जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 104/2021. तक्रार दाखल दिनांक : 30/03/2021 तक्रार निर्णय दिनांक : 25/11/2021.
कालावधी : 00 वर्षे 07 महिने 26 दिवस
(1) श्रध्दा भ्र. साहेबराव मुस्कावाड, वय 34 वर्षे,
व्यवसाय : घरकाम, रा. आवलकोंडा, ता. उदगीर, जि. लातूर.
(2) प्रियंका पि. साहेबराव मुस्कावाड, वय 13 वर्षे, व्यवसाय : शिक्षण.
(3) अंकीत पि. साहेबराव मुस्कावाड, वय 8 वर्षे, व्यवसाय : शिक्षण.
तक्रारकर्ते क्र.2 व 3 अज्ञान असून त्यांची अ.पा.क. आई तक्रारकर्ती
क्र.1, सर्व रा. आवलकोंडा, ता. उदगीर, जि. लातूर. तक्रारकर्ते
विरुध्द
(1) महाव्यवस्थापक, दी ओरिएंटल इन्शुरन्स कं.लि.,
विभागीय कार्यालय नं.3, 321/ए/2, जवाहरलाल नेहरु रोड,
ओसवाल बंधू समाज बिल्डींग, दुसरा माळा, पुणे-411 042.
(2) व्यवस्थापक, जयका इन्शुरन्स ब्रोकरेज प्रा.लि., दुसरा मजला,
जयका बिल्डींग, कमर्शियल रोड, सिव्हील लाईन्स, नागपूर-440 001.
(3) व्यवस्थापक, दी ओरिएंटल इन्शुरन्स कं.लि.,
सिंध टॉकीजसमोर, सुभाष चौक, लातूर.
(4) तालुका कृषि अधिकारी, कृषि कार्यालय, येरमे नगर,
जळकोट रोड, उदगीर, जि. लातूर. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : मा. श्री. कमलाकर अ. कोठेकर, अध्यक्ष
मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
मा. श्रीमती रेखा जाधव, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- असिफ एम.के. पटेल
विरुध्द पक्ष क्र.1 व 3 यांचेकरिता विधिज्ञ :- एस.जी. डोईजोडे
विरुध्द पक्ष क्र.2 यांचेकरिता विधिज्ञ :- दिपक एम. परांजपे
न्यायनिर्णय
मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ता यांच्या ग्राहक तक्रारीचा आशय असा आहे की, महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व शेतक-यांचा गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत विरुध्द पक्ष क्र.1 व 3 विमा कंपनीकडे दि.8/12/2017 ते 7/12/2018 कालावधीकरिता विमा उतरविलेला होता. तक्रारकर्ती क्र.1 यांचे पती साहेबराव गुंडेराव मुस्कावाड (यापुढे संक्षिप्त रुपामध्ये 'मयत साहेबराव') यांचे नांवे मौजे आवलकोंडा, ता. उदगीर येथे जमीन गट क्र.50, क्षेत्र 5 हे. 78 आर. शेतजमीन होती. मयत साहेबराव व त्यांचे मित्र हे दि.24/10/2018 रोजी रात्री 8.00 वाजता जेवन करण्यासाठी गेले होते आणि लघुशंकेकरिता हॉटेलबाहेर आले असताना मयत साहेबराव यांना फाजीन पठाण व शाकेर हाशमी यांनी विनाकारण मारहाण केली. मयत साहेबराव यांना उपचाराकरिता रुग्णालयात नेले असता तपासणीअंती मयत घोषीत करण्यात आले. घटनेबाबत पोलीस ठाणे, उदगीर शहर येथे गुन्हा क्र.227/2018 नोंद करण्यात आला.
(2) तक्रारकर्ते यांचे पुढे असे कथन आहे की, मयत साहेबराव हे शेतकरी होते आणि विमा योजनेकरिता लाभार्थी होते. मयत साहेबराव यांच्या मृत्यूनंतर तक्रारकर्ते यांनी वारस व लाभार्थी नात्याने विरुध्द पक्ष क्र.4 यांच्याकडे सर्व कागदपत्रांसह विमा प्रस्ताव सादर केला. त्यानंतर विरुध्द पक्ष क्र.2 यांच्याकडे कार्यवाहीस्तव प्रस्ताव सादर करण्यात आला. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी सूचित केलेल्या त्रुटींची पूर्तता केली. परंतु फेब्रुवारी 2021 मध्ये ई-मेलद्वारे विमा प्रस्ताव नामंजूर केल्याचे कळविण्यात आले. अशाप्रकारे विरुध्द पक्ष यांनी अकार्यक्षम सेवा पुरविली असल्याच्या कारणास्तव तक्रारकर्ते यांनी प्रस्तुत तक्रारीद्वारे विरुध्द पक्ष यांच्याकडून रु.2,00,000/- विमा रक्कम अपघात तारखेपासून द.सा.द.शे. 15 टक्के व्याजासह देण्याचा, शारीरिक व मानसिक त्रासाकरिता रु.10,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.7,000/- देण्याचा विरुध्द पक्ष यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती केली आहे.
(3) विरुध्द पक्ष क्र.1 व 3 यांनी अभिलेखावर लेखी उत्तरपत्र सादर केले आहे. ग्राहक तक्रारीतील बहुतांश विधाने त्यांनी अमान्य करुन पुराव्याद्वारे सिध्द होणे आवश्यक असल्याचे नमूद केले. त्यांचे कथन आहे की, तक्रारकर्ते यांचा विमा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर मयत हे घटनेच्या वेळी दारुच्या नशेमध्ये होते आणि त्यांनी दारु प्राशन केली होती, असे व्हिसेरा रिपोर्टवरुन आढळून आले. हे कृत्य विमा पॉलिसीच्या अपवर्जन कलमामध्ये येत असल्यामुळे कागदपत्रांची शहानिशा करुन विमा दावा नामंजूर केला. त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी नाही. अंतिमत: तक्रार रद्द करण्यात यावी, अशी विनंती केली आहे.
(4) विरुध्द पक्ष क्र.2 यांनी अभिलेखावर लेखी निवेदन सादर केले आहे. त्यांच्याकडे प्राप्त होणा-या त्रुटीयुक्त विमा दाव्याची पूर्तता करुन घेऊन ते विरुध्द पक्ष क्र.1 व 3 यांच्याकडे पाठविण्यात येतात, असे त्यांचे कथन आहे. विमा कंपनी, तक्रारकर्ते व शासन यांच्यातील ते मध्यस्त म्हणून काम करतात. मृतकाचा मृत्यू दारुच्या प्रभावाखाली झाला असल्यामुळे दि.13/9/2021 रोजीच्या पत्राद्वारे विरुध्द पक्ष क्र.1 व 3 यांनी तक्रारकर्ती यांचा विमा दावा नामंजूर केला. त्यांनी त्यांची जबाबदारी त्वरीत व व्यवस्थित पार पाडली आहे आणि त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी नाही. अंतिमत: त्यांच्याविरुध्द तक्रारकर्ते यांची तक्रार रद्द करण्यात यावी, अशी विनंती केलेली आहे.
(5) विरुध्द पक्ष क्र.4 यांना जिल्हा आयोगाच्या सूचनापत्राची बजावणी होऊनही ते जिल्हा आयोगापुढे अनुपस्थित राहिले आणि लेखी उत्तरपत्र सादर केले नाही. त्यामुळे त्यांच्याविरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश पारीत करण्यात आले.
(6) उभय बाजुंचे निवेदन व पुरावे विचारात घेता, तसेच विधिज्ञांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायनिर्णयासाठी जिल्हा आयोगापुढे खालील मुद्दे विचारार्थ येतात आणि त्यावरील न्यायनिर्णय कारणमीमांसेसह पुढीलप्रमाणे देण्यात येतो.
मुद्दे उत्तर
(1) विरुध्द पक्ष क्र.1 व 3 यांनी तक्रारकर्ते यांचा विमा दावा नामंजूर
करुन सेवेमध्ये त्रुटी केल्याचे सिध्द होते काय ? होय.
(2) तक्रारकर्ते अनुतोषास पात्र आहेत काय ? होय.
(3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(7) मुद्दा क्र. 1 ते 3 :- गोपीनाथ मुंडे शेतकरी जनता अपघात विमा योजनेबाबत कृषि आयुक्त पुणे, विरुध्द पक्ष क्र.1 व विरुध्द पक्ष क्र.2 यांच्यामध्ये झालेले करारपत्र अभिलेखावर दाखल आहे. त्या अनुषंगाने गोपीनाथ मुंडे शेतकरी जनता अपघात विमा योजनेनुसार राज्यातील शेतक-यांना विमा कंपनीने अपघाती विमा संरक्षण दिल्याबाबत उभय पक्षांमध्ये वाद नाही. मयत साहेबराव यांचे नांवे मौजे आवलकोंडा, ता. उदगीर येथे भूमापन क्र.50, क्षेत्र 5 हे. 76 आर. शेतजमीन होती, असे दर्शविणारा 7/12 उतारा अभिलेखावर दाखल आहेत. यावरुन मयत साहेबराव हे शेतकरी होते, ही बाब स्पष्ट होते. अभिलेखावर दाखल करण्यात आलेला पोलीस जबाब, प्रथम माहिती अहवाल, घटनास्थळ पंचनामा, मरनोत्तर पंचनामा, अंतिम अहवाल ई. पोलीस कागदपत्रांचे अवलोकन केले असता मयत साहेबराव यांचा मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचे निदर्शनास येते. तसेच शवचिकित्सा अहवालाचे अवलोकन केले असता साहेबराव यांचा मृत्यू डोक्यास इजा झाल्यामुळे झाल्याचे दर्शवितो.
(8) मयत साहेबराव यांच्या मृत्यूनंतर तक्रारकर्ती क्र.1 यांनी गोपीनाथ मुंडे शेतकरी जनता अपघात विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी विरुध्द पक्ष क्र.4 यांच्याकडे विमा प्रस्ताव सादर केला आणि त्यानंतर तो विरुध्द पक्ष क्र.1 व 3 यांना प्राप्त झाला, ही बाब विवादीत नाही. त्यानंतर विरुध्द पक्ष क्र.1 व 3 यांनी तक्रारकर्ती क्र.1 यांचा विमा दावा नामंजूर केला, ही बाब विवादीत नाही.
(9) तक्रारकर्ती यांचा विमा दावा नामंजूर करण्याच्या विरुध्द पक्ष क्र.1 व 3 यांच्या कृत्याचे समर्थन करताना विरुध्द पक्ष क्र.1 व 3 तर्फे विधिज्ञांनी युक्तिवाद केला की, मयत साहेबराव हे घटनेच्या वेळी दारुच्या नशेमध्ये होते आणि त्यांनी दारु प्राशन केली असल्याचे व्हिसेरा रिपोर्टवरुन आढळून आले. हे कृत्य विमा पॉलिसीच्या अपवर्जन कलमामध्ये येत असल्यामुळे कागदपत्रांची शहानिशा करुन विमा दावा नामंजूर केला, असे निवेदन केले. उलटपक्षी, तक्रारकर्ता यांच्या विधिज्ञांनी युक्तिवाद केला की, मयत साहेबराव हे मद्याच्या अंमलाखाली असले तरी त्यांचा खुन झालेला आहे आणि असा दावा नामंजूर करुन विरुध्द पक्ष क्र.1 व 3 यांनी सेवेमध्ये त्रुटी निर्माण केलेली आहे.
(10) विरुध्द पक्ष क्र.1 व 3 यांच्या वतीने अभिलेखावर मयत साहेबराव यांचा व्हिसेरा रिपोर्ट दाखल केलेला आहे. त्यामध्ये अल्कोहोलबाबत विश्लेषण आढळून येते. तसेच विरुध्द पक्ष क्र.1 व 3 यांनी विमा करारपत्रातील अपवर्जन कलमाचा आधार घेतलेला आहे आणि ज्यामध्ये मद्याचा अंमल याबाबत उल्लेख निदर्शनास येतो.
(11) उभयतांचा वाद-प्रतिवाद, युक्तिवाद व कागदपत्रांचे अवलोकन केले असता मयत साहेबराव यांचा मृत्यू हा खुन झाला आणि खुनाच्या घटनेवेळी ते मद्याच्या अंमलाखाली होते, ही बाब स्पष्ट आहे. तसेच खुन ही बाब अपघात असल्याचे स्पष्ट आहे. तक्रारकर्ता यांच्यातर्फे मा. बॉम्बे उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाच्या 'लताबाई रावसाहेब देशमुख /विरुध्द/ स्टेट ऑफ महाराष्ट्र', 2019 (2) ALL MR 859 या न्यायनिर्णयाचा संदर्भ सादर करण्यात आला. मा. उच्च न्यायालयाच्या न्यायनिर्णयातील न्यायिक प्रमाण या प्रकरणामध्ये लागू पडते. मा. उच्च न्यायालयाने अशा प्रकारचा दावा नामंजूर केला जाऊ शकत नाही, असे तत्व विषद केले आहे.
(12) प्रस्तुत प्रकरणामध्ये मयत साहेबराव यांचा खुन झालेला आहे आणि मृत्यूवेळी ते मद्याच्या अंमलाखाली होते, असे दर्शविणारा कुठलाही पुरेसा पुरावा नाही. साहेबराव यांचा खुन असल्यामुळे घटनास्थळ व घटनेच्या वेळी असणारा घटनाक्रम महत्वपूर्ण आहे. अशा स्थितीमध्ये अनेक संभाव्यता येऊ शकतात. मयत साहेबराव हे नियमीत मद्य प्राशन करीत होते, असे कथन किंवा पुरावा नाही. तसेच त्यांनी स्वमर्जीने मद्य प्राशन केले, असेही निवेदन नाही. उक्त बाबींचा विचार विरुध्द पक्ष क्र.1 व 3 यांनी करणे आवश्यक होते. परंतु त्यांनी पॉलिसीतील कलमांचा आधार घेऊन तांत्रिक कारण देऊन विमा दावा नामंजूर केलेला असून जे गैर व अनुचित ठरते. जिल्हा आयोगाच्या मते अशा तांत्रिक बाबीचा आधार घेऊन तक्रारकर्ते यांना त्यांच्या विमा रक्कम मिळविण्याच्या हक्कापासून वंचित ठेवता येणार नाही. विरुध्द पक्ष क्र.1 व 3 यांनी विमा पॉलिसीचा सामाजिक व परोपकारी उद्देश समोर ठेवून विमा दाव्याबाबत विचार करावयास पाहिजे होता. परंतु विरुध्द पक्ष क्र.1 व 3 यांनी केवळ व्यवसायिक हेतू जपण्याचा प्रयत्न केलेला आहे. उपरोक्त विवेचनाअंती विरुध्द पक्ष क्र.1 व 3 यांनी तक्रारकर्ते यांचा विमा दावा नामंजूर करुन सेवेमध्ये त्रुटी केल्याचे सिध्द होते आणि तक्रारकर्ते हे विरुध्द पक्ष क्र.1 व 3 यांच्याकडून पॉलिसीनुसार देय विमा रक्कम मिळण्यास पात्र ठरतात, या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
(13) तक्रारकर्ते यांच्या मानसिक व शारीरिक त्रासासह तक्रार खर्चाकरिता मागणीचा विचार करता विरुध्द पक्ष क्र.1 व 3 यांनी तक्रारकर्ता यांना विमा रक्कम अदा न केल्यामुळे व विमा दावा नामंजूर केल्यामुळे तक्रारकर्ते यांना जिल्हा आयोगापुढे प्रस्तुत तक्रार दाखल करणे भाग पडले. अशा कायदेशीर कार्यवाहीकरिता विधिज्ञांचा सल्ला, सहायता, प्रकरण शुल्क इ. खर्चाच्या बाबी आहेत. तसेच ग्राहक तक्रार न्यायप्रविष्ठ असताना आर्थिक खर्च व वेळेचा अपव्यय होतो. योग्य विचाराअंती तक्रारकर्ते हे मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.5,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.3,000/- मिळण्यास पात्र ठरतात, या निर्णयाप्रत आयोग येत आहोत. वरील विवेचनाअंती मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देऊन खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) तक्रार अशंत: मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्द पक्ष क्र.1 व 3 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारकर्ते यांना विमा रक्कम रु.2,00,000/- आदेश प्राप्तीपासून 45 दिवसाच्या आत द्यावी. अन्यथा तक्रार दाखल तारखेपासून संपूर्ण रक्कम अदा करेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज देय राहील.
(3) विरुध्द पक्ष क्र.1 व 3 यांनी तक्रारकर्ते यांना शारीरिक व मानसिक त्रासाकरिता रु.5,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.3,000/- द्यावेत.
(4) उभय पक्षांना न्यायनिर्णयाची प्रथम प्रत नि:शुल्क द्यावी.
(श्रीमती रेखा जाधव) (श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्री. कमलाकर अ. कोठेकर)
सदस्य सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-
(संविक/श्रु/स्व/241121)