(आदेश पारीत व्दारा - श्री नितीन मा. घरडे, मा.सदस्य)
(पारीत दिनांक : 16 मार्च 2017)
1. तक्रारकर्त्याने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केली असून तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालील प्रमाणे.
2. तक्रारकर्ता हे सेवानिवृत्त प्राचार्य असून ते वडिलोपार्जीत शेतजमिनीत शेतीचे काम करतात. विरुध्दपक्ष क्र.1 ते 4 हे किटक नाशक व तणनाशक उत्पादन करणारी कंपनी असून, विरुध्दपक्ष क्र.5 हे त्या उत्पादनाचे अधिकृत विक्रेते आहेत. तक्रारकर्त्याने जुन-जुलै 2012 खरीब हंगामामध्ये 19 एकर शेत जमिनीमध्ये सोयाबीन पिकाची पेरणी केली. त्यावेळी सोयाबीन पिकाला पोषक वातावरण असल्यामुळे सोयाबीन पिकाची वाढ व्यवस्थीत होते. परंतु, त्यानंतर झालेल्या सततधार पावसामुळे सोयाबीन पिकांमध्ये तणाची उत्पत्ती झाली असता, त्याचे निदंन करुन झाल्यानंतर देखील तणाची वाढ होत होती. त्यामुळे तक्रारकर्ता विरुध्दपक्ष क्र.1 ते 5 यांचेकडे पारंपारीक तणनाशक खरेदी करण्यासाठी गेले असता विरुध्दपक्ष यांनी फुंगीलेड व स्पिनर हे तण नाशक खरेदी करुन शेतामध्ये फवारणी करण्यास सांगितले. तसेच, विरुध्दपक्ष क्र.1 ते 5 या वरील नमूद केलेले तण नाशक हे सर्व प्रकारच्या गवतांचा नाश करणारे असून पिकाला पोषक आहे, तसेच या तण नाशकापासून पिकास कोणताही धोका होणार नाही असे स्पष्ट सांगितले. तसेच असे स्पष्ट केले की, तण नाशकाचा वापर केल्यानंतर काही नुकसान झाल्यास ती संपूर्ण नुकसान भरपाई खर्चासह भरुन देण्याचे आश्वासीत केले. त्याप्रमाणे दिनांक 6.7.2012 रोजी प्रतयेकी 16 बॉटल विरुध्दपक्ष क्र.5 यांचेकडून खरेदी केल्या व त्याचे तक्रारकर्त्याने रुपये 9,440/- नगदी देवून त्याची पावती प्राप्त केली. विरुध्दपक्ष क्र.5 यांनी सांगितल्याप्रमाणे त्याच्या प्रतिनीधीच्या उपस्थितीमध्ये संपूर्ण शेतात फवारणी करण्यात आली. ती फवारणी केल्यानंतर तक्रारकर्त्याला लक्षात आले की, तण नाशक फवारणीमुळे कोणत्याही प्रकारचा प्रभाव पडलेला नाही, याउलट सोयाबीन पिकाचे वाढीस नुकसान होत असल्याचे आढळून आले व त्यामुळे सोयाबीन पिकाची वाढ खुंटली असे सुध्दा दिसून आले. त्यामुळे सोयाबीन पिक पूर्णपणे करपले व पूर्णपणे सोयाबीन पिकाची नुकसान झाले. याअनुषंगाने, विरुध्दपक्ष क्र.5 यांचकडे तक्रारकर्त्याने वारंवार मोक्यावर पाहणी करण्याकरीता विनंती केली. परंतु, विरुध्दपक्ष क्र.5 यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही व पिकाचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई देऊ असे आश्वासीत केले. परंतु, बराच काळ लोटून सुध्दा विरुध्दपक्षाकडून कोणतीही नुकसान भरपाई मिळाली नाही, त्यामुळे नाईलाजास्तव विरुध्दपक्ष यांना तक्रारकर्त्याने कायदेशिर नोटीस बजावली. नोटीसीचा सुध्दा कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे सरते शेवटी सदरची तक्रार मा. मंचासमोर दाखल करण्यात आली व खालील प्रमाणे मागणी केली आहे.
1) विरुध्दपक्ष क्र.1 ते 5 यांनी उत्पादीत केलेले तणनाशक व किटकनाशकाचे उत्पादीत केलेल्या फवारणीमुळे तक्रारकर्त्याच्या सोयाबीन पिकाचे नुकसान झाल्याचे सिध्द झालेले असून त्याचे नुकसानीस विरुध्दपक्ष क्र.1 ते 5 हे संयुक्तीकरित्या जबाबदार आहे असे आदेशीत करावे.
2) तसेच, विरुध्दपक्ष क्र.1 ते 5 यांना आदेशीत करावे की, पिकाचे नुकसानीची नुकसान भरपाई एकूण रुपये 3,50,040/- कोर्टात भरावी व ती रक्कम तक्रारकर्त्याला देण्यासंबंधी आदेश करावे.
3) तसेच, विरुध्दपक्ष क्र.1 ते 5 यांनी निम्न दर्जाचे तण नाशक व किटक नाशक उत्पादन करुन तक्रारकर्त्या सारख्या शेतक-यांच्या पिकाचे नुकसान झाले त्याचेविरुध्द कायदेशिर कार्यवाही करावी व दंड आकारण्यात यावा.
4) तक्रारकर्ता यांना झालेल्या शारिरीक व मानसिक ञासापोटी, तसेच विरुध्दपक्ष क्र.1 ते 5 यांनी तक्रारकर्त्याचे झालेल्या नुकसान भरपाईच्या रकमेवर 12 टक्के व्याज देण्याचे आदेशीत व्हावे.
3. तक्रारकर्त्याच्या तक्रारीला अनुसरुन विरुध्दपक्ष क्र.1 ते 5 यांना मंचा मार्फत नोटीस बजावण्यात आली. त्यावर विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारीला आपले लेखीउत्तर सादर करुन त्यात नमूद केले की, तक्रारकर्ता यांनी सदरची तक्रार वाईट हेतुने दाखल केलेली असून तक्रारकर्त्याचा मुख्य उद्देश हा पैसे उकडण्याचा आहे. विरुध्दपक्ष क्र.1 ही शेतीकरीता लागणारी औषधी व किटकनाशक बनविणारी मोठी कंपनी असून त्याचे गचीलवोली, हैद्राबाद, आंध्रप्रदेश अशा ठिक-ठिकाणी उत्पादक कंपण्या असून त्याचे निरनिराळ्या शहरात डिलरच्या माध्यमातून विकतात. मुख्यतः स्पिनर हे उत्पादन स्पिनर या तणनाशक व किटकनाशकाचे उत्पादन विरुध्दपक्ष क्र.1 व 2 करीत नसून सदरचे उत्पादन हे M/s E.1 Dupont Indian Limited, Gurgaon, Haryana यांचे असून सदरची कंपनी ही बहुराष्ट्रीय कंपनी आहे व सदरची कंपनी ही निरनिराळ्या प्रकारचे किटकनाशक (Insecticides, Herbicides, Fungicides and pesticides ) उत्पादन करते. विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांचेकडे सदरचे उत्पादनाचे मार्केटींग करते, त्यामुळे विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांचा कोणताही दोष नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने दाखल केलेली तक्रार ही खोट्या स्वरुपाची आहे, तसेच पुढे त्यांनी नमूद केले आहे की, तक्रारकर्त्याने जुन-जुलै 2012 चे दरम्यानच्या काळात 19 एकरामध्ये सोयाबीनचे पिक घेण्याकरीता सदर किटकनाशकाचा वापर केला हे दर्शविण्याकरीता कोणताही पुरावा अभिलेखावर आणला नाही, त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार ही खोट्या स्वरुपाची असून ती खारीज होण्यास पाञ आहे. तसेच, तक्रारकर्त्यानी सदरच्या किटकनाशकाचा वापर केल्यामुळे त्यांना नुकसान झाले याबाबतचा सुध्दा पुरावा अभिलेखावर आणला नाही.
4. विरुध्दपक्ष क्र.5 यांनी तक्रारीला उत्तर दाखल करुन त्यात असे नमूद केले की, तक्रारकर्त्याची सदरची तक्रार ही संपूर्ण खोटी असून तक्रारकर्त्याने स्वतः खोटी तक्रार निर्माण केलेली आहे. त्याने पुढे असे नमूद केले आहे की, ही बाब सत्य आहे की, तक्रारकर्त्याने फुंगीलेड व स्पिनर हे किटकनाशक/ तणनाशक विरुध्दपक्ष क्र.5 यांचेकडून विकत घेतले. परंतु, विरुध्दपक्ष क्र.5 यांचा या किटकनाशकापासून तक्रारकर्त्याला झालेल्या नुकसानीबाबत दोष नाही. तक्रारकर्ता यांनी स्वतः या दोन किटकनाशक/ तणनाशकाची मागणी विरुध्दपक्ष क्र.5 यांचेकडे केली होती, त्यामुळे ते फक्त शेतीकरीता लागणा-या औषधी किंवा तणनाशक हे कृषिकेंद्र (शेती विषयक सामुग्रीचे विक्रेते) आहे. त्यामुळे विरुध्दपक्ष क्र.5 यांनी कोणत्याही प्रकारे सेवेत ञुटी किंवा अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला नाही, त्यामुळे विरुध्दपक्ष क्र.5 यांचेविरुध्द सदरची तक्रार खारीज करण्यात यावी. पुढे तक्रारकर्ता यांनी लावलेले दोषारोप आणि प्रत्योराप आपल्या उत्तरात खोडून काढले.
5. पुढे विरुध्दपक्ष क्र.3 व 4 यांनी आपल्या उत्तरात नमूद केले की, तक्रारकर्त्याने सदरची तक्रार ही खोट्या स्वरुपाची दाखल केली असून प्रत्येक उत्पादनाच्या कठोर चाचण्या उत्तीर्ण करुन नंतरच उत्पादन हे बाजारपेठेत विक्रीसाठी आणल्या जातात. तसेच, सरकारी प्रयोगशाळेत तपासणी करुन तसेच प्रमाणपञ दिल्यानंतरच त्या उत्पादानाचे बाजारपेठेत विक्री होते. सदर फुंगीलेड तणनाशक उत्पादन करणारी कंपनी ही मागील दोन वर्षापासून सदरचे औषधीचे उत्पादन बनवीत असून देशात व देशाबाहेरील शेतक-यांना पुरविल्या जातात व त्याचा लाभ शेतकरी घेतात. सदरची तक्रार ही फक्त एकट्या तक्रारकर्त्याने दाखल केली आहे. सदर तक्रारकर्त्याने पिकाचे नुकसान निदर्शनास आल्याबरोबर म्हणजेच जुलै 2012 च्या तिस-या आठवड्यात विरुध्दपक्षाकडे व संबंधीत कृषि अधिका-याकडे तक्रार दाखल करावयास हवी होती, माञ तसे न करता तक्रारकर्त्याने ऑक्टोंबरच्या दुस-या आठवड्यात नुकसान भरपाई मिळण्याकरीता नोटीस पाठविला, तसेच तक्रारकर्त्याच्या पिकाचे नुकसान झाल्याचा कुठलाही पुरावा व अहवाल तक्रारकर्त्याने सादर केला नाही. तसेच, छायाचिञाच्या आधारावर तसे निष्कर्ष काढता येणार नाही, त्यामुळे तक्रारकर्त्याची कुठलीही नुकसान भरपाई मिळण्यास तक्रारकर्ते पाञ नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात यावी. पुढे तक्रारकर्त्याने केलेले आरोप व प्रत्यारोप आपल्या उत्तरात खोडून काढले.
6. तक्रारकर्त्याने सदरच्या तक्रारी बरोबर 1 ते 8 दस्ताऐवज दाखल केले असून त्यात प्रामुख्याने तणनाशक औषधी खरेदी केल्याची पावती, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाला पाठविलेला कायदेशिर नोटीसची प्रत, पोहचपावत्या, व शेतीतील पिकाचे फोटो, पावतीसह दाखल केले आहे.
7. सदरच्या प्रकरणात दोन्ही पक्षाने लेखी युक्तीवाद दाखल केले. तसेच, दोन्ही पक्षांचा मंचासमक्ष मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला व अभिलेखावर दाखल केलेल्या दस्ताऐवजाचे अवलोकन करण्यात आले, त्याप्रमाणे खालील प्रमाणे मुद्दे व निष्कर्ष देण्यात येते.
मुद्दे : निष्कर्ष
1) तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष यांचा ग्राहक होतो काय ? : होय
2) विरुध्दपक्ष यांचेकडून तक्रारकर्त्याचे सेवेत ञुटी किंवा : होय
अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केल्याचे दिसून येते काय ?
3) आदेश काय ? : खालील प्रमाणे
// निष्कर्ष //
8. तक्रारकर्त्याची सदची तक्रार थोडक्यात अशी आहे की, तक्रारकर्ता हा शेतकरी असून त्यांनी त्याचे 19 एकर शेतीमध्ये सोयाबीनचे पिक पेरले होते. परंतु सोयाबीन पिकात अतिशय तण वाढत असल्यामुळे व पिकाला नुकसान होत असल्या कारणास्तव जुन-जुलै 2012 च्या दरम्यानच्या काळात विरुध्दपक्ष क्र.5 च्या कृषिकेंद्रातून फुंगीलेड व स्पिनर हे तणनाशक विकत घेवून, सदरचे तण नाशक हे उकृष्ठ तणनाशक आहे व ते सर्व प्रकारच्या गवतांचे नाश करते व पिकाला पोषक आहे, असे विरुध्दपक्ष क्र.5 यांनी आश्वासीत केले होते. त्यामुळे तक्रारकर्त्याने एकूण 16 बॉटल विकत घेतले व विरुध्दपक्ष यांनी सांगितल्याप्रमाणे त्याचे मिश्रण करुन विरुध्दपक्ष क्र.5 याच्या प्रतिनीधीसमक्ष शेतात त्याच्या सल्यानुसार फवारणीचे काम पिकांवर करण्यात आले व सदरचे प्रतिनीधीचे सल्यानुसार फवारणीचे काम झाल्यावर त्याने समाधान व्यक्त केले होते. परंतु तणनाशक फवारणी केल्यानंतर सुध्दा पिकातील तणाचे नाश न होता तेथील तण आणखी वाढू लागले, त्यामुळे तक्रारकर्त्याच्या सोयाबीन पिकाची वाढ खुंटली व पिकांचे नुकसान झाले. थोडक्यात म्हणजे तण नाशकाची फवारणी करुन सुध्दा पिकातील तण नष्ट झाले नाही व त्यामुळे तक्रारकर्त्यांना पिकाची आर्थिक ञास, मानसिक व शारिरीक ञास सहन करावा लागला व तक्रारकर्त्याची फसवणूक झाली, तसेच विरुध्दपक्षाकडून अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब झाला.
9. विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्त्याच्या तक्रारीला खोटे व बनावटी तक्रार असल्याचे आपल्या उत्तरात नमूद केले. पुढे विरुध्दपक्ष क्र.1 व 2 हा स्पीनर या तणनाशकाचे उत्पादन करीत नसून फक्त त्या उत्पादनाचे मार्केटींग करतो. मुळात स्पिनर हे उत्पादन M/s E.1 Dupont Indian Limited, Gurgaon, Haryana यांचे आहे व तसेच तक्रारकर्त्याने झालेल्या नुकसानीबाबत कुठलाही पुरावा अभिलेखावर आणला नाही, त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खोटी आहे.
10. विरुध्दपक्ष क्र.5 यांनी आपल्या उत्तरात असे म्हटले आहे की, ते फक्त शेती विषयक लागणारे किटक नाशकाचे विक्रेते आहे, त्यामुळे तक्रारकर्त्याला झालेल्या नुकसानीकरीता ते जबाबदार नाही.
11. विरुध्दपक्ष क्र.3 व 4 यांनी आपल्या उत्तरात असे नमूद केले आहे की, उत्पादन बाजारात येण्यापूर्वी ते सरकारी प्रयोग शाळेतून प्रमाणपञ दिल्यानंतर बाजारात विक्रीकरीता येते, तसेच त्यापूर्वी सुध्दा उत्पादन कंपनी निरनिराळ्या प्रयोग शाळेतून कठोर चाचण्याकरुन उत्पादन बाजारात विकण्यासाठी आणते. तसेच, फुंगीलेड तण नाशक हे मागील दोन वर्षापासून उत्पादन करीत असून त्याचा लाभ देशातील व बाहेरदेशातील शेतकरी घेतात. तक्रारकर्त्याने सदरची तक्रार जाणून-बुजून कंपनीच्या अस्तित्वावर काळीमा फासण्याकरीता सदरची तक्रार दाखल केली आहे व तक्रारकर्त्याची तक्रार खोटी व बिनबुडाची असून ती खारीज होण्यास पाञ आहे.
12. दोन्ही पक्षाचा युक्तीवाद व दाखल दस्ताऐवज, त्याचप्रमाणे मंचासमक्ष तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या पुराव्याचे मंचाने सुक्ष्मपणे अवलोकन केले. त्यामध्ये ही बाब स्पष्ट होते की, तक्रारकर्ता यांनी दिनांक 6.7.2012 रोजी विरुध्दपक्ष क्र.5 कृषि वैभव एजंसी यांचे दुकानातून फुंगीलेड व स्पिनर हे तण नाशक रुपये 9,440/- ला विकत घेतले. तसेच, फुंगीलेड याचा लॉट नंबर E 017 अवधी 5/13 व पॅकींग 400 ग्रॅम एकूण 16 नग प्रती रुपये 420/- दराने घेतले, तसेच स्पिनर हे लॉट नंबर SL672 अवधी 6/14 पॅकींग 15 ग्रॅम प्रमाणे 16 नग रुपये 170/- प्रमाणे घेतल्याचे दिसून येते. तसेच, सदरच्या तणनाशकाचे विरुध्दपक्ष क्र.5 यांनी पाठविलेल्या प्रतिनीधीसमक्ष सदरचे तणनाशकाची फवारणी शेतात करण्यात आली. याबाबत विरुध्दपक्ष क्र.5 यांनी ही बाब आपल्या उत्तरात नाकारली नाही. तसेच, तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीबरोबर दाखल केलेल्या छायाचिञांचे अवलोकन केले असता, सोयाबीन पिकात वाढलेले तण स्पष्ट दिसून येते. विरुध्दपक्ष क्र.3 व 4 यांनी आपल्या उत्तरात असे नमूद केले आहे की, उत्पादन बाजारात विक्रीकरीता येण्यापूर्वी सदरच्या उत्पादनाचे सरकारी प्रयोगशाळेतून प्रमाणपञ दिल्यानंतरच उत्पादन बाजारात विक्रीकरीता येतात. तसेच, कंपनीकडून उत्पादनाचे निरनिराळ्या प्रयोग शाळेतून कठीण चाचण्या करुनच विक्रीकरीता बाजारपेठेत आणल्या जातात. परंतु, विरुध्दपक्षाचे उत्पादन हे सर्वात उकृष्ठ व सरकारी प्रयोग शाळेतून प्रमाणपञ प्राप्त झाल्याबाबतचा कोणताही पुरावा विरुध्दपक्ष क्र.3 व 4 यांनी अभिलेखावर आणला नाही. तसेच, विरुध्दपक्षाचे उत्पादन हे उकृष्ठ दर्जाचे होते याबाबत सरकारी प्रयोग शाळेचा उकृष्ठ असल्याचे प्रमाणपञ आणण्याची जबाबदारी ही विरुध्दपक्षाची होती. त्यामुळे मंचाचे असे मत आहे की, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र.2 कडून विकत घेतलेले तण नाशक फुंगीलेड व स्पिनर लॉट नंबर E017 व स्पिनर लॉट नंबर SL672 हे निकृष्ठ दर्जाचे असल्या कारणास्तव तक्रारकर्त्याचे सोयाबीन पिकातील तणाचा नाश होऊ शकला नाही, त्यामुळे तक्रारकर्त्याचे शेतातील पिकाचे नुकसान झाले. पुढे मंचाचे असे मत आहे की, विदर्भातील शेतकरी हा आधीच शेतीपासून व दुष्काळग्रस्त, कर्जबोजीत असतो, या सर्व कारणास्तव शेतीतील पिक झाले नाही तर त्याच्या कुंटूंबाचे पालन-पोषणाचा प्रश्न निर्माण होतो, त्यामुळे त्याचेवर दिवसेंदिवस आर्थिक बोजा सुध्दा वाढत जातो, शेवटी अशापरिस्थितीत शेतक-याला आत्महत्या करण्या व्यतिरिक्त दुसरा पर्याय नसतो. अशापरिस्थितीत सुध्दा कृषि सामुग्री पुरविणारी कंपनी निकृष्ठ दर्जाचे उत्पादन करुन शेतक-यांची पिळवणूक व फसवेगिरी करतात, हे कितपत योग्य आहे. सदरच्या प्रकरणात तक्रारकर्त्याचे सोयाबीनचे पिकाचे रुपये 3,33,040/- एवढे नुकसान झाल्याबाबत नमूद केले आहे, त्यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्दपक्षाकडून नुकसान भरपाई मागण्यास पाञ आहे, असे मंचाला वाटते.
सबब, खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येते.
// अंतिम आदेश //
(1) तक्रारकर्त्यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्दपक्ष क्र.1 ते 4 यांना वैयक्तीकरित्या व संयुक्तीकरित्या आदेशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्त्याला सोयाबीन पिकाचे नुकसान भरपाई म्हणून रुपये 1,00,000/- (रुपये एक लाख फक्त) तक्रारकर्त्याला द्यावे.
(3) विरुध्दपक्ष क्र.5 यांना सदरच्या प्रकरणातून मुक्त करण्यात येते.
(4) तसेच, विरुध्दपक्ष क्र.1 ते 4 यांना वैयक्तीकरित्या व संयुक्तीकरित्या आदेशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्त्याला झालेल्या शारिरीक व मानसिक ञासापोटी रुपये 5,000/- व तक्रार खर्च म्हणून रुपये 5,000/- असे एकूण रुपये 10,000/- तक्रारकर्त्याला द्यावे.
(5) विरुध्दपक्ष यांनी आदेशाची पुर्तता आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत करावे.
(6) उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क पाठविण्यात यावी.