तक्रारदार स्वत:
जाबदेणार एकतर्फा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
द्वारा- मा. श्री. व्ही. पी. उत्पात, अध्यक्ष
:- निकालपत्र :-
दिनांक 20/जुलै/2013
प्रस्तुतची तक्रार तक्रारदार यांनी जाबदेणार बँकेविरुध्द सेवेतील त्रुटी संदर्भात ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अंतर्गत दाखल केली आहे. यातील कथने थोडक्यात खालीलप्रमाणे-
1. तक्रारदार हे खडक पोलिस स्टेशन येथे पोलिस हवालदार म्हणून कार्यरत असून त्यांचे जाबदेणार बँकेमध्ये पगाराचे बचत खाते आहे. दिनांक 16/4/2012 रोजी त्यांनी सोसायटी मधून घेतलेल्या कर्जाची रक्कम रुपये 2,87,000/- त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली होती. दिनांक 18/4/2012 रोजी सकाळी 7 वा. थेरगाव येथील अॅक्सीस बँकेच्या ए.टी.एम मधून त्यांनी रुपये 20,000/- काढले. परत रुपये 20,000/- काढण्यासाठी ए.टी.एम कार्ड मशिन मध्ये टाकून पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता रक्कम न येता स्लिप आली व त्यावर जास्तीत जास्त रुपये 20,000/- मिळण्याची क्षमता असल्याचे दर्शविण्यात आले. म्हणून तक्रारदार रुपये 20,000/- घेऊन गावी निघाले. प्रवासात असतांना त्यांना अॅक्सिस बँके मार्फत त्यांच्या खात्यातून रुपये 20,000/- काढल्याचा व खात्यामधील शिल्लक रकमेतून रुपये 40,000/- कमी झाल्याचा संदेश आला. तक्रारदारांच्या खात्यामधे रुपये 2,89,267.07 शिल्लक होती व रुपये 20,000/- काढल्यानंतर रुपये 2,69,267.07 शिल्लक रहाणे आवश्यक होते. परंतू त्यांच्या खात्यामध्ये शिल्लक रुपये 2,49,267.07 दाखविण्यात आली. त्या दिवशी ते परगावी असल्यामुळे त्यांनी बँकेमध्ये जाऊन चौकशी केली नाही. दिनांक 20/4/2012 रोजी परत आल्यानंतर जाबदेणार बँकेत जाऊन चौकशी केली असता त्यांना तक्रार देण्यास सांगण्यात आले. त्याप्रमाणे तक्रार नोंदवून तक्रारीचे निराकरण 24 तासात अगर 7 दिवसात होईल असे सांगण्यात आले. आठ दिवसांनंतर त्यांनी चौकशी केली असता सदरची रक्कम खात्यात जमा झाली नसल्यामुळे त्यांनी परत बँकेत जाऊन चौकशी केली असता अॅक्सिस बँकेच्या ए.टी.एम मधून व्यवहार केला असल्याने पैसे कोठे जाणार नाहीत, पैसे मिळतीलच, तसेच ए.टी.एम चा व्यवहार जाबदेणार यांच्याकडे नसून तो मुंबई वरील पाहिला जातो असे तक्रारदारांना सांगण्यात आले. वारंवार लेखी व तोंडी चौकशी करुनही उपयोग झाला नाही. म्हणून तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल करुन त्यांना न मिळालेली रक्कम रुपये 20,000/- व त्यावरील व्याज रुपये 3,000/- मिळावेत अशी मागणी करतात. तसेच त्यांना 15 दिवस रजा काढावी लागली व शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागला म्हणून नुकसान भरपाई पोटी रुपये 1,00,000/- मिळावेत, तक्रारीचा खर्च रुपये 5000/- मिळावा एकूण रुपये 1,28,000/- मिळावेत अशी मागणी करतात.
2. सदरच्या तक्रारीमध्ये नोटीस बजावल्यानंतर जाबदेणार वकीलांमार्फत मंचासमोर हजर झाले. परंतू त्यांनी तक्रारदारांच्या तक्रारीला कोणतेही उत्तर दिले नाही. त्यामुळे सदरची तक्रार जाबदेणार यांच्या कथनाशिवाय एकतर्फा चालविण्याचे आदेश करण्यात आले. तक्रारदार यांनी आपल्या तक्रारीसोबत शपथपत्र, त्यांना बँकेमधून आलेल्या संदेशाची प्रत, बँकेकडे दिलेल्या तक्रार अर्जाची प्रत, नोटीसची प्रत, त्यांना कर्ज मंजूर झाल्यासंबंधी आदेशाची प्रत व त्यांची रजा मंजूर झाल्यासंबंधी आदेशाची प्रत इ. कागदपत्रे दाखल केली आहेत.
या प्रकरणातील कागदपत्रांचे व शपथपत्राचे अवलोकन केले असता एक गोष्ट स्पष्ट होते की जाबदेणार यांनी तक्रारदार यांची तक्रार गांभीर्यपुर्वक कधीही विचारात घेतली नाही. तक्रारदार यांनी लेखी तक्रार दाखल केली, वकीलांमार्फत नोटीस पाठविली परंतू त्यांच्या तक्रारीला किंवा नोटीसला उत्तर पाठविण्याचे सौजन्यही जाबदेणार यांनी दाखविले नाही. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन असे स्पष्ट होते की तक्रारदार यांनी केवळ एकदाच रुपये 20,000/- काढले असतांना त्यांच्या खात्यामधून रुपये 40,000/- वजा झालेले आहेत. त्यासंबंधी जाबदेणार यांनी कोणताही खुलासा केलेला नाही. सबब जाबदेणार यांनी सेवा देतांना निकृष्ट दर्जाची सेवा दिलेली आहे असे सिध्द होते. तक्रारदारांनी दाखल केलेल्या खातेउता-यावरुन असे स्पष्ट दिसून येते की दिनांक 18/4/2012 रोजी त्यांच्या खात्यामध्ये रुपये 40,000/- नावे टाकलेले आहेत. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या पुराव्यास निरुत्तर करण्यासाठी जाबदेणार यांनी कोणताही लेखी पुरावा, शपथपत्र अथवा लेखी कैफियत दाखल केलेली नाही. सबब तक्रारदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे व शपथपत्र यांचा विचार करुन गुणवत्तेनुसार प्रस्तुतचे प्रकरण निकाली काढण्यात येत आहे. या प्रकरणातील कागदपत्रांवरुन असे स्पष्ट दिसून येते की तक्रारदार यांना रुपये 20,000/- कमी मिळालेले आहेत. त्यांना रजा काढून त्यांच्या घराचे बांधकाम करता आले नाही उलट त्यांना बँकेत वारंवार जावे लागले म्हणून त्यांना शारिरीक व मानसिक त्रासापोटी रुपये 5000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 2000/- देणे योग्य ठरेल. सबब तक्रार अंशत: मंजूर करुन खालील प्रमाणे आदेश देण्यात येत आहे-
:- आदेश :-
1. तक्रार अंशत: मान्य करण्यात येत आहे.
2. तक्रारदारांनी त्यांच्या खात्यामधून रुपये 20,000/- काढलेले
असतांना जाबदेणार बँकेने रुपये 40,000/- वजा करुन सेवेत त्रुटी निर्माण केलेली आहे असे जाहिर करण्यात येत आहे.
3. जाबदेणार बँकेने तक्रारदारांना रक्कम रुपये 20,000/- आदेशाची प्रत मिळाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावेत.
4. जाबदेणार बँकेने तक्रारदारांना नुकसान भरपाई पोटी रक्कम रुपये 5000/- व तक्रारीचा खर्च रुपये 2000/- आदेशाची प्रत मिळाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावेत.
5. मा. सदस्यांसाठी दिलेले संच आदेशाच्या दिनांकापासून एका महिन्याच्या आत तक्रारदारांनी घेऊन जावेत अन्यथा संच नष्ट करण्यात येतील.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.
स्थळ- पुणे
दिनांक – 20 जुलै 2013