निकाल
दिनांक- 09.04.2014
(द्वारा- श्री.विनायक रावजी लोंढे, अध्यक्ष)
तक्रारदार क्र.1 ते 4 यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाले यांनी सेवेत त्रूटी ठेवली आहे म्हणून नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केली आहे.
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे, तक्रारदार क्र.1 वैजिनाथ येताळा सानप यांनी सामनेवाले बँकेमध्ये पावती नंबर 013988, 013989, 013990,009242 व 009243 द्वारे मुदत ठेव ठेवली आहे. त्यांची मुदत संपल्यानंतर व्याजासह रककम रु.5,02,546/- मिळणार होती. तक्रारदार क्र.2 मथुरा वैजिनाथा सानप हिचे नांवे पावती क्र. 013992, 013993, 013994 द्वारे मुदत ठेव ठेवली आहे. त्यांची मुदत संपल्यानंतर व्याजासह रक्कम रु.3,03,312/- मिळणार होती. तक्रारदार ्र.3 भाऊसाहेब वैजिनाथ सानप यांचे नांवे मुदत ठेव पावती क्र.009234, 009235, 009236 व 009237 द्वारे मुदत ठेव ठेवली आहे. त्यांची मुदत संपल्यानंतर व्याजासह रक्कम रु.2,00,248/- मिळणार होती. तक्रारदार क्र.4 सुनिता वैजिनाथ सानप हिचे नांवे मुदत ठेव पावती क्र.009251, 009252 व 009253 द्वारे मदत ठेव ठेवली आहे. त्यांची मुदत संपल्यानंतर व्याजासह रक्कम रु.3,00,713/- मिळणार होती, अशी तक्रारदारांची एकूण रक्कम रु.13,06,819/- सामनेवाले बॅकेत मुदत ठेव जमा आहे. मुदतीचा कालावधी 13 महिन्याचा होता. मुदत ठेवीवर द.सा.द.शे.10 टक्के व्याज देण्याचे कबूल केले होते. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे ठेवलेल्या ठेवीची मुदत संपल्यानंतर रक्कम काढण्यासाठी गेले. सामनेवाले बँकेचे चेअरमन व अधिकारी यांनी तक्रारदार यांना सांगितले की, बॅकेची सध्या आर्थिक अडचण असल्यामुळे तक्रारदार यांची मुदत ठेवीची रक्कम देऊ शकत नाही. 15 दिवसांनी मुदत ठेवीची रक्कम अदा करण्याचे कबूल केले. तक्रारदार हे वेळोवेळी सामनेवाले यांचे बँकेत गेले व त्यांनी ठेवलेल्या ठेवीच्या रक्कमेची मागणी केली. सामनेवाले यांनी सदरील ठेवीची रक्कम तक्रारदार यांना परत दिली नाही. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे वेळोवेळी अर्ज करुनही तक्रारदार यांची ठेवीची रक्कम दिली नाही. सर्व तक्रारदार यांनी सामनेवाले यांचे बँकेत रक्कम रु.12,85,000/- ची मुदत ठेवी आहे व त्या रक्कमेवर द.सा.द.शे.10 टक्के व्याज देण्याचे कबूल केले आहे. तक्रारदार यांनी वेळोवेळी मागणी करुनही सामनेवाला यांनी मुदत ठेव व त्यावरील व्याज तक्रारदार यांना दिले नाही. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दयावयाचे सेवेत त्रूटी ठेवली आहे. सबब, तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडून तक्रारदार यांनी ठेव म्हणून ठेवलेली रक्कम रु.12,85,000/- व त्यावर द.सा.द.शे. 12 टक्के व्याज देण्याचा हूकूम व्हावा. तसेच तक्रारदार यांना झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासापोटी नुकसान भरपाई देण्याचा हूकूम व्हावा अशी विनंती केली आहे.
सामनेवाले क्र.1 व 2 यांना या मंचाची नोटीस मिळाली. सामनेवाले क्र.1 व 2 हे अँड.एल.वाय.कुलकर्णी मार्फत मंचासमोर हजर झाले. सामनेवाले यांनी मुदतीत लेखी म्हणणे सादर केले नाही. म्हणून त्यांचे विरुध्द लेखी कैफियत नाही असा आदेश करण्यात आला व तक्रार पूढे चालविण्यात आली. सामनेवाले यांनी दि.2.4.2014 रोजी लेखी म्हणणे दाखल केले. सदरील तक्रारीमध्ये सामनेवाले यांनी मुदतीत लेखी कैफियत दाखल न केल्यामुळे सामनेवाले यांनी दाखल केलेले लेखी कैफियत दाखल (filed )करण्यात आली.
तक्रारदार यांनी त्यांचे स्वतःचे शपथपत्र दाखल केले. तसेच तक्रारदार यांनी सामनेवाले बॅकेमध्ये मुदत ठेव ठेवल्या बाबतच्या पावतीच्या झेरॉक्स प्रति हजर केल्या. तक्रारदार यांनी स्वतः यूक्तीवाद केला. सामनेवाले यांचे वकील श्री.एल.वाय.कूलकर्णी यांचा यूक्तीवाद ऐकला. न्यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1. तक्रारदार यांनी सामनेवाले बँकेत ठेवलेली ठेव रक्कम मुदत
संपल्यानंतरही सामनेवाले यांनी न देऊन सेवेत त्रूटी ठेवली आहे
ही बाब तक्रारदार शाबीत करतात काय ? होय.
2. तक्रारीत मागणी केलेली नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत
काय ? होय.
3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिंमासा
मुददा क्र.1 व 2ः-
तक्रारदार व सामनेवाले यांनी केलेला यूक्तीवाद व कागदपत्राचे अवलोकन केले असता खालील नमुद केलेल्या बाबीविषयी तक्रारदार व सामनेवाले यांचेमध्ये वाद नाही. तक्रारदार यांनी त्यांचे तक्रारीत नमूद केलेल्या ठेवी सामनेवाले बँकेत ठेवलेल्या आहेत ही बाब उभय पक्षकार यांना मान्य आहे. सामनेवाले यांनी मुदत संपल्यानंतर तक्रारदार यांना रक्कम दिली नाही याविषयी वाद नाही. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे वेळोवेळी अर्ज देऊन त्यांनी सामनेवाले बँकेत ठेवलेली मुदत ठेव रक्कम मिळावी म्हणून अर्ज दिला हेता ही बाब सामनेवाले यांना मान्य आहे.
तक्रारदार यांनी असा युक्तीवाद केला की, तक्रारदार क्र.1 वैजिनाथ येताळा सानप हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. सेवानिवृत्तीनंतर त्यांना मिळालेली रक्कम त्यांनी त्यांचे व त्यांचे कूटूंबियाचे नांवे सामनेवाले बॅकेमध्ये मुदत ठेवी मध्ये ठेव म्हणून ठेवले. ठेवीची मुदत संपल्यानंतर तक्रारदार यांनी सामनेवाले बॅकेत वेळोवेळी ठेव रक्कम व त्यावरील व्याज मिळावे म्हणून पाठपूरावा केला. परंतु सामनेवाले यांनी सदरील ठेव रक्क्म व त्यावरील व्याज तक्रारदार यांना दिले नाही. तक्रारदार यांना त्यांचे घरी मुलीचे लग्न करण्यासाठी रक्कमेची आवश्यकता असतानाही सामनेवाले यांनी त्यांची दखल घेतली नाही व सदरील रक्कम देण्यास टाळाटाळ करुन सेवेत त्रुटी ठेवली आहे. तक्रारदार यांनी मागणी केली आहे की, तक्रारदार यांनी ठेवलेल्या ठेवीवर द.सा.द.शे. 12 टक्के व्याज देण्याचा आदेश व्हावा व झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळावी व तक्रारीचा खर्च मिळावा.
सामनेवाले यांचे वकील श्री.कूलकर्णी यांनी असा युक्तीवाद केला की, तक्रारदार यांनी सामनेवाले बँकेमध्ये तक्रारीत नमुद केलेली रक्कम मुदत ठेव म्हणून सामनेवाले बँकेत ठेवली आहे. सामनेवाले बँक ही आर्थिक अडचणीत असल्यामुळे तक्रारदारर यांची रक्कम देता आली नाही. सामनेवाले यांनी कर्जदाराकडून रक्कम वसूल केल्यानंतर सामनेवाले हे तक्रारदार यांची ठेव रक्कम देण्यास तयार आहेत. बॅकेच्या वसूलीचे पैसे समाधानकारक झाल्यानंतर तक्रारदार याचे ठेवीची रक्कम व्याजासह देण्यास सामनेवाले तयार आहेत. सामनेवाले यांचे वकिलांनी त्यांचे यूक्तीवादाचे प्रित्यर्थ महाराष्ट्र शासनाचे काही पत्र जोडले आहेत. सदरील पत्रामध्ये अवेळी पाऊस व गारपीटमुळे ज्या शेतक-याचे पिकाचे नुकसान झाले आहे. कर्जाची रक्कम वसूल करण्या बाबत मार्गदर्शक तत्वे दिली आहेत.
तक्रारदार यांचे शपथपत्र व कागदपत्र यांचे काळजीपुर्वक अवलोकन केले. सामनेवाले यांनी दाखल केलेले शासकीय पत्र व यूक्तीवाद लक्षात घेतला. तकारदार क्र.1 ते 4 यांनी सामनेवाले बँकेत तक्रारीत नमूद केलेल्या ठेवी ठेवलेल्या आहेत. सदरील ठेवचीची मुदत संपल्यानंतर सामनेवाले यांनी तक्रारदार यांना मुदत ठेवीची रककम व त्यावरील व्याज दिले नाही. ती देण्याची टाळाटाळ केली आहे. तक्रारदार क्र. 1 हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. त्यांनी त्यांचे आयूष्याची कमाई त्यांचे व त्यांचे कूटूंबियाचे नांवावर सामनेवाले बँकेत गुंतविली आहे. सदरील रक्कम तक्रारदार यांना अडीअडचणीचे वेळेस मिळणे गरजेचे आहे. मुदत ठेव संपल्यानंतर सदरील रक्कम तक्रारदार यांना सामनेवाले यांनी दिली नाही. केवळ सामनेवाले बँक आर्थिक अडचणीत आहे या सबबीवर सामनेवाले बँक टाळाटाळ करु शकत नाही. सामनेवाले बँकेचे आर्थिक नुकसानीस तक्रारदार हे जबाबदार नाहीत. तक्रारदार यांनी ठेवलेली ठेव रक्क्म व त्यावरील व्याज मुदत संपताच देण्याची जबाबदारी सामनेवाले बँकेवर आहे. ती जबाबदारी सामनेवाले बँक यांनी टाळलेली आहे. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दयावयाचे सेवेत त्रुटी ठेवलेली आहे. तक्रारदार हे त्यांनी ठेवलेली ठेव व त्यावरील व्याज मिळण्यास पात्र आहेत. तसेच मुदत ठेव रक्कम न दिल्यामुळे तक्रारदार यांना मानसिक व शारीरिक त्रास झाला आहे व त्यांना मंचात तक्रार दाखल करावी लागली आहे. त्याबददल मानसिक व शारीरिक त्रासाबददल प्रत्येक तक्रारदारास रु.3,000/- व तक्रारीच्या खर्चाबददल प्रत्येक तक्रारदारास रु.1,000/- दयावेत.
मुददा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
सबब, मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
1) तक्रारदारांची तक्रार मंजूर करण्यात येत आहे.
2) सामनेवाले क्र.1 व 2यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदार क्र.1
ते 4 यांना ठेवीची व्याजासह होणारी रक्कम रु.13,06,819/-
निकाल कळाल्यापासून 30 दिवसांचे आंत दयावेत, न दिल्यास
तक्रार दाखल दि.18.03.2014 पासून पुर्ण रक्कम वसुल होईलपर्यत
द.सा.द.शे 10 टक्के व्याज दराने संपूर्ण रक्कम दयावी.
3) सामनेवाले क्र.1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदार क्र.1
ते 4 यांना प्रत्येकी शारिरीक व मानसिक त्रासापोटी रक्कम
रु.3,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी प्रत्येकी रककम रु.1,000/-
दयावेत.
4) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम
20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत
करावेत.
श्रीमती मंजूषा चितलांगे, श्री.विनायक लोंढे,
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड
जयंत पारवेकर
लघुलेखक