निकाल
पारीत दिनांकः- 31/08/2012
(द्वारा- श्रीमती अंजली देशमुख, अध्यक्ष)
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे.
1] तक्रारदारांनी दि. 26/12/2010 रोजी मायक्रोमॅक्स या कंपनीचा X560 हा हॅंडसेट घनश्याम एंटरप्रायजेस येथून खरेदी केला. त्यानंतर सदरच्या हॅंडसेटमध्ये चार्जिंगची समस्या उद्भभवली म्हणून तक्रारदारांनी कंपनीचे अधिकृत सर्व्हिस सेंटर, जाबदेणार क्र. 2 यांच्याकडे हॅंडसेट दुरुस्तीकरीता टाकला. त्यावेळी जाबदेणार क्र. 2 यांनी मोबाईलच्या चार्जिंग कनेक्टरमध्ये बिघाड असल्याचे सांगितले आणि सदरचा हॅंडसेट दुरुस्तीसाठी 52 दिवस त्यांच्याकडे ठेवून घेतला व त्यानंतर दि. 16/6/2011 रोजी तक्रारदारांच्या ताब्यात दिला. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, जाबदेणारांनी सदर हॅंडसेट दुरुस्त करुन दिलाच नाही. दि. 7/7/2011 रोजी तक्रारदार पुन्हा हॅंडसेट जाबदेणारांकडे घेऊन गेले असता, त्यांनी हॅंडसेटमधील बोर्ड बदलावा लागेल व त्याचा सर्व खर्च तक्रारदारांना करावा लागेल असे, सांगितले. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, सदरचा मोबाईल हॅंडसेट हा वॉरंटीमध्ये असूनसुद्धा जाबदेणारांनी त्यांना दुरुस्तीचा खर्च करावयास सांगितले. त्यानंतर जाबदेणारांनी तक्रारदारांना हॅंडसेटबद्दल कोणतीही अधिकृत माहिती अथवा पत्रव्यवहार केलेला नाही व अद्याप हॅंडसेट जाबदेणारांकडेच आहे. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, सदरच्या हॅंडसेटमध्ये उत्पादकिय दोष आहे, त्यामुळे ते जाबदेणारांकडून नविन हॅंडसेटची मागणी करतात अथवा हॅंडसेटची किंमत रक्कम रु. 5,200/- द.सा.द.शे. 18% व्याजदराने मागतात. तसेच त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागल्यामुळे व दुसरा हॅंडसेट घ्यावा लागल्यामुळे रक्कम रु. 5,000/- नुकसान भरपाई आणि रक्कम रु. 2,000/- तक्रारीचा खर्च मागतात.
2] तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीच्या पुष्ठ्यर्थ शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
3] जाबदेणारांना नोटीस पाठविली असता ते नोटीस मिळूनही गैरहजर राहिले म्हणून मंचाने त्यांच्याविरुद्ध ‘एकतर्फा आदेश’ पारीत केला. त्यानंतर जाबदेणारांतर्फे अॅड. श्रीमती शहा यांनी वकीलपत्र व ई-मेलची प्रत दाखल केली, परंतु लेखी जबाब दाखल केला नाही. जाबदेणारांनी दाखल केलेल्या ई-मेलच्या प्रतीमध्ये, ते हॅंडसेटची किंमत देऊ शकत नाहीत, परंतु त्याच किंमतीचा नविन हॅंडसेट देऊ शकतात, असे नमुद केले आहे.
4] तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदारांनी दि. 26/12/2010 रोजी मायक्रोमॅक्स या कंपनीचा X560 हा हॅंडसेट खरेदी केला परंतु त्यामध्ये चार्जिंगची समस्या उद्भभवल्यामुळे त्यांनी तो हॅंडसेट जाबदेणार क्र. 2 यांच्याकडे दुरुस्तीकरीता टाकला. जाबदेणारांनी सदरचा हॅंडसेट 52 दिवस त्यांच्याकडे ठेवून दि. 16/6/2011 रोजी तक्रारदारांना नादुरुस्त अवस्थेतच दिला. त्यानंतर तक्रारदारांनी पुन्हा दि. 7/7/2011 रोजी हॅंडसेट जाबदेणारांकडे दुरुस्तीसाठी दिला, परंतु सदरचा हॅंडसेट वॉरंटीमध्ये असताना जाबदेणारांनी दुरुस्तीचा खर्च तक्रारदारांना करावयास सांगितला व अद्यापपर्यंत परत केलेला नाही. वास्तविक पाहता, जाबदेणारांनी दि. 16/6/2011 रोजी चार्जिंगच्या कनेक्टरमध्ये उत्पादकिय दोष असल्याचे सांगितले होते, त्याच वेळी त्यांनी तक्रारदारास हॅंडसेट बदलून द्यावयास हवा होता, परंतु त्याकरीता तक्रारदारांना मंचामध्ये प्रस्तुतची तक्रार दाखल करावी लागली, त्यानंतर जाबदेणारांनी हॅंडसेट बदलून देतो असे सांगितले. याचा साहजिकच तक्रारदारांना मानसिक त्रास झाला असेल. त्यामुळे मंच जाबदेणारांना, त्यांनी तक्रारदारांना पूर्वीच्या हॅंडसेटच्या किंमतीचा नविन हॅंडसेट नविन वॉरंटीसह द्यावा, रक्कम रु. 1000/- मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व रक्कम रु. 1000/- तक्रारीच्या खर्चापोटी द्यावेत, असा आदेश देते.
5] वरील सर्व विवेचनावरुन व कागदपत्रांवरुन मंच खालील आदेश पारीत करते.
** आदेश **
1. तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2. जाबदेणारांनी तक्रारदारास पूर्विच्या हॅंडसेटच्या
किंमतीचा नविन हॅंडसेट, नविन वॉरंटीसह, तसेच
रक्कम रु. 1,000/- (रु. एक हजार फक्त) नुकसान
भरपाई म्हणून व रक्कम रु.1,000/-(रु. एक हजार
फक्त) तक्रारीच्या खर्चापोटी द्यावेत, या आदेशाची प्रत मिळाल्यापासून सहा आठवड्यांच्या आंत द्यावेत.
3. निकालाच्या प्रती दोन्ही बाजूंना नि:शुल्क पाठविण्यात
याव्यात.