी योजना असल्याचे वेळोवेळी मा. वरिष्ठ न्यायालयांनी त्यांचे न्यायनिवाडयां मध्ये स्पष्ट केलेले आहे.
12. पोलीस दस्तऐवजांचा फायदा विमा कंपनीला होणार नाही या संदर्भात जिल्हा ग्राहक आयोगाव्दारे खालील मा.वरिष्ठ न्यायालयांचे निवाडयांवर भिस्त ठेवण्यात येते, त्या निवाडयांचे जिल्हा ग्राहक आयोगा तर्फे काळजीपूर्वक वाचन करण्यात आले त्यातील संक्षीप्त निरिक्षणे नोंदविण्यात आलीत, ती निरिक्षणे खालील प्रमाणे आहेत-
- IV (2011) CPJ 243 (NC)- “New India Assurance Co.Ltd.-Versus-M.S.Venkatesh Babu”
सदर प्रकरणात मा.राष्ट्रीय ग्राहक आयोगाने असे नमुद केले की, पोलीसानीं नोंदविलेला एफआयआर आणि जबाब हा पुराव्याचे कायद्दा नुसार भक्कम पुरावा आहे असे म्हणता येणार नसल्याने पोलीसांचे दस्तऐवजाचा विरुध्दपक्ष विमा कंपनीला फायदा घेता येणार नसल्याचे मत नोंदविले.
*****
- 2007 (3) CPR 142 -“New India Assurance Co.Ltd.-Versus-Hausabai Pannalal Dhoka”
सदर प्रकरणात मा.राज्य ग्राहक आयोग, मुंबई यांनी असे नमुद केले की, पोलीसानीं गुन्हयाचे प्रकरणात नोंदविलेला जबाब हा पुरावा म्हणून ग्राहय धरता येणार नाही जो पर्यंत ग्राहक मंचा तर्फे जबाब देणा-याची साक्ष घेतल्या जात नाही असे मत नोंदविले.
*****
पोलीस दस्तऐवजांचा फायदा विमा कंपनीला होणार नाही या संदर्भात जिल्हा ग्राहक आयोगा व्दारे खालील मा. वरिष्ठ न्यायालयाचे निवाडयां वर भिस्त ठेवण्यात येते-
3. III (2016) CPJ-574 (NC) “S.B.I.Life Insurance Co.-Versus-Sudesh Khanduja & Anr.”
सदर प्रकरणात मा.राष्ट्रीय ग्राहक आयोगाने डॉक्टरांचा अहवाला वरुन मृतकाने विष घेतले किंवा नाही हे स्पष्ट होऊ शकले नाही. पोलीसांनी घेतलेल्या जबाबाचा आधार हा विमा दावा नामंजूर करताना विमा कंपनीला घेता येणार नसल्याचे मत नोंदविले.
*****
4. IV (2015) CPJ 307 (NC)-“United India Assurance Co.Ltd.-Versus-Saraswatabai Balabhau Bharti”
सदर प्रकरणात मा.राष्ट्रीय ग्राहक आयोगाने असे नमुद केले की, मृतकाने विष प्राशन केले होते या संबधाने पुरावा आलेला नसल्याने त्याने आत्महत्या केली होती असा निष्कर्ष काढता येणार नसल्याचे मत नोंदविले.
*****
5. Hon’ble State Consumer Dispute Redressal Commission, Mumbai, Circuit Bench at Aurangabad, First Appeal No.FA/427/2011, Decided on-21/11/2011-“United India Insurance Company Ltd.-Versus-Smt.Sumanbai Rangrao Mugal and others”
मा.राज्य ग्राहक आयोग, खंडपिठ औरंगाबाद यांनी आदेशा मध्ये स्पष्टपणे नमुद केलेले आहे की, सदर मृत्यू प्रकरणात पोलीसांनी फौजदारी प्रक्रिया संहिते अंतर्गत कलम 174 अनुसार गुन्हा नोंदविलेला असून पोलीस चौकशी प्रलंबित आहे. विमा कंपनीने मृतकाने आत्महत्या केल्या बाबत कोणताही पुरावा दाखल केलेला नाही, जेणे करुन ही बाब सिध्द होईल की, मृतकाने आत्महत्या केलेली आहे.
6. Hon’ble National Consumer Commission, New Delhi-Consumer Case No.-100 of 2013 Decided on-01 March, 2019- “MS. Manisha Gupta & 03 others-Versus-M/s Birla Sun Life Insurance Company Ltd.”
मा.राष्ट्रीय ग्राहक आयोग यांनी दिलेल्या निवाडया मध्ये रासायनिक विश्लेषक विभागाचे (Dept. of Forensic Medicine) अहवाला मध्ये मृतकाने सायनाईड प्राशन करुन (No evidence of consumption of cyanide by late Ajay Gupta was found) आत्महत्या केल्या बाबतचा कोणताही पुरावा आढळून न आल्याने अपिलार्थी-मूळ तक्रारकर्तीचे अपिल मंजूर केले.
7. Hon’ble National Consumer Commission, New Delhi-Revision Petition No.-421 of 2013 Decided on-05 Sep., 2019- “Oriental Insurance Company Ltd.-Versus-Rishikesh Sandeep Kale & 04 others.”
मा. राष्ट्रीय ग्राहक आयोगाचे निवाडयामध्ये मृतकाने आत्महत्या केल्या बाबतचा कोणताही पुरावा विरुध्दपक्ष विमा कंपनी दाखल न करु शकल्याने विमा कंपनीचे अपिल खारीज केले. उपरोक्त नमुद मा.वरीष्ठ न्यायालयांचे न्यायनिवाडे हातातील प्रकरणात लागू होतात असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे.
उपरोक्त मा.वरिष्ठ न्यायालयांचे न्यायनिवाडयातील तत्वे (Ratio) हातातील प्रकरणात लागू होतात आणि सदर न्यायनिवाडे आमचेवर बंधनकारक आहेत.
जिल्हा ग्राहक आयोगाव्दारे मा. उच्च न्यायालयाच्या खालील निवाडयावर भिस्त ठेवण्यात येते, सदर मा. उच्च न्यायालयाचा निवाडा हातातील प्रकरणात तंतोतंत लागू पडतो
- WRIT PETITON NO.-10185 OF 2015-LATABAI RAOSAHEB DESHMUKH-VERSUS-THE STATE OF MAHARASHTRA & ANOTHER
सदर निवाडया मध्ये मा. उच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, मृतक शेतक-याची मोटर सायकल ही रस्त्याच्या उजव्या बाजूला सापडली आणि मृतक शेतक-याच्या दोषामुळे अपघात झाला होता असे कुठेही दस्तऐवजा मध्ये नमुद नाही. आमचे समोरील हातातील प्रकरणात सुध्दा मृतकाने निषकाळजीपणाने मोटर सायकल चालविली होती असा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही.
2. HON’BLE MAHARASHTRA STATE CONSUMER DISPUTE REDRESSAL COMMISSION MUMBAI, BENCH AT AURANGABAD- FIRST APPEAL NO. 158 OF 2020 DATE OF ORDER -24/11/2021- THE ORIENTAL INSURANCE COMPANY-VERSUS-SMT. GAYABAI APPASAHEB JADHAV & OTHERS.
सदर निवाडया मध्ये मा. उच्च न्यायालयाचे WRIT PETITON NO.-10185 OF 2015-LATABAI RAOSAHEB DESHMUKH-VERSUS- THE STATE OF MAHARASHTRA AND ANOTHER या निवाडयाचा आधार घेऊन पुढे असे नमुद केले की, Wherein the Hon’ble High Court observed that, there was nothing to infer that accident was occurred due to fault of deceased, and to reject the claim. Insurance Company has committed deficiency in service mistaken in rejecting claim. In view of the scheme introduced for benefit of farmers, as seen in GR of 2009 is binding on the insurance company. This court hold that, compensation needs to be given to the petitioner and interest also to be paid, as provided in GR of 2009.
उपरोक्त नमुद मा. वरिष्ठ न्यायालयांचे न्यायनिवाडे आमचे समोरील हातातील प्रकरणात लागू पडतात. त्यामुळे आम्ही असा निष्कर्ष काढीत आहोत की, विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने तक्रारकर्तीचा विमा दावा नाकारुन दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब सिध्द होते.
13. आम्ही महाराष्ट्र शासनाचे कृषी, पशुसवंर्धन, दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे दिनांक-19 सप्टेंबर, 2019 रोजीचे परिपत्रकाचे वाचन केले, त्यामध्ये विमा कंपनी या सदरा खाली विमा कंपनीस सुचना दिलेल्या आहेत, त्यामधील विमा दावा निकाली काढण्यासाठी काही सुचना पुढील प्रमाणे आहेत.
अक्रं-9 विमा कंपन्यांना सुस्पष्ट कारणां शिवाय विमा प्रस्ताव नाकारता येणार नाहीत. विमा कंपन्यांनी नामंजूर विमा दाव्या प्रकरणी सुस्पष्ट कारणमीमांसा संबधित शेतक-यांना कटाक्षाने मराठी भाषेतच कळविले व त्याची प्रत विमा सल्लागार कंपनी/आयुक्त कृषी/ सहसंचालक कृषी/ जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी/तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे पाठविणे व विमा संगणक प्रणाली मध्ये नोंद घेणे अनिवार्य आहे.
अक्रं-10 विमा प्रस्तावात त्रुटी असल्यास त्या बाबतचे पत्र संबधित अर्जदारास पोहोच करावे व त्याची प्रत विमा सल्लागार कंपनी/ जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांना दयावी. परिपूर्ण प्रस्ताव प्राप्त झाल्या पासून 21 दिवसाच्या आत उचित कार्यवाही करावी (मंजूरी, नामंजूरी, त्रुटी कळविणे) न केलास तीन महिन्यां पर्यंत दावा रकमेवर दरमहा 9 टक्के व त्यानंतर पुढे 15 टक्के व्याज देय राहील.
अक्रं-11 प्रकरण मंजूर केल्यावर पंधरा दिवसांच्या आत अनुज्ञेय नुकसान भरपाई संबधित लाभार्थ्यांच्या खात्या वर जमा करणे बंधनकारक राहील. अन्यथा तीन महिन्या पर्यंत दावा रकमेवर दरमहा 9 टक्के व त्यानंतर 15 टक्के व्याज देय राहील.
अक्रं-12 परिपूर्ण विमा दावा कंपनीकडे सादर झाल्या पासून त्यावर 21 दिवसांच्या आत कार्यवाही करणे विमा कंपनी वर बंधनकारक राहील. मात्र तरीही विमा कंपनीने कागदपत्रांची पुर्तता झालेल्या प्रकरणी मंजूरी योग्य प्रस्ताव नाकारल्यास विमा सल्लागार कंपनीने शेतक-यांच्या वतीने इर्डा ग्राहक तक्रार कक्ष/ विमा न्यायाधीश/ जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच/ राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग/न्यायालय येथे दावे दाखल करेल.
अक्रं-13 शेतक-यांचा विमा प्रस्ताव विहित कागदपत्रांसह विमा योजनेच्या कालावधीत कधीही प्राप्त झाला तरी तो विचारात घेणे विमा कंपनीला बंधनकारक राहील.
अक्रं-14 तथापी विमा पॉलिसी कालावधीच्या अखेरच्या दिवसात झालेल्या अपघातासाठी योजनेचा कालावधी संपल्या पासून 90 दिवसा पर्यंत पूर्वसूचना प्राप्त होणारे व संगणक प्रणाली मध्ये विहित कालावधीत कागदपत्रांसह नोंद झालेल्या पूर्वसूचना पत्रा नुसार विमा प्रस्ताव सुध्दा स्विकारणे विमा कंपनीस बंधनकारक राहील.
वरील प्रमाणे शासन परिपत्रकात सुचना विमा कंपनीसाठी निर्गमित केलेल्या आहेत. महाराष्ट्र शासनाचे परिपत्रका नुसार परिपूर्ण प्रस्ताव प्राप्त झाल्या पासून 21 दिवसाच्या आत उचित कार्यवाही करावी (मंजूरी, नामंजूरी, त्रुटी कळविणे) न केलास तीन महिन्यां पर्यंत दावा रकमेवर दरमहा 9 टक्के व त्यानंतर पुढे 15 टक्के व्याज देय राहील असे स्पष्ट नमुद आहे.
महाराष्ट्र शासनाचे कृषी, पशुसवंर्धन, दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे दिनांक-19 सप्टेंबर, 2019 रोजीचे परिपत्रका नुसार राज्यातील सर्व वहितीधारक शेतकरी व त्याच बरोबर शेतक-याच्या कुटूंबातील कोणताही 1 वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेला व्यक्ती आई-वडील, शेतक-याची पती, पत्नी, मुलगा, अविवाहित मुलगी यापैकी कोणताही एक व्यक्ती असे 10 ते 75 वयोगटातील एकूण 2 जणांना विमाछत्र प्रदान करण्यासाठी सुधारीत स्वरुपात गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यास मान्यता दिलेली आहे.आमचे समोरील हातातील प्रकरणात तक्रारकर्तीचा पती श्री जितेंद्र सूरजलाल राठोड याचे वडील श्री सूरजलाल भरतलाल राठोड यांचे नावे भूमापन क्रं-80/1 मौजा सोरणा, तहसिल तुमसर, जिल्हा भंडारा येथे 0.21 हेक्टर आर शेती असल्याचे 7/12 उता-यावरुन सिध्द होते. मृतकाचे वडीलांचे नावे शेती असल्याने मृतक हा शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभार्थी असून मृतकाचे अपघातील मृत्यू नंतर त्याची पत्नी तक्रारकर्ती ही कायदेशीर वारसदार या नात्याने विमा रक्कम मिळण्यास पात्र आहे असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे.
14. उपरोक्त विवेचन केल्या प्रमाणे मृतकाची पत्नी व कायदेशीर वारसदार तक्रारकर्ती श्रीमती प्रिती जितेंद्र राठोड हीला विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी कडून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने प्रमाणे तिचे पतीचे अपघाती मृत्यू संबधात विमा रक्कम रुपये-2,00,000/- आणि सदर विमा रकमेवर विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने विमा नामंजूर केल्याचा दिनांक-16.08.2020 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.15 टक्के दराने व्याज मंजूर करणे योग्य व न्यायोचित होईल. त्याच बरोबर तक्रारकर्ती हिला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/- आणि तक्रारीचा खर्च रुपये-10,000/- मंजूर करणे योग्य व न्यायोचित होईल असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे.
15. उपरोक्त नमुद वस्तुस्थितीचा विचार करुन आम्ही प्रस्तुत तक्रारी मध्ये खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-
::अंतिम आदेश::
- तक्रारकर्ती श्रीमती प्रिती जितेंद्र राठोड यांची तक्रार विरुध्दपक्ष क्रं 1 युनिव्हर्सल जनरल इन्शुरन्स कंपनी तर्फे मॅनेजर, नवी मुंबई यांचे विरुध्द खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीला आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्ती श्रीमती प्रिती जितेंद्र राठोड हिला तिचे पतीचे अपघाती मृत्यू संबधाने देय विमा रक्कम रुपये-2,00,000/- (अक्षरी रुपये दोन लक्ष फक्त) अदा करावी आणि सदर विमा रकमेवर विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने विमा नामंजूर केल्याचा दिनांक-16.08.2020 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-15 टक्के दराने व्याजाची रक्कम तक्रारकर्तीला अदा करावी.
- तक्रारकर्तीला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्त) आणि प्रस्तुत तक्रारीचा खर्च रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्त) विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने तक्रारकर्तीस अदा करावेत.
- विरुध्दपक्ष क्रं 2 जयका इन्शुरन्स ब्रोकरेज सर्व्हीसेस प्रायव्हेट लिमिटेड, नागपूर यांनी त्यांचे कर्तव्य योग्य रितीने पार पाडल्याने त्यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
- विरुध्दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी, मोहाडी, तालुका मोहाडी, जिल्हा भंडारा यांनी त्यांचे कर्तव्य योग्य रितीने पार पाडल्याने त्यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
- सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत करावे.
- निकालपत्राच्या प्रथम प्रमाणित प्रती सर्व पक्षकांराना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
- सर्व पक्षकारांनी अतिरिक्त संच जिल्हा आयोगाचे कार्यालयातून परत घेऊन जावेत.