तक्रारदार स्वत: हजर.
जाबदेणारंतर्फे अॅड. ख्नांडेकर हजर
द्वारा मा. श्री. व्ही. पी. उत्पात, अध्यक्ष
** निकालपत्र **
(22/10/2013)
प्रस्तुतची तक्रार ग्राहकाने, जाबदेणार यांनी डिपॉझिटची रक्कम परत केलेली नाही व सेवेतील त्रुटीकरीता दाखल केलेली आहे. तक्रारीतील कथने खालीलप्रमाणे आहेत.
1] तक्रारदार हे ससाणेनगर, हडपसर, पुणे येथील रहिवासी असून जाबदेणार ही दूरध्वनी सेवा पुरविणारी संस्था आहे. तक्रारदार हे पूर्वी 9, जीवनछाया सोसायटी, गायकवाड हॉस्पिटल मागे, ससाणेनगर, हडपसर, पुणे – 28 या पत्त्यावर राहत होते. त्यांनी 1997 साली बी.एस.एन.एल. ची लॅन्ड लाईन दूरध्वनी क्र. 26819758 ची सुविधा घेतलेली होती. सन 2007 च्या सप्टेंबर महिन्यामध्ये तक्रारदार यांनी त्यांच्या राहण्याचे ठिकाण बदलले व सदरचे कनेक्शन ट्रान्सफर करण्याकरीता अर्ज दिला. जाबदेणार यांनी, तक्रारदार यांच्या नविन सोसायटीला त्यांची केबल नसल्यामुळे कनेक्शन देता येणार नाही असे कळविले. त्यानंतर दि. 11/9/2012 रोजी तक्रारदारांनी डिपॉजिटची रक्कम रु. 3,000/- परत मिळण्याकरीता अर्ज पाठविला. परंतु, जाबदेणार यांनी डिपॉजिटची रक्कम दिली नाही. म्हणून, तक्रारदार यांनी मानसिक व शारीरिक त्रासापोटी रक्कम रु. 1,000/-, डिपॉजिटची रक्कम रु. 3,000/- व तक्रारीचा खर्च रक्कम रु. 1,000/- ची मागणी प्रस्तुतच्या तक्रारीद्वारे केलेली आहे.
2] जाबदेणार यांनी प्रस्तुतच्या प्रकरणामध्ये हजर होऊन लेखी कैफियत दाखल केली व तक्रारीतील कथने नाकारले. जाबदेणार यांच्या म्हणण्यानुसार, प्रस्तुत मंचास सदरची तक्रार चालविण्याचे अधिकार नाहीत, कारण इंडियन टेलीग्राफ अॅक्ट, 1885 च्या कलम 7बी प्रमाणे त्यांच्याविरुद्धच्या तक्रारींकरीता पर्यायी व्यवस्था आहे. त्याचप्रमाणे, तक्रारदारांनी सदरचे टेलीफोन कनेक्शन बंद करण्याबाबत किंवा पुढे चालू ठेवण्याबाबत न कळविल्यामुळॆ त्यांचे टेलीफोन कनेक्शन खंडीत करण्यात आले व डिपॉजिटची रक्कम बीलामध्ये अॅडजस्ट करण्यात आली. प्रस्तुतच्या प्रकरणामध्ये जाबदेणार यांची कोणतीही सेवेतील त्रुटी नाही, म्हणून तक्रार फेटाळण्यात यावी अशी विनंती जाबदेणार करतात.
4] दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेले शपथपत्र व कागदोपत्री पुरावे आणि लेखी कथने त्याचप्रमाणे जाबदेणार यांनी दाखल केलेला मा. राष्ट्रीय आयोगाचा निवाडा विचारात घेता खालील मुद्दे निश्चित करण्यात येत आहेत. सदरचे मुद्ये, त्यावरील निष्कर्ष व कारणे खालीलप्रमाणे-
अ.क्र. | मुद्ये | निष्कर्ष |
1. | जाबदेणार यांनी कमी प्रतीची सेवा देऊन सेवेमध्ये त्रुटी निर्माण केली आहे का ? | नाही |
2 . | अंतिम आदेश काय ? | तक्रार नामंजूर करण्यात येते |
कारणे
4] तक्रारदारांनी जाबदेणार यांचेकडून टेलीफोन कनेक्शन घेतले याबाबत वाद नाही. त्याचप्रमाणे त्यांनी डिपॉजिटची रक्कम भरली याबाबतही वाद नाही. तक्रारदार यांनी सदरचे कनेक्शन नवीन जागी शिफ्ट करण्यासाठी अर्ज केला, परंतु जाबदेणार यांनी त्यांची टेलीफोन लाईन नवीन जागेवर उपलब्ध नसल्याचे कळविले. अशा परिस्थितीमध्ये, तक्रारदारांनी सदरचे कनेक्शन रद्द करण्याबाबत जाबदेणार यांना कळविणे आवश्यक होते. परंतु तक्रारदारांनी तसे न केल्यामुळे त्यांचे नावे बील खर्ची पडले. सदरच्या डिपॉजिटपैकी रक्कम रु. 840/- प्रथम देयकामध्ये समाविष्ट करण्यात आले व उर्वरीत रक्कम रु. 2160/- ही डिसे. 2007 पर्यंतच्या सर्व बीलापोटी वळती करुन घेण्यात आली.
5] जाबदेणार यांनी सन्मा. राष्ट्रीय आयोगाचा रिव्हीजन पिटीशन क्र. 4411/2009, “श्रीमती वंदना भोसले विरुद्ध भारत संचार निगम लिमिटेड” निवाडा दाखल केलेला आहे. सदरच्या निवाड्यामध्ये सन्मा. राष्ट्रीय आयोगाने असे प्रतिपादन केले आहे की, सदरचे प्रकरण हे टेलीग्राफ अॅक्टच्या कक्षेत येते व सन्मा. सर्वोच्च न्यायालयने यासंबंधी, ग्राहक मंचास हे प्रकरण चालविण्याचे अधिकार नाहीत, असे निरिक्षण केले आहे. वर उल्लेख केलेले मुद्दे, निष्कर्षे आणि कारणे यांचा विचार करता, खालील आदेश पारीत करण्यात येतो.
** आदेश **
1. तक्रारदार यांची तक्रार नामंजूर करण्यात येते.
2. तक्रारीच्या खर्चाबाबत कोणताही हुकुम नाही.
3. आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात
यावी.
4. पक्षकारांना असे आदेश देण्यात येतात की त्यांनी आदेशाची
प्रत मिळाल्यापासून एक महिन्याच्या आंत सदस्यांकरीता
दिलेले तक्रारीचे संच घेऊन जावेत, अन्यथा सदरचे संच
नष्ट करण्यात येतील.
स्थळ : पुणे
दिनांक : 22/ऑक्टो./2013