जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 72/2022. तक्रार दाखल दिनांक : 28/02/2022. तक्रार निर्णय दिनांक : 28/09/2022.
कालावधी : 00 वर्षे 07 महिने 01 दिवस
शेख अब्दूल मजीद अब्दूल गफ्फार, वय 54 वर्षे, व्यवसाय : व्यापार,
रा. नगर परिषद कॉम्प्लेक्स, नांदेड-बिदर रोड, उदगीर, जि. लातूर. तक्रारकर्ता
विरुध्द
(1) मुख्य अधीक्षक अभियंता, म.रा.वि.वि. कंपनी म., नांदेड रोड, लातूर.
(2) कार्यकारी अभियंता, म.रा.वि.वि. कंपनी म., उपशहर विभाग सर्कल
ऑफीस, उदगीर, ता. उदगीर, जि. लातूर. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- बी.इ. कवठेकर
विरुध्द पक्ष यांचेकरिता विधिज्ञ :- व्ही.व्ही. उगले
आदेश
श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार) यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी आहे की, ते उदगीर नगर पालिकेचे भाडेकरु असून नगर पालिका संकुलामध्ये असणा-या 'हिंद इलेक्ट्रीकल्स' दुकानाचे ते प्रोप्रायटर आहेत. दुकानाकरिता मुख्याधिकारी, न.प., उदगीर यांच्या नांवे मीटर घेतले असून ग्राहक क्रमांक 622010045216 आहे आणि ते विद्युत देयकांचा नियमीत भरणा करीत आहेत. विरुध्द पक्ष क्र.2 यांनी 11 महिन्यापूर्वी त्यांचा विद्युत पुरवठा तात्पुरत्या स्वरुपात खंडीत केला आहे. मात्र त्यांना दि.9/2/2022 रोजी बेकायदेशीर देयक रु.37,360/- देण्यात आले. ते देयक रद्द करण्यासाठी विनंती केली असता विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी दखल घेतली नाही. उक्त वादकथनाच्या अनुषंगाने दि.9/2/2022 रोजीचे देयक रद्द करण्याचा, तात्पुरता खंडीत केलेला विद्युत पुरवठा पूर्ववत सुरु करण्याचा, सी.पी.एल. दाखल करण्याचा, मानसिक व आर्थिक त्रासाकरिता रु.10,000/- देण्याचा व तक्रार खर्च रु.10,000/- देण्याचा विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ता यांनी केलेली आहे.
(2) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी लेखी निवेदनपत्र दाखल केले आहे. त्यांनी ग्राहक तक्रारीतील बहुतांश मजकूर अमान्य केला आहे. ते कथन करतात की, नगर परिषद संकुलामध्ये 'हिंद इलेक्ट्रीकल्स' दुकानाकरिता विद्युत मीटर ग्राहक क्र. 622010045216 अन्वये मुख्याधिकारी, नगर परिषद, उदगीर यांच्या नांवे विद्युत पुरवठा दिलेला आहे आणि तक्रारकर्ता त्यांचे ग्राहक नाहीत. तक्रारकर्ता यांचा संकुलामध्ये वाद सुरु असल्यामुळे दुकानाचा विद्युत पुरवठा खंडीत करण्याच्या सूचना मुख्याधिकारी यांनी सूचना केल्या होत्या. तक्रारकर्ता यांच्याकडे थकबाकी असल्यामुळे ऑक्टोबर 2017 मध्ये त्यांचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला. तक्रारकर्ता यांना नियम व अटीनुसार देयक देण्यात आलेले होते. जानेवारी 2022 मध्ये तात्पुरता विद्युत पुरवठा खंडीत केलेल्या ग्राहकांची तपासणी करताना तक्रारकर्ता अनधिकृतपणे अन्य ठिकाणाहून विद्युत पुरवठ्याचा वापर करीत असल्याचे निदर्शनास आले आणि अनधिकृत विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला. सन 2017 मध्ये विद्युत पुरवठा खंडीत केल्यानंतर तक्रारकर्ता यांना केवळ स्थिर आकाराचे देयक व व्याज आकारणी करण्यात आली. मा. उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपिठापुढे याचिका अर्ज क्र. 10561/2016 व 3389/2022 मधील आदेशाच्या अनुषंगाने विद्युत पुरवठा प्रक्रियेचे निर्देश दिलेले आहेत. ग्राहक तक्रार मुदतबाह्य आहे. अंतिमत: ग्राहक तक्रार नामंजूर करण्यात यावी, अशी विनंती विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी केलेली आहे.
(3) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार, विरुध्द पक्ष यांचे लेखी निवेदनपत्र, उभय पक्षांनी दाखल केलेली कागदपत्रे इ. चे अवलोकन केले असता; तसेच विद्वान विधिज्ञांचा मौखिक युक्तिवाद ऐकल्यानंतर वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे वाद-मुद्दे निश्चित करण्यात येतात आणि त्या मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
(1) वाद-तथ्याच्या अनुषंगाने तक्रारकर्ता अनुतोषास पात्र आहेत काय ? होय (अंशत:)
असल्यास किती ? अंतिम आदेशाप्रमाणे
(2) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(4) प्रथमत:, विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्ता हे त्यांचे 'ग्राहक' नाहीत आणि ग्राहक तक्रार मुदतबाह्य आहे, अशी हरकत नोंदविली आहे. निर्विवादपणे, तक्रारकर्ता हे नगर पालिका, उदगीर यांच्या संकुलामध्ये गाळा क्र.10 मध्ये 'हिंद इलेक्ट्रीकल्स' नांवे व्यवसाय करतात. दुकानाकरिता मुख्याधिकारी, नगर पालिका, उदगीर यांच्या नांवे विद्युत जोडणी घेतलेली आहे आणि तक्रारकर्ता हे विद्युत पुरवठ्याचा वापर करीत आहेत. यावरुन तक्रारकर्ता हे विद्युत पुरवठ्याकरिता लाभार्थी असल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे तक्रारकर्ता हे ग्राहक संरक्षण अधिनियम, 2019 चे कलम 2(7) अन्वये 'ग्राहक' संज्ञेत येतात.
(5) ग्राहक तक्रार मुदतबाह्य ठरते काय ? हे पाहत असताना ग्राहक तक्रारीनुसार दि.9/2/2022 रोजी दिलेल्या विद्युत देयकाच्या अनुषंगाने वादकारण व अनुतोषाची मागणी दिसून येते. त्यामुळे ग्राहक तक्रार मुदतबाह्य ठरत नाही आणि विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांचे उक्त आक्षेप अमान्य करण्यात येतात.
(6) मुद्दा क्र. 1 व 2 :- प्रामुख्याने, नगर परिषद संकुलामध्ये 'हिंद इलेक्ट्रीकल्स' दुकानाकरिता विद्युत मीटर ग्राहक क्र. 622010045216 अन्वये दिलेल्या विद्युत पुरवठ्याकरिता तक्रारकर्ता यांच्याकडे थकबाकी असल्यामुळे ऑक्टोबर 2017 मध्ये विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला, असा विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांचा प्रतिवाद आहे. असे दिसते की, प्रस्तुत प्रकरण जिल्हा आयोगापुढे प्रलंबीत असताना तक्रारकर्ता यांनी विद्युत देयकापैकी रु.15,000/- रक्कम विरुध्द पक्ष यांच्याकडे भरणा केलेली आहे. तसेच त्यांनी शपथपत्राची छायाप्रत अभिलेखावर दाखल केलेली असून ज्यामध्ये दि.22/8/2022 रोजी थकबाकी रु.41,950/- पैकी दि.22/8/2022 रोजी रु.15,000/- भरणा करीत असल्याचा व उर्वरीत दि.28/9/2022 पर्यंत भरणा करीत असल्याचा उल्लेख असून विद्युत पुरवठा पूर्ववत सुरु करण्यासंबंधी निवेदन केलेले आहे. असे दिसते की, तक्रारकर्ता हे त्यांच्याकडे असणा-या थकबाकीची रक्कम मान्य करीत असून त्याप्रमाणे थकीत रक्कम भरण्याची तयारी दर्शवत आहेत. त्यामुळे उभयतांचा वाद-प्रतिवाद पाहता वाद-तथ्याच्या अनुषंगाने तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार निष्फळ किंवा निरर्थक ठरत असली तरी न्यायाच्या दृष्टीने अनुतोष मंजूर करणे उचित आहे आणि मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी देऊन खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार अशंत: मंजूर करण्यात येते.
(2) तक्रारकर्ता यांनी दि.28/9/2022 पर्यंत विद्युत देयकांच्या अनुषंगाने थकबाकी असणा-या उर्वरीत रकमेचा विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांच्याकडे भरणा करावा आणि त्यानंतर विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्ता यांना विद्युत पुरवठा पूर्ववत सुरु ठेवावा.
(3) खर्चासंबंधी आदेश नाहीत.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
(संविक/स्व/28922) -०-