जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 117/2020. तक्रार दाखल दिनांक : 07/09/2020. तक्रार निर्णय दिनांक : 09/09/2021.
कालावधी : 01 वर्षे 00 महिने 02 दिवस
लक्ष्मण पांडुरंग गुडे, वय 41 वर्षे, धंदा : व्यापार,
रा. पांडुरंग कृपा निवास, मंठाळे नगर, समाज कल्याण कार्यालयाजवळ,
शिवनेरी गेट क्र.1 समोर, लातूर, ता.जि. लातूर - 413 512. तक्रारकर्ता
विरुध्द
(1) मॅनेजर, Seller - Online Shoppers, शॉप नं.19, सेकंड फ्लोअर,
माया कॉम्प्लेक्स, शिला बायपास चौक, रोहतक - सोनिपत रोड,
रोहतक, हरियाना स्टेट - 124 001.
(2) व्यवस्थापक, DELHIVERY PVT LTD. (www.delhivery.com),
नांदेड-औसा रिंग रोड, श्रीनिवास नगर, आदित्य आंगणसमोर,
लातूर, ता. जि. लातूर - 413 512. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : मा. श्री. कमलाकर अ. कोठेकर, अध्यक्ष
मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
मा. श्रीमती रेखा जाधव, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- ए.एम.के. पटेल
विरुध्द पक्ष एकतर्फा
विरुध्द पक्ष क्र.2 यांचेकरिता विधिज्ञ :- पी.ए. मुजावर
न्यायनिर्णय
मा. श्रीमती रेखा जाधव, सदस्य यांचे द्वारा :-
(1) अर्जदाराने दि.1/8/20 रोजी व्हाटस-अपद्वारे शॉईमी कंपनीचा रेडमी 9 प्रो मॅक्स ब्ल्यू अरोरा कलर बुक केला. गैरअर्जदार क्र.1 यांनी त्याची किंमत रु.13,000/- रुपये सांगितली. डिस्काऊंट वजा करता रु.11,000/- आणि कुरिअर चार्जेस व ऑर्डर कन्फर्मेशनसाठी रु.500/- असे एकूण रु.11,500/- सदर मोबाईलची किेंमत सांगण्यात आली. अर्जदाराने दि.1/8/2020 रोजी रु.500/- गैरअर्जदार क्र.1 च्या खात्यावर हस्तांतरीत केली. गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदारास व्हाटस-अपद्वारे फॉर्म भरुन देण्याचा संदेश दिला. त्याप्रमाणे अर्जदाराने संपूर्ण माहिती दिली. गैरअर्जदार क्र.1 यांनी गैरअर्जदार क्र.2 ची मोबाईल डिलेव्हरीकरिता अर्जदारास लिंक सांगितली. अर्जदाराने सदर कन्साईनमेंट शोध लिंकद्वारे घेतला असता त्याचा शोध लागला नाही. सदरची माहिती गैरअर्जदार क्र.1 यास कळविली असता त्यांनी पोस्टाच्या नांवात चूक झाल्याचे कळविले. अर्जदारास दि.7 ऑगस्ट, 2020 रोजी गैरअर्जदार क्र.2 मार्फत पार्सल कन्साईनमेंट क्रमांक (mob) No. AWB4583910001492 सांगितला. अर्जदाराने सदरचे कन्साईनमेंट पार्सल उघडते वेळेस व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क करावा, असे गैरअर्जदार क्र.1 ने सांगितले आणि रक्कम रु.11,000/- डिलेव्हरी घेण्यापूर्वी गैरअर्जदार क्र.2 यांस देण्यास सांगितले. त्याप्रमाणे अर्जदाराने रक्कम अदा केली आणि व्हिडीओ कॉलसमक्ष सदरील बॉक्समधील पार्सल उघडले असता बुकींग केलेला शॉईमी कंपनीचा रेडमी 9 प्रो मॅक्स नसून मॅफे कंपनीचा वापरलेला व खराब झालेला मोबाईल दिसून आला. त्यावेळी गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदारास सदरचे पार्सल चुकीने प्राप्त झाले आहे, तुमच्याकडे ठेवा, तुमचे बुक झालेला हँडसेट तुम्हाला प्राप्त झाल्यास सदरचे पार्सल परत करा, असे आश्वासन दिले. अर्जदाराने गैरअर्जदार क्र.1 शी अनेकवेळा संपर्क साधला. तरीही त्यांनी अर्जदारास बुकींग केल्याप्रमाणे मोबाईल हँडसेट पाठविला नाही व अर्जदारास कुठल्याही प्रकारची दाद दिली नाही. म्हणून अर्जदारास सदरची तक्रार दाखल करण्यास कारण प्राप्त झाले. अर्जदाराने तक्रार- अर्जात हँडसेट व कुरिअरची जमा केलेली रक्कम रु.11,500/-, मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रासापोटी रु.15,000/-, नुकसान भरपाईसाठी रु.25,000/- व अर्जाचा खर्च रु.5,000/- अर्ज दाखल केलेल्या तारखेपासून 18 टक्के व्याज दराने मिळण्याची मागणी केली आहे.
(2) अर्जदाराने तक्रार-अर्जासोबत शपथपत्र व 2 कागदपत्रे दाखल केली आहेत.
(3) गैरअर्जदार क्र.1 विरुध्द एकतर्फा व गैरअर्जदार क्र.2 विरुध्द विनाम्हणणे आदेश झालेला आहे.
(4) अर्जदार यांचा तक्रार-अर्ज व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करण्यात आले असता; तसेच अर्जदार व गैरअर्जदार क्र.2 यांच्या विधिज्ञांचा युक्तिवाद ऐकला असता न्यायनिर्णयासाठी खालीलप्रमाणे उपस्थित होणा-या मुद्यांचे सकारण उत्तरे त्यांच्यापुढे नमूद करुन कारणमीमांसा देत आहोत.
मुद्दे उत्तर
(1) गैरअर्जदार यांनी अर्जदारास द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी निर्माण
व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याचे सिध्द होते काय ? होय.
(2) अर्जदार अनुतोषास पात्र आहेत काय ? होय (अंशत:)
(3) काय आदेश ? अंतीम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(5) मुद्दा क्र. 1 ते 3 :- अर्जदाराने नि.3/1 वर रक्कम रु.11,000/- ची वादकथित मोबाईल खरेदीची व्हाटसॲपची नेट प्रिंट दाखल केली आहे. तसेच सदर प्रिंटवरुन डिस्काऊंट, वॉरंटी व रक्कम रु.11,000/- चे बील मोबाईल प्राप्त झाल्यानंतर दिले असल्याचे दिसून येते. अर्जदाराने माहिती फॉर्ममध्ये प्रोडक्ट नेम : रेडमी 9 प्रो मॅक्स कलर अरोरा ब्ल्यू ही माहिती भरली असल्याचे दिसून येते. यावरुन अर्जदाराने गैरअर्जदार क्र.1 कडे रेडमी कंपनीचा मोबाईल बुक केल्याचे सिध्द होते. अर्जदाराने मिळालेल्या मोबाईलची झेरॉक्स फोटो दाखल केली आहे. त्यावर मोबाईल कंपनीचे नाव मॅफे दिसून येते.
(6) गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी लेखी निवेदन दाखल केले नाही. वास्तविक पाहता, ग्राहक तक्रारीमध्ये नमूद वादकथनांचे खंडण करण्यासाठी लेखी निवेदन व पुराव्याची कागदपत्रे दाखल करण्याकरिता त्यांना उचित संधी होती. अशा स्थितीत अर्जदार यांच्या ग्राहक तक्रारीस व त्यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे खंडन करणारे लेखी निवेदन व विरोधी पुरावा नाही. त्यामुळे ग्राहक तक्रारीतील वादकथने व तक्रारीपृष्ठयर्थ दाखल केलेली कागदपत्रे विरुध्द पक्ष यांना मान्य आहेत, असे अनुमान काढणे न्यायोचित वाटते.
(7) यावरुन असे दिसून येते की, गैरअर्जदाराने अर्जदारास त्यांनी करार केल्याप्रमाणे सेवा दिली नाही. अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन बुकींगप्रमाणे मोबाईल न देता अन्य कंपनीचा मोबाईल देऊन सेवेत त्रुटी केली आहे. वरील सर्व बाबींचे अवलोकन केले असता अर्जदार हे त्याच्या मागणीप्रमाणे मोबाईल रक्कम व कुरिअर चार्जेस रु.11,500/- मिळण्यास पात्र असल्याचे या आयोगाचे मत आहे. तसेच सेवेतील त्रुटीमुळे रु.10,000/- नुकसान भरपाईसह मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.5,000/- व तक्रार खर्चाकरिता रु. 3,000/- मंजूर करणे न्याय्य व संयुक्तिक वाटते. म्हणून मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देऊन खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
ग्राहक तक्रार क्र. 117/2020.
आदेश
(1) अर्जदार याची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
(2) अर्जदार यांनी आदेश प्राप्तीपासून 15 दिवसाच्या आत गैरअर्जदार क्र.1 व 2 मार्फत मॅफे कंपनीचा दिलेला मोबाईल गैरअर्जदार क्र.2 यास परत करावा.
(3) आदेश क्र.2 चे मुदतीत पालन केल्यास गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी अर्जदारास वैयक्तिक अथवा संयुक्तिकरित्या मोबाईलची किंमत व कुरिअर चार्जेस रु.11,500/- आदेश प्राप्तीपासून तीस दिवसाच्या आत परत करावेत.
(4) या मुदतीत जर रक्कम अदा केली नाही तर विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी अर्जदारास तक्रार दाखल तारखेपासून रक्कम अदा करेपर्यत द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज द्यावे लागेल.
(5) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी अर्जदारास सेवेतील त्रुटीबाबत रु.10,000/- नुकसान भरपाई, मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.5,000/- नुकसान भरपाई व तक्रार खर्चाकरिता रु.3,000/- द्यावेत.
(6) उभय पक्षकारांना या निवाड्यांच्या प्रती विनामुल्य त्वरीत देण्यात याव्यात.
(श्रीमती रेखा जाधव) (श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्री. कमलाकर अ. कोठेकर)
सदस्य सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-