जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 9/2021. तक्रार दाखल दिनांक : 04/01/2021. तक्रार निर्णय दिनांक : 06/02/2023.
कालावधी : 02 वर्षे 01 महिने 02 दिवस
श्री. जाकीर नुरोद्दीन आत्तार, वय 35 वर्षे, धंदा : व्यापार,
रा. अजय नगर, उमरगा, ता. उमरगा, जि.उस्मानाबाद. तक्रारकर्ता
विरुध्द
(1) महिंद्रा ॲन्ड महिंद्रा फायनान्स बँक, पहिला मजला,
मस्तान हाईटस्, आय.डी.बी.आय. बँकेजवळ, लातूर - 413 512.
(2) महिंद्रा ॲन्ड महिंद्रा फायनान्स बँक, मुंबई,
आग्रा रोड, एस-7 ते एस-11, दुसरा मजला,
सुयोजीत सिटी सेंटरजवळ, मुंबई नाका, नाशिक - 422 009. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- एस्. एस्. पवार
विरुध्द पक्ष यांचेकरिता विधिज्ञ :- पी. जी. रुद्रवार
आदेश
श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार) यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी की, त्यांचे पिता कै. नुरोद्दीन खाजाभाई आत्तार (यापुढे 'कै. नुरोद्दीन') यांनी विरुध्द पक्ष क्र.1 (यापुढे विरुध्द पक्ष क्र.1 व 2 'बँक") यांच्याकडून रु.3,50,000/- कर्ज घेऊन महिंद्रा मोटार वाहन कंपनीचे XUV 500 FWDW8 नोंदणी क्रमांक एम. एच. 46 पी. 9543 (यापुढे 'वादकथित वाहन') खरेदी केले होते. कर्ज परतफेड कालावधी 3 वर्षाचा होता आणि कर्ज कालावधी पूर्ण होईपर्यंत कै. नुरोद्दीन यांचे आरोग्य विमापत्र काढण्यासाठी बँकेतर्फे रक्कम भरुन घेतलेली होती. दि.15/8/2020 रोजी कै. नुरोद्दीन यांचे श्री मार्केंडेय रुग्णालय आणि संशोधन केंद्र नियमीत, सोलापूर येथे कोवीड-19 आजारामुळे निधन झाले. तक्रारकर्ता यांनी बँकेकडे विमापत्र अनुसूचीची मागणी केली. त्याबाबत कै. नुरोद्दीन यांनी दि.13/8/2018 ते 12/8/2019 कालावधीकरिता MAS POLICY घेतली होती; परंतु त्याचे नुतनीकरण केले नाही, असे बँकेने कळविले. कै. नुरोद्दीन यांच्याकडून आरोग्य विम्याकरिता बँकेने रक्कम स्वीकारुनही विमा घेतला नाही आणि तक्रारकर्ता यांना नुकसान सहन करावे लागले. उक्त कथनाच्या अनुषंगाने कै. नुरोद्दीन यांच्या कर्ज रकमेच्या दुप्पट रकमेची आरोग्य विमा रक्कम रु.5,00,000/- व्याजासह देण्याचा व तक्रार खर्च रु.5,000/- देण्याचा बँकेस आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ता यांनी केली आहे.
(2) बँकेने लेखी निवेदनपत्र दाखल केले. सर्वप्रथम, लवाद व प्रादेशिक कार्यक्षेत्राचा मुद्दा उपस्थित करुन जिल्हा आयोगास कार्यक्षेत्र नसल्याची हरकत नोंदविली. त्यांचे कथन असे की, तक्रारकर्ता त्यांचे ग्राहक नाहीत आणि अन्य वारसांकरिता ग्राहक तक्रार दाखल केलेली नाही. तक्रारकर्ता यांनी विमा कंपनीस आवश्यक पक्षकार केले नाही, असे नमूद केले.
(3) बँकेचे पुढे कथन असे की, कै. नुरोद्दीन यांनी वाहन खरेदी करताना स्वत: रॉयल सुंदरम कंपनीचा आरोग्य विमा व अपघाती विमापत्र खरेदी केले होते. त्या विमापत्राची मुदत दि.13/8/2018 ते 12/8/2019 पर्यंत होती. त्यानंतर विमापत्राचे नुतनीकरण केले नाही. कै. नुरोद्दीन यांच्या विमापत्राशी बँकेचा संबंध नाही. आरोग्य विमा व अपघाती विमा घेण्याकरिता कै. नुरोद्दीन यांनी एक वर्षाचा हप्ता भरलेला होता आणि त्याची विमा अनुसूची देण्यात आलेली होती. अंतिमत: ग्राहक तक्रार खर्चासह रद्द करण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली.
(4) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार, विरुध्द पक्ष यांचे लेखी निवेदनपत्र, उभय पक्षांनी दाखल केलेली कागदपत्रे इ. चे अवलोकन केले असता; तसेच बँकेच्या विद्वान विधिज्ञांचा मौखिक युक्तिवाद ऐकल्यानंतर वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे वाद-मुद्दे निश्चित करण्यात येतात आणि त्या मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
(1) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी
केल्याचे सिध्द होते काय ? नाही.
(2) मुद्दा क्र.1 च्या अनुषंगाने तक्रारकर्ता अनुतोषास पात्र आहेत काय ? नाही.
(3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(5) प्रथमत: लवाद व प्रादेशिक कार्यक्षेत्र, ग्राहक व आवश्यक पक्षकार इ. बँकेच्या हरकतीच्या मुद्दयांची दखल घेतली असता त्यामध्ये तथ्य आढळत नाही. उभय पक्षांचा वाद-प्रतिवाद, ग्राहक संरक्षण अधिनियम, 2019 मध्ये नमूद तरतुदी व वरिष्ठ न्यायालयांनी व्यक्त केलेले न्यायिक तत्व पाहता प्रस्तुत प्रकरण निर्णयीत करण्यासाठी जिल्हा आयोगास बाध निर्माण होत नाही, या निष्कर्षाप्रत आम्ही येत आहोत.
(6) मुद्दा क्र. 1 ते 3 :- प्रामुख्याने, कै. नुरोद्दीन यांनी बँकेकडून वाहन कर्ज घेतले, ही मान्यस्थिती आहे. कर्ज देत असताना बँकेने कै. नुरोद्दीन यांच्या कर्ज खात्यातून रु.4,038/- आरोग्य विम्याकरिता वसूल केले, याबद्दल वाद नाही. बँकेचे कथन असे की, कै. नुरोद्दीन यांच्या विमापत्राची मुदत दि.13/8/2018 ते 12/8/2019 पर्यंत होती आणि त्यानंतर विमापत्राचे नुतनीकरण केले नाही. तसेच कै. नुरोद्दीन यांनी आरोग्य विमा व अपघाती विमा घेण्याकरिता कै. नुरोद्दीन यांनी एक वर्षाचा हप्ता भरलेला होता आणि त्याची विमा अनुसूची देण्यात आलेली होती.
(7) अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता कै. नुरोद्दीन यांच्या कर्ज परतफेडीच्या संपूर्ण कालावधीमध्ये बँकेने आरोग्य विमापत्र घ्यावे, अशी करारात्मक तरतूद दिसत नाही. कर्ज घेत असताना रु.4,038/- आरोग्य विम्याकरिता वसूल केले असले तरी तो संपूर्ण विमा कालावधीकरिता हप्ता होता, असे सिध्द होत नाही. आमच्या मते, तक्रारकर्ता यांनी त्यांच्या अनुतोष मागणीप्रमाणे ग्राहक तक्रार सिध्द होण्याकरिता पुरेसा पुरावा नाही. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना सेवा देण्यामध्ये त्रुटी केल्याचे सिध्द होत नसल्यामुळे तक्रारकर्ता अनुतोषास पात्र नाहीत. मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर नकारार्थी देऊन मुद्दा क्र.3 करिता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) ग्राहक तक्रार नामंजूर करण्यात येते.
(2) खर्चासंबंधी आदेश नाहीत.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-