(आदेश पारीत व्दारा - श्री नितीन मा. घरडे, मा. सदस्य)
(पारीत दिनांक : 9 मार्च 2017)
1. उपरोक्त नमूद दोन्ही तक्रारी या ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केली असून तक्रारीचे थोडक्यात स्वरुप असे आहे की,
2. तक्रारकर्ता यांनी चारचाकी गाडी घ्यावयाचे असल्या कारणास्तव विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांचेशी संपर्क साधला. विरुध्दपक्ष क्र.1 हे महाव्यवस्थापक, इरोज हुंदाई, गायञी सदन, घाट रोड नागपूर येथे असून, विरुध्दपक्ष क्र.2 हे महाव्यवस्थापक, हुंदाई इंडिया लिमिटेड, न्यु दिल्ली येथे अस्तित्वात आहे. विरुध्दपक्षाचे प्रतिनीधी दिनांक 22.4.2011 रोजी तक्रारकर्त्याचे घरी येवून त्यांना सुचना दिली की, उद्यापासून चारचाकी वाहन (I-10) याची किंमत वाढत आहे, करीता तुम्हीं आजच वाहनाची बुकींग करावी, असे तक्रारकर्त्याला प्रवृत्त केले व त्यामुळे तक्रारकर्ता यांनी रुपये 1,00,000/- चा धनादेश बुकींग म्हणून विरुध्दपक्षाचे प्रतिनीधी श्री प्रशांत बरबटकर व विक्रीप्रतिनीधी श्री ढोबळे, टीम लिडर श्री गगन यादव यांना धनादेश दिला, तसेच चारचाकी वाहन विकत घेण्यास एक्सचेंज बोनस देण्याचे कबूल केले होते. म्हणजेच जुने चारचाकी वाहन देवून नवीन चारचाकी वाहनाच्या किंमतीमध्ये बोनसची रक्कम कपात करण्याबाबत आश्वासन दिले होते. त्याचप्रमाणे तक्रारकर्ता यांनी I-10 ची रकमेपैकी उर्वरीत रक्कम रुपये 4,64,838/- तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडे भरले. या रकमेमध्ये इंशुरन्स व एक्सटेंडेड वाहनाची वॉरंटी सुध्दा होती. सदर व्यवहार करतांना विरुध्दपक्ष यांनी आश्वासीत केले होते की, नवीन I-10 चारचाकी वाहनासोबत उत्तम क्वॉलिटीचे म्हणजे रुपये 1950/- चे सीट कव्हर, तसेच वाहनाचे बॉडी कव्हर रुपये 1200/-, त्याचबरोबर कार परफ्युम व स्टेअरींग कव्हर सुध्दा द्यावे अशी तक्रारकर्त्याने इच्छा व्यक्त केली होती. त्याप्रमाणे विरुध्दपक्षाचे प्रतिनीधी सर्व गोष्टीस मान्य झाले होते. तक्रारकर्ता पुढे असे नमूद करतो की, तक्रारकर्त्याला नवीन I-10 चारचाकी गाडी ही दिनांक 6 मे रोजी म्हणजे ‘अक्षय तृतिया’ पर्वावर वाहनाची डिलीव्हरी करावयाची होती. डिलीव्हरी करण्यापूर्वी तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाचे प्रतिनीधी श्री ढोबळे यांना त्यांनी बुक केलेल्या गाडीची प्रत्येकवेळा विचारणा केली असता व तसेच गाडी बघण्याची इच्छा दर्शविली असता दिनांक 5.5.2011 पर्यंत कोणतेही उत्तर दिले नाही व दिनांक 5.5.52011 च्या राञी गाडीची डिलीव्हरी तक्रारकर्त्याला दुस-या दिवशी 12-00 वाजता पर्यंत देण्यात येईल असे सांगितले. तक्रारकर्ता 6 मे रोजी 12-00 वाजता शोरुममध्ये गेले असता, गाडीच्या डिलीव्हरीबाबत माहीती विचारली असता तुमची गाडी येत आहे थोडावेळ बसावे लागेल असे सांगितले. त्यानंतर, तक्रारकर्त्याला बराचवेळ वाट बघावी लागली व तक्रारकर्त्याने शेवटी आमची गाडी दाखवा असे म्हटल्यावर शोरुमच्या मागील यार्डमध्ये तक्रारकर्त्याला घेवून गेले. तक्रारकर्त्याने गाडीची पाहणी केली असता गाडीवर अतोनात धुळ, पाला-पाचोळा दिसला व गाडीची डिलीव्हरी 3-30 मि. च्या दरम्यान तक्रारकर्त्याला देण्यात आली. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाचे प्रतिनीधीने आश्वासीत केल्याप्रमाणे गाडीचे सीट कव्हर, स्टेअरींग कव्हर, गाडीचा बॉडी कव्हर मागितला असता सदर वस्तु ह्या गाडी बनविणारी कंपनी देत नाही. परंतु, तुम्हीं नंतर या तुम्हांला इतर वस्तु देण्यात येईल असे सांगितले. तक्रारकर्ता त्यानंतर सदर वस्तु घेण्याकरीता कंपनीच्या शोरुममध्ये गेला असता, अनेकदा सीट कव्हर बद्दल व इतर वस्तुबाबत बोलणी केली. परंतु, विरुध्दपक्षाने लोकल क्वॉलिटीचे व्यवस्थीत न बसणारे सीट कव्हर काही दिवसांनी दिले व तसेच हलक्या दर्जाचे बॉडी कव्हर तक्रारकर्त्याला दिले. परंतु स्टेअरींग कव्हर व इतर वस्तु दिल्या नाही व त्याची मागणी केली असता नंतर पुढच्या खेपेला देऊ असे सांगण्यात आले व त्याचबरोबर सीट कव्हर सुध्दा बदलवून देवून असे आश्वासन दिले. तक्रारकर्ता पुढे असे नमूद करतो की, तक्रारकर्ता बरोबर गाडी बुकींग करतांना दिलेल्या आश्वासनाचे पालन विरुध्दपक्षाने केले नाही, परंतु याउलट तक्रारकर्ता कंपनीच्या शोरुममध्ये आश्वासीत केलेल्या वस्तुची मागणी करावयास गेला असता त्याच्या मागणीची प्रतिनीधी टिंगल करु लागला व त्याचेशी व्यवस्थीत न बोलून त्याचा अवमान करु लागला. पुढे तक्रारकर्ता असे नमूद करतो की, याबाबत तक्रारकर्ता यांनी विरुध्दपक्ष क्र.2 महाव्यवस्थापक यांनी सदर बाबत पञ पाठवून त्याच्या प्रतिनीधीने आश्वासीत केल्याप्रमाणे पुर्तता केली नाही याबद्दल कळविले व त्याचबरोबर तक्रारकर्त्याला जुने वापरलेले वाहन दिले याबद्दल सुध्दा कळविले. परंतु, विरुध्दपक्ष क्र.2 यांनी दिलेल्या पञाचे कोणतेही प्रतीउत्तर तक्रारकर्त्याला प्राप्त झाला नाही, तसेच सीट कव्हर, स्टेअरींग कव्हर व बॉडी कव्हर हे सुध्दा आश्वासीत केल्याप्रमाणे उच्च दर्जाचे तक्रारकर्त्याला देण्यात आले नाही. तक्रारकर्त्याचे चारचाकी वाहनाची मुळ किंमत रुपये 4,37,949/- दिनांक 25.11.2011 पर्यंत होती, परंतु विरुध्दपक्षाच्या प्रतिनीधी यांनी एक्सचेंज बोनसचे नावाने खोटे आश्वासन देवून व तसेच वाहनाच्या किंमती वाढत आहे असे सांगून कंपनी व विक्रेता याचे संगणमताने स्किमच्या किंमती ठरवतील असे सांगून ते ग्राहकांना सुध्दा लुबाडतात व तक्रारकर्त्याकडून सुध्दा दिनांक 6.5.2012 रोजी रुपये 4,64,838/- वाहनाची किंमती घेतली. म्हणजेच तक्रारकर्त्याकडून अतिरिक्त किंमत रुपये 26,889/- जास्त वसूल करण्यात आली.
3. तक्रारकर्ता पुढे असे नमूद करतो की, तक्रारकर्ताबरोबर दिनांक 22.4.2011 रोजी ऑर्डर फॉर्म भरतांना प्रतिनीधीने बोनस देण्याचे कबूल केले होते, परंतु त्यानंतर ऑर्डर फॉर्मची प्रत (कार्बन कॉपी) काही दिवसांनी दिली व त्यावर नव्याने अटींची पुर्तता ही नंतर पेनाने लिहिल्या सारखे दिसते, म्हणजेच विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्याला एक्सचेंज बोनस देण्याचे प्रथम कबूल केले, परंतु त्यानंतर एक्सचेंज बोनस दिला नाही. याप्रकारे विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्याशी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब व सेवेत ञुटी दिल्याचे दिसून येते. सदर बाबत तक्रारकर्त्याला अतिशय शारिरीक व मानसिक ञास सहन करावा लागला. तसेच, वाहनाचे रजिस्ट्रेशन करीत एकूण रुपये 33,055/- तक्रारकर्त्याकडून घेण्यात आले, त्यामध्ये एजंट सर्वीस चार्जेसच्या नावावर रुपये 2250/- अतिरिक्त घेण्यात आले. या सर्व कारणास्तव तक्रारकर्त्याने झालेल्या नुकसान भरपाई घेण्याकरीता सदरची तक्रार मंचामध्ये दाखल करुन खालील प्रमाणे प्रार्थना केली आहे.
1) तक्रारकर्त्याला दिलेले चारचाकी वाहन हे डेंटींग पेटींग करुन दिल्याचे निष्पादीत झाल्याने वाहन बदलवून देण्यात यावे किंवा पैसे परत करण्याचे आदेशीत व्हावे.
2) विरुध्दपक्ष यांनी वाहनाच्या किंमतीपेक्षा जास्त घेतलेली रक्कम रुपये 26,889/- तक्रारकर्त्याला परत करण्याचे आदेशीत व्हावे.
3) तक्रारकर्त्याला विरुध्दपक्ष यांचे प्रतिनीधीने आश्वासीत केलेले रुपये 15,000/- एक्सचेंज बोनस परत तक्रारकर्त्याला देण्याचे आदेशीत व्हावे.
4) सीट कव्हर, बॉडी कव्हर, स्टेअरींग कव्हर याचे एकूण रुपये 3450/- विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास देण्याचे आदेशीत व्हावे.
5) एजंट सर्वीसच्या नावाने घेतलेली रक्कम रुपये 2250/- तक्रारकर्त्याला देण्याचे आदेशीत व्हावे.
6) तक्रारकर्त्यास झालेल्या शारिरीक व मानसिक ञासापोटी रुपये 30,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 7,000/- देण्याचे आदेशीत व्हावे.
4. तक्रारकर्त्यांच्या तक्रारीला अनुसरुन विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांना मंचाची नोटीस बजावण्यात आली. विरुध्दपक्ष क्र.1 यांनी मंचात उपस्थित होऊन तक्रारकर्त्याच्या तक्रारीला लेखीउत्तर सादर करुन नमूद केले की, तक्रारकर्त्याची सदरची तक्रार ही खोटी व बनावटी व पुर्वग्रह दुषित भावनेनी केलेली असून ती खारीज करण्यात यावी. तक्रारकर्ता विरुध्दपक्ष कंपनीला व त्याच्या अस्तित्वाला धोका पोहचविण्याच्या दृष्टीकोनातून दाखल केली आहे. तसेच, पुढे त्यांनी असे नमूद केले आहे की, तक्रारकर्ता यांनी दिनांक 22.4.2011 रोजी विरुध्दपक्ष क्र.2 चे मार्फत कंपनीच्या शोरुमला भेट दिली व त्यांनी वाहनाची संपूर्ण माहिती व गॅरंटी व वॉरंटी याबद्दल माहिती घेवून I-10 मॅग्मा 1.2 सिल्व्हर कलरची कार विकत घेण्याचे ठरविले. तसेच, ही बाब मान्य केले आहे की, तक्रारकर्त्याकडून रुपये 1,00,000/- चा धनादेश बुकींग म्हणून घेण्यात आला होता. परंतु, विरुध्दपक्षाने ही बाब अमान्य केली आहे की, त्याचे प्रतिनीधीने तक्रारकर्त्याला दुस-या दिवशी पासून वाहनाची किंमतीमध्ये वाढ होत आहे, त्यामुळे तुम्ही ताबडतोब वाहनाची बुकींग आजच करावी. तसेच, वाहनाची डिलीव्हरी देण्याकरीता तक्रारकर्त्याला 12-00 वाजता बोलाविले नव्हते त्यामुळे झालेल्या विलंबास विरुध्दपक्ष जबाबदार नाही. परंतु त्याचदिवशी 3-00 वाजता तक्रारकर्त्याला त्याचे वाहनाची डिलीव्हरी देण्यात आली. तसेच, ही बाब खोटी आहे की, तक्रारकर्त्याचे वाहन शोरुमचे गोडाऊन मध्ये असून ते धुळ व पाला-पाचोळा होता. तक्रारकर्त्याला वाहनासोबत इतर वस्तु देण्याचे कोणतेही आश्वासन दिले नव्हते. उदा. स्टेअरींग कव्हर, सीट कव्हर, बॉडी कव्हर, कार परफ्युम इत्यादी देण्याचे आश्वासन तक्रारकर्त्याला दिले नव्हते. तसेच, तक्रारकर्त्याकडून वाहनाची कोणतही अतिरिक्त रक्कम घेतलेली नाही व तक्रारकर्त्याला कोणत्याही प्रकारचा अपशब्ध्द शोरुममध्ये आले असता वापरला नाही. तक्रारकर्त्याची सदरची तक्रार खोटी, बिनबुडाची असून ती खारीज होण्यास पाञ आहे.
5. तक्रारकर्त्याने सदरच्या तक्रारीबरोबर 1 ते 9 दस्ताऐवज दाखल करुन त्यात प्रामुख्याने कार बुकींगची पोहचपावती, तक्रार उद्भवल्यामुळे विरुध्दपक्षाला पाठविलेले पञ, सॅटीसफॅक्शन रेटींग पञ, तक्रारीबाबत विरुध्दपक्षास दिलेले स्मरणपञ, व्दीतीय स्मरणपञ व अंतिम स्मरणपञ, प्राईज लिस्ट, कस्टमर ऑर्डर फॉर्म, शुल्काचे विवरण इत्यादी दस्ताऐवज दाखल केलेले आहो. विरुध्दपक्ष यांनी आपल्या उत्तराबरोबर कंपनी व डिलर यांचेशी झालेल्या करारनाम्याची प्रत, व दिनांक 2.4.2012 रोजी एक्सचेंज डिस्काउंड रद्द झाल्याबाबतचे पञ पाठविलेले आहे.
6. सदर प्रकरणात दोन्ही पक्षांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला. दोन्ही पक्षांनी अभिलेखावर दाखल केलेल्या दस्ताऐवजाचे अवलोकन करण्यात आले, त्याप्रमाणे खालील प्रमाणे मुद्दे व निष्कर्ष देण्यात येते.
मुद्दे : निष्कर्ष
1) तक्रारकर्ता हे विरुध्दपक्ष यांचे ग्राहक होतात काय ? : होय
2) विरुध्दपक्ष कंपनीकडून/डिलरकडून तक्रारकर्त्यास अनुचित : होय
व्यापारी प्रथेचा अवलंब अथवा सेवेत ञुटी दिल्याचे दिसून
येते काय ?
3) आदेश काय ? : खालील प्रमाणे
// निष्कर्ष //
7. तक्रारकर्त्यांची तक्रार थोडक्यात अशी आहे की, त्यांनी चारचाकी I-10 वाहन घ्यावयाचे होते, त्याकरीता त्याने विरुध्दपक्षाशी संपर्क साधला. यावरुन विरुध्दपक्षाच्या प्रतिनिधी यांनी तक्रारकर्त्याच्या घरी येवून वाहनाची किंमत वाढत आहे त्यामुळे तुम्हीं आज वाहनाची बुकींग करावी असे सुचीत केले व तसेच नवीन वाहनामध्ये जुने वाहन देवून एक्सचेंज बोनसची रक्कम देवून नवीन वाहनाच्या किंमतीतून ती वजा करण्यात येईल, असे सांगितले. त्याचबरोबर, नवीन वाहन घेतांना त्याचेबरोबर इतर वस्तु (Accessories) जसे, सीट कव्हर, स्टेअरींग कव्हर, बॉडी कव्हर, कार परफ्युम इत्यादी वस्तु नवीन वाहनाबरोबर देण्याची तक्रारकर्त्याने इच्छा दर्शविली, तेंव्हा विरुध्दपक्षाचे प्रतिनीधीने या वस्तु सुध्दा नवीन गाडीचे डिलीव्हरीसोबत तुम्हांला देऊ असे आश्वासन दिले. तक्रारकर्त्याला सदरचे वाहन दिनांक 6.5.2012 रोजी ‘अक्षय तृतिया’ च्या पर्वावर डिलीव्हरी हवी असल्या कारणास्तव त्यादिवशी तक्रारकर्ता 12-00 वाजता वाहनाची डिलीव्हरी करीता गेला, परंतु वाहनाची डिलीव्हरी उशिराने 3-30 वाजता देण्यात आली. तसेच, विरुध्दपक्षास वाहनाबद्दल माहिती विचारली असता, शोरुमच्या गोडाऊन मध्ये वाहन असल्याचे सांगितले व तेथे वाहनाची पाहणी केली असता वाहनावर धुळ, पाला-पाचोळा पडला होता. त्यामुळे तक्रारकर्त्याला संशय आहे की, विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला जुने वापरलेले वाहन दिले आहे, तसेच तक्रारकर्त्याकडून वाहनाच्या मुळ किंमतीपेक्षा अतिरिक्त रक्कम घेतली आहे व सर्वीस चार्जेसच्या नावावर पुन्हा रक्कम घेतली आहे. त्याचप्रमाणे तक्रारकर्त्याला एक्सचेंज बोनसची रक्कम नवीन गाडीच्या किंमतीतून वजा केलेली नाही. तसेच, तक्रारकर्त्याला सदर बाब माहिती विचारण्याकरीता विरुध्दपक्ष याचे शोरुममध्ये गेले असता व्यवस्थित वागणूक मिळाली नाही व तक्रारकर्त्याने विचारलेल्या प्रश्नाची टिंगलबाजी करुन त्याचा अवमान केला. सदर बाबत तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र.2 ला पञाव्दारे कळविले, परंतु विरुध्दपक्ष क्र.2 यांनी सुध्दा तक्रारकर्त्याचे तक्रारीला व पञाला कोणतेही उत्तर दिले नाही, करीता तक्रारकर्त्याने सदरची तक्रार दाखल केली आहे.
8. विरुध्दपक्ष यांनी आपल्या उत्तरात तक्रारकर्त्याची संपूर्ण तक्रारीतील मुद्दे हे अतिशय खोटे, बिनबुडाचे आहे, त्याकरीता तक्रार खारीज करावी, तसेच तक्रारकर्त्याला नवीन वाहन विकत घेतांना कोणतेही आश्वासन दिले नाही, तक्रारकर्त्याकडून कोणतीही अतिरिक्त रक्कम स्विकारली नाही किंवा तक्रारकर्त्याचे शोरुममध्ये आल्यावर कोणताही प्रकारचा अवमान केला नाही. तक्रारकर्त्याचे आरोप व प्रत्यारोप आपल्या उत्तरात खोडून काढले. तक्रारकर्त्याचा मुळ हेतु हा विरुध्दपक्ष कंपनी व डिलर यांची प्रतिष्ठा मलीन करण्याचा पूर्णपणे हेतु साधून, तसेच पैसे उकडण्याकरीता ही तक्रार दाखल केलेली आहे, करीता ती तक्रार खारीज होण्यास पाञ आहे असे नमूद केले आहे.
9. दोन्ही पक्षांनी सदरच्या तक्ररीत लेखी युक्तीवाद दाखल केला व दोन्ही पक्षाचे मंचासमोर तोंडी युक्तीवाद ऐकण्यात आला. तसेच तक्रारकर्त्याने सदरच्या तक्रारीमध्ये दाखल केलेल्या दस्ताऐवजाचे अवलोकन केले असता, असे दिसून येते की, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडून I-10 चारचाकी वाहन घेण्याकरीता बुकींग रक्कम विरुध्दपक्षाच्या प्रतिनीधीला दिली ती सुध्दा विरुध्दपक्षाने मान्य केली आहे व तसेच दाखल केलेल्या दस्ताऐवजाचे अवलोकन केले असता, एक्सचेंज बोनस रुपये 15,000/- व कार्पोरेट बेनिफीट रुपये 3000/- असे दस्ताऐवजावर नमूद आहे. तसेच दिनांक 22..4.2011 कस्टमर फॉर्मचे अवलोकन केले असता Item Description या रकाण्यात बॉडी कव्हर, सीट कव्हर, सन कंट्रोल फ्लीम, मॅटींग, मड फ्लॅप व इतर वस्तु 1 ते 9 या रकाण्यापर्यंत देण्यात येतील असे दिसून येते. त्याचबरोबर एक्सचेंज समोर ‘एस’ या शे-यावर मार्क केल्याचे दिसून येते. त्याचप्रमाणे तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्ताऐवज क्र.9 चे अवलोकन केले असता, एजंट सर्वीस चार्जेस या नावाखाली रुपये 2250/- आकारल्याचे दिसून येते. सदरचे दस्ताऐवजामध्ये Vehicle Inspection Fees रुपये 300/-, रजिस्ट्रेशन फी रुपये 350/- नमूद आहे. आर.टी.ओ. चार्जेस रुपये 30,150/- हे योग्य असल्याबाबत मंचाला वाटते. परंतु, एजंट सर्वीस चार्जेस रुपये 2250/- कोणत्या आधारावर आकारले याबाबतचा खुलासा विरुध्दपक्षाने दिला नाही. तसेच, वाहनाची मुळ किंमत व तक्रारकर्त्याने अतिरिक्त किंमत दिल्याचा दावा येथे नमूद केला आहे. त्याचा खुलासा विरुध्दपक्षाने आपल्या उत्तरात आणलेला नाही किंवा पुरावा आणला नाही. विरुध्दपक्ष यांनी दाखल केलेल्या एक्सचेंज बोनस न मिळणारे पञ दिनांक 2.4.2012 रोजी तक्रारकर्त्याला दिले आहे. त्याचे अवलोकन केले असता तक्रारकर्त्याने दस्ताऐवजाची पुर्तता न केल्या कारणास्तव त्यांना एक्सचेंज बोनस देता येणार नाही या बाबतचे आहे, परंतु तत्पूर्वी तक्रारकर्त्याला एक्सचेंज बोनस मिळण्याकरीता लागणा-या दस्ताऐवजाची पुर्तता करण्याबाबतचे कोणतेही पञ दिल्याबाबतचा पुरावा विरुध्दपक्षाने अभिलेखावर आणला असे दिसत नाही. यावरुन मंचाचे असे मत आहे की, तक्रारकर्त्याने वाहन घेतांना विरुध्दपक्षाकडून आश्वासीत झालेल्या वाहनाच्या Accessories ची वाहन बुकींग करतांना झालेल्या फॉर्ममध्ये (Customer Order Form) नमूद असल्याचे दिसून येते. परंतु, तक्रारकर्त्याला सदरच्या Accessories देवून तक्रारकर्त्याचे समाधान झाले व Accessories प्राप्त झाले याबाबतचे कोणतेही पञ किंवा फॉर्म विरुध्दपक्षाने सदरच्या प्रकरणामध्ये दाखल केला नाही. यावरुन ही बाब स्पष्ट होते की, तक्रारकर्त्याला सेवेत ञुटी व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब विरुध्दपक्षाकडून झालेला आहे. त्यामुळे तक्रारकर्ता हे शारिरीक व मानसिक ञासापोटी व विरुध्दपक्षाकडून अतिरिक्त घेतलेले पैसे परत घेण्यास पाञ आहे, असे मंचाला वाटते.
सबब, खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येते.
// अंतिम आदेश //
(1) तक्रारकर्त्यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्दपक्ष यांना आदेशीत करण्यात येते की, तक्रारकर्त्याला आश्वासीत केलेले Accessories उदा. सीट कव्हर, स्टेअरींग कव्हर, बॉडी कव्हर हे उच्च दर्जाचे त्यांना द्यावे, अन्यथा त्याची रक्कम रुपये 3,450/- तक्रारकर्त्याला द्यावी.
(3) तसेच विरुध्दपक्ष यांना आदेशीत करण्यात येते की, एक्सचेंज बोनसचे रुपये 15,000/- व वाहनाच्या किंमतीपेक्षा जास्ती घेण्यात आलेली रक्कम रुपये 26,889/- तक्रारकर्त्याला परत करावी. तसेच, एजंट सर्वीस चार्जेस या तत्वावर आकारलेली रक्कम रुपये 2250/- ही सुध्दा रक्कम तक्रारकर्त्याला परत करावी.
(4) तक्रारकर्त्यास झालेल्या शारिरीक व मानसिक ञासापोटी रुपये 3,000/- व तक्रार खर्च म्हणून रुपये 2,000/- द्यावे.
(5) विरुध्दपक्षाने आदेशाची पुर्तता निकालप्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आंत न केल्यास एकूण आदेशाचे रकमेवर 6 % टक्के व्याजाने तक्रारकर्त्याचे हाती रक्कम पडेपर्यंत आदेशाचे दिनांकापासून द्यावे.
(6) उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क पाठविण्यात यावी.
नागपूर.
दिनांक :- 09/03/2017