तक्रारदारातर्फे अॅड. श्री. करकंडे हजर.
जाबदेणार गैरहजर
द्वारा मा. श्री. व्ही. पी. उत्पात, अध्यक्ष
** निकालपत्र ** (01/03/2014)
प्रस्तुतची तक्रार ग्राहकाने जाबदेणार विद्युत मंडळाविरुद्ध ग्राहक संरक्षण कायदा, 1986 च्या कलम 12 नुसार दाखल केलेली आहे. त्यातील कथने खालीलप्रमाणे आहेत.
1] तक्रारदार या ज्येष्ठ नागरिक असून विधवा आहेत. त्या “गणेश प्रसाद”, तुळशीबागवाले कॉलनी, सहकारनगर नं. 2, पुणे – 9 येथील रहीवासी आहेत. त्या जाबदेणार यांच्या विद्युत वापरणार्या ग्राहक असून त्यांचा ग्राहक क्र. 170012749301 असा आहे व विद्युत मीटर क्र. 9000202568 असा आहे. तक्रारदार या घरगूती कामाकरीता विद्युत पुरवठा घेत आहेत व त्याचे बील नियमीतपणे भरते आहेत. आजतागायत त्यांनी विद्युत बील थकविलेले नाही. तक्रारदार व जाबदेणार यांच्यामध्ये ‘उपभोक्ता’ व ‘सेवा पुरवठा करणारी कंपनी’ असे नाते आहे. दि. 1/6/2011 रोजी तक्रारदार यांनी घरगुती वीजपुरवठा मागणीसाठी अर्ज केला होता. त्यानंतर दि.8/6/2011 रोजी सुरक्षिततेच्या कारणावरुन विद्युत मीटरची जागा बदलण्यासाठी अर्ज केला. त्यासाठी तक्रारदार यांनी अधिकृत कंत्राटदाराची नेमणुक केली व दि.23/9/2011 रोजी एक फेज मीटर काढून तीन फेज मीटर बसविणेबाबत व मीटरची जागा बदलणेबाबत केलेल्या अर्जाचे स्मरणपत्र पाठविले. जाबदेणार यांच्या आदेशानुसार लोड मंजूर करुन घेऊन तक्रारदार यांनी चलनाने रक्कम रु. 2,720/- भरले तसेच टेस्ट रिपोर्टही सादर केला. सध्याच्या मीटरची जागा ही अवघड ठिकाणी असल्यामुळे त्याठिकाणे जावून दरमहाच्या बीलाकरीता रिडींग घेणे शक्य होत नाही. त्याचप्रमाणे तक्रारदार यांचा सावत्र मुलगा अनधिकृतपणे घरी व्यवसाय करतो व त्याकामी तो तक्रारदार यांच्या विद्युत मीटरमध्ये फेरफार करण्याची शक्यता आहे. सदर मीटरची जागा बदलण्याकरीता तक्रारदार यांनी जाबदेणार यांचेकडे विनंती केली, त्यासाठी योग्य ती रक्कम भरुन पुर्तता केली, परंतु जाबदेणार यांनी तक्रारदार यांना योग्य सेवा न देऊन सेवेमध्ये त्रुटी निर्माण केलेली आहे. सदरची त्रुटी दूर व्हावी व नुकसान भरपाई मिळावी म्हणून तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केलेली आहे.
2] या प्रकरणात जाबदेणार क्र. 1, 2 व 4 हे नोटीस बजवूनही गैरहजर राहीले, त्यामुळे त्यांच्याविरुद्ध एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला. जाबदेणार क्र. 3 यांचेतर्फे अॅड. वाघ यांनी त्यांचे वकीलपत्र दाखल केले परंतु लेखी कैफियत किंवा कोणत्या कारणासाठी त्यांनी तक्रारदार यांना सेवा देण्यास नकार दिला याचे कारण दर्शविले नाही. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध विनाकैफियत चौकशीचे आदेश देण्यात आले.
3] तक्रारदार यांनी दाखल केलेले कागदपत्रे, लेखी व तोंडी युक्तीवाद यांचा विचार करता मंचाचे असे मत झाले आहे की, जाबदेणार यांनी तक्रारदार यांच्या विद्युत मीटरची जागा बदलण्याची विनंती विनाकारण फेटाळलेली आहे. सदरची बाब ही सेवेतील त्रुटी आहे, असे मंचाचे मत आहे. त्यामुळे तक्रारदार हे जाबदेणार यांचेकडून मीटरची जागा बदलून घेण्याच्या आदेशास पात्र आहेत. सबब, खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो.
** आदेश **
1. तक्रारदार यांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2. जाबदेणार यांनी तक्रारदार यांचे विद्युत मीटर शिफ्टिंग
न करुन सेवेमध्ये त्रुटी निर्माण केलेली आहे, असे
जाहीर करण्यात येते.
3. जाबदेणार यांना असा आदेश देण्यात येतो की, त्यांनी
या आदेशाची प्रत मिळाल्यापासून सहा आठवड्यांच्या
आंत तक्रारदार यांच्या विनंतीनुसार त्यांच्या विद्युत
मीटरची जागा बदलून द्यावी व तक्रारदार यांना मानसिक
व शारीरिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रक्कम
रु. 5, 000/- (रु. पाच हजार फक्त) आणि रक्कम
रु. 1,000/-(रु एक हजार फक्त) तक्रारीच्या खर्चापोटी
द्यावी.
5. आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात
यावी.
6. दोन्ही पक्षकारांना असे आदेश देण्यात येतात
की त्यांनी आदेशाची प्रत मिळाल्यापासून एक
महिन्याच्या आंत सदस्यांकरीता दिलेले तक्रारीचे
संच घेऊन जावेत, अन्यथा सदरचे संच नष्ट
करण्यात येतील.
स्थळ : पुणे
दिनांक : 01/मार्च/2014