Maharashtra

Bhandara

CC/21/27

रघुवीर श्रीराम टिचकुले. - Complainant(s)

Versus

महाराष्ट्रठ राज्य बियाने महामंडळ - Opp.Party(s)

कुमारी. सरिता पी.माकडे

08 Jul 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,BHANDARA
Near Akhil Sabhagruha, Ganeshpur Road,Bhandara
PINCODE-441904
 
Complaint Case No. CC/21/27
( Date of Filing : 17 Feb 2021 )
 
1. रघुवीर श्रीराम टिचकुले.
रा.गराडा खुर्द. तह.जि.भंडारा
भंंडारा
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. महाराष्ट्रठ राज्य बियाने महामंडळ
तह.जि.अकोला
अकोला
महाराष्‍ट्र
2. महा. राज्य् बियाने महामंडळ.
प्लॉ.ट. गडेगाव .महाबीज. पो.गडेगांव.तह.लाखनी. जि.भंडारा
भंडारा
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. BHASKAR B. YOGI PRESIDENT
 HON'BLE MR. NITIN M. GHARDE MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 08 Jul 2022
Final Order / Judgement

           (पारीत व्‍दारा श्री नितीन माणिकराव घरडे, मा.सदस्‍य)

                                                                             (पारीत दिनांक–08 जुलै, 2022)

   

 

 

01.  तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 2019 च्‍या कलम 35 खाली विरुध्‍दपक्ष क्रं-1  व क्रं-2  अनुक्रमे बियाणे निर्माता कंपनी व तिचे प्‍लॅन्‍ट  यांचे विरुध्‍द धानाचे निकृष्‍ट दर्जाचे बियाण्‍या मुळे त्‍याचे झालेल्‍या नुकसानीची भरपाई मिळण्‍यासाठी दाखल केलेली आहे.

 

 

02.  तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालील प्रमाणे-      

      तक्रारकर्ता हा व्‍यवसायाने शेतकरी असून त्‍याची शेती मौजा गराडा खुर्द तालुका जिल्‍हा भंडारा येथे आहे. यातील विरुध्‍दपक्ष क्रं 1 महाबीज बियाणे निर्माता महामंडळ असून विरुध्‍दपक्ष क्रं 2 त्‍यांचा गडेगाव येथील प्‍लॅन्‍ट आहे. तक्रारकर्त्‍यास त्‍याचे शेतात भाताचे पिकाची लागवड करावयाची असल्‍याने त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळ निर्मित धानाचे बियाणे वाण-DRK-II एकूण 03 बॅग रुपये-2030/- मध्‍ये विरुध्‍दपक्ष क्रं 2 प्‍लॅन्‍ट मधून  दिनांक-01.06.2020 रोजी खरेदी केले व बिल प्राप्‍त केले.  तसेच त्‍याने ईतरही बियाणे (श्रीराम) खरेदी केले. बियाणे खरेदी करते वेळी विरुध्‍दपक्षाचे प्‍लॅन्‍ट वर महाबीज यांचे प्रतिनिधी कु. पी.पी. बन्‍सोड मॅडम होत्‍या. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष महामंडळाचे निर्मित बियाणे खरेदी केले असल्‍याने तो विरुध्‍दपक्षांचा ग्राहक आहे. बियाणे खरेदी नंतर त्‍याने भात बियाणे वाण-DRK-II एकूण 03 बॅग आपल्‍या  02 एकर शेता मध्‍ये रोवणी करुन लावले, रोवणीसाठी त्‍याला रुपये-15,000/- तसेच निंदणासाठी रुपये-10,000/- आणि भातपिकावर खता साठी रुपये-10,000/- व रासायनिक  औषधांसाठी रुपये-10,000/-  खर्च आला. अशाप्रकारे शेतात भात पिकाची रोवणी, निंदण आणि रासायनिक खते व औषधांची पिकावर फवारणी करुन पिक वाढविले परंतु त्‍याचे असे लक्षात आले की, धान निसवीत असताना अर्धे धान हे वर जाऊन निसवून तयार होत होते व भात DRK-II हे खालीच असल्‍याचे दिसून आले होते त्‍यामुळे सदर बाब त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 2 यांना सांगितली व मोक्‍यावर येऊन  पिकाची  पाहणी  करावी  अशी  विनंती केली परंतु त्‍यांनी प्रतिसाद  दिला नाही. अशाप्रकारे विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्र 2  यांनी निकृष्‍ट दर्जाचे धानाचे बियाणे विक्री करुन त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली म्‍हणून शेवटी त्‍याने विरुध्‍दपक्षां  विरुध्‍द बियाणे तक्रार निवारण समिती, पंचायत समिती भंडारा यांचे कडे लिखित स्‍वरुपात  दिनांक-02.11.2020 रोजी तक्रार केली त्‍यानुसार  पंचायत समिती भंडारा यांनी तक्रारकर्त्‍यास दिनांक-03.11.2020 रोजी पत्र देऊन पाहणीचे वेळी उपस्थित राहण्‍यास सुचित  केले.

   

   तक्रारकर्त्‍याने  पुढे असे नमुद  केले की, तालुका तक्रार  निवारण  समितीने त्‍याचे शेतात प्रत्‍यक्ष दिनांक-04.11.2020 रोजी भेट देऊन विरुध्‍दपक्ष महाबीज निर्मित धान बियाणे DRK-II  या पिकाची  पाहणी केली. सदर  तक्रार निवारण समितीचे पाहणीचे वेळी कृषी विद्दापिठाचे शास्त्रज्ञ डॉ. एम.पी. मेश्राम, महाबीज प्रतिनिधी कु. पी.पी. बन्‍सोड,  कृषी अधिकारी,पंचायत समिती भंडारा तथा  सदस्‍य सचिव आणि तक्रारकर्ता उपस्थित होते. सदर तक्रार निवारण  समितीने पाहणी करुन दिलेल्‍या अहवालात विरुध्‍दपक्ष महाबीज निर्मित  भाताचे बियाण्‍याचे वाणात ईतर धानाच्‍या बियाण्‍याच्‍या भेसळीचे प्रमाण 11.98 टक्‍के असल्‍याचे नमुद केलेले आहे.

 

      त्‍याने पुढे असेही नमुद केले की, वर नमुद केल्‍या प्रमाणे त्‍याला पिकाचे लागवडी  करीता  रोवणी, निंदण,खत व औषधांसाठी रुपये-45,000/- खर्च आलेला  आहे.या शिवाय  त्‍याला कटाई खर्च रुपये-20,000/- आणि चुराई खर्च रुपये-10,000/- असे मिळून पिक लागवड व मशागतीसाठी एकूण रुपये-75,000/- खर्च आला.तालुकास्‍तरीय बियाणे  तक्रार निवारण समितीचे अहवालात अपेक्षीत उत्‍पादनात सरासरी 10 टक्‍के घट येण्‍याची शक्‍यता असल्‍याचे जरी नमुद केलेले असली तरी प्रत्‍यक्षात भात पिकाचे उत्‍पादनात सरासरी 25 टक्‍के एवढी घट झालेली आहे. त्‍याला दोन एकर मध्‍ये विरुध्‍दपक्ष महाबीज निर्मित भात DRK-II चे 10 क्विंटल धान झाले.  याउलट श्रीराम धानाचे एक एकर मध्‍ये 18 क्विंटल धान झाले. श्रीराम वाणाच्‍या तुलनेत विरुध्‍दपक्ष महाबीज निर्मित भात DRK-II चे उत्‍पन्‍नात 60 टक्‍के एवढी घट आली आणि सदर बाब धानाची मळणी केली असता त्‍याचे लक्षात आली. त्‍याचे कडे 02 एकर शेती असून त्‍याला रुपये-4,00,000/- उत्‍पन्‍न मिळते. परंतु  विरुध्‍दपक्ष महाबीज यांचे निर्मित भात बियाणे हे भेसळयुक्‍त असल्‍याने त्‍याचे फार मोठे अपेक्षीत उत्‍पन्‍नाचे आर्थिक नुकसान झाले. त्‍याचे आणि त्‍याचे कुटूंबाचे पालनपोषण हे सदर शेती मधून मिळणा-या उत्‍पना मधून होत असते परंतु विरुध्दपक्ष महाबीज निर्मित धानाचे बियाणे भेसळयुक्‍त असल्‍याने त्‍याचेवर उपासमारीची  वेळ आली आहे.  त्‍याने भेसळयुक्‍त बियाण्‍याची विक्री विरुध्‍दपक्षांनी केल्‍यामुळे विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2 यांना  अधिवक्‍ता सरीता माकडे  यांचे मार्फतीने दिनांक-05.12.2020 रोजीची कायदेशीर नोटीस रजिस्‍टरपोस्‍टाने  पाठविली सदर नोटीस दोन्‍ही विरुध्‍दपक्षांना मिळूनही  त्‍यांनी कोणतीही दखल घेतली नाही म्‍हणून शेवटी  त्‍याने  प्रस्‍तुत तक्रार   जिल्‍हा ग्राहक आयोगा  समक्ष दाखल करुन विरुध्‍दपक्ष क्रं 1 व विरुध्‍दपक्ष क्रं 2  बियाणेनिर्माता कंपनी यांचे  विरुध्‍द खालील प्रमाणे मागण्‍या केल्‍यात-

 

  1.  विरुध्‍दपक्ष क्रं 1  क्रं 2 महाबीज बियाणे  निर्माता कंपनी कडून खरेदी केलेल्‍या बियाण्‍याची किम्‍मत रुपये-2030/- आणि बियाणे लागवड व मशागतीचा खर्च रुपये-75,000/- अशा रकमा विरुध्‍दपक्षांनी परत करण्‍याचे आदेशित व्‍हावे.
  2. तक्रारकर्त्‍याला अपेक्षीत उत्‍पन्‍नाचे नुकसानी पोटी रुपये-4,00,000/- विरुध्‍दपक्षांनी देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

 

  1.  त्‍याला झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्‍हणून रुपये-30,000/- आणि प्रस्‍तुत तक्रारीचा खर्च रुपये-30,000/- विरुध्‍दपक्षांकडून मिळावा. या शिवाय योग्‍य ती दाद त्‍याचे बाजूने मंजूर करण्‍यात यावी.

 

 

03.  जिल्‍हा ग्राहक आयोग, भंडारा यांचे मार्फतीने विरुध्‍दपक्ष क्रं-1 महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळ मर्यादित, अकोला या बियाणे निर्माता कंपनीला आणि विरुध्‍दपक्ष क्रं 1 महाबीज निर्माता कंपनीचे प्‍लॅन्‍ट असलेल्‍या विरुध्‍दपक्ष क्रं 2 यांना नोटीस पाठविली असता जिल्‍हा व्‍यवस्‍थापक,महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळ मर्यादित, भंडारा यांनी उपस्थित होऊन विरुध्‍दपक्ष क्रं 1 व विरुध्‍दपक्ष क्रं 2 यांचेसाठी एकत्रीत लेखी उत्‍तर दाखल केले. त्‍यांनी लेखी उत्‍तरा मध्‍ये विरुध्‍दपक्ष हे DRK II या धान वाणाचे उत्‍पादन व विक्री करतात ही बाब मान्‍य केली. तक्रारकर्त्‍याने त्‍यांचे निर्मित सदर बियाणे दिनांक-01.06.2020 रोजी विकत घेतल्‍याची बाब मान्‍य केली. तक्रारकर्त्‍याचे म्‍हणणे की त्‍याला सदर भात बियाणे लागवडीचा व मशागतीचा एकूण खर्च रुपये-75,000/- आला ही बाब अमान्‍य असून सदरचा खर्च अवाढव्‍यरित्‍या वाढवून नमुद केलेला आहे त्‍यामुळे तो नामंजूर करण्‍यात येतो. तक्रारकर्त्‍याने त्‍याचे शेतात जे DRK II भाताचे बियाणे लावले, तयाची योग्‍य काळजी व देखभाल केलेली नाही तसेच विरुध्‍दपक्षाचे प्रतिनिधींनी दिलेल्‍या सुचनांचे पालन केले नाही, उलट त्‍यांचेशी वाद घालून तुमचे जवळ फक्‍त डिग्री आहे, प्रत्‍यक्ष काम करण्‍याचा अनुभव नाही असे म्‍हणून अपमानीत केले. तक्रारकर्त्‍याने जेंव्‍हा शेतात मळणी केली त्‍यावेळी कोणताही जबाबदार व्‍यक्‍ती तिथे उपस्थित नव्‍हता आणि अशा स्थिती मध्‍ये त्‍याने केलेले आरोप कि विरुध्‍दपक्षाचे  संपूर्ण धानच भेसळीचे होते हे योग्‍य त्‍या पुराव्‍या अभावी नामंजूर करण्‍यात येते. राष्‍ट्रीय शेती उत्‍पन्‍न प्रमाणिकरण कायदया प्रमाणे धानाचे एका एकरात 15 ते 17 क्विंटल सरासरी उत्‍पन्‍न येते. मात्र तक्रारकर्त्‍याने अपेक्षीत उत्‍पन्‍नाची नुकसानी मागताना कोणत्‍या उत्‍पन्‍नाचा आधार घेतला किंवा त्‍याचे मागणीस कोणता सांख्यिकीय आधार आहे  ही बाब पुराव्‍यानिशी सिध्‍द केलेली नाही. तक्रारकर्त्‍याची दिनांक-05.12.2020 रोजीची नोटीस प्राप्‍त झाल्‍या नंतर त्‍यास विरुध्‍दपक्षांनी रितसर उत्‍तर दिले. विरुध्‍दपक्षांना बदनाम करण्‍याचे हेतूने तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत खोटी तक्रार दाखल केली. आपले विशेष कथनात विरुध्‍दपक्षा व्‍दारे नमुद करण्‍यात आले की, विरुध्‍दपक्ष महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळ मर्यादित हे एक महाराष्‍ट्र शासनाचे अंगीकृत महामंडळ असून  ते मागील 44 वर्षा पासून बिना नफा या तत्‍वावर  शेतक-यांना गुणवत्‍तायुक्‍त दर्जेदार बियाणे पुरवितात. तक्रारकर्त्‍याला DRK II स्‍त्रोत बियाणे (Source Seed) पुरविण्‍यात आले होते. सदर बियाणे उत्‍पादन कार्यक्रम व विक्री करताना विरुध्‍दपक्ष संस्‍थेला  तसेच तक्रारकर्त्‍याला कृषी विभागा मार्फत वेळोवेळी निर्गमित करण्‍यात आलेल्‍या मार्गदर्शक सुचनांचे पालन करणे बंधनकारक आहे. त्‍या अनुषंगाने विरुध्‍दपक्षा तर्फे  ग्राम गराडा या गावातील ईतरही शेतक-यांना DRK II या भात वाणाचे बिजोत्‍पादन कार्यक्रमात समाविष्‍ट करण्‍यात आले होते व तसा करारनामा दिनांक-25.09.2020 रोजी ईतर शेतक-यां सोबत करण्‍यात आला होता.  सदर करारनाम्‍याच्‍या अट क्रं 6 प्रमाणे बिज प्रमाणिकरणाचे व महाबिजच्‍या प्रमाणित अथवा सत्‍यतादर्शक किंवा इतर प्रकारचे बियाणे उत्‍पादना संबधिचे प्रचलित मानका प्रमाणे व वेळोवेळी अमलात येणारे सर्व नियम पाळणे हे बिजात्‍पादकावर बंधनकारक राहिल,ही बाब तक्रारकतर्यास माहिती असताना सुध्‍दा त्‍याने विरुध्‍दपक्षाने दिलेल्‍या सुचनांचे पालन न करता स्‍वतःच्‍याच मताने बिजोत्‍पादन कार्यक्रम राबविण्‍याचा प्रयत्‍न केला तसेच बिजोत्‍पादन कार्यक्रमातील उत्‍पादीत कच्‍चे बियाणे ज्‍यावेळेस शेतात पेरणी केले जातात त्‍यावेळी सदर बिजाई मध्‍ये किलोच्‍या पाठीमागे 10 दाणे भेसळ येणे कायदया प्रमाणे अपेक्षीत असते आणि त्‍यामुळे विरुध्‍दपक्ष महामंडळाचे प्रतिनिधी हे वेळोवेळी बिजोत्‍पादक शेतक-यांच्‍या शेतास भेट देऊन त्‍यांना भेसळ काढण्‍यासाठी निर्देश देत असतात, जेणे करुन उत्‍पादनाअंती आलेले बियाणे हे पायाभूत/प्रमाणित/सत्‍यतादर्शक दर्जाचे असे सर्व कसोटी मध्‍ये पास झाले पाहिजे, त्‍या करीता विरुध्‍दपक्ष सस्‍था ही बिजोत्‍पादकाला प्रोत्‍साहन राशी म्‍हणून त्‍या आर्थिक वर्षात  कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या त्‍या बिजाईच्‍या दराचे सरासरी वर 20 टक्‍के प्रोत्‍साहन राशी अधिक प्रती क्विंटल रुपये-35/- प्रमाणे चांगल्‍या  बियाण्‍यावर प्रोत्‍साहन राशी  अधिक प्रती क्विंटल रुपये-35/- प्रमाणेपास बियाण्‍यांवर वाहतुक राशी अशी रक्‍कम देण्‍यात येते. यामागचा उद्देश्‍य हाच आहे की, संबधित शेतक-याला जास्‍तीत जास्‍त नफा मिळविता यावा. मात्र या प्रकरणात तक्रारकर्ता यांनी स्‍वतःच करारनाम्‍याचा भंग केला असून विरुध्‍दपक्षाचे नुकसान केलेले आहे.  विरुध्‍दपक्षां तर्फे पुढे असेही नमुद करण्‍यात आले की, ज्‍यावेळी बिजोत्‍पादक शेतकरी हा विरुध्‍दपक्ष संस्‍थेशी बिजोत्‍पादनाचा करारनामा करतो त्‍यावेळी तो शेतकरी विरुध्‍दपक्ष संस्‍थेला अशी हमी देतो की, तो बिजोत्‍पादक आणि विरुध्‍दपक्ष महाबीज बियाणे निर्माता कंपनी यांचे मध्‍ये झालेल्‍या  करारा संबधात अथवा कराराचे  अमलबजावणी बाबत काही वाद उदभविलयास आर्बिट्रेशन अॅक्‍ट 1996 अंतर्गत आर्बिट्रेटर सक्षम अधिकारी तथा व्‍यवस्‍थापकीय संचालक, महाबीज अकोला यांचे समोर वादाचे निराकरण करेल.  परंतु तक्रारकर्त्‍याने स्‍वतःच कराराचा भंग केलेला आहे. तक्रारकर्त्‍यास त्‍याचे मध्‍ये आणि विरुध्‍दपक्षां मध्‍ये काही  वाद निर्माण झाल्‍यास तो सोडविण्‍यासाठी प्रकरणात आर्बिट्रेशनची तरतुद आहे ही बाब माहित असताना देखील त्‍याने  जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष प्रस्‍तुत खोटी तक्रार दाखल केली. सबब प्रस्‍तुत तक्रार खर्चासह खारीज व्‍हावी अशी विनंती विरुदपक्षांनी केली.

 

04.  तक्रारकर्त्‍याची तक्रार, त्‍याने दाखल केलेले दस्‍तऐवज, विरुध्‍दपक्ष क्रं-1 व क्रं- 2  महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळ मर्यादित या बियाणे निर्माता कंपनी व विरुध्‍दपक्ष क्रं 2 महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळ यांचा प्‍लॅन्‍ट  यांचे एकत्रीत लेखी उत्‍तर तसेच तक्रारकर्त्‍याचा शपथे वरील पुरावा आणि विरुध्‍दपक्ष क्रं 1 बियाणे निर्माता कंपनी तर्फे जिल्‍हा व्‍यवस्‍थापक, भंडारा यांनी दाखल केलेला शपथे वरील पुरावा ईत्‍यादीचे जिल्‍हा ग्राहक आयोगा तर्फे अवलोकन करण्‍यात आले. प्रस्‍तुत तक्रारी मध्‍ये तक्रारकर्त्‍या तर्फे वकील श्रीमती सरीता माकडे यांचा मौखीक युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला त्‍यावरुन जिल्‍हा ग्राहक आयोगा समोर तक्रारीचे न्‍यायनिवारणार्थ खालील मुद्दे उपस्थित होतात-

  

 

अक्रं

मुद्या

उत्‍तर

1

तक्रारकर्त्‍यास विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2 महाबीज निर्मित निकृष्‍ट दर्जाचे धान बियाण्‍याची विक्री केल्‍याची बाब पुराव्‍यानिशी सिध्‍द झालेली  आहे काय ?

-होय-

 

 

2

निकृष्‍ट दर्जाच्‍या धान बियाण्‍यामुळे झालेल्‍या पिकाची नुकसान भरपाई मिळण्‍यास तक्रारकर्ता पात्र आहे काय

-होय-

3

काय आदेश?

अंतिम आदेशा नुसार

 

 

                                                                            :: निष्‍कर्ष ::

मुद्दा क्रं 1 बाबत

 

05.    तक्रारकर्त्‍याचे विरुध्‍दपक्ष क्रं 1 महाबीज  निर्मित DRK II जातीच्‍या धान पिकाचे निकृष्‍ट दर्जाचे  बियाण्‍या संबधात केलेल्‍या तक्रारीचे अनुषंगाने तालुकास्‍तरीय बियाणे तक्रार निवारण समितीच्‍या वतीने प्रत्‍यक्ष मोका पाहणीचे वेळी विरुध्‍दपक्ष क्रं-1 महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळ मर्यादित अकोला या धान बियाण्‍याचे निर्माता कंपनीस नोटीस देऊन उपस्थित राहण्‍यास सुचित केले होते. सदर  तक्रार निवारण समितीने दिनांक-04.11.2020 रोजी तक्रारकर्त्‍याचे शेतास प्रतयक्ष भेट दिली. सदर तक्रार निवारण समितीचे  पाहणीचे वेळी कृषी विद्दापिठाचे शास्त्रज्ञ डॉ. एम.पी. मेश्राम, महाबीज प्रतिनिधी कु.  पी.पी. बन्‍सोड,   कृषी अधिकारी,पंचायत समिती भंडारा तथा  सदस्‍य सचिव आणि तक्रारकर्ता उपस्थित होते असे अहवालावरील स्‍वाक्षरी वरुन दिसून येते. . सदर तक्रार निवारण  समितीने पाहणी करुन दिलेल्‍या अहवालात विरुध्‍दपक्ष महाबीज निर्मित  भाताचे बियाण्‍याचे वाणात भेसळीचे प्रमाण 11.98 टक्‍के असल्‍याचे नमुद केले.  सदर अहवाला मध्‍ये तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष महाबीज निर्मित DRK II जातीचे धानाचे बियाणे दिनांक-01.06.2020 रोजी 30 किलो खरेदी केले व तेवढेच बियाणे शेतात वापरले. बियाण्‍याचे लागवड क्षेत्र 1  हेक्‍टर 20 आर व बाधीत क्षेत्र 1 हेक्‍टर 20 आर नमुद केलेले असून पेरणी      दिनांक-20.06.2020 रोजी टोचून पध्‍दतीने केल्‍याचे नमुद आहे तसेच सिंचनाची सुविधा तलावा मधून केलेली आहे असे नमुद आहे. सदर अहवाला मध्‍ये पिकास रासायनिक खते दिल्‍याची व कोळपणी केल्‍याचे सुध्‍दा नमुद केलेले आहे. सदर अहवालात पुढे असे नमुद आहे की, उत्‍पादनाच्‍या गुणवत्‍तेत फरक असून मुख्‍य भात पिक व भेसळ दाण्‍यात फरक आहे. सदर अहवाला मध्‍ये तक्रारकर्ता आणि विरुध्‍दपक्ष  महाबीज निर्माता कंपनीचे प्रतिनिधी तथा बियाणे विक्रेता यांची स्‍वाक्षरी आहे. तालुका स्‍तरीय बियाणे तक्रार निवारण समितीने आपल्‍या अहवाला मध्‍ये खालील निरिक्षणे व निष्‍कर्ष नोंदविला-

    मुख्‍य भात पिक महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळ मर्यादित अकोला गडेगाव प्‍लॅन्‍ट भंडारा निर्मित DRK II  लागवड केलेलया प्रक्षेत्राची पाहणी केली असता मुख्‍य पिकात त्‍याच पिकाचे इतर वाणाचे धानाच्‍या लोंबी निसावलेलया स्थितीत आढळले. मुख्‍य भात पिक वाण DRK II लागवड केलेल्‍या प्रक्षेत्राची पाहणी केली असता 1X1 मीटर क्षेत्रात एकूण 5.88 टक्‍के धानाची लोंबी हे इतर वाणाचे असल्‍याचे निदर्शनास आले. मुख्‍य भात पिक वाण DRK II    व्‍यतिरिक्‍त मध्‍यम दाणा लांब व टोकावर लांब असल्‍याचे निदर्शनास आले. तसेच दुस-या 1X1 मीटर क्षेत्रात  एकूण 18.09 टक्‍के धानाची लोंबी हे इतर वाणाचे असल्‍याचे निदर्शनास आले. एकूण सरासरी 11.98 टक्‍के मुख्‍य भात पिक वाण DRK IIव्‍यतिरिक्‍त भात पिकाचे इतर वाणाची भेसळ आढळली त्‍यामुळे शेतक-याचे मालाचे गुणवत्‍ते मध्‍ये  व उतपादनात  घट अपेक्षीत आहे. सरासरी 10 टक्‍के उत्‍पादनात घट अपेक्षीत येण्‍याची शक्‍यता आहे असे अहवालात नमुद आहे. सदर शासना मार्फत गठीत केलेल्‍या स‍मीती मध्‍ये कृषी क्षेत्रातील तज्ञ व्‍यक्‍तींचा समावेश असून त्‍यांनी दिलेल्‍या अहवालावर अविश्‍वास दाखविण्‍याचे कोणतेही प्रयोजन जिल्‍हा ग्राहक आयोगास दिसून येत नाही त्‍यामुळे समितीचे अहवाला वरुन तक्रारकर्त्‍यास विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2 महाबीज व्‍दारे विक्री केलेले मुख्‍य धान पिक वाण DRK II  हे भेसळयुक्‍त  निकृष्‍ट दर्जाचे  बियाणे असल्‍याची बाब सिध्‍द होते करीता मुद्दा क्रं 1 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी” नोंदवित आहोत.

 

06.  विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2  बियाणे विक्रेता कंपनी यांनी लेखी उत्‍तरात असे नमुद केले की,  विरुध्‍दपक्ष महाबीजचे प्रतिनिधी यांचे पाहणी खाली संबधित शेतक-याचे शेतात महाबीज निर्मीत बियाण्‍यांची पेरणी करुन बिजोत्‍पादन कार्यक्रम घेतल्‍या जातो आणि जेणे करुन उत्‍पादना अंती आलेले बियाणे हे पायाभूत/प्रमाणित/सत्‍यतादर्शक दर्जाचे असे सर्व कसोटी मध्‍ये पास झाले पाहिजे, त्‍या करीता विरुध्‍दपक्ष सस्‍था ही बिजोत्‍पादकाला प्रोत्‍साहन राशी सुध्‍दा देते परंतु तक्रारकर्त्‍याने धान पिकाची लागवड करताना विरुध्‍दपक्ष महाबीजचे प्रतिनिधी यांनी दिलेल्‍या सुचनांचे पालन केले नाही तसेच पिकाची योग्‍य काळजी घेतली नाही.

 

   या आक्षेपाचे संदर्भात जिल्‍हा ग्राहक आयोगा तर्फे स्‍पष्‍ट करण्‍यात येते की, तालुकास्‍तरीय तक्रार निवारण समितीने तक्रारकर्त्‍याचे शेतात दिनांक-04.11.2020 रोजी प्रत्‍यक्ष मोका पाहणी करुन निरीक्षणे नोंदविलीत, त्‍यामध्‍ये तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष महाबीज निर्मित DRK II जातीचे धानाचे बियाणे दिनांक-01.06.2020 रोजी 30 किलो खरेदी केले व तेवढेच बियाणे शेतात वापरले. लागवड क्षेत्र 1  हेक्‍टर 20 आर नमुद केलेले असून  बाधीत क्षेत्र हे 1  हेक्‍टर 20 आर नमुद केलेले आहे. पेरणी दिनांक-20.06.2020 रोजी टोचून पध्‍दतीने केल्‍याचे नमुद  केलेले आहे तसेच सिंचनाची सुविधा तलावा मधून केलेली आहे असे नमुद आहे. सदर अहवाला मध्‍ये पिकास रासायनिक खते दिल्‍याची व कोळपणी केल्‍याचे सुध्‍दा नमुद केलेले आहे. तालुकास्‍तरीय बियाणे तक्रार निवारण समितीचे अहवाला मध्‍ये मुख्‍य भात पिक वाण DRK II लागवड केलेल्‍या प्रक्षेत्राची पाहणी केली असता 1X1 मीटर क्षेत्रात एकूण 5.88 टक्‍के धानाची लोंबी हे इतर वाणाचे असल्‍याचे निदर्शनास आले. तसेच दुस-या 1X1 मीटर क्षेत्रात  एकूण 18.09 टक्‍के धानाची लोंबी हे इतर वाणाचे असल्‍याचे निदर्शनास आले. एकूण सरासरी 11.98 टक्‍के मुख्‍य भात पिक वाण DRK II    व्‍यतिरिक्‍त भात पिकाचे इतर वाणाची भेसळ आढळली त्‍यामुळे शेतक-याचे मालाचे गुणवत्‍ते मध्‍ये  व उतपादनात  घट अपेक्षीत आहे. सरासरी 10 टक्‍के उत्‍पादनात घट अपेक्षीत येण्‍याची शक्‍यता आहे असे अहवालात नमुद आहे. सदर अहवाला वरुन  विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2 निर्मित DRK II धानाचे बियाणे हे  भेसळयुक्‍त निकृष्‍ट दर्जाचे होते असा अर्थ काढण्‍यास जिल्‍हा ग्राहक आयोगास कोणतीही अडचण निर्माण होत नाही. त्‍यामुळे धानाचे वाणाची उगवण जरी पूर्णपणे झाली तरी धानाचे पिकामध्‍ये  घट आल्‍याचे जेंव्‍हा तक्रारकर्त्‍याचे लक्षात आले की, त्‍यावेळेस त्‍याने तक्रार निवारण समिती, पंचायत समिती भंडारा यांचे कडे लेखी तक्रार केली. उपरोक्‍त नमुद विवेचना वरुन विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2 बियाणे निर्माता कंपनी यांनी त्‍यांचे लेखी उत्‍तरा मध्‍ये घेतलेल्‍या आक्षेपां मध्‍ये जिल्‍हा ग्राहक आयोगास फारसे तथ्‍य दिसून येत नाही.

 

 

07.   जिल्‍हा ग्राहक आयोगा तर्फे खालील नमुद  मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाचे निवाडयांवर भिस्‍त ठेवण्‍यात येत आहे-

 

  1.           Hon’ble National Consumer Commission, New Delhi- “ Kanta Kantha Rao- Verus-Y.Surya Narayana” (2017) CJ 619 (N.C.)- Revision Petition Nos.1008,1009 and 1010 of 2017 Decided on 03-05-2007

 

        Petitioner had never filed any objections to report of Scientist nor did not file any application under Section 13 (1) (c) requesting for sample seeds to be sent to appropriate laboratory for testing. Petitioner could have sent sample for testing to laboratory which it had failed to do so. Revision Petitions dismissed.

                            *****

 

  1.       Hon’ble National Consumer Commission, New Delhi- “ Dharam Pal & Sons- Verus-Som Prakash” (2014) CJ 666 (N.C.)- Revision Petition No.-4672 of 2012 Decided on 08-05-2014

 

            We have perused the evidence on record, the report submitted by the Committee constituted by the Deputy Director, Agriculture, Sirsa. Thus, as per the report, it is clear that the Complainant had suffer his paddy crop, to the extent of 50%, on account of substandard quality of seeds sold to him by the Ops. Revision Petition dismissed.

                       *****  

 

 

  1.     Hon’ble National Consumer Commission, New Delhi- “ National Seeds Corporation Ltd.- Verus-Abdul Azia Fakir Mohd. Inamdar & Another” (2009) CJ 518 (N.C.)- Revision Petition No.-1227 of 2004 Decided on 19-01-2009

 

            In view of report of District Seeds Complaint Enquiry Committee seeds supplied to complainant were defective and a wrong representation had been made to complainant that seeds were certified and were having 85% germination capacity. Revision Petition dismissed.

                       *****

 

  1.      Hon’ble National Consumer Commission, New Delhi- “ Maharashtra State Seeds Corporation Ltd.- Verus-Arvind Bajirao Borkar &Others” (2014) CJ 35 (N.C.)- Revision Petition No.-1412 of 2013 Decided on 06-09-2013

There is nothing on record to show that at the time of preparation of Panchanama made  by  District Seeds Complaint Enquiry Committee, representative of petitioners ever objected to same. As per Panchanama 50% of seeds were infected.

                              *****

 

  1.       Hon’ble National Consumer Disputes Redressal

 Commission, New Delhi- “ Western Agri Seeds Pvt.Ltd. & Others -Verus-K. Murlidhar Reddy & Others” (2015)CJ 920(N.C.)

 

                           *****

 

 

  1.      Hon’ble National Consumer Disputes Redressal Commission, New Delhi- “ Indian Farmers Fertilizers Co-operative Ltd. -Verus-Vijay Kumar And Another” (2018)CJ 861 (N.C.)

 

सदर न्‍यायनिवाडया मध्‍ये मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाने असे नमुद केलेले आहे की, “If despite all efforts made by the farmer, there is no flower and foliage in as many as 60-70% of the plants, it is obvious that there was some adulteration in the seeds.  The team of the Agriculture Department also noted in this regard that there was a mixture of Gwar seeds shown to it. Therefore, there is no reason to discard the report prepared by the officers of the Agriculture Department”.

   सदर मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाचे निवाडयामध्‍ये स्‍पष्‍टपणे नमुद आहे की, शेतक-याने पिक लागवडीसाठी सर्व प्रकारचे प्रयत्‍न केल्‍या नंतरही 60 ते 70 टक्‍के झाडांना फुले व बोंडे आलेले नाहीत आणि बियाणे भेसळयुक्‍त असल्‍याचा अहवाल कृषी अधिकारी यांचे समीतीने दिलेला असून सदर अहवाल अमान्‍य करण्‍याचे कोणतेही प्रयोजन नाही.

                                        ******

 उपरोक्‍त नमुद मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाचे न्‍यायनिवाडे आमचे समोरील हातातील प्रकरणात तंतोतंत लागू पडतात  असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे  मत आहे.

      *****

  

 

08.       आमचे समोरील हातातील प्रकरणात सुध्‍दा तालुका स्‍तरीय बियाणे तक्रार समितीने दिलेल्‍या अहवाला मध्‍ये विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2 महाबीज निर्मीत मुख्‍य भात पिक वाण DRK II लागवड केलेल्‍या प्रक्षेत्राची पाहणी केली असता 1X1 मीटर क्षेत्रात एकूण 11.98 टक्‍के धानाची लोंबी  इतर वाणाची
असल्‍याचे निदर्शनास आले. मुख्‍य भात पिक वाण DRK II व्‍यतिरिक्‍त मध्‍यम दाणा लांब व टोकावर लांब असल्‍याचे निदर्शनास आले. त्‍यामुळे शेतक-याचे मालाचे गुणवत्‍ते मध्‍ये  व उत्‍पादनात  सरासरी 10 टक्‍के उत्‍पादनात घट अपेक्षीत येण्‍याची शक्‍यता आहे असे नमुद केलेले आहे. तालुकास्‍तरीय बियाणे तक्रार निवारण समितीचे अहवालावरुन  ही बाब स्‍वयंस्‍पष्‍ट होते की, विरुध्‍दपक्ष महाबीज निर्मीत मुख्‍य भात पिकाचे वाण DRK II सोबत इतर वाणाचे 11.98 टक्‍के बियाणे दिसून आल्‍याचे अहवाला मध्‍ये नमुद असल्‍यामुळे तक्रारकर्त्‍यास विक्री केलेले  बियाणे या मध्‍ये अन्‍य वाणाच्‍या बियाण्‍याची भेसळ असल्‍यामुळे सरासरी 10 टक्‍के अपेक्षीत उत्‍पादनात घट येण्‍याची शक्‍यता आहे.

 

    तक्रारकर्त्‍याने तक्रारीत असे नमुद केले आहे की, त्‍याला अपेक्षीत उत्‍पादनाच्‍या 25 टक्‍के एवढी घट आलेली आहे परंतु तालुका बियाणे तक्रार निवारण समीतीने दिलेला अहवाल कृषी तज्ञांनी दिलेला अहवाल असून तो जास्‍त विश्‍वासदर्शक आहे असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे. तक्रारकर्त्‍याला अपेक्षीत उत्‍पादनाच्‍या 25 टक्‍के घट आली या बद्दल स्‍पष्‍ट असा पुरावा आमचे समोर आलेला नाही.  

 

 

09.   या व्‍यतिरिक्‍त जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण आयोगा तर्फे खालील मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाचे निकालावर आणि मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाचे निवाडयांवर भिस्‍त ठेवण्‍यात येते-

 

  1. Hon’ble Supreme Court of India-  H.N.S.Shastry- Verus-“Asstt. Director Agriculture” (2004 (4) Mh.L.J.- (Page No.-838 to 841) Civil Appeal No. 2253 of 1999 decided on 06-05-2004

 

सदर न्‍यायनिवाडया मध्‍ये मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाने असे नमुद केलेले आहे की, Under Section 14(1) of the Consumer Protection Act, 1986, if the District Forum is satisfied that the goods complained against suffer from any defect, it could grant reliefs which include return of the price of the paddy and also compensation to the consumer for any loss suffered. Granting of relief to the consumer does not depend upon whether he should have made alternative arrangement. In the present case, it was enough for the appellant to establish that the paddy seeds supplied by the respondent were defective.  

     आमचे समोरील हातातील प्रकरणात सुध्‍दा तालुकास्‍तरीय बियाणे तक्रार निवारण समितीचे अहवालावरुन  ही बाब स्‍वयंस्‍पष्‍ट होते की, विरुध्‍दपक्ष महाबीज निर्मीत मुख्‍य भात पिकाचे वाण DRK II सोबत इतर वाणाचे 9.97 टक्‍के बियाणे दिसून आल्‍याचे नमुद  असून अन्‍य वाणाच्‍या बियाण्‍याची भेसळ असल्‍यामुळे सरासरी 10 टक्‍के अपेक्षीत उत्‍पादनात घट येण्‍याची शक्‍यता आहे, त्‍यामुळे सदर मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाचा निवाडा हातातील प्रकरणात तंतोतंत लागू पडतो असे आमचे मत आहे.

******

 

(II)    Hon’ble National Consumer Disputes Redressal Commission, New Delhi- “ Avon Beej Company- -Verus-Anoop Singh And Others” (2020)CJ 954 (N.C.)

 

सदर न्‍यायनिवाडया मध्‍ये मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाने असे नमुद केलेले आहे की, “Report of the Agriculture Experts Committee wherein it has been found that 31% plants were of off-type due to which the Complainant suffered 29% loss of paddy crop and Off-type means any seed or plant not a part of the same variety and make include, seeds or plants of  other varieties. Further, it is established that the seeds were not pure. The report submitted by the team of Agriculture Experts was not discarded”.

 

आमचे समोरील हातातील प्रकरणात सुध्‍दा विरुध्‍दपक्ष महाबीज  निर्मीत बियाण्‍या मध्‍ये भेसळ असल्‍याचा अहवाल तालुकास्‍तरीय  बियाणे तक्रार समितीने  दिलेला   असल्‍याने सदर  मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाचा निवाडा हातातील प्रकरणात तंतोतंत लागू पडतो असे आमचे मत आहे.

******

मुद्दा क्रं 2 बाबत

 

10.  उपरोक्‍त नमुद मा.वरिष्‍ठ न्‍यायालयांचे न्‍यायनिवाडयां वरुन तक्रारकर्त्‍याची तक्रार मंजूर होण्‍यास पात्र आहे. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष महाबीज निर्मीत मुख्‍य भात पिकाचे वाण DRK II सोबत इतर वाणाचे बियाणे असल्‍यामुळे अपेक्षीत धानाचे उत्‍पादनात आलेल्‍या घट मुळे झालेल्‍या नुकसानीची भरपाई मिळण्‍या करीता  जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष तक्रार दाखल केलेली आहे परंतु सदर धान पिकाचे बाजार भावाचे दस्‍तऐवज दाखल केलेले नाहीत तसेच पिकाचे लागवडीसाठी आलेला खर्च जसे ट्रॅक्‍टर, मजूरी, निंदणी, पेरणी, रासायनिक औषधी व खते इत्‍यादीची बिले पुराव्‍या दाखल सादर केलेली नाहीत.

 

       जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मते सदर तक्रार निकाली काढण्‍यासाठी तालुकास्‍तरीय बियाणे तक्रार निवारण समितीचे अहवालाचा आधार पुरेसा आहे कारण सदर समिती ही महाराष्‍ट्र शासनाने गठीत केलेली असून त्‍यामध्‍ये कृषी विभागाचे वरिष्‍ठ अधिकारी, कृषी विद्दापिठाचे शास्‍त्रज्ञ इत्‍यादी तज्ञांचा समावेश असतो आणि सदर समितीचे सदस्‍य हे प्रत्‍यक्ष मोक्‍यावर जाऊन पिकाची पाहणी करुन आपला अहवाल देतात. सदर समितीचे पाहणीचे वेळी तक्रारकर्ता आणि बियाणे निर्माता व विक्रेता यांना सुचना दिली जाते. आमचे समोरील हातातील प्रकरणात तालुकास्‍तरीय तक्रार निवारण समितीचे पिक पाहणीचे वेळी बियाणे निर्माता महाबीजचे प्रतिनिधी उपस्थित होते. तालुकास्‍तरीय बियाणे तक्रार निवारण समितीचा अहवाल अत्‍यंत स्‍वयंस्‍पष्‍ट असून त्‍यामध्‍ये विरुध्‍दपक्ष महाबीज निर्मीत मुख्‍य भात पिकाचे वाण DRK II सोबत इतर वाणाचे 11.98 टक्‍के बियाणे दिसून आल्‍याचे नमुद असून बियाण्‍यातील भेसळीमुळे अपेक्षीत उत्‍पादनात सरासरी 10 टक्‍के घट येण्‍याची शक्‍यता वर्तविली आहे. तालुकास्‍तरीय तक्रार निवारण समिती ही महाराष्‍ट्र शासना मार्फत गठीत कृषी क्षेत्रातील तज्ञ अधिकारी/शास्‍त्रज्ञांची समिती असून सदर समितीने दिलेल्‍या अहवालावर अविश्‍वास ठेवण्‍याचे कोणतेही प्रयोजन जिल्‍हा ग्राहक आयोगास वाटत नाही.

 

     तक्रारकर्त्‍याने तक्रारी  मध्‍ये त्‍याला विरुध्‍दपक्ष महाबीज निर्मीत धान बियाण्‍यामुळे अपेक्षीत उत्‍पादनाच्‍या 25 टक्‍के घट आली असून त्‍याने तक्रारीच्‍या मागणी मध्‍ये बियाण्‍याची किम्‍मत रुपये-2030/-, पिक लागवड व मशागतीचा खर्च रुपये-75,000/- आणि अपेक्षीत उत्‍पन्‍नाचे नुकसानीपोटी रुपये-4,00,000/- अशा रकमा विरुध्‍दपक्षां कडून मागितलेल्‍या आहेत परंतु सदर रकमा या खरोखरच जास्‍त फुगवून मागितलेल्‍या आहेत असे  दिसून येते.

 

  11.   जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मते तक्रारकर्त्‍याचे धान पिकाचे संपूर्ण 100% नुकसान झाले असा निषकर्ष तालुकास्‍तरीय बियाणे तक्रार निवारण समितीने काढलेला नाही. त्‍यामुळे धान पिकाच्‍या अपेक्षीत उत्‍पादना पेक्षा कमी आलेल्‍या पिकाची प्रचलित कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीचे बाजारभावाचे दरा प्रमाणे नुकसान भरपाई मंजूर करणे योग्‍य राहिल. तक्रारकर्त्‍यास अपेक्षीत उत्‍पादनापेक्षा कमी आलेल्‍या पिकाची नुकसान भरपाई मंजूर केलेली असल्‍याने पिकाचे लागवडीसाठी आलेला खर्च देण्‍याचे प्रयोजन नाही सर्वसाधारणपणे एकरी 20 क्विंटल अपेक्षीत धानाचे उत्‍पादन हिशोबात धरल्‍यास आणि तालुकास्‍तरीय समितीचे अहवाला नुसार तक्रारकर्त्‍याचे अपेक्षीत धान पिकाचे  10% नुकसान   हिशोबात धरल्‍यास तक्रारकर्त्‍याचे एकरी 02 क्विंटल अपेक्षीत उत्‍पादनाचे नुकसान झालेले आहे. तालुका बियाणे तक्रार निवारण समितीच्‍या अहवाला मध्‍ये तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष महाबीज निर्मीत धानाचे बियाणे 1 हेक्‍टर 20 आर एवढया क्षेत्रात पेरले असल्‍याचे नमुद केलेले आहे. (एक हेक्‍टर म्‍हणजे अडीच एकर आणि 40 आर म्‍हणजे एक एकर या प्रमाणे 1.00 हेक्‍टर 20 आर याचे एकर मध्‍ये रुपांतरण केल्‍यास तक्रारकर्त्‍याची लागवड केलेली शेती ही एकूण 3.00 एकर एवढी आहे)  त्‍यामुळे 3.00 एकर एवढया क्षेत्रफळा करीता तो नुकसान भरपाई मिळण्‍यास पात्र आहे. त्‍याचे 3.00 एकर एवढया  क्षेत्रफळा करीता अपेक्षीत धानाचे पिकाचे एकूण 6.00 क्विंटल नुकसान झाले असा निष्‍कर्ष काढण्‍यास कोणतीही अडचण जिल्‍हा ग्राहक आयोगास येत नाही. या ठिकाणी जिल्‍हा ग्राहक आयोगाव्‍दारे आणखी एक बाब स्‍पष्‍ट करण्‍यात येते की, तक्रारकर्त्‍याचे वकीलांनी तक्रारी मध्‍ये धानाचे बियाणे 02 एकर क्षेत्रा मध्‍ये पेरणी केल्‍याचे नमुद केलेले आहे परंतू  तालुकास्‍तरीय बियाणे तक्रार निवारण समितीच्‍या अहवाला मध्‍ये तक्रारकर्त्‍याने धानाचे बियाणे हे 1.20 हेक्‍टर आर म्‍हणजेच 03 एकर मध्‍ये पेरल्‍याचे नमुद केलेले आहे त्‍यामुळे नुकसान भरपाई मंजूर करताना तालुकास्‍तरीय बियाणे तक्रार निवारण समितीचा अहवाल ग्राहय धरण्‍यात येतो.

 

12.   तक्रारकर्त्‍यास अपेक्षीत उत्‍पादना पेक्षा कमी आलेल्‍या धानाचे पिकाचे नुकसानीची भरपाई देण्‍यासाठी जिल्‍हा ग्राहक आयोगा तर्फे कृषी उत्‍पन्‍न बाजार समिती, नागपूर येथील प्रचलीत दराचा आधार घेण्‍यात येते. कृषी उत्‍पन्‍न बाजार समिती, नागपूर मधील  तांदुळाचे दर सन-2018-2019 मध्‍ये सरासरी जास्‍तीत जास्‍त रुपये-4725/- आणि कमीतकमी रुपये-2750/- संगणकावर दर्शविलेले आहेत, त्‍यानुसार तक्रारकर्त्‍यास  धान पिकाचा भाव प्रतीक्विंटल रुपये-3000/- एवढा दर मंजूर करण्‍यास कोणतीही अडचण नाही.  तक्रारकर्त्‍यास तालुकास्‍तरीय बियाणे तक्रार निवारण समितीचे अहवालाचे आधारे  अपेक्षीत उत्‍पादना पेक्षा 6.00 क्विंटल कमी धानाचे पिक आल्‍याने  6.00 क्विटल धानासाठी एकूण रुपये-18,000/- एवढी नुकसान भरपाईची रक्‍कम मंजूर करणे योग्‍य व न्‍यायोचित आहे असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे. तक्रारकर्त्‍यास वेळेवर त्‍याचे पिकाचे झालेल्‍या नुकसानीची भरपाई न मिळाल्‍याने शेवटी प्रस्‍तुत तक्रार जिल्‍हा ग्राहक आयोगा समोर दाखल करावी लागली. विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2 महाबीज निर्मीत DRK II जातीचे धानाचे बियाणे निकृष्‍ट दर्जाचे  असल्‍याची बाब तालुका तक्रार निवारण समितीचे अहवाला प्रमाणे सिध्‍द झालेली असल्‍याने  त्‍याला  नाहक या प्रकरणात त्रास सहन करावा लागला त्‍यामुळे त्‍याला झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-20,000/- नुकसान भरपाई आणि तक्रारीचा खर्च रुपये-5000/- 
विरुध्‍दपक्ष क्रं 1  व क्रं 2 बियाणे निर्माता महाबीज कडून देण्‍याचे आदेशित करणे योग्‍य व न्‍यायोचित होईल असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे
त्‍यामुळे आम्‍ही मुद्दा क्रं 2 चे उत्‍तर “होकारार्थी” नोंदवित आहोत. अशाप्रकारे मुद्दा क्रं 1 व 2 चे उत्‍तर “होकारार्थी” नोंदविण्‍यात आल्‍यामुळे आम्‍ही मुद्दा क्रं 3 अनुसार तक्रारी मध्‍ये  खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहोत.

 

 

                                                                          :: अंतिम आदेश ::

 

 

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार विरुध्‍दपक्ष क्रं-1 महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळ मर्यादित अकोला आणि विरुध्‍दपक्ष क्रं 2 महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळ अकोला प्‍लॉन्‍ट गडेगाव, पोस्‍ट गडेगाव, तालुका लाखनी जिल्‍हा भंडारा या बियाणे निर्माता कंपनी तर्फे तिचे कार्यकारी संचालक यांचे विरुध्‍द वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्‍या खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्‍यात येते.

 

  1. विरुध्‍दपक्ष  क्रं-1 महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळ मर्यादित अकोला आणि विरुध्‍दपक्ष क्रं 2 महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळ अकोला प्‍लॉन्‍ट गडेगाव, पोस्‍ट गडेगाव, तालुका लाखनी जिल्‍हा भंडारा  या बियाणे निर्माता कंपनी तर्फे तिचे कार्यकारी संचालक यांना आदेशित करण्‍यात येते की,त्‍यांनी तक्रारकर्त्‍याला पुरविलेल्‍या निकृष्‍ट दर्जाचे धान पिकाचे बियाण्‍यामुळे झालेल्‍या नुकसान भरपाई दाखल रक्‍कम रुपये-18,000/- (अक्षरी रुपये अठरा हजार फक्‍त) तक्रारकर्त्‍याला दयावी आणि सदर नुकसान भरपाईचे रकमेवर प्रस्‍तुत तक्रार जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल दिनांक-17.02.2021 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-12 टक्‍के दराने व्‍याज तक्रारकर्त्‍याला दयावे.

 

 

  1. विरुध्‍दपक्ष  क्रं-1 महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळ मर्यादित अकोला आणि विरुध्‍दपक्ष क्रं 2 महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळ अकोला प्‍लॉन्‍ट गडेगाव, पोस्‍ट गडेगाव, तालुका लाखनी जिल्‍हा भंडारा  या बियाणे निर्माता कंपनी तर्फे तिचे कार्यकारी संचालक यांना असेही आदेशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल भरपाई म्‍हणून रुपये-20,000/- (अक्षरी रुपये वीस हजार फक्‍त) आणि प्रस्‍तुत तक्रारीचा खर्च रुपये-5000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्‍त) अशा रकमा तक्रारकर्त्‍याला दयाव्‍यात.

 

 

  1. विरुध्‍दपक्ष  क्रं-1 महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळ मर्यादित अकोला आणि विरुध्‍दपक्ष क्रं 2 महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळ अकोला प्‍लॉन्‍ट गडेगाव, पोस्‍ट गडेगाव, तालुका लाखनी जिल्‍हा भंडारा  या बियाणे निर्माता कंपनी तर्फे तिचे कार्यकारी संचालक यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्‍या  सदर आदेशाचे अनुपालन निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत मिळाल्‍याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत करावे.

 

 

  1. निकालपत्राच्‍या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्‍क उपलब्‍ध     करुन देण्‍यात याव्‍यात.

 

  1.  उभय पक्षां तर्फे दाखल अतिरिक्‍त फाईल्‍स त्‍यांनी जिल्‍हा ग्राहक आयोगाचे कार्यालयातून परत घेऊन जाव्‍यात.         

 

 

 
 
[HON'BLE MR. BHASKAR B. YOGI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MR. NITIN M. GHARDE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.