(पारीत व्दारा श्री भास्कर बी. योगी, मा.अध्यक्ष )
(पारीत दिनांक-14 नोव्हेंबर, 2022)
01. तक्रारकर्त्याने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 2019 च्या कलम 35 खाली विरुध्दपक्ष क्रं 1 नर्मदा मोटर्स वाहन दुरुस्ती केंद्र आणि विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनी यांचे विरुध्द विमाकृत वाहनाचे अपघाता मुळे झालेल्या नुकसानीची रक्कम मिळण्या बाबत आणि इतर अनुषंगीक मागण्यांसाठी जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारकर्त्याचे तक्रारी प्रमाणे त्याचे मालकीचे टाटा मोटर्स कंपनीचे चार चाकी वाहन टाटा झेस्ट असून त्याचा नोंदणी क्रं-MH-49/AE-6409 असा आहे. तक्रारकर्त्याने सदर वाहनाचा विमा विरुध्दपक्ष क्रं 2 चोला एमएस जनरल इन्शुरन्स कंपनी यांच्या मार्फत काढला होता, सदर विमा पॉलिसीचा क्रं-3362/01480766/000/02 असा असून विम्याचा कालावधी हा दिनांक-15.02.2020 ते दिनांक-14.02.2021 असा होता.
तक्रारकर्त्याने सदरचे वाहन त्याचा मित्र श्री सत्यम सुंदरसिंग चंद्रवंशी याला दिनांक-03.03.2020 रोजी रामटेक येथे जाण्या करीता सकाळी 07.00 वाजता दिले होते. परंतु त्याचा मित्र श्री विलास वलथरे याने त्याला फोन वरुन कळविले की, त्याचे विमाकृत वाहनाचा खात (भंडारा) येथे अपघात झालेला आहे. त्याच दिवशी दिनांक-03.03.2020 रोजी अरोली पोलीस स्टेशन यांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला होता. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीचे कार्यालयात विमाकृत वाहनास झालेल्या अपघाताची माहिती दिली असता विमा कंपनीचे एजंट आले व विमाकृत वाहनाचे फोटो घेतले. विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीचे सुचने नुसार विमा कंपनीचे कॅशलेस टायअप असलेल्या विरुध्दपक्ष क्रं 1 नर्मदा मोटर्स येथे विमाकृत क्षतीग्रस्त वाहन दुरुस्तीकरीता पाठविण्यास सांगितले, त्या नुसार तक्रारकर्त्याने दिनांक-03.03.2020 रोजी सदर विमाकृत वाहन विरुध्दपक्ष क्रं 1 नर्मदा मोटर्स वाहन दुरुस्ती केंद्र यांचे कडे नेले. विरुध्दपक्ष क्रं 1 नर्मदा मोटर्स यांनी वाहनाचे निरिक्षण करुन संपूर्ण वाहन दुरुस्तीचा खर्च रुपये-1,80,000/- येणार असल्याचे सांगितले तसेच वाहन एक महिन्यात दुरुस्त होऊन मिळेल असेही सांगितले, त्यानुसार वाहन विरुध्दपक्ष क्रं 1 यांचे कडे दुरुस्तीसाठी त्याच दिवशी दिले. दिनांक-31.03.2020 रोजी विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीने एकूण दुरुस्तीचा खर्च रुपये-1,80,000/- पैकी विरुध्दपक्ष क्रं 1 नर्मदा मोटर्स यांचे खात्यात सुरुवातीची रक्कम रुपये-1,15,000/- जमा केली. दिनांक-06.06.2020 रोजी विरुध्दपक्ष क्रं1 नर्मदा मोटर्स यांचे केंद्रात भेट दिली असता विमाकृत वाहनाचे काम झालेले नव्हते, त्यावर विरुध्दपक्ष क्रं 1 याने लॉकडाऊन असल्याने वाहनाचे दुरुस्तीचे काम झाले नसल्याचे सांगितले व दिनांक-15.08.2020 पर्यंत वाहन दुरुस्त करुन मिळेल असे आश्वासन दिले परंतु नंतर 15 ते 20 वेळा दुरध्वनीवर संपर्क साधूनही प्रत्येक वेळी थोडा वेळ दुरुस्ती साठी दयावा असे सांगितले. जवळपास सहा महिन्याचा कालावधी उलटून गेल्या नंतरही वाहन दुरुस्त करुन न मिळाल्याने तक्रारकर्त्याने डिसेंबर-2020 मध्ये विरुध्दपक्ष क्रं 1 चे वाहनदुरुस्ती केंद्रास भेट दिली असता तेथे तक्रारकर्त्याचे वाहन दिसून न आल्याने मानसिक धक्का बसला. वाहनाचे बाबतीत विरुध्दपक्ष क्रं 1 वाहन दुरुस्ती केंद्र यांचे कडे चौकशी केली असता सदर वाहन दुरुस्ती करीता दुसरीकडे पाठविले असे सांगितले. वस्तुतः विरुध्दपक्ष क्रं 1 हे विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीचे अधिकृत दुरुस्ती केंद्र असल्याने विरुध्दपक्ष क्रं 1 यांनी स्वतःच वाहनाची दुरुस्ती करुन देणे गरजेचे होते. विमाकृत वाहन दुसरीकडे कोणाकडे दुरुस्तीला पाठविले या बाबत विरुध्दपक्ष क्रं 1 वाहन दुरुस्ती करणारे यांनी 06 महिन्याचा कालावधी होऊन सुध्दा वाहन परत न केल्यामुळे तक्रारकर्त्याचे मनात संशय निर्माण झाला आणि त्यामुळे विरुध्दपक्ष क्रं 1 नर्मदा मोटर्स यांचे विरोधात विमाकृत वाहन चोरी गेल्या बाबत पोलीस स्टेशन भंडारा येथे लेखी तक्रार दिनांक-21.01.2021 रोजी दिली परंतु तक्रारीचे निवारण झाले नाही.दिनांक-03.01.2021 रोजी तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष क्रं 1 नर्मदा मोटर्स गॅरेज मध्ये गेला असता त्याला त्याचे वाहन भंगार अवस्थेत दिसले व ते वाहन ज्यावेळी दुरुस्तीसाठी दिले होते त्यापेक्षा अत्यंत वाईट अवस्थेत दिसले, त्यामुळे त्याने त्याचे वाहनाचे मोबाईलव्दारे फोटो काढले व ते तक्रारी सोबत दाखल करीत आहे.या बाबत विरुध्दपक्ष क्रं1 याला विचारले असता त्याने उत्तर दिले नाही,उलट जे करायचे ते करुन टाक अशी धमकी देऊन पोलीस स्टेशनला तक्रार केल्याने बघून घेण्याची धमकी दिली. तक्रारकर्त्यास मानसिक धक्का बसला, त्याचे वाहन रुपये-7,00,000/- किमतीचे होते आणि वाहन विकत घेऊन फक्त 03 वर्ष झाले होते. विरुध्दपक्ष क्रं 1 याने सहा महिन्यात वाहनाची अवस्था भंगारा सारखी करुन ठेवली होती आणि संपूर्ण वाहनाचा रंग सुध्दा ओळखू येत नव्हता. दोन्ही विरुध्दपक्षांचे दोषपूर्ण सेवेमुळे त्याला शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे आणि म्हणून तो विरुध्दपक्षां कडून खालील विवरणा प्रमाणे रक्कम मिळण्यास पात्र आहे-
-विवरणपत्र-
अक्रं | विवरण | नुकसान भरपाईची रक्कम |
1 | टाटा झेस्ट वाहनाचे मोबदल्यात टाटा कंपनीचे नविन वाहनाची कोटेशन प्रमाणे किम्मत | 7,50,000/- |
2 | अपघातग्रस्त वाहन साकोली येथून भंडारा येथे विरुध्दपक्ष क्रं 1 च्या दुकानात जाणे-येणे करण्या करीता लागलेला खर्च | 25,000/- |
3 | दोन्ही विरुध्दपक्षांचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्त्याला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल नुकसान भरपाई | 1,00,000/- |
4 | नोटीस खर्च व तक्रारीचा खर्च | 25,000/- |
| एकूण | 9,00,000/- |
म्हणून शेवटी तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल करुन त्याव्दारे विरुध्दपक्षां विरुध्द खालील प्रमाणे मागण्या केल्यात-
1. उपरोक्त विवरणपत्रा प्रमाणे नमुद केलेली रक्कम रुपये-9,00,000/- तक्रारीचे निकाल दिनांका पासून एक महिन्याचे आत दोन्ही विरुध्दपक्षांनी तक्रारकर्त्यास देण्याचे आदेशित व्हावे.
2. या शिवाय योग्य ती दाद तक्रारकर्त्याचे बाजूने मंजूर करण्यात यावी.
03. विरुध्दपक्ष क्रं 1 नर्मदा मोटर्स भंडारा तर्फे श्री मनिष पिता सुनिल माहूले याने लेखी उत्तर जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केले. त्याने लेखी उत्तरा मध्ये त्याचे आणि विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीचे आपसी व्यवसायीक संबध असून परस्पर समन्वयाने तो काम करीत असल्याची बाब मान्य केली. विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीचे सांगणा नुसार त्याने तक्रारकर्त्याचे वाहन दुरुस्ती करीता घेतले होते. त्याचे नर्मदा मोटर्स गॅरेज हे वैनगंगा नदीच्या जुन्या पुला पासून 100 मीटरच्या आत आहे. तक्रारकर्त्याचे विमाकृत क्षतीग्रस्त वाहनाची पाहणी करुन नविन स्पेअर पार्टसह दुरुस्तीसाठी अपेक्षीत खर्च रुपये-3,40,220/- एवढा होता परंतु एवढी रक्कम देण्यास विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीने नकार दिल्यामुळे विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीचे प्रतिनिधी आणि तक्रारकर्ता यांचे मध्ये असे ठरले की, वाहना मध्ये नविन स्पेअर पार्ट न टाकता वाहन तसेच दुरुस्त करुन घ्यावे. तक्रारकर्त्याने विमाकृत वाहन हे दुस-यास चालविण्यास दिल्यामुळे वाहनाचे नुकसान हे तक्रारकर्त्याचे निष्काळजीपणा मुळे झालेले आहे त्यामुळे तक्रारकर्ता आणि विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनी मध्ये असे ठरले की, क्षतीग्रसत विमाकृत वाहनाचे दुरुस्तीसाठी काही प्रमाणात नविन स्पेअर पार्टस टाकून दुरुस्ती करावी त्यासाठी अंदाजे रुपये-2,15,000/- एवढा खर्च लागणार होता, त्यापैकी रुपये-1,15,000/- एवढा खर्च विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनी उचलण्यास तयार झाली आणि उर्वरीत रुपये-1,00,000/-खर्च तक्रारकर्ता करणार होता, त्यानुसार विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीने तक्रारकर्त्यास रुपये-1,15,000/- एवढी रक्कम दिली व तक्रारकर्त्याने ती रक्कम रुपये-1,15,000/- विरुध्दपक्ष क्रं 1 ला दिली. परंतु उर्वरीत तक्रारकर्त्यास दयावयाची रक्कम रुपये-1,00,000/- तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं 1 ला दिली नाही. वाहनाचे काही स्पेअर पार्टस हे स्थानिक पातळीवर मिळत नसल्याने विरुध्दपक्ष क्रं 1 याने टाटा कंपनीकडे स्पेअर पार्टस मिळण्या बाबत यादी पाठविली होती परंतु ते स्पेअर पार्टस विरुध्दपक्ष क्रं 1 याचे कडे ऑग्स्ट,2020 मध्ये आले व त्यानंतर विरुध्दपक्ष क्रं 1 याने तक्रारकर्त्याचे वाहनाचे काम सुरु केले परंतु दिनांक-29.08.2020 रोजी भंडारा जिल्हयामध्ये महापूर आला होता व विरुध्दपक्ष क्रं 1 चे दुकान नर्मदा मोटर्स नदी पासून 100 मीटरच्या आत असल्याने त्याचे दुकाना मध्ये पुराचे पाणी शिरल्याने दुकानातील सर्व साहित्य ज्यामध्ये मशीन,नादुरुस्त वाहने व सुटे भाग
बुडाले होते. पुराचे पाणी हे तीन ते चार दिवस राहिल्यामुळे विरुध्दपक्ष क्रं 1 याचे फार मोठया प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले. महसूल विभागातर्फे दुकानातील नुकसानीचा पंचनामा करण्यात आला असता त्याचे जवळपास रुपये-42,36,745/- चे नुकसान झाले. सदर पंचनामा हा नोडल अधिकारी व कर सहायक यांच्या समक्ष व पंचाच्या हजेरीत तयार करण्यात आला होता व त्या सर्वांच्या पंचनाम्यावर सहया आहेत, त्याची प्रमाणित प्रत तो दाखल करीत आहे. महापुरा मुळे तयाचे वाहन दुरुस्तीचे दुकान पूर्ववत होण्यास 2 ते 3 महिन्याचा कालावधी लागला. तक्रारकर्ता आणि त्याचे मध्ये झालेल्या बोलणी नुसार त्याने वाहन हे मे-2021 पर्यंत दुरुस्त करुन देण्याचे ठरले होते.. परंतु तक्रारकर्त्याने वारंवार दुरुस्ती बाबत विचारणा केली. तो वाहनाचे सुटे भाग जुळवा जुळव करुन दुरुस्तीचे काम करीत असताना तक्रारकर्त्याने विनाकारण त्याचे वाहन चोरी गेल्या बाबत पोलीस स्टेशनला तक्रार दाखलकेली. पोलीसांनी त्याचे बयान दिनांक-04.01.2021 रोजी नोंदविले. विरुध्दपक्ष क्रं 1 याने पोलीसांना असे सांगितले की, विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीने वाहन दुरुस्तीसाठी जी रक्कमरुपये-1,15,000/- दिली होती त्यामधून काही भाग विरुध्दपक्ष क्रं1 याने विमाकृत वाहना मध्ये लावले होते, लावलेल्या सुटया भागाची रक्कम कमी करुन उर्वरीत रक्कम जवळपास रुपये-80,000/- विरुध्दपक्ष क्रं 1 हा तक्रारकर्त्याला परत करेल व तक्रारकर्ता त्याचे वाहन परत घेऊन जाईल परंतु तक्रारकर्त्याने खोटया बनावट माहितीचे आधारावर प्रस्तुत खोटी तक्रार दाखल केली. तक्रारकर्त्याचे वाहन तीन वर्षापूर्वी जुने असून देखील त्याने वाहनाची संपूर्ण किम्मत मागणी केलेली आहे. तक्रारकर्ता आणि विरुध्दपक्ष क्रं 2 यांचे मध्ये वाहन दुरुस्ती बाबत जो काही करार झालेला आहे त्याचेशी विरुध्दपक्षक्रं 1 चा कोणताही संबध येत नाही तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनी कडे नुकसान भरपाई बाबत पाठपुरावा केलेला नाही तसेच विरुध्दपक्ष क्रं 1 चे वाहन दुरुस्तीचे दुकान महापूरा मध्ये बुडलेले असताना देखील तक्रारकर्त्याने ही बाब तक्रारी मध्ये लपवून ठेवली. वाहन दुरुस्ती बाबत झालेल्या करारापोटी विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीने रुपये-1,15,000/- दिलेले आहेत आणि सदर पावतीवर तक्रारकर्त्याची सही देखील आहे व तक्रारकर्त्याने सदर रक्कम विरुध्दपक्ष क्रं 1 ला वाहन दुरुस्ती साठी दिलेली आहे परंतु ठरल्या प्रमाणे तक्रारकर्त्याने स्वतःचे हिश्श्याची रक्कम रुपये-1,00,000/- आज पर्यंत विरुध्दपक्ष क्रं 1 यास दिलेली नाही. करीता तक्रार खारीज करण्याची विनंती केली.
04. विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनी तर्फे लेखी उत्तर जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल करण्यात आले. विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीचे लेखी उत्तरा प्रमाणे तक्रारकर्त्याने त्याचे वाहन त्याचा मित्र श्री सत्यम सुंदरसिंग सुर्यवंशी यास रामटेक येथे जाण्या करीता दिनांक-03.03.2020 रोजी दिले होते ही बाब माहिती अभावी नामंजूर केली. वाहनास झालेला अपघात हा रेकॉर्डचा भाग असल्याचे नमुद केले .विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीने तक्रारकर्त्यास क्षतीग्रस्त विमाकृत वाहन दुरुस्तीसाठी विरुध्दपक्ष क्रं 1 याचे कडे नेण्यास सांगितले होते ही बाब नामंजूर केली. विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीने सर्व्हेअर यांचे अहवाला नुसार तक्रारकर्त्यास विम्यापोटीरुपये-1,15,000/- पूर्ण व अंतीम विमा रक्कम म्हणून मंजूर केले होते आणि तेवढी रक्कम विरुध्दपक्ष क्रं 1 चे खात्यामध्ये जमा करण्यात आली होती. विमाकृत क्षतीग्रस्त वाहनाचे जर काही काम झाले नसेल तर तो विवाद हा तक्रारकर्ता आणि विरुध्दपक्ष क्रं1 यांचे मधील आहे, त्याचेशी विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीचा संबध नाही. त्यांनी फुल अॅन्ड फायनल सेटलमेंट पोटी रुपये-1,15,000/- विमा रक्कम दिलेली असल्यामुळे तक्रारकर्त्यास कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही. सबब तक्रारकर्त्याची तक्रार त्यांचे विरुध्दची खारीज करण्यात यावी अशी विनंती विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीने केली.
05. तक्रारकर्त्याची तक्रार, विरुध्दपक्ष क्रं 1 नर्मदा मोटर्स आणि विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीचे लेखी उत्तर त्याच बरोबर सर्वपक्षांनी दाखल केलेला साक्षी पुरावा तसेच दाखल केलेले दस्तऐवज याचे अवलोकन करण्यात आले. तक्रारकर्त्या तर्फे वकील श्री भलावी तर विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनी तर्फे वकील कु. प्रतिभा गवई यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला, त्यावरुन जिल्हा ग्राहक आयोगाचा निष्कर्ष खालील प्रमाणे आहे-
:: निष्कर्ष ::
06. प्रस्तुत प्रकरणातील उपलब्ध दस्तऐवज, दाखल साक्षी पुरावे तसेच उभय पक्षांचे वकीलांचा मौखीक युक्तीवाद यावरुन असे दिसून येते की, प्रस्तुत तक्रारीचे दोन भाग आहेत. त्यातील प्रथम भाग असा आहे की, तक्रारकर्त्याने त्याचे मालकीचे विमाकृत वाहन त्याचा मित्र श्री सत्यम सुंदरसिंग चंद्रवंशी याला दिनांक-03.03.2020 रोजी रामटेक येथे जाण्या करीता सकाळी 07.00 वाजता दिले होते. परंतु त्याचे विमाकृत वाहनास त्याच दिवशी खात (भंडारा) येथे अपघात झालेला होता. तक्रारकर्त्याने त्या संबधात विरुध्दपक्ष क्रं 2 चोला मंडलम इन्शुरन्स कंपनी कडे विमा दावा दाखल केला होता तसेच विमाकृत क्षतीग्रसत वाहन हे विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीचे सुचने नुसार विरुध्दपक्ष क्रं 1 नर्मदा मोटर्स मार्फत श्री मनिष माहुले याचे कडे दुरुस्तीसाठी टाकले होते. विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीचे असे म्हणणे आहे की, त्यांनी तक्रारकर्त्यास विरुध्दपक्ष क्रं 1 याचे कडे विमाकृत वाहन दुरुस्तीसाठी टाकण्यास सांगितले नव्हते. विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीचे असे म्हणणे आहे की, त्यांनी सर्व्हेअर यांचे अहवाला नुसार तक्रारकर्त्यास विम्या पोटी रुपये-1,15,000/- पूर्ण व अंतीम विमा रक्कम म्हणून मंजूर केले होते आणि तेवढी रक्कम विरुध्दपक्ष क्रं 1 चे खात्यामध्ये जमा करण्यात आली होती. विमाकृत क्षतीग्रस्त वाहनाचे जर काही काम झाले नसेल तर तो विवाद हा तक्रारकर्ता आणि विरुध्दपक्ष क्रं 1 यांचे मधील आहे, त्याचेशी विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीचा संबध नाही. त्यांनी फुल अॅन्ड फायनल सेटलमेंट पोटी रुपये-1,15,000/- विमा रक्कम दिलेली असल्यामुळे तक्रारकर्त्यास कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही.
07. सदर प्रकरणातील दुसरा भाग असा आहे की, तक्रारकर्त्याने दिनांक-03.03.2020 रोजी सदर विमाकृत वाहन विरुध्दपक्ष क्रं 1 याचे कडे वाहन दुरुस्तीसाठी नेले. विरुध्दपक्ष क्रं 1 नर्मदा मोटर्स यांनी वाहनाचे निरिक्षण करुन संपूर्ण वाहन दुरुस्तीचा खर्च रुपये-1,80,000/- येणार असल्याचे सांगितले तसेच वाहन एक महिन्यात दुरुस्त होऊन मिळेल असेही सांगितले, त्या नुसार वाहन विरुध्दपक्ष क्रं 1 यांचे कडे दुरुस्तीसाठी त्याचा दिवशी दिले. दिनांक-31.03.2020 रोजी विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीने एकूण दुरुस्तीचा खर्च रुपये-1,80,000/- पैकी विरुध्दपक्ष क्रं 1 नर्मदा मोटर्स यांचे खात्यात रक्कम रुपये-1,15,000/- जमा केली. दिनांक-06.06.2020 रोजी विरुध्दपक्ष क्रं 1 नर्मदा मोटर्स यांचे केंद्रात भेट दिली असता विमाकृत वाहनाचे काम झालेले नव्हते, जवळपास सहा महिन्याचा कालावधी उलटून गेल्या नंतरही वाहन दुरुस्त करुन न मिळाल्याने तक्रारकर्त्याने डिसेंबर-2020 मध्ये विरुध्दपक्ष क्रं 1 चे वाहन दुरुस्ती केंद्रास भेट दिली असता तेथे तक्रारकर्त्याचे वाहन दिसून आले नसल्याने विरुध्दपक्ष क्रं 1 नर्मदा मोटर्स यांचे विरोधात विमाकृत वाहन चोरी गेल्या बाबत पोलीस स्टेशन भंडारा येथे लेखी तक्रार दिनांक-21.01.2021 रोजी दिली. दिनांक-03.01.2021 रोजी तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष क्रं 1 नर्मदा मोटर्स गॅरेज मध्ये गेला असता त्याला त्याचे वाहन भंगार अवस्थेत दिसले त्याचे वाहन रुपये-7,00,000/- किमतीचे होते आणि वाहन विकत घेऊन फक्त 03 वर्ष झाले होते. विरुध्दपक्ष क्रं 1 याने सहा महिन्यात वाहनाची अवस्था भंगारा सारखी करुन ठेवली होती आणि संपूर्ण वाहनाचा रंग सुध्दा ओळखू येत नव्हता.
08. या बाबतीत विरुध्दपक्ष क्रं 1 नर्मदा मोटर्स तर्फे मनिष माहूले याचे असे म्हणणे आहे की, दिनांक-29.08.2020 रोजी भंडारा जिल्हया मध्ये महापूर आला होता तसेच विरुध्दपक्ष क्रं 1 चे दुकान नर्मदा मोटर्स नदी पासून 100 मीटरच्या आत असल्याने त्याचे दुकाना मध्ये पुराचे पाणी शिरल्याने दुकानातील सर्व साहित्य ज्यामध्ये मशीन, नादुरुस्त वाहने व सुटे भाग बुडाले होते. पुराचे पाणी हे तीन ते चार दिवस राहिल्यामुळे विरुध्दपक्ष क्रं 1 याचे फार मोठया प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले. शासनाचे महसूल विभागा कडून नुकसानीचा पंचनामा करण्यात आलेला असून शासना कडून नुकसान भरपाई मिळेल.
09. जिल्हा ग्राहक आयोगाचे असे मत आहे की, तक्रारकर्त्याने दिनांक-03.03.2020 रोजी सदर विमाकृत वाहन विरुध्दपक्ष क्रं 1 याचे कडे वाहन दुरुस्तीसाठी नेले होते परंतु विरुध्दपक्ष क्रं 1 याने एक महिन्यात दुरुस्तीचे आश्वासन देऊनही दिनांक-29 ऑगस्ट, 2020 पर्यंत म्हणजे महापूर येई पर्यंत तक्रारकर्त्याचे विमाकृत वाहन विरुध्दपक्ष क्र 2 विमा कंपनी कडून विमा रक्कम रुपये-1,15,000/- मिळूनही दुरुस्त करुन दिलेले नव्हते. दिनांक-29 ऑगस्ट, 2020 रोजीच्या महापुरामुळे तक्रारकर्त्याचे वाहनाचे आणखी जास्त प्रमाणात नुकसान झाले. त्यानंतरही विरुध्दपक्ष क्रं 1 याने तक्रारकर्त्यास त्याचे वाहनाचे पुरामुळे झालेल्या नुकसानीची कल्पना दिलेली नाही उलट ही बाब तक्रारकर्त्या पासून लपवून ठेवली. दिनांक-03.01.2021 रोजी तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष क्रं 1 नर्मदा मोटर्स गॅरेज मध्ये गेला असता त्याला त्याचे वाहन भंगार अवस्थेत दिसले. तक्रारकर्त्याने त्याचे मालकीचे टाटा मोटर्स कंपनीचे चार चाकी वाहन टाटा झेस्ट नोंदणी क्रं-MH-49/AE-6409 चा विमा विरुध्दपक्ष क्रं 2 चोला एमएस जनरल इन्शुरन्स कंपनी यांच्या मार्फत काढला होता. सदर विमा पॉलिसीचा क्रं-3362/01480766/000/02 असा असून विम्याचा कालावधी हा दिनांक-15.02.2020 ते दिनांक-14.02.2021 असा होता. यावरुन ही बाब स्पष्ट होते की, दिनांक-29 ऑगस्ट, 2020 रोजीच्या महापुराचे वेळी सुध्दा विमाकृत वाहनाचे पॉलिसीचा कालावधी वैध होता, जर विरुध्दपक्ष क्रं 1 वाहन दुरुस्त करणारा नर्मदा मोटर्स याने खरी बाब म्हणजे महापुरामुळे तक्रारकर्त्याचे वाहनाचे झालेले नुकसान वेळीच लक्षात आणून दिली असती तर वेळीच तक्रारकर्त्यास पुन्हा सुधारीत विमा दावा विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनी कडे करता आला असता परंतु असे या प्रकरणात घडलेले नाही. यामध्ये जी काही चुक दिसून येते ती विरुध्दपक्ष कं 1 नर्मदा मोटर्स याची दिसून येते.
10. विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीचे असे म्हणणे आहे की, तक्रारकर्त्यास विम्या पोटी रुपये-1,15,000/- पूर्ण व अंतीम विमा रक्कम म्हणून मंजूर केले होते आणि तेवढी रक्कम विरुध्दपक्ष क्रं 1 चे खात्यामध्ये जमा करण्यात आली होती. तक्रारकर्त्याचे म्हणण्या प्रमाणे दिनांक-03.03.2020 रोजी सदर विमाकृत वाहन विरुध्दपक्ष क्रं 1 याचे कडे वाहन दुरुस्तीसाठी नेले. विरुध्दपक्ष क्रं 1 नर्मदा मोटर्स यांनी वाहनाचे निरिक्षण करुन संपूर्ण वाहन दुरुस्तीचा खर्च रुपये-1,80,000/- येणार असल्याचे सांगितले होते. विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीने तक्रारकर्ता श्री राहूल आगलावे यास जो ई मेल दिनांक-28 मार्च, 2020 रोजी पाठविला होता त्या ई –मेल संदेशाचे अवलोकन केले असता त्यांनी असे लिहिले की, आपले दुरध्वनी वरुन झालेल्या चर्चे नुसार विमा दावा हा बिला शिवाय निश्चीत केला आहे आणि आपले चर्चे प्रमाणे सदर रक्कम रुपये-1,15,000/- ही नर्मदा मोटर्स (तक्रारीतील विरुदपक्ष क्रं 1 वाहन दुरुस्ती करणारा) याचे खात्यात ट्रान्सफर करण्यात येत आहे. तक्रारकर्ता आणि विरुध्दपक्ष क्रं 1 यांचे म्हणण्या प्रमाणे वाहन दुरुस्तीसाठी एकूण खर्च रुपये-1,80,000/- येणार होता व तेवढी रक्कम विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीने देण्याचे ठरले होते परंतु त्या संबधाने कोणताही योग्य असा लेखी पुरावा समोर आलेला नाही.
11. विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनी कडून विमाकृत वाहनाचे दुरुस्तीचे रुपये-1,15,000/- विरुध्दपक्ष क्रं 1 नर्मदा मोटर्स याला मिळून सुध्दा त्याने तक्रारकर्त्याचे वाहन दुरुस्त केले नाही ही बाब सिध्द झालेली आहे. विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीव्दारे निर्गमित विमा पॉलिसीचा क्रं-3362/01480766/000/02 असा असून विम्याचा कालावधी हा दिनांक-15.02.2020 ते दिनांक-14.02.2021 असा होता तसेच विमा पॉलिसी मध्ये विमाकृत वाहनाची आय.डी.व्ही. रुपये-4,24,175/- दर्शविलेली आहे. विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीने तक्रारकर्त्याचे विमाकृत वाहनाचे दुरुस्तीपोटी यापूर्वीच रुपये-1,15,000/- विरुध्दपक्ष क्रं 1 नर्मदा मोटर्स याला दिलेली आहे, परंतु विरुध्दपक्ष क्रं 1 याने तक्रारकर्त्याचे विमाकृत वाहनाची कोणतीही दुरुस्ती केलेली नाही, याही पेक्षा जास्त म्हणजे महापुरामुळे तक्रारकर्त्याचे विमाकृत वाहनाचे अतिशय मोठया प्रमाणावर नुकसान झालेले असतानाही वेळीच ही बाब तक्रारकर्त्याचे लक्षात आणून दिलेली नाही या सर्व बाबी निकालपत्रातील अंतीम आदेश पारीत करताना विचारात घेणे अत्यंत गरजेचे आहे. दुसरी महत्वाची बाब विशेषत्वाने नमुद करावीशी वाटते की, तक्रारकर्त्याचे वाहन हे फक्त तीन वर्ष जुने होते आणि प्रकरणात तक्रारकर्त्याने पुराव्या दाखल जे विमाकृत वाहनाचे छायाचित्रे दाखल केलेली आहेत त्यावरुन विमाकृत वाहन पूर्णपणे क्षतीग्रस्त असल्याचे दिसून येते आणि ते पुन्हा दुरुस्त होण्या पलीकडे आहे, त्यामुळे टोटल लॉस बेसिसचे आधारावर वाहनाची नुकसान भरपाई तक्रारकर्त्यास मंजूर करणे आवश्यक आहे असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे. अशा परिस्थितीत विमाकृत वाहनाचे संपूर्णपणे जे नुकसान झालेले आहे ते विरुध्दपक्ष क्रं 1 नर्मदा मोटर्स, भंडारा याचे चुकीमुळे झालेले आहे ही बाब पुराव्यानिशी सिध्द झालेली आहे. तसेच जिल्हा ग्राहक आयोगाचे असेही मत आहे की, विमाकृत क्षतीग्रस्त वाहनाचा दुरुपयोग विरुध्दपक्ष क्रं 1 नर्मदा मोटर्स याचे कडून होऊ नये म्हणून त्याने सदरचे वाहन आहे त्या स्थिती मध्ये तक्रारकर्त्याचे ताब्यात दयावे. अशा परिस्थितीत विमा पॉलिसी प्रमाणे विमाकृत वाहनाची आय.डी.व्ही. ची रक्कम रुपये-4,24,175/- विरुध्दपक्ष क्रं 1 नर्मदा मोटर्स तर्फे मनीष माहुले याने तक्रारकर्त्यास अदा करावी व क्षतीग्रस्त विमाकृत वाहन तक्रारकर्त्यास परत करावे असे आदेशित करणे योग्य व न्यायोचित होईल असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे. विरुध्दपक्ष क्रं 1 वाहन दुरुस्ती करणारा नर्मदा मोटर्स याने तक्रारकर्त्यास दोषपूर्ण सेवा दिल्यामुळे तक्रारकर्त्यास झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बाबत रुपये-10,000/- आणि प्रस्तुत तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-10,000/- दयावा असे आदेशित करणे योग्य व न्यायोचित होईल असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे.
12. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन, आम्ही प्रस्तुत तक्रारी मध्ये खालील प्रमाणे अंतीम आदेश पारीत करीत आहोत-
::अंतिम आदेश::
1. तक्रारकर्ता श्री राहूल एकनाथ आगलावे यांची तक्रार विरुध्दपक्ष क्रं 1 नर्मदा मोटर्स कारधा, भंडारा मार्फत प्रोप्रायटर/मालक श्री मनिष सुनिल माहूले याचे विरुध्द खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्यात येते.
2. विरुध्दपक्ष क्रं 1 नर्मदा मोटर्स कारधा, भंडारा मार्फत प्रोप्रायटर/मालक श्री मनिष सुनिल माहूले यास आदेशित करण्यात येते की, त्याचे निष्काळजीपणा मुळे तक्रारकर्त्याचे टाटा कंपनीचे झेस्ट वाहन क्रं-MH-49/AE 6409 चे नुकसान झाले असल्याने नुकसान भरपाई दाखल रुपये-4,24,175/- (अक्षरी रुपये चार लक्ष चोवीस हजार एकशे पंच्याहत्तर फक्त) एवढी रक्कम तक्रारकर्त्यास दयावी आणि सदर रकमेवर तक्रारकर्त्याने नोटीस पाठविल्याचा दिनांक-08.01.2021 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-7 टक्के दराने व्याज तक्रारकर्त्याला दयावे. विरुध्दपक्ष क्रं 1 नर्मदा मोटर्स भंडारा तर्फे श्री मनीष माहुले याने आदेशित नुकसान भरपाईची व्याजासह रक्कम तक्रारकर्त्यास अदा करावी तसेच तक्रारकर्त्याचे मालकीचे क्षतीग्रस्त विमाकृत वाहन आहे त्या परिस्थितीत तक्रारकर्त्याचे घरी स्वखर्चाने नेऊन ते तक्रारकर्त्यास परत करावे व ते मिळाल्या बाबत तक्रारकर्त्या कडून लेखी पोच घ्यावी.
3. विरुध्दपक्ष क्रं 1 नर्मदा मोटर्स कारधा, भंडारा मार्फत प्रोप्रायटर/मालक श्री मनिष सुनिल माहूले यास आदेशित करण्यात येते की, त्याने तक्रारकर्त्यास झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्त) तक्रारकर्त्यास दयावेत.
4. विरुध्दपक्ष क्रं -2 चोला एम.एस. जनरल इन्शुरन्स कंपनी चेन्नई मार्फत श्री निरज आर. पांडे राहणार भंडारा यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
5. निकालपत्राच्या प्रथम प्रमाणित प्रती सर्व पक्षकांराना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
6. सर्व पक्षकारांनी अतिरिक्त संच जिल्हा आयोगाचे कार्यालयातून परत घेऊन जावेत