(आदेश पारीत व्दारा - श्री शेखर प्र. मुळे, मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक : 14 नोव्हेंबर, 2017)
1. तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण कायद्या अन्वये, ही तक्रार विरुध्दपक्ष क्रमांक 1 डॉ.चारु बडवाईक आणि विरुध्दपक्ष क्रमांक 2 ग्रीन सिटी मल्टीस्पेशॉलिटी हॉस्पीटल, नागपुर यांचेविरुध्द वैद्यकीय निष्काळजीपणा केल्याचे आरोपाखाली दाखल केली आहे. तक्रारकर्त्यांची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे.
2. तक्रारकर्तीची सन 2007 मध्ये राष्ट्रीय कुंटूंब कल्याण कार्यक्रमाअंतर्गत स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया झाली होती. परंतु, ती शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्यामुळे तिला पुन्हा गर्भधारणा राहिली. गर्भधारणामध्ये तिला अस्वस्थ वाटत असल्यामुळे ती आपल्या पतीसह दिनांक 2.2.2011 रोजी विरुध्दपक्ष क्र.2 चे दवाखान्यात वैद्यकीय उपचाराकरीता दाखल झाली. त्यावेळी, विरुध्दपक्ष क्र.1 यांनी तक्रारकर्तीला डॉ.आसावरी देशमुख यांचे पॅथॉलॉजी लॅबमध्ये मायक्रोवेव्ह सोनोग्रॉफी करीता पाठविले. सोनोग्रॉफी अहवालानुसार तक्रारकर्तीच्या डाव्या Fallopian tube मध्ये गर्भधारणा झाल्याचे निदान झाले. विरुध्दपक्ष क्र.1 ने तिला सांगितले की, गर्भधारणेमध्ये तिच्या जिवीतास धोका निर्माण झाल्याने डाव्या tube मधील गभधारणा काढून दोन्ही गर्भ पिशव्याचा मार्ग कायमचा बंद करुन स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया तात्काळ करणे आवश्यक आहे. त्यासाठी आणि दवाखाण्यात राहण्याचा खर्च व औषधोपचाराकरीता एकूण रुपये 30,000/- चा खर्च सांगण्यात आला. तक्रारकर्तीने रुपये 3,000/- जमा केले आणि विरुध्दपक्ष क्र.1 ने विरुध्दपक्ष क्र.2 चे दवाखाण्यात दिनांक 2.2.2011 रोजी डाव्या tube मधील गर्भधारणा काढण्याची शस्त्रक्रिया केली. दिनांक 6.2.2011 रोजी तक्रारकर्तीला दवाखाण्यात उर्वरीत रक्कम स्विकारुन सुट्टी देण्यात आली.
3. तक्रारकर्तीचा असा आरोप आहे की, विरुध्दपक्ष क्र.1 ने स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया न केल्यामुळे आणि दोन्ही गर्भ पिशव्याचा मार्ग कायमचा बंद न केल्यामुळे अकारणपणे उजव्या गर्भ पिशवीचा मार्ग कायमचा बंद केला आणि अशाप्रकारे वैद्यकीय सेवेत उणीव ठेवली. त्यामुळे, साधारणतः तिन-साडेतीन महिन्याच्या कालावधीत तक्रारकर्तीला पुन्हा गर्भधारणा राहिली. त्यामुळे, दिनांक 6.7.2011 ला पुन्हा विरुध्दपक्षाकडे गेली आणि तपासणीनंतर असे आढळून आले की, तिच्या उजव्या tube मध्ये गर्भधारणा झाली होती. ती गर्भधारणा काढण्यासाठी तक्रारकर्तीकडून पुन्हा पैशाची मागणी करण्यात आली, परंतु वैद्यकीय सेवा देण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे, तक्रारकर्तीने पुढे दिनांक 6.7.2011 ला डॉ.ढोके यांच्या रुग्णालयात गर्भधारणा काढण्याची शस्त्रक्रिया करुन घेतली, त्याकरीता तिला रुपये 15,000/- चा खर्च सोसावा लागला. विरुध्दपक्ष क्र.1 ने अशाप्रकारे तोंडी आश्वासन व हमी देऊनही उचीत शस्त्रक्रिया न केल्यामुळे तक्रारकर्तीला शारिरीक आणि आर्थिक त्रास सोसावा लागला, त्यामुळे या तक्रारीव्दारे तीने विरुध्दपक्षाकडून रुपये 1,00,000/- ची नुकसान भरपाई आणि तक्रारीचा खर्च मागितला आहे.
4. तक्रारकर्तीच्या तक्रारीला अनुसरुन विरुध्दपक्षांना मंचा मार्फत नोटीस पाठविण्यात आली. त्यानुसार, विरुध्दपक्ष क्रमांक 1 ने या तक्रारीला आपले लेखीउत्तर सादर केला व त्यात असे नमूद केले आहे की, तक्रारकर्ती ही विरुध्दपक्ष क्र.1 कडे तपासणीकरीता आली होती. परंतु, त्यानंतर करण्यात आलेला उपचार, शस्त्रक्रिया आणि दवाखाण्याचा खर्च यांचेशी विरुध्दपक्ष क्र.1 चा काहीही संबंध नाही. तक्रारकर्तीची प्राथमिक तपासणी केल्यानंतर तिला उपचारासाठी दुस-या दवाखाण्यात जाण्याचा सल्ला देण्यात आला होता. विरुध्दपक्ष क्र.1 ने तक्रारकर्तीची स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया किंवा गर्भधारणा काढण्याची शस्त्रक्रिया केली नाही. तसेच, तक्रारकर्तीने विरुध्दपक्ष क्र.1 ला त्यासाठी कुठलाही शुल्क दिलेला नाही, त्यामुळे तक्रारकर्ती विरुध्दपक्ष क्र.1 ची ग्राहक ठरत नाही. तक्रारकर्ती विरुध्दपक्ष क्र.1 च्या खाजगी रुग्णालयात तपासणीकरीता आली होती. विरुध्दपक्ष क्र.1 ने तक्रारकर्तीची तपासणी किंवा उपचार विरुध्दपक्ष क्र.2 चे दवाखाण्यात केली नाही. तपासणीनंतर तक्रारकर्तीला गर्भधारणा झाल्याचे निष्पन्न झाले, परंतु त्यानंतर तक्रारकर्ती विरुध्दपक्ष क्र.1 कडे कधीही आली नाही. विरुध्दपक्ष क्र.1 ने उचीत निदान केले होते आणि योग्य तो सल्ला दिला होता. त्यामुळे, विरुध्दपक्ष क्र.1 ने कुठल्याही सेवेत त्रुटी किंवा हलगर्जीपणा केलेला नसल्याने ही तक्रार खारीज करण्याची विनंती करण्यात आली.
5. विरुध्दपक्ष क्र.2 यांनी आपल्या जबाबात असे म्हटले आहे की, ही तक्रार केवळ विरुध्दपक्ष क्र.1 विरुध्द केल्याचे दिसून येते. कारण, विरुध्दपक्ष क्र.2 विरुध्द कुठलिही विशिष्ट तक्रार केलेली नाही. तक्रारकर्तीला विरुध्दपक्ष क्र.2 चे दवाखाण्यात उपचार केला होता ही बाब मान्य करुन पुढे असे म्हटले आहे की, तक्रारकर्तीला दवाखाण्यात जे काही उपचार देण्यात आले त्यासंबंधी तिने केंव्हाही तक्रार केली नव्हती. तक्रारकर्तीवर गर्भधारणा काढून टाकण्याची शस्त्रक्रिया डॉ. आशिष कुबडे यांनी केली होती, परंतु डॉ. कुबडे यांना तक्रारीमध्ये विरुध्दपक्ष म्हणून बनविले नाही, त्यामुळे ही तक्रार Non-Joinder of Necessary party नुसार अयोग्य आहे. पुढे असे नमूद केले की, तक्रारकर्तीला असा सल्ला केंव्हाही देण्यात आला नव्हता की, तिच्या दोन्ही गर्भ tube बंद कराव्या लागतील, तसेच डाव्या tube मध्ये गर्भधारणा झालेली नव्हती. विरुध्दपक्ष क्र.2 चे दवाखाण्यात तिच्यावर झालेली शस्त्रक्रिया विरुध्दपक्ष क्र.1 ने केली नव्हती. पुढे असे नमूद केले की, तक्रारकर्तीची योग्य ती काळजी घेण्यात आली होती, तसेच योग्य उपचार करण्यात आले होते आणि योग्य तो सल्ला सुध्दा देण्यात आला होता आणि त्यानंतर तिचा जीव वाचविण्यासाठी तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रिये पूर्वी तक्रारकर्तीचा पती व बहिणीची मंजुरी सुध्दा घेण्यात आली होती. अशाप्रकारे, विरुध्दपक्ष क्र.2 च्या सेवेत कुठलिही कमतरता किंवा हलगर्जीपणा नव्हता, त्यामुळे तक्रार खारीज करण्यात यावी, अशी विनंती केली.
6. दोन्ही पक्षांच्या वकीलांचा युक्तीवाद ऐकण्यात आला. उभय पक्षांनी अभिलेखावर दाखल केलेले बयाण, दस्ताऐवज आणि युक्तीवादाच्या आधारे खालील प्रमाणे निष्कर्ष देण्यात येते.
// निष्कर्ष //
7. विरुध्दपक्षाने तक्रारीला जे उत्तर सादर केले त्यावरुन पहिला मुद्दा असा उपस्थित होतो की, या प्रकरणाशी विरुध्दपक्ष क्र.1 चा काही संबंध येतो की नाही. कारण, तक्रारकर्तीवर विरुध्दपक्ष क्र.1 ने शस्त्रक्रिया केल्याची बाब दोन्ही विरुध्दपक्षांनी नाकारली आहे. विरुध्दपक्ष क्र.2 ने जे डिसचार्ज समरी तक्रारकर्तीला दिली ती पाहिली असता असे दिसते की, तक्रारकर्तीवर डॉ. कुबडे यांनी दिनांक 2.2.2011 ला विरुध्दपक्ष क्र.2 च्या दवाखाण्यात शस्त्रक्रिया केली होती. विरुध्दपक्ष क्र.1 ने तक्रारकर्तीवर शस्त्रक्रिया केल्या संबंधी एकही दस्ताऐवज किंवा इतर कुठलाही पुरावा अभिलेखावर दाखल केला नाही. त्याशिवाय असा सुध्दा कुठलाही पुरावा अभिलेखावर नाही, ज्यावरुन असे म्हणता येईल की, विरुध्दपक्ष क्र.1 ही विरुध्दपक्ष क्र.2 च्या दवाखाण्यात कार्यरत होते आणि तिने त्या दवाखाण्यात तक्रारकर्तीची तपासणी केली होती. तक्रारकर्तीने विरुध्दपक्ष क्र.1 ने दिलेल्या औषधोपचाराची एक प्रत दाखल केली आहे, ज्यामध्ये विरुध्दपक्ष क्र.1 च्या दवाखाना हा दुस-या ठिकाणी आहे हे दिसून येते, ज्याठिकाणी तिने तक्रारकर्तीची तपासणी केली होती. विरुध्दपक्ष क्र.1 ने तक्रारकर्तीची शस्त्रक्रिया केली हे दाखविण्यासाठी कुठलाही पुरावा तक्रारकर्तीने दाखल केलेला नाही. इतकेच नव्हेतर तक्रारकर्तीच्या वकीलांनी सुध्दा युक्तीवादात सांगितले की, शस्त्रक्रिया विरुध्दपक्ष क्र.1 ने नव्हेतर डॉ. कुबडे यांनी केली होती. जर, यासंबंधी तक्रारीमध्ये चुकीचे विधान केले होते तर ते दुरुस्त करण्यासाठी कुठलाही प्रयत्न तक्रारकर्ती तर्फे करण्यात आला नाही. त्यामुळे हे सिध्द होते की, या तक्रारीमध्ये विरुध्दपक्ष क्र.1 ला तिच्याविरुध्द कुठलेही कारण नसतांना प्रतिपक्ष बनविले आहे. सबब, ही तक्रार विरुध्दपक्ष क्र.1 चे विरुध्द खारीज करण्यासाठी मंचाला कुठलिही अडचण नाही.
8. विरुध्दपक्ष क्र.2 दवाखाण्याला या प्रकरणात मागाहून सामील करण्यात आले. परंतु, तक्रारीमधील जी काही विधाने तक्रारकर्तीने केलेली आहेत ती केवळ विरुध्दपक्ष क्र.1 च्या विरुध्द आहेत. ज्यावेळी, विरुध्दपक्ष क्र.2 ला याप्रकरणात सामील करण्यात आले, त्यावेळी तक्रारकर्तीने तक्रारीतील मजकुर सुध्दा विरुध्दपक्ष क्र.2 च्या अनुषंगाने दुरुस्त करुन घ्यावयाचा होता, परंतु तिने तसे केले नाही. तक्रारीलमधील सर्व आरोप विरुध्दपक्ष क्र.1 च्या विरुध्द असून विरुध्दपक्ष क्र.2 विरुध्द निष्काळजीपणा किंवा हलगर्जीपणा किंवा सेवेत त्रुटी असा कुठलाही आरोप केलेला नाही. ज्याअर्थी, विरुध्दपक्ष क्र.1 चा तक्रारकर्तीवर झालेल्या शस्त्रक्रियेशी काही संबंध नाही, तेंव्हा विरुध्दपक्ष क्र.1 ला तक्रारकर्तीच्या शस्त्रक्रियेत ती म्हणते त्याप्रमाणे झालेल्या हलगर्जीपणामध्ये विरुध्दपक्ष क्र.1 ला जबाबदार धरता येणार नाही. त्याचप्रमाणे, विरुध्दपक्ष क्र.2 ला सुध्दा तक्रारी अभावी जबाबदार धरता येणार नाही. अशापरिस्थितीत ही तक्रार चुकीच्या पक्षाविरुध्द दाखल केलेली असल्याने तक्रारीतील आरोपाच्या गुणवत्तेसंबंधी विचार करण्याची गरज नाही.
9. परंतु, तक्रारीतील शस्त्रक्रियेसंबंधी केलेला आरोपाबद्दल थोडक्यात विचार आम्हीं करीत आहोत. तक्रारकर्तीचे असे म्हणणे आहे की, ज्यावेळी तिची स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया अयशस्वी झाली आणि तिला पुन्हा गर्भधारणा झाली होती, त्यावेळी तिने विरुध्दपक्ष क्र.1 कडे जावून उपचारासंबंधी सल्ला घेतला होता. त्यावेळी, तक्रारकर्तीची मायक्रोवेव्ह सोनोग्रॉफी करण्यात आली, ज्यामध्ये तिच्या डाव्या Fallopian tube मध्ये गर्भधारण झाल्याचे निदान झाले. त्यावेळी, विरुध्दपक्ष क्र.1 ने तिला गर्भधारणा काढून टाकण्यासाठी आणि दोन्ही Fallopian tube बंद करण्यासाठी सल्ला दिला, असे तक्रारकर्तीचे म्हणणे आहे. परंतु, सोनोग्रॉफी रिपोर्ट पाहिले तर असे दिसते की, गर्भधारणा ही डाव्या tube मध्ये नव्हेतर उजव्या Fallopian tube मध्ये झाली होती. तक्रारकर्तीने असा आरोप केला आहे की, विरुध्दपक्ष क्र.1 ने गर्भधारणा काढण्याची शस्त्रक्रिया न करता तिची उजवी tube गरज नसतांना बंद केली. खरे पाहता तक्रारकर्तीला यासंबंधी काय म्हणावयाचे आहे हे तक्रारीतील विधानावरुन स्पष्ट होत नाही. पहिल्यांदा ती असे म्हणते की, तिच्या दोन्ही Fallopian tube बंद केल्या, परंतु स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया केली नाही. परंतु ती पुढे असे म्हणते की, तिची उजवी Fallopian tube कारण नसतांना बंद केली. जर तिच्या दोन्ही Fallopian tube बंद केल्या असत्या तर तिला गर्भधारणा होण्याची शक्यता नव्हती. परंतु ती पुढे असे म्हणते की, शस्त्रक्रिया झाल्याची काही महिन्यानंतर तिला पुन्हा गर्भधारणा झाली आणि म्हणून दिनांक 6.7.2011 ला ती पुन्हा विरुध्दपक्ष क्र.1 कडे गेली. यासंबंधी, दस्ताऐवज पाहिलेतर असे दिसून येते की, विरुध्दपक्ष क्र.1 ने तिला दोन्ही Fallopian tube बंद करण्याचा सल्ला दिला होता असे कुठेही नमूद नाही. याउलट, तक्रारकर्तीच्या म्हणण्याप्रमाणे जर पाहिले तर दिनांक 2.2.2011 ला झालेल्या शस्त्रक्रियेत जर तिचे दोन्ही tube बंद केल्या होत्या आणि तरी सुध्दा तिला गर्भधारणा झाली हे असे दर्शविते की, तिच्या दोन्ही tube बंद केल्या नव्हत्या. डिसचार्ज समरीमध्ये सुध्दा असे नमूद आहे की, तिच्या उजव्या tube मधील गर्भधारणा काढण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली आणि तिची डावी Fallopian tube ही Normal होती.
10. याप्रकरणात, तज्ञाचा अहवाल नाही आणि आमच्या मते त्याची गरज सुध्दा नाही. परंतु, विरुध्दपक्ष क्र.1 ने दोन स्त्रीरोग तज्ञांकडून या प्रकरणासंबंधी अहवाल प्राप्त केला होता. दोन्ही तज्ञांनी असा अहवाल दिला की, तक्रारकर्तीवर विरुध्दपक्ष क्र.2 च्या दवाखाण्यात डॉ. कुबडे यांनी तिचा जीव धोक्यात येऊ नसे म्हणून शस्त्रक्रिया केली होती आणि तिच्या उजव्या Fallopian tube संबंधी झालेली शस्त्रक्रिया योग्य होती, तसेच विरुध्दपक्ष क्र.2 च्या दवाखाण्यात तक्रारकर्तीवर जे काही उपचार झाले, त्यामध्ये कुठलिही चुक किंवा हलगर्जीपणा दिसून आला नाही. त्यामुळे, तक्रारकर्तीवर झालेल्या दोन्ही शस्त्रक्रिया आणि उपचारासंबंधी आणखी जास्त काही भाष्य करण्याची गरज उरत नाही. विरुध्दपक्ष क्र.1 ला दुस-या डॉक्टरने केलेल्या शस्त्रक्रिया उपचारासंबंधी जबाबदार धरता येणार नाही. अशाप्रकारे, ही तक्रार दोन्ही विरुध्दपक्षाविरुध्द चालविण्या योग्य नाही आणि त्याशिवाय या तक्रारीत विरुध्दपक्षाविरुध्द केलेले आरोप तथ्यहीन आहेत आणि म्हणून तक्रार खारीज होण्या लायक आहे. सबब, तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येते.
// अंतिम आदेश //
(1) तक्रारकर्तीची तक्रार खारीज करण्यात येते.
(2) खर्चाबद्दल कोणताही आदेश नाही.
(3) उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क पाठविण्यात यावी.
नागपूर.
दिनांक :- 14/11/2017