निकालपत्र
(द्वारा- मा.अध्यक्ष - श्री.व्ही.आर.लोंढे)
(१) तक्रारदार श्री. रमेश माधव घुगे यांनी सदरील तक्रार, ग्राहक संरक्षण कायदा १९८६ कलम १२ अन्वये, सामनेवाले यांनी ग्राहकांना द्यावयाचे सेवेस नकार देऊन सेवेत त्रुटी ठेवलेली आहे म्हणून गॅस सिलेंडरची ग्राहक सेवा पुर्ववत करणेकामी व नुकसान भरपाई मिळणेकामी दाखल केलेली आहे
(२) तक्रारदार यांची तक्रार थोडक्यात येणे प्रमाणे.
तक्रारदार हे देवपूर, धुळे येथे कायम वास्तव्य करतात. सामनेवाले अॅडहोक शुभमकर गॅस सर्व्हीसेस या नावाने, हिंदूस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांची गॅस सिलेंडर सेवा पुरविण्याची एजन्सी चालवितात आणि ग्राहकांना त्यांचे मागणीनुसार गॅस सिलेंडरचा पुरवठा करतात. सदरील गॅस एजन्सी सुरु होण्याचेपुर्वी सदर गॅस वितरणाचे काम धुलिया गॅस एजन्सी मार्फत केले जात होते. सदरील एजन्सी बंद झाल्यामुळे हिंदूस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीने सामनेवाले यांच्याकडे ग्राहक सेवा वर्ग केली.
तक्रारदार हे दि.०८-०९-१९९३ पासून धुलिया एजन्सीचे ग्राहक होते. तक्रारदार यांचा ग्राहक क्रमांक ५०७९९५ असा आहे. तक्रारदार हे गॅस कार्डधारक आहेत. तक्रारदार यांना द्यावयाची सेवा सामनेवाले यांच्याकडे वर्ग करण्यात आल्यानंतर सामनेवाले यांनी तक्रारदार यांना वेळोवेळी गॅस सिलेंडरचा पुरवठा केलेला आहे.
माहे ऑक्टोबर २०१२ मध्ये तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडे गॅस सिलेंडर बुकींग करिता फोन केला असता, सामनेवाले यांनी बुकींग करुन घेतले नाही. तक्रारदार यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. तक्रारदार हे स्वत: सामनेवाले यांच्या कर्यालयात गेले. ग्राहकाचे प्रमाणपत्र, गॅस कार्ड व पावत्या दाखवल्या, परंतु सामनेवाले यांनी तक्रारदार यांना गॅस सिलेंडर दिले नाही. तक्रारदार हे सामनेवाले यांचे कायदेशीर ग्राहक असतांनाही सामनेवाले यांनी सेवा प्रदान केली नाही. तक्रारदार यांनी दि.०१-१०-२०१३ रोजी सामनेवाले यांना नोटीस पाठविली व पुर्ववत गॅस सिलेंडर देऊन सेवा प्रदान करावी असे कळविले. त्यास सामनेवाले यांनी कोणताही खुलासा केला नाही. सबब तक्रारदार यांना सदरील तक्रार दाखल करणे भाग पडले आहे.
(३) तक्रारदार यांनी अशी विनंती केली आहे की, तक्रारदार यांना सामनेवाले यांनी नियमित गॅस सिलेंडरचा पुरवठा करुन सेवा प्रदान करण्याचे आदेश देण्यात यावेत. तसेच तक्रारदार यांना झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळावा.
(४) सामनेवाले यांना नि.नं.८ अन्वये, या मंचाची रजिष्टर्ड नोटीस प्राप्त झाल्याबाबत भारतीय टपाल खात्याची पोहोच पावती रेकॉर्डवर दाखल आहे. सबब सामनेवाले यांना या मंचासमोर हजर होण्याची नोटीस बजावणी झाली. नोटीस बजावणी होऊनही सामनेवाले हे या मंचासमोर हजर झाले नाहीत. सबब त्यांचे विरुध्द दि.२५-०८-२०१४ रोजी एकतर्फा आदेश करण्यात आला.
(५) तक्रारदार यांनी नि.नं. ९ वर स्वत:चे शपथपत्र दखल केले असून, नि.नं. ५ वर तक्रारदार यांनी गॅस कार्डची झेरॉक्स प्रत, सामनेवाले यांना दिलेली नोटीस, तक्रारदार यांनी वेळोवेळी गॅस सिलेंडर घेतल्याच्या नोंदीचा उतारा हजर केला आहे.
(६) तक्रारदार यांचे वकील श्री.मोरे यांचा युक्तिवाद ऐकला. तक्रारदार यांनी दाखल केलेले शपथपत्र व दस्ताचे अवलोकन केले. न्यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्देः | निष्कर्षः |
(अ) तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत सामनेवाले यांनी त्रुटी ठेवली आहे ही बाब तक्रारदार यांनी शाबीत केली आहे काय ? | : होय |
(ब) तक्रारदार हे तक्रारीत केलेली मागणी मिळण्यास पात्र आहेत काय ? | : होय |
(क) आदेश काय ? | : अंतिम आदेशा प्रमाणे |
विवेचन
(७) तक्रारदार यांचे वकील श्री.मोरे यांनी असा युक्तिवाद केला की, तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत. सामनेवाले ही गॅस सिलेंडर पुरवठा करणारी एजंसी आहे. तक्रारदार हे पुर्वी धुलिया गॅस एजन्सीचे ग्राहक होते. सदरील एजन्सी बंद पडली, त्यामुळे सदरील गॅस एजन्सीचे सर्व ग्राहक सामनेवाले यांच्याकडे वर्ग करण्यात आले. तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडून वेळोवेळी गॅस सिलेंडर घेतलेले आहेत. ऑक्टोबर २०१२ मध्ये सामनेवाले यांनी तक्रारदार यांना गॅस सिलेंडर देण्यास नकार दिला. तक्रारदार यांच्या वकिलांनी या मंचाचे लक्ष तक्रारदार यांनी दाखल केलेल्या दस्तावर वेधले व तक्रारदार हे तक्रारीत केलेली मागणी मिळण्यास पात्र आहेत असा युक्तिवाद केला.
या मंचाने तक्रारदार यांनी दाखल केलेल्या शपथपत्राचे निरीक्षण केले. तसेच तक्रारदार यांनी दाखल केलेल्या दस्तांचे अवलोकन केले. तक्रारदार यांनी हिदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीचे गॅस कनेक्शन घेतलेले आहे. तक्रारदार हे देवपूर या भागात राहतात. तक्रारदार हे पुर्वी धुलिया गॅस एजन्सी यांचेकडून गॅस सिलेंडर घेत होते. सदरील गॅस एजन्सी बंद पडली व त्यांचे ग्राहक हे सामनेवाले यांच्याकडे वर्ग करण्यात आले. त्यामुळे सामनेवाले यांनी तक्रारदार यांना गॅस सिलेंडर दिल्याचे निदर्शणास येते. सामनेवाले हे या मंचासमोर हजर झाले नाहीत व त्यांनी कोणताही पुरावा दिला नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी दाखल केलेले शपथपत्र व दस्त यांचेवर विश्वास ठेवणे क्रमप्राप्त आहे. सामनेवाले हे हिदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या कंनीचे गॅस वितरक आहेत. ग्राहकांना सेवा देण्याचे काम ते करतात. तक्रारदार यांना गॅस सिलेंडर पुरवठा न करुन सामनेवाले यांनी सेवेत त्रुटी ठेवलेली आहे. तक्रारदार यांना गॅस सिलेंडर न मिळाल्यामुळे शारीरिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले आहे. तसेच सदरील तक्रार दाखल करणे भाग पडले आहे. सबब या मंचाचे मत की, तक्रारदार हे तक्रारीत मागितलेली दाद मिळण्यास पात्र आहेत. म्हणून उपरोक्त मुद्दा क्र. “अ” आणि “ब” चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(८) उपरोक्त सर्व विवेचनाचा विचार करता, हे मंच खालील प्रमाणे आदेश करीत आहे.
आदेश
- तक्रारदारांचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येत आहे.
(ब) सामनेवाले यांनी या आदेशाच्या प्राप्तीपासून, तक्रारदार यांना नियमानुसार नियमित गॅस सिलेंडरचा पुरवठा करावा.
(क) सामनेवाले यांनी या आदेशाच्या प्राप्तीपासून पुढील तीस दिवसांचे आत, तक्रारदारांना शारीरिक व मानसिक त्रासापोटी एकूण रक्कम ३,०००/- (अक्षरी रक्कम रुपये तीन हजार मात्र) व तक्रार अर्जाचे खर्चापोटी १,०००/- (अक्षरी रक्कम रुपये एक हजार मात्र) द्यावेत.
धुळे.
दिनांक : १८-११-२०१४
(श्री.एस.एस.जोशी) (श्री.व्ही.आर.लोंढे)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.