Maharashtra

Bhandara

CC/20/85

रामदास सदाशिव कोळवटे - Complainant(s)

Versus

मूख्‍य अधिकारी अभियंता. मा. राज्‍य विदृुत वितरण कार्यालय - Opp.Party(s)

श्री.व्‍ही.डी.सातदेवेे

18 Feb 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,BHANDARA
Near Akhil Sabhagruha, Ganeshpur Road,Bhandara
PINCODE-441904
 
Complaint Case No. CC/20/85
( Date of Filing : 14 Oct 2020 )
 
1. रामदास सदाशिव कोळवटे
रा. बोंडे गाव.कोका जंगल. तह.मोहाडी ि‍जि.भंडारा
भंंडारा
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. मूख्‍य अधिकारी अभियंता. मा. राज्‍य विदृुत वितरण कार्यालय
तह.मोहाडी.जि.भंडारा
भंंडारा
महाराष्‍ट्र
2. मूख्‍य अधिक्षक अभियंता. मा. राज्‍य विदृुत वितरण कार्यालय
विदृुत भवन भंंंंंंडारा. तह.जि.भंडारा
भंडारा
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. BHASKAR B. YOGI PRESIDENT
 HON'BLE MR. NITIN M. GHARDE MEMBER
 HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 18 Feb 2022
Final Order / Judgement

                                                                              (पारित दिनांक-18 फेब्रुवारी, 2022)

                                                                     (पारीत व्‍दारा श्रीमती वृषाली जागीरदार, मा.सदस्‍या)

 

01.  तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2 अनुक्रमे कनिष्‍ठ अभियंता, महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनी मर्यादित करडी, तालुका मोहाडी, जिल्‍हा भंडारा  आणि अधिक्षक अभियंता, महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनी मर्यादित भंडारा यांचे  कडून मुख्‍यमंत्री सौर कृषी  पंप योजने प्रमाणे सौर प्रकल्‍प व सी.आर.आय. कंपनीचे सबमर्सिबल पंप 05 अश्‍वशक्‍ती क्षमतेचे नविन गुणवत्‍तेचे मिळावे तसेच झालेल्‍या नुकसानीची भरपाई मिळावी व अन्‍य अनुषंगिक मागण्‍यासाठी ग्राहक संरक्षण अधिनियम-2019 चे कलम-35 अन्‍वये प्रस्‍तुत तक्रार जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केलेली आहे. मा.सदस्‍य व मा.सदस्‍या हे कोवीड पॉझेटीव्‍ह होते त्‍यामुळे आज रोजी निकाल पारीत करण्‍यात येत आहे.

02.     तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालील प्रमाणे-

    महाराष्‍ट्र शासनाने सन-2018-2019 मध्‍ये शेतक-यां करीता त्‍यांचे शेतातील पिकासाठी जलसिंचनाची  सोय व्‍हावी या उद्देश्‍याने मुख्‍यमंत्री सौर कृषीपंप योजना अमलात आणली आहे. सदर योजने अंतर्गत पात्र लाभार्थी शेतक-यास विरुध्‍दपक्ष महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनी कार्यालया व्‍दारे  दिलेल्‍या डिमांड नोटची  रक्‍कम भरल्‍या नंतर सौर उर्जेवर आधारित  सोलर  प्‍लॅन्‍ट व  सी.आर.आय. कंपनीचा  स‍बमर्सिबल 05 अश्‍व  शक्‍तीचा पंप मिळणार होता. तक्रारकर्त्‍याने सदर योजनेचा लाभ मिळावा म्‍हणून विरुध्‍दपक्ष क्रं 1  (कनिष्‍ठ अभियंता, महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनी करडी, तहसिल मोहाडी, जिल्‍हाभंडारा) यांचे कडे दिनांक-17.02.2019 रोजी अर्ज केला होता, सदरचा अर्ज विरुध्‍दपक्ष महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनी तर्फे मंजूर करण्‍यात आला होता व त्‍यानुसार तक्रारकर्त्‍याने दिनांक-21.06.2019 रोजी प्राप्‍त झालेल्‍या डिमांड प्रमाणे रक्‍कम रुपये-8280/- विरुध्‍दपक्ष महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनीचे कार्यालयाचे खात्‍यात जमा केली. त्‍यानंतर विरुध्‍दपक्ष महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनीने ठेकेदारा मार्फत तक्रारकर्त्‍याचे शेतात दिनांक-12.05.2020 रोजी सौर उर्जा प्रकल्‍प व सबमर्सिबल पंप सी.आर.आय.कंपनीचा 05 अश्‍वशक्‍ती क्षमतेचा बसवून दिला. सदर पंप बसविल्‍या नंतर तो एक महिन्‍या पर्यंत सुरळीत चालला परंतु त्‍यानंतर पंपा मध्‍ये बिघाड निर्माण होऊन तो बंद पडला. सदर पंप हा वॉरन्‍टी कालावधीत असल्‍यामुळे त्‍याने मौखीक तक्रार विरुध्‍दपक्ष क्रं 1 यांचे कडे केली असता त्‍यांनी त्‍याचे शेतात दुरुस्‍त केलेला जुना पंप बसून दिला परंतु तो जुना पंप सुध्‍दा दोन दिवसांनी बंद पडला, त्‍यामुळे त्‍याने पुन्‍हा विरुध्‍दपक्ष क्रं 2 यांचे कडे मौखीक तक्रार केली असता त्‍यांनी प्रतिसाद दिला नाही तसेच बिघडलेला पंप दुरुस्‍त करुन दिला नाही वा त्‍याऐवजी दुसरा पंप लावून दिला नाही. सदर पंप दिनांक-20.06.2020 पासून बंद पडल्‍याने तक्रारकर्त्‍याने दिनांक-08.06.2020 रोजी बंद पडलेल्‍या पंपा संबधात विरुध्‍दपक्ष क्रं 1 (कनिष्‍ठ अभियंता, महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनी, करडी, तहसिल मोहाडी, जिल्‍हा भंडारा) यांचे कडे लेखी तक्रार केली होती परंतु  कोणताही प्रतिसाद मिळाला नाही तसेच कोणतीही चौकशी केली नाही. त्‍यानंतर त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 2 (अधिक्षक अभियंता, महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनी भंडारा) यांचे कार्यालयात दिनांक-04.08.2020 रोजी पंप बंद पडल्‍या बाबत तक्रार केली होती परंतु आश्‍वासना शिवाय काहीही मिळाले नाही. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने दिनांक-15.09.2020 रोजी विरुध्‍दपक्ष क्रं 2 अधिक्षक अभियंता, भंडारा यांचे कडे लेखी तक्रार केली परंतु कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. वस्‍तुतः सदर पंप हा वॉरन्‍टी कालावधीत असतानाही विरुध्‍दपक्ष महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनी कडून कोणतीही कार्यवाही करण्‍यात आली नाही म्‍हणून शेवटी तक्रारकर्त्‍याने अधिवक्‍ता यांचे मार्फतीने विरुध्‍दपक्षांना दिनांक-19.09.2020 रोजी कायदेशीर नोटीस पाठवून नुकसान भरपाईची मागणी केली, सदर नोटीस विरुध्‍दपक्षास दिनांक-24.09.2020 रोजी प्राप्‍त झाल्‍या नंतरही कोणतीही कार्यवाही केली नाही ईतकेच नव्‍हे तर नोटीसला उत्‍तर सुध्‍दा दिले नाही.

 

    तक्रारकर्त्‍याने पुढे असे नमुद केले की, त्‍याने त्‍याचे शेतात ऊस, भाजीपाला, कडधान्‍य व तांदूळ ईत्‍यादी पिके लावली होती परंतु पंप बंद पडल्‍यामुळे तो पिकास मुबलक प्रमाणावर पाणी देऊ शकला नाही. त्‍याने शेतीसाठी रुपये-2,00,000/- एवढे कर्ज घेतले होते व त्‍या कर्जाची परतफेड तो करु शकला नाही. तसेच पंप बंद पडल्‍यामुळे त्‍याचे पिका पासून होणा-या नफ्याचे रुपये-1,50,000/- एवढे नुकसान झालेले आहे. तसेच कर्जा वरील व्‍याज दर वाढत आहे. अशाप्रकारे तक्रारकर्त्‍याचे जवळ पास रुपये-3,50,000/- ते 4,00,000/- एवढया रकमेचे आर्थिक नुकसान झालेले आहे, त्‍यामुळे त्‍याने शेवटी जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष प्रस्‍तुत तक्रार दाखल करुन त्‍याव्‍दारे विरुध्‍दपक्षा विरुध्‍द खालील प्रकारच्‍या मागण्‍या केल्‍यात-

 

  1. विरुध्‍दपक्ष महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनी कडून तक्रारकर्त्‍यास योजने अंतर्गत मिळालेला सौर प्रकल्‍प आणि सी.आर.आय. कंपनीचा सबमर्सिबल 05 अश्‍वशक्‍तीचा पंप बदलवून देऊन त्‍याऐवजी नविन गुणवत्‍तेचा सौर प्रकल्‍प आणि सबमर्सिबल पंप  विरुध्‍दपक्षा कडून देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

 

  1. पंपाच्‍या अभावी तक्रारकर्त्‍याचे शेतातील झालेल्‍या नुकसानी बद्दल भरपाई म्‍हणून रुपये-4,00,000/- विरुध्‍दपक्ष महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनी कडून देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

 

  1. तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-50,000/- विरुध्‍दपक्ष महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनी कडून  देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

 

  1. या शिवाय योग्‍य ती दाद तक्रारकर्ता याचे बाजूने मंजूर करण्‍यात यावी.

 

03.    जिल्‍हा ग्राहक आयोग, भंडारा यांचे मार्फतीने विरुध्‍दपक्ष महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनी तर्फे लेखी उत्‍तर दाखल करण्‍यात आले. त्‍यांनी लेखी उत्‍तरात प्राथमिक आक्षेप घेतला की, करडी, तालुका मोहाडी, जिल्‍हा भंडारा येथे कनिष्‍ठ अभियंता, महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनी मर्यादित  तर अधिक्षक अभियंता, ओ अॅन्‍ड एम सर्कल महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनी विद्दुत भवन भंडारा असे पद अस्तित्‍वात आहे परंतु तक्रारकर्त्‍याने तक्रारी मध्‍ये चुकीचे प्रतिपक्ष केल्‍याने योग्‍य त्‍या प्रतिपक्षा अभावी तक्रार खारीज करण्‍यात यावी किंवा मा.जिल्‍हा ग्राहक आयोगाने तक्रारी मध्‍ये योग्‍य ते प्रतिपक्ष करण्‍याचे तक्रारकर्त्‍यास आदेशित करावे, त्‍यानुसार तक्रारकर्त्‍याने तक्रारी मध्‍ये योग्‍य ती दुरुस्‍ती करण्‍याचे जिल्‍हा ग्राहक आयोगाव्‍दारे दिनांक-17.09.2021 रोजी आदेशित केल्‍या नंतर तक्रारी मध्‍ये त.क.चे वकीलांनी विरुध्‍दपक्षाचे पदनामा मध्‍ये योग्‍य ती दुरुस्‍ती केली. विरुध्‍दपक्ष यांनी पुढे असाही आक्षेप घेतला की, सदर तक्रारी मध्‍ये सी.आर.आय.पम्‍पस प्रायव्‍हेट लिमिटेड, 486-481 Sathy Main Road, Kurumbapalayam, Coimbatore या ठेकेदार फर्म/कंपनीस तक्रारी मध्‍ये आवश्‍यक प्रतीपक्ष न केल्‍याचे कारणा वरुन तक्रार खारीज करण्‍यात यावी कारण ग्रीड सोलर एजी पंप इन्‍स्‍टालेशनचा ठेका सदर कंपनीस दिला होता व त्‍यांनीच सदर पंप सोलर एनर्जी करीता जोडून दिलेला आहे आणि याची संपूर्ण जाणीव तक्रारकर्त्‍यास असताना देखील त्‍याने सदर ठेकदार कंपनीस तक्रारी मध्‍ये प्रतिपक्ष केले नाही. विरुध्‍दपक्ष महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनीने सदर ठेकेदार कंपनीस दिनांक-23.09.2020 रोजी तक्रारकर्त्‍याचे पंपाचे नादुरुस्‍त असल्‍या बाबतचे तक्रारी बद्दल लेखी कळविले होते आणि त्‍याची प्रत तक्रारकर्त्‍यास सुध्‍दा पाठविण्‍यात आली होती.

          विरुध्‍दपक्ष महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनी तर्फे परिच्‍छेद निहाय लेखी उत्‍तरात  सन-2018-2019 मध्‍ये महाराष्‍ट्र शासनाने शेतक-यांना जलसिंचनाच्‍या सोयी करीता मुख्‍यमंत्री सौर कृषीपंप  योजना घोषीत केली होती, सदरची योजना विरुध्‍दपक्ष महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनी कडून राबविण्‍यात आली होती आणि योजनेतील अटी व शर्ती नुसार पात्र लाभार्थी शेतक-यांना डिमांड नोटची  रक्‍कम भरल्‍या नंतर सौर उर्जेवर आधारीत सोलर प्‍लेट व सी.आर.आय. कंपनीचा सबमर्सिबल पंप देणे हा योजनेचा भाग असल्‍याचे नमुद केले. तक्रारकर्त्‍याचे शेतात सौर उर्जा प्रकल्‍प व सी.आर.आय. कंपनीचा सबमर्सिबल पंप नमुद ठेकदार कंपनी मार्फत मे-2020 मध्‍ये बसवून दिला होता ही बाब मान्‍य केली. परंतु सदर पंपा मध्‍ये बिघाड होऊन तो एकदम बंद पडला ही बाब नामंजूर केली. तक्रारकर्त्‍याने पंप बंद पडल्‍या बाबत त्‍यांचे कडे तक्रार केल्‍या नंतर विरुध्‍दपक्ष क्रं 1 कनिष्‍ठ अभियंता, महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनी करडी, जिल्‍हा भंडारा यांनी                          मे. सी.आर.आय.पम्‍पस प्रायव्‍हेट लिमिटेड कोईम्‍बतुर या ठेकेदार कंपनीस दिनांक-23.09.2020 रोजी पत्र पाठवून तक्रार दुर करण्‍याची विनंती केली होती व तक्रार दुर न केल्‍यास कार्यवाही करण्‍यात येईल असे देखील सुचित करण्‍यात आले होते. सबमर्सिबल पंपाची  देखरेख मेन्‍टनन्‍स ईत्‍यादीची जबाबदारी ही सदर ठेकेदार कंपनीची आहे. त्‍यांनी तक्रारकर्त्‍यास कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही त्‍यामुळे तक्रारकर्त्‍यास शारिरीक व मानसिक त्रास होण्‍याचा प्रश्‍नच उदभवत नाही. पंपाचा बिघाडामुळे तक्रारकर्त्‍याचे जवळपास रुपये-3,50,000/-ते 4,00,000/- रकमेचे नुकसान झाले ही बाब खोटी असून नामंजूर केली. विरुध्‍दपक्ष महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनीने आपले लेखी उत्‍तरात पुढे अशी विनंती केली की, मे. सी.आर.आय. पम्‍पस कंपनी प्रायव्‍हेट लिमिटेड कोईम्‍बतूर यांना या तक्रारीत आवश्‍यक पक्ष क्रं 3 म्‍हणून जोडण्‍याचे तक्रारकर्त्‍यास आदेशित व्‍हावे जेणे करुन नादुरुस्‍त पंपाचे तक्रारी बद्दल सदर कंपनी योग्‍य ते निराकरण करेल. विरुध्‍दपक्ष यांनी कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नसल्‍याने तक्रार खारीज करण्‍यात यावी अशी विनंती विरुध्‍दपक्ष महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनी तर्फे करण्‍यात आली.

 

04. तक्रारकर्त्‍याने तक्रारी सोबत शेती उता-याचे दस्‍तऐवज, डिमांडनोट भरल्‍याची पावती,  विरुध्‍दपक्ष विज वितरण कंपनीचे कार्यालयात केलेल्‍या 03 तक्रारीच्‍या प्रती, विरुध्‍दपक्षांना पाठविलेली कायदेशीर नोटीस प्रत, मुख्‍यमंत्री सौर कृषी पंप योजनेचे परि‍पत्रक अशा दस्‍तऐवजाच्‍या प्रती दाखल केल्‍यात. तसेच त.क. यांनी पुराव्‍या दाखल स्‍वतःचे शपथपत्र  आणि लेखी युक्‍तीवाद दाखल केला.

 

05.   विरुध्‍दपक्ष महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनी तर्फे सीआरआय पंपस प्रायव्‍हेट लिमिटेड, कोईम्‍बतुर या कंपनीला Letter of Empanelment (LOE) दिनांक-07 मार्च, 2019 रोजी दिलेले पत्र, दिनांक-11 सप्‍टेंबर, 2019 रोजी  त.क. आणि ईतर शेतकरी यांचे शेतात सोलर डी.सी.पंप ईन्‍स्‍टालेशन बाबतचे पत्र, विरुध्‍दपक्ष क्रं 2 विज वितरण कंपनीने मे.सी.आर.आय.पंप कोईम्‍बतुर यांना दिनांक-03.08.2020 रोजी तक्रारकर्ता आणि ईतर शेतकरी यांचे तक्रारी वेळेवर सोडविण्‍या बाबत दिलेले पत्र तसेच विरुध्‍दपक्ष क्रं 2 विज वितरण कंपनीने तक्रारकर्ता यांची तक्रार निकाली काढण्‍या बाबतमे.सी.आर.आय.पंप कोईम्‍बतुर यांना दिनांक-23.09.2020 रोजी दिलेले पत्रअशा दस्‍तऐवजाच्‍या प्रती दाखल केल्‍यात. विरुध्‍दपक्ष क्रं 1 यांनी शपथे वर पुरावा दाखल केला तसेच विरुध्‍दपक्षांनी लेखी युक्‍तीवाद दाखल केला. तक्रारकर्त्‍याचे शेताचा घटनास्‍थळ पंचनामा दाखल केला.

 

06.  तक्रारकर्त्‍या तर्फे वकील श्री सतदेवे यांचा तर विरुध्‍दपक्ष महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनी  तर्फे वकील श्री डि.आर.निर्वाण यांचा मौखीक युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला.

 

07. तक्रारकर्त्‍याची तक्रार, विरुध्‍दपक्ष विज वितरण कंपनीचे लेखी उत्‍तर तसेच प्रकरणातील दाखल साक्षी पुरावे आणि उपलब्‍ध दस्‍तऐवज इत्‍यादीचे अवलोकन करण्‍यात आले. तसेच उभय पक्षांचे विदवान वकीलांचा मौखीक युक्‍तीवाद यावरुन जिल्‍हा ग्राहक आयोगाचा निष्‍कर्ष खालील प्रमाणे-

                                                                                        ::निष्‍कर्ष::

08.   तक्रारकर्त्‍याने मुख्‍यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्‍ट्र शासन, उद्दोग उर्जा व कामगार विभाग यांचे दिनांक-11 सप्‍टेंबर, 2019 रोजीचे परिपत्रका प्रमाणे सदर योजनेचा लाभ मिळावा म्‍हणून विरुध्‍दपक्ष क्रं 1 कनिष्‍ठ अभियंता, महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनी करडी, तहसिल मोहाडी, जिल्‍हा भंडारा यांचे कडे  दिनांक-17.02.2019 रोजी अर्ज केला होता, सदरचा अर्ज विरुध्‍दपक्ष महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनी तर्फे मंजूर करण्‍यात आला होता व त्‍यानुसार तक्रारकर्त्‍याने दिनांक-21.06.2019 रोजी डिमांड प्रमाणे रक्‍कम रुपये-8280/- विरुध्‍दपक्ष महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनीचे कार्यालयाचे खात्‍यात जमा केली होती ही बाब विरुध्‍दपक्ष विज वितरण कंपनीचे दिनांक-21.06.2019 रोजीचे पावती वरुन सिध्‍द होते. त्‍यानंतर विरुध्‍दपक्ष महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनीने ठेकेदारा मार्फत तक्रारकर्त्‍याचे शेतात दिनांक-12.05.2020 रोजी सौर उर्जा प्रकल्‍प व सबमर्सिबल पंप सी.आर.आय.कंपनीचा 05 अश्‍वशक्‍ती क्षमतेचा बसवून दिला होता ही बाब सुध्‍दा उभय पक्षां मध्‍ये विवादास्‍पद नाही.

 

09. तक्रारकर्त्‍याचे तक्रारी प्रमाणे सदर पंप बसविल्‍या नंतर तो एक महिन्‍या पर्यंत सुरळीत चालला परंतु त्‍यानंतर पंपा मध्‍ये बिघाड निर्माण होऊन तो बंद पडला. सदर पंप हा वॉरन्‍टीकालावधीत असल्‍यामुळे त्‍याने मौखीक तक्रार विरुध्‍दपक्ष क्रं 1 यांचे कडे केली असता त्‍यांनी त्‍याचे शेतात दुरुस्‍त केलेला जुना पंप बसून दिला परंतु तो जुना पंप सुध्‍दा दोन दिवसांनी बंद पडला, त्‍यामुळे त्‍याने पुन्‍हा विरुध्‍दपक्ष क्रं 2 यांचे कडे मौखीक तक्रार केली असता त्‍यांनी प्रतिसाद दिला नाही तसेच बिघडलेला पंप दुरुस्‍त करुन दिला नाही वा त्‍याऐवजी दुसरा पंप लावून दिला नाही. सदर पंप दिनांक-20.06.2020 पासून बंद पडल्‍याने त्‍याने  दिनांक-08.06.2020 रोजी  विरुध्‍दपक्ष क्रं 1 कनिष्‍ठ अभियंता, महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनी, करडी, तहसिल मोहाडी, जिल्‍हा भंडारा यांचे कडे लेखी तक्रार केली होती परंतु   प्रतिसाद मिळाला नसल्‍याने  त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 2 अधिक्षक अभियंता, महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनी भंडारा यांचे कार्यालयात दिनांक-04.08.2020 रोजी पंपा बाबत तक्रार केली होती त्‍यानंतर त्‍याने दिनांक-15.09.2020 रोजी विरुध्‍दपक्ष क्रं 2 अधिक्षक अभियंता, भंडारा यांचे कडे लेखी तक्रार केली परंतु एवढा पत्रव्‍यवहार करुनही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. वस्‍तुतः सदर पंप हा वॉरन्‍टी कालावधीत असतानाही विरुध्‍दपक्ष महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनी कडून कोणतीही कार्यवाही करण्‍यात आली नाही म्‍हणून शेवटी त्‍याने अधिवक्‍ता यांचे मार्फतीने विरुध्‍दपक्षांना दिनांक-19.09.2020 रोजी कायदेशीर नोटीस पाठवून नुकसान भरपाईची मागणी केली, सदर नोटीस विरुध्‍दपक्षास दिनांक-24.09.2020 रोजी प्राप्‍त झाल्‍या नंतरही कोणतीही कार्यवाही केली नाही ईतकेच नव्‍हे तर नोटीसला उत्‍तर सुध्‍दा दिले नाही. तक्रारकर्त्‍याने आपले म्‍हणण्‍याचे पुराव्‍यार्थ सदर पत्रव्‍यवहाराच्‍या प्रती दाखल केल्‍यात त्‍यावर पत्र मिळाल्‍या बाबत विरुध्‍दपक्ष कार्यालयाव्‍दारे मिळाल्‍या बाबत सही व शिक्‍का अशी नोंद आहे. या शिवाय त्‍याने  विरुध्‍दपक्षांना रजि. पोस्‍टाने पाठविलेल्‍या नोटीसची प्रत व रजि.पोस्‍टाच्‍या पावत्‍या आणि पोस्‍ट ट्रॅक रिपोर्ट पुराव्‍यार्थ दाखल केला या सर्व पुराव्‍या वरुन त्‍याचे तक्रारी मधील कथनाला पुष्‍टी मिळते.

 

10.  या उलट विरुध्‍दपक्ष महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनीचे असे म्‍हणणे आहे की,सदर तक्रारी मध्‍ये मे.सी.आर.आय.पम्‍पस प्रायव्‍हेट लिमिटेड, 486-481 Sathy Main Road, Kurumbapalayam, Coimbatoreया ठेकेदार फर्म/कंपनीस तक्रारी मध्‍ये आवश्‍यक प्रतीपक्ष न केल्‍याचे कारणा वरुन तक्रार खारीज करण्‍यात यावी कारण ग्रीड सोलर एजी पंप इन्‍स्‍टालेशनचा ठेका सदर कंपनीस दिला होता व त्‍यांनीच सदर पंप सोलर एनर्जी करीता जोडून दिलेला आहे आणि याची संपूर्ण जाणीव तक्रारकर्त्‍यास असताना देखील त्‍याने सदर ठेकदार कंपनीस तक्रारी मध्‍ये प्रतिपक्ष केले नाही.विरुध्‍दपक्ष महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनी तर्फे सीआरआय पंपस प्रायव्‍हेट लिमिटेड, कोईम्‍बतुर या कंपनीला Letter of Empanelment (LOE) दिनांक-07 मार्च, 2019 रोजी दिलेले पत्र, दिनांक-11 सप्‍टेंबर, 2019 रोजी  त.क. आणि ईतर शेतकरी यांचे शेतात सोलर डी.सी.पंप ईन्‍स्‍टालेशन बाबतचे पत्र,  विरुध्‍दपक्ष क्रं 2 विज वितरण कंपनीने मे.सी.आर.आय.पंप कोईम्‍बतुर यांना       दिनांक-03.08.2020 रोजी तक्रारकर्ता आणि ईतर शेतकरी यांच्‍या तक्रारी वेळेवर सोडविण्‍या बाबत दिलेले पत्र तसेच विरुध्‍दपक्ष क्रं 2 विज वितरण कंपनीने तक्रारकर्ता यांची तक्रार निकाली काढण्‍या बाबतमे.सी.आर.आय.पंप कोईम्‍बतुर यांना दिनांक-23.09.2020 रोजी दिलेले पत्र अशा दस्‍तऐवजाच्‍या प्रती पुराव्‍यार्थ  दाखल केल्‍यात.

 

11.  जिल्‍हा ग्राहक आयोगाचे असे मत आहे की, तक्रारकर्त्‍याचा संबध हा विरुध्‍दपक्ष महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनीशी आहे, त्‍याने विरुध्‍दपक्ष विज कंपनी मध्‍ये सौर पंपा बाबत  रुपये-8280/- एवढया रकमेची डिमांड भरलेली आहे. विरुध्‍दपक्ष महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनीने मे.सी.आर.आय.पम्‍पस प्रायव्‍हेट लिमिटेड, 486-481 Sathy Main Road, Kurumbapalayam, Coimbatore या ठेकेदार कंपनी मार्फत संबधित योजनेतील पात्र लाभार्थी शेतक-यांच्‍या शेता मध्‍ये सोलर डी.सी. पंप बसवून दिलेला आहे, त्‍या ठेकेदार कंपनीशी तक्रारकर्त्‍याचा प्रत्‍यक्ष काहीही संबध नाही. सदर व्‍यवहार हा विरुध्‍दपक्ष विज वितरण कंपनी आणि मे.सी.आर.आय.पम्‍पस प्रायव्‍हेट लिमिटेड यांचे मधील अंतर्गत व्‍यवहार आहे त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने सदर ठेकेदार कंपनीला तक्रारी मध्‍ये प्रतीपक्ष करुन त्‍यांचे कडून नुकसान भरपाईची मागणी करावी असा जो विरुध्‍दपक्ष विज वितरण कंपनीने आक्षेप घेतलेला आहे तो मूळातच चुकीचा दिसून येतो. सदर कंपनी कडून काही नुकसान झाले असे विरुध्‍दपक्ष विज वितरण कंपनीला वाटत असल्‍यास त्‍यांनी सदर कंपनी विरुध्‍द योग्‍य त्‍या कायेदशीर मार्गाने दाद मागावी आणि हा त्‍यांचा अधिकार आहे परंतु विरुध्‍दपक्ष विज वितरण कपंनी आणि मे.सी.आर.आय.पम्‍पस प्रायव्‍हेट लिमिटेड यांचे मधील अंतर्गत वादा मध्‍ये तक्रारकर्त्‍याला गुंतविणे हे योग्‍य नाही असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे.

 

12.  ज्‍या अर्थी विरुध्‍दपक्ष क्रं 2 महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनीने मे.सी.आर.आय.पंप कोईम्‍बतुर यांना दिनांक-03.08.2020 रोजी तक्रारकर्ता आणि ईतर शेतकरी सर्वश्री चंद्रशेख भालधरे, राहणार आमगाव, जयशंकर गाढवे राहणार कोलारी, श्री व्‍ही. गजभिये राहणार धसाळा, श्री आनंद गोस्‍वामी राहणार कांद्री जिल्‍हा भंडारा या तक्रारदारांच्‍या  तक्रारी वेळेवर सोडविण्‍या बाबत दिलेले पत्र तसेच विरुध्‍दपक्ष क्रं 2 विज वितरण कंपनीने मे.सी.आर.आय.पंप कोईम्‍बतुर यांना तक्रारकर्ता यांची तक्रार निकाली काढण्‍या बाबत दिनांक-23.09.2020 रोजी दिलेले पत्र अशा दस्‍तऐवजाच्‍या प्रती विरुध्‍दपक्ष विज वितरण कपंनीने अभिलेखावर दाखल केलेल्‍या आहेत, त्‍या अर्थी तक्रारकर्ता आणि इतर शेतकरी यांच्‍या सदर सौर पंपा बाबत दिलेल्‍या तक्रारी या ख-या आहेत ही बाब  पुराव्‍यानिशी सिध्‍द होते आणि ही बाब विरुध्‍दपक्ष विज वितरण कंपनीला मान्‍य आहे ही बाब सिध्‍द होते.

 

13.  विरुध्‍दपक्ष महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनी तर्फे सीआरआय पंपस प्रायव्‍हेट लिमिटेड, कोईम्‍बतुर या कंपनीला Letter of Empanelment (LOE) दिनांक-07 मार्च, 2019 रोजी दिलेल्‍या पत्राचे अवलोकन जिल्‍हा ग्राहक आयोगाव्‍दारे करण्‍यात आले, त्‍यामध्‍ये खालील प्रमाणे नमुद आहे.

 

2.1 Design, manufacture, supply, transport, installation, testing and commissioning of DC Solar Photovoltaic water pumping systems of 3 HP & 5 HP capacity at the project sites of identified farmers in Districts of Maharashtra with guarantee period of 5 years for off grid solar pump system and 10 years for solar PV panels on “Turnkey” Contract Basis and as described in the Bidding Document.

2.4 Free replacement of defective components of Solar Photovoltaic Water Pumping systems within guarantee period of 5 years after commissioning for efficient running of the system for delivering desired discharge as per specifications. The guarantee period of PV Solar Panel shall be 10 years.

   

     यावरुन ही बाब सिध्‍द होते की, पंपाची वॉरन्‍टी ही 05 वर्षाची होती तर सोलर पी.व्‍ही.पॅनेल्‍सची वॉरन्‍टी ही 10 वर्षाची होती. तक्रारकर्त्‍याचे शेतात सोलर पॅनल्‍स आणि पंप दिनांक-12.05.2020 रोजी बसवून दिला होता आणि तक्रारकर्त्‍याने त्‍यानंतर  लगेच दिनांक-08.06.2020 रोजी दिनांक-04.08.2020 रोजी दिनांक-15.09.2020 रोजी लेखी तक्रारी केल्‍या होत्‍या ही बाब दाखल पुराव्‍या वरुन सिध्‍द होते.

 

14.  तक्रारकर्त्‍याने मानस अॅग्रो इंडस्‍ट्रीज अॅन्‍ड इन्‍फ्रास्‍ट्रक्‍चर प्रा.लि. देव्‍हाडा, जिल्‍हा भंडारा येथील लिपिक यांन दिलेले प्रमाणपत्र दाखल केले त्‍यामध्‍ये तक्रारकर्त्‍याची  शेती मौजे बोंडे सर्व्‍हे क्रं-72/1 क्षेत्र 0.40 हेक्‍टर आर व सर्व्‍हे क्रं 77/1 क्षेत्र 0.15 हेक्‍टर आर असून त्‍यामध्‍ये ऊसाची लागवड केलेली असून हंगाम 2019-20 मध्‍ये 59.519 मे. टन व हंगाम 2020-21 मध्‍ये 29.731 मे.टन ऊस मानस अॅग्रो युनिट क्रं 4 देव्‍हाडा बु. मध्‍ये गाळपास आलेला आहे करीता दाखला देण्‍यात येत आहे असे नमुद आहे. परंतु या प्रमाणपत्रा व्‍यतिरिक्‍त ऊस गाळपा साठी कारखान्‍यात आणल्‍या जातो तेंव्‍हा कारखान्‍याचे रजिस्‍टर मधील नोंदीचा उतारा दाखल केलेला नाही.

 

15.  या उलट विरुध्‍दपक्ष महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनी तर्फे तक्रारकर्ता श्री रामदास कोडवते यांचे शेताचा दिनांक-03.11.2021 रोजी दोन साक्षीदार श्री नरहरी मनोहर निंबार्ते आणि श्री कुणाल दिलीप भोयर यांचे समक्ष श्री सजय बाबुराव भुते, कनिष्‍ठ अभियंता, विज वितरण केंद्र करडी, जनमित्र श्री इरफान अंसारी, वरीष्‍ठ तंत्रज्ञ, व सी.आर.ई. सोलर कंपनीचे प्रतिनिधी श्री शैलेश एस. चौधरी व शेतमालक श्री रामदास कोडवते यांचे उपस्थितीत पाहणी पंचनामा तयार करण्‍यात आला त्‍यामध्‍ये असे नमुद आहे की, शेतमालक यांना विचारणा केल्‍या नंतर त्‍यांनी जून-2021 ला खाजगी तंत्रज्ञ सोलर यांचे कडून सोलर पंप चालू केल्‍याची माहिती दिली. आज दिनांक-03.11.2021 रोजी पाहणी केली असता सोलर पंप चालू असल्‍याचे दिसून आले पण ढगाळ वातारण असल्‍याने पाण्‍याचा Flow  कमी असल्‍याचे आढळून आले. नंतर सी.आर.ई कंपनीचे सर्व्‍हीस इंजिनियर श्री भोसले यांचेशी मोबाईल वर संपर्क केला असता त्‍यांनी वातावरण व्‍यवस्‍थीत असल्‍यावर परत टेक्‍नेशियनला पाठवून पाहणी करु असे नमुद आहे. सदर पंचनाम्‍यावर तक्रारकर्ता, कनिष्‍ठ अभियंता  श्री संजय भुते, सी.आर.ई. कंपनीचे प्रतिनिधी श्री शैलेश चौधरी आणि दोन साक्षीदार यांच्‍या सहया आहेत.

 

16.  जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मते सदर घटनास्‍थळ पंचनाम्‍या वरुन असे दिसून येते की, जून-2021 पासून पंप चालू होता परंतु पंपातून पाणी फेकण्‍याचा जोर कमी होता. तक्रारकर्त्‍याचे असे म्‍हणणे नाही की, सन-2020-2021 मध्‍ये पुरेश्‍या पाण्‍याच्‍या अभावा मुळे त्‍याचा संपूर्ण शेतातील ऊस वाळून गेला. याचाच अर्थ असा आहे की, तक्रारकर्त्‍याला काही प्रमाणावर ऊस झालेला आहे.

 

17.  तक्रारकर्त्‍याने आपले शपथे वरील पुराव्‍यात असे नमुद केले की, त्‍यांनी दिनांक-12.11.2020 रोजी स्‍टेट बॅंक ऑफ इंडीया शाखा कोका, तहसिल व जिल्‍हा भंडारा यांचे कडून रुपये-96,000/- कर्ज उचलले होते.  तसेच श्री देवदास बुरडे यांचे कडून रुपये-1,00,000/- उसने घेतले होते. त्‍याला सन-2019-20 या कालावधीत  60 टन उस झाला होता परंतु सन-2020-21 या कालावधीत पाण्‍याचे अभावा मुळे 30 टन उसाचे उत्‍पादन झाले आहे. तसेच अर्धा एकर शेतात तांदूळ होत असल्‍याने त्‍याचे रुपये-25,000/- नुकसान झाले आणि उन्‍हाळी हंगामात गहू पिक घेता आले नसल्‍याने रुपये-30,000/- नुकसान झाले असल्‍याचे नमुद केलेले आहे.  तक्रारकर्त्‍याने स्‍टेट बॅंक ऑफ इंडीया शाखा कोका, तहसिल व जिल्‍हा भंडारा यांचे कडून पिक कर्ज घेतल्‍या बाबत दिनांक-12.11.2020 रोजीचे   रुपये-96000/- कर्ज रकमेची उचल केल्‍या बाबत बॅंकेचे प्रमाणपत्र दाखल केलेले आहे.तसेच खाजगी कर्जाचे संदर्भात त्‍यांने श्री देवदास नतथु बुरडे यांचे शपथपत्र दाखल केलेले आहे व श्री बुरडे यांनी तक्रारकर्त्‍यास रुपये-1,00,000/- कर्ज दिल्‍याचे शपथपत्रात  नमुद केलेले आहे.

 

18.  जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मते तक्रारकर्त्‍याने वारंवार विरुध्‍दपक्ष विज वितरण कंपनीकडे तक्रारी करुनही मुदतीत योग्‍य कार्यवाही झाली नाही आणि ही विरुध्‍दपक्ष विज वितरण कंपनीने   तक्रारकर्त्‍याला दिलेली दोषपूर्ण (Deficiency in Service)सेवा ठरते. विरुध्‍दपक्ष विज वितरण कंपनीचे  दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्त्‍याला निश्‍चीतच शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.

 

19.  तक्रारकर्त्‍याने शेतातील पिकाचे नुकसानी बाबत रुपये-1,50,000/- एवढया रकमेची मागणी केलेली आहे तसेच शेतातील पिका बाबत कर्ज उचल रुपये-96,0000/- बॅंकेचे कर्ज आणि रुपये-1,00,000/- खाजगी मित्रा कडून कर्ज उचलल्‍याचे नमुद केलेले आहे आणि परतफेड न झाल्‍यामुळे व्‍याज लागत आहे असे नमुद करुन एकूण रुपये-4,00,000/- नुकसान भरपाई आणि शारिरीक व मानसिक त्रासा बाबत रुपये-50,000/- ची मागणी केलेली आहे परंतु जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मते सदर नुकसान भरपाईच्‍या रकमेचा आकडा हा फुगवून सांगितलेला आहे. खाजगी मित्रा कडून कर्ज उचलले किंवा नाही ही बाब सबळ पुरावा असल्‍या शिवाय केवळ शपथपत्र देऊन सिध्‍द होत नाही. तसेच तक्रारकर्त्‍याने सन-2019-2020 मध्‍ये नेमका किती मेट्रीक टन कापूस कारखान्‍या मध्‍ये गाळपा करीता नेला होता आणि सन-2020-21 मध्‍ये नेमका किती मेट्रीक टन कापूस कारखान्‍या मध्‍ये गाळपा करीता नेला होता या बाबत कारखान्‍याचे रजिस्‍टर नोंदीचे उतारे पुराव्‍या दाखल सादर केलेले नाहीत. एवढे मात्र खरे आहे की, पंप नादुरुस्‍त असल्‍यामुळे तो पूर्ण क्षमतेने ऊस आणि ईतर पिकास जलसिंचन करु शकला नाही त्‍यामुळे त्‍याला विरुध्‍दपक्ष विज वितरण कंपनी कडून योजने मध्‍ये मिळालेले सौर प्रकल्‍प व सी.आर.आय. कंपनीचा 05 अश्‍वशक्‍ती क्षमतेचा सबमर्सिबल पंप बदलूवन देऊन नविन दोषरहीत गुणवत्‍तेचे बसवून देण्‍याचे विरुध्‍दपक्ष विज वितरण कंपनीला आदेशित करणे योग्‍य व न्‍यायोचित होईल. त्‍याच बरोबर तक्रारकर्त्‍याचे पिकाचे नुकसानीचे निर्धारण करताना ही बाब तेवढीच लक्षात ठेवणे आवश्‍यक आहे की, तक्रारकर्त्‍याने महाराष्‍ट्र शासनाचे योजने प्रमाणे सौर प्रकल्‍पासाठी विरुध्‍दपक्ष विज वितरण कंपनीचे कार्यालयात केवळ रुपये-8280/- डिमांडनोट व्‍दारे भरुन मोठया रकमेचा सौर प्रकल्‍प मिळवून शासकीय योजनेचा लाभ घेतलेला आहे त्‍यामुळे त्‍याचे जवळपास पिकाचे रुपये-30,000/- नुकसान झाल्‍याचे जिल्‍हा ग्राहक आयोगाव्‍दारे हिशोबात धरण्‍यात येते आणि तेवढया रकमेची विरुध्‍दपक्षा कडून नुकसान भरपाईची रक्‍कम मंजूर करणे योग्‍य व न्‍यायोचित होईल असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे. या शिवाय त्‍याला या सर्व प्रकारा मध्‍ये निश्‍चीतच शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागला आणि नोटीस खर्च तसेच प्रस्‍तुत तक्रारी साठी खर्च करावा लागला त्‍यामुळे शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/- आणि नोटीस खर्च व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये-10,000/- अशा रकमा विरुध्‍दपक्षा कडून मंजूर करणे योग्‍य व न्‍यायोचित होईल असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे. 

 

20.       उपरोक्‍त नमुद सर्व वस्‍तुस्थितीचा विचार करुन जिल्‍हा ग्राहक आयोग  प्रस्‍तुत तक्रारीमध्‍ये खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.

                                                              :: अंतिम आदेश ::

  1. तक्रारकर्ता श्री रामदास सदाशिव कोळवटे यांची तक्रार विरुध्‍दपक्ष क्रं-1 महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनी मर्यादित करडी, तहसिल मोहाडी, जिल्‍हा भंडारा तर्फे कनिष्‍ठ अभियंता आणिविरुध्‍दपक्ष क्रं-2महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनी मर्यादित भंडारा सं.व.सु. प्रविभाग महावितरण भंडारा, तालुका-जिल्‍हा- भंडारा तर्फे अधिक्षक अभियंतायांचे विरुध्‍द वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्‍या खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्‍यात येते.

 

  1. विरुध्‍दपक्ष क्रं-1 व क्रं -2 महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनी मर्यादित  तर्फे अनुक्रमे कनिष्‍ठ अभियंता, करडी, तहसिल मोहाडी जिल्‍हा भंडारा आणि अधिक्षक अभियंतासं.व.सु. प्रविभाग महावितरण भंडारा, तालुका-जिल्‍हा-भंडारा यांना आदेशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍याला मुख्‍यमंत्री सौर कृषी पंप योजने मध्‍ये पुरविलेला सौर प्रकल्‍प सोलर प्‍लेट  व 05 अश्‍वशक्‍ती क्षमतेचा सी.आर.आय. कंपनीचा सबमर्सिबल नादुरुस्‍त पंप बदलवून त्‍याऐवजी त्‍याच कंपनीचे नविन व गुणवत्‍तेचे सौर प्रकल्‍प व सबमर्सिबल पंप बसवून दयावा.

 

  1. तक्रारकर्त्‍यास पिकाचे नुकसान बाबत रुपये-30,000/- (अक्षरी रुपये तीस हजार फक्‍त) आणि त्‍याला झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये- 10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त) आणि  नोटीस व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त) अशा नुकसान भरपाईच्‍या रकमा विरुध्‍दपक्ष क्रं-1 व क्रं -2 महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनी मर्यादित  तर्फे अनुक्रमे कनिष्‍ठ अभियंता, करडी, तहसिल मोहाडी जिल्‍हा भंडारा आणि अधिक्षक अभियंता सं.व.सु. प्रविभाग महावितरण भंडारा, तालुका-जिल्‍हा-भंडारा यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्‍या तक्रारकर्त्‍यास अदा कराव्‍यात.

 

  1. सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष क्रं-1 व क्रं -2 महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनी मर्यादित  तर्फे अनुक्रमे कनिष्‍ठ अभियंता, करडी, तहसिल मोहाडी जिल्‍हा भंडारा आणि अधिक्षक अभियंता सं.व.सु. प्रविभाग महावितरण भंडारा, तालुका-जिल्‍हा-भंडारा यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्‍या निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे. विहित मुदतीत आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष  क्रं 1 व क्रं 2 यांनी न केल्‍यास अंतीम आदेशातील पिका संबधीची नुकसान भरपाईची रक्‍कम रुपये-30,000/- आणि सदर रकमेवर  मुदती नंतर पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-6 टक्‍के दराने व्‍याज तक्रारकर्त्‍याला देण्‍यास विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2 जबाबदार राहतील.

 

  1. विरुध्‍दपक्ष महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनीला उचित वाटल्‍यास ते या अंतिम आदेशात नमुद केलेल्‍या संपूर्ण नुकसान भरपाईच्‍या रकमा  आणि तक्रारीचा खर्च मे.सी.आर.आय.पम्‍पस प्रायव्‍हेट लिमिटेड, 486-481 Sathy Main Road, Kurumbapalayam, Coimbatoreया ठेकेदार फर्म/कंपनी कडून योग्‍य ती कायदेशीर कार्यवाही करुन  त्‍यांचे कडून वसुल करु शकतील.

 

  1. उभय पक्षांना आदेशाच्‍या प्रथम प्रमाणित प्रती निःशुल्क उपलब्‍ध करुन देण्‍यात याव्‍यात.

 

  1. उभय पक्षकार व त्‍यांचे अधिवक्‍ता यांना निर्देशित करण्‍यात येते की, त्‍यांनी जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष प्रकरणात दाखल केलेले अतिरिक्‍त संच जिल्‍हा ग्राहक आयोगाचे कार्यालयातून परत घेऊन जावेत.  

 

 

 
 
[HON'BLE MR. BHASKAR B. YOGI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MR. NITIN M. GHARDE]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.