::निकालपत्र:: (पारीत व्दारा- श्री मनोहर गोपाळराव चिलबुले, मा.अध्यक्ष) (पारीत दिनांक-19 मार्च, 2014 ) 01. तक्रारकर्तीने तिचे मृतक पती यांचे पॉलिसी संबधाने विमा दाव्याची रक्कम विरुध्दपक्ष विमा कंपनीकडून मिळावी व इतर अनुषंगीक मागण्यांसाठी प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली मंचा समक्ष दाखल केली.
02. तक्रारकर्तीचे तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे- तक्रारकर्तीचे मृतक पती श्री हनुमंतसिंग डोंगरे हे डब्ल्यु.सी.एल. मध्ये डंप्पर ऑपरेटर म्हणून कार्यरत होते. त्यांनी वि.प. विमा कंपनी कडून खालील प्रमाणे जीवन सरल विमा पॉलिसी काढल्या होत्या, त्याचे विवरण “परिशिष्ठ-अ” नुसार खालील प्रमाणे - “परिशिष्ठ-अ” पॉलिसी क्रमांक | पॉलिसी काढल्याची तारीख | दरमहा हप्ता रुपयांमध्ये | विमा पॉलिसीचे मासिक हप्त्यां पोटी तक्रारकर्तीचे पती यांनी विमा पॉलिसी काढल्याचे दिनांका पासून डिसेंबर, 2012 पर्यंत जमा केलेली एकूण रक्कम | विमा पॉलिसीव्दारे वि.प.विमा कंपनीने स्विकारलेली जोखीम | 973759439 | 15.02.2010 | 531.00 | डिसेंबर,2012 पर्यंत एकूण 23 महिने म्हणजेच रुपये-531/-X23 महिने= एकूण रुपये-12,213/- | नैसर्गिक मृत्यू झाल्यास रुपये-1,25,000/- व अपघाती मृत्यू झाल्यास रुपये-1,25,000/- | 973760851 | 15.10.2010 | 1062.00 | डिसेंबर,2012 पर्यंत एकूण 23 महिने म्हणजेच रुपये-1062/-X15 महिने= एकूण रुपये-15,930/- | नैसर्गिक मृत्यू झाल्यास रुपये-2,50,000/- व अपघाती मृत्यू झाल्यास रुपये-2,50,000/- |
पॉलिसी क्रमांक | पॉलिसी काढल्याची तारीख | दरमहा हप्ता रुपयांमध्ये | विमा पॉलिसी पोटी तक्रारकर्तीचे पती यांनी जमा केलेली रक्कम | विमा पॉलिसीव्दारे वि.प.विमा कंपनीने स्विकारलेली जोखीम | 973761167 | 28.12.2010 | 1021/- | डिसेंबर,2012 पर्यंत एकूण 23 महिने म्हणजेच रुपये-1062/-X13 महिने=रुपये-13,273/- | नैसर्गिक मृत्यू झाल्यास रुपये-2,50,000/- व अपघाती मृत्यू झाल्यास रुपये-2,50,000/- |
तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, तिचे पती विमाधारक श्री हनुमंतसिंग डोंगरे यांचा दि.03 जानेवारी, 2012 रोजी आजारपणामुळे मृत्यू झाला. पतीचे मृत्यू नंतर तक्रारकर्तीने शाखा व्यवस्थापक, भारतीय जीवन बिमा निगम उमरेड यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितल्या नुसार विभागीय कार्यालयात आवश्यक मूळ दस्तऐवजांसह दावा सादर केला. वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक, भारतीय जीवन बिमा निगम नागपूर यांनी दि.12.10.2012 रोजीचे पत्रान्वये विमाधारक श्री हनुमंतसिंग डोंगरे यांना पॉलिसी काढते वेळी Olfactory neuroblastoma आजार होता व ही बाब त्यांनी विरुध्दपक्ष विमा कंपनी पासून लपवून ठेवल्यामुळे दावा खारीज करण्यात आला. त्यावर तक्रारकर्तीने विरुध्दपक्ष विमा कंपनीचे झोन ऑफीस दावा पुर्नविचार समिती यांचे पुढे अपिल दाखल करुन त्यात नमुद केले की, तिचे विमाधारक पतीचा Olfactory neuroblastoma या आजाराने मृत्यू झालेला नाही तसेच मृत्यूपूर्वी त्यांना हा आजार कधीही झालेला नव्हता. वि.प.झोन ऑफीस पुर्नविचार समितीने तक्रारकर्तीचे अपिल खारीज केले व तसे तक्रारकर्तीस दि.30.03.2013 रोजीचे पत्रान्वये कळविले. तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, विरुध्दपक्ष विमा कंपनीने विमा दावा खोटया दस्तऐवजाचे आधारावर फेटाळून लावला. वस्तुतः तक्रारकर्ती ही विमा दाव्याची संपूर्ण रक्कम रुपये-6,25,000/- मिळण्यास दावेदार असताना तक्रारकर्तीस सदर विमा रक्कम मिळण्या पासून केले. म्हणून तक्रारकर्तीने मंचा समक्ष प्रस्तुत तक्रार दाखल करुन विरुध्दपक्ष विमा कंपनी विरुध्द खालील प्रमाणे मागणी केली- तक्रारकर्तीची प्रार्थना- अ) तक्रारकर्तीचे पतीचे नैसर्गिक मृत्यू संबधाने विमा पॉलिसी क्रं-973761176, क्रं-973760851 आणि क्रं-973759439 नुसार एकूण विमा दावा रक्कम रुपये-6,25,000/- वि.प.विमा कंपनीने त.क.ला देण्याचे आदेशित व्हावे. ब) तसेच प्रार्थना क्रं-(अ) नुसार मा.मंचास विमा दावा रक्कम देणे अनुकूल वाटत नसल्यास त्या स्थितीत तक्रारकर्तीचे मृतक पतीने पॉलिसी पोटी जमा केलेली हप्त्यांची रक्कम व्याजासह तक्रारकर्तीस देण्याचे आदेशित व्हावे. क) तक्रारकर्तीस झालेल्या मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रासा बद्दल रुपये-25000/- नुकसान भरपाई देण्याचे वि.प.विमा कंपनीस आदेशित व्हावे. ड) प्रस्तुत तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-10,000/- विरुध्दपक्ष विमा कंपनीने त.क.ला देण्याचे आदेशित व्हावे. 03. विरुध्दपक्ष विमा कंपनीने प्रतिज्ञालेखावरील उत्तर मंचा समक्ष सादर केले. वि.प.विमा कंपनीने आपले लेखी उत्तरात मान्य केले की, तक्रारकर्तीचे दिवंगत पती श्री हनुमंतसिंग डोंगरे यांनी सन-2010 मध्ये विरुध्दपक्ष भारतीय जीवन बिमा निगमच्या अधिकृत अभिकर्त्या तर्फे जीवन सरल पॉलिसी अनुक्रमांक- क्रं-973759439 क्रं-973761176 आणि क्रं-973760851 काढल्यात. परंतु विमाधारकाने पॉलिसीपोटी मासिक हप्त्यांचा भरणा नियमित केला ही बाब आवश्यक दस्तऐवजां अभावी नाकारण्यात येत असल्याचे व ते सिध्द करण्याची जबाबदारी तक्रारकर्तीची असल्याचे नमुद केले. विरुध्दपक्ष विमा कंपनी तर्फे पुढे असे नमुद करण्यात आले की, तक्रारकर्तीचे मृतक पती श्री हनुमंतसिंग डोंगरे यांना Olfactory neuroblastoma हा आजार सन-2006 म्हणजे पॉलिसी काढण्यापूर्वी पासून होता. विमाधारक श्री हनुमंतसिंग डोंगरे यांचे मृत्यूला Olfactory neuroblastoma हा आजार प्रामुख्याने कारणीभूत आहे. विमाधारकाने
पॉलिसी काढतेवेळी त्यास पूर्वी पासून असलेला Olfactory neuroblastoma हा आजार विरुध्दपक्ष विमा कंपनी पासून लपवून ठेवला. पॉलिसी काढतेवेळी भरुन घेण्यात आलेल्या फॉर्म मधील वैयक्तिक ईतिवृत्त कॉलम मध्ये असणा-या सर्व प्रश्नानां प्रश्न क्रं 11(क) ते (ह) ज्यामध्ये गेल्या 05 वर्षात ज्या आजारा करीता 01 हप्त्यापेक्षा जास्त कालावधीची वैद्दकीय चिकित्सा लागते अशा आजारासाठी चिकित्साकडे उपचार घेतले आहे काय? या प्रश्नास विमाधारक यांनी “नाही” असे उत्तर दिले. विरुध्दपक्ष विमा कंपनीने केलेल्या चौकशीत मृतक विमाधारकास Olfactory neuroblastoma आजार सन-2006 पासून म्हणजे पॉलिसी घेण्या अगोदर पासून होता ही बाब सिध्द होते. पॉलिसी घेताना भरावयाच्या फॉर्ममध्ये तक्रारकर्तीचे मृतक पती विमाधारक यांनी घोषणापत्राव्दारे फॉर्म मधील माहिती असत्य असल्याचे आढळून आल्यास विमा करार रद्द होईल असे घोषीत केलेले असून त्याखाली विमाधारक आणि साक्षीदाराची सही आहे. त्यामुळे तक्रारकर्तीचे मृतक पती हे पॉलिसी घेण्यापूर्वीच त्यांच्या मृत्यूस कारण असलेल्या Olfactory neuroblastoma या आजाराने ग्रस्त होते व ही गोष्ट विरुध्दपक्षा पासून लपवून ठेवल्यामुळे विमाधारक आणि विरुध्दपक्ष विमा कंपनी मधील विमा करार रद्द ठरतो. विरुध्दपक्ष विमा कंपनीने वरिष्ठ विभागीय प्रबंधक, भारतीय जीवन बिमा निगम, नागपूर तसेच झोनल प्रबंधक, भारतीय जीवन बिमा निगम, मुंबई यांनी दिलेला निर्णय योग्य आहे, त्यांनी तक्रारकर्तीस कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही. विरुध्दपक्ष विमा कंपनीचे अधिकारी यांनी विमा दावा खारीज करताना पॉलिसीच्या अटी अट क्रं 11 व मा.राष्ट्रीय ग्राहक वाद निवारण आयोगाने निर्देशित केलेली मार्गदर्शक तत्वे विचारात घेतलेली आहेत. विरुध्दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्तीने केलेल्या संपूर्ण मागण्या अमान्य असल्याचे नमुद केले. आपले विशेष कथनात वि.प.विमा कंपनी तर्फे नमुद करण्यात आले की, विमाधारकाचे मृत्यू नंतर केलेल्या चौकशीत विमाधारकाने दि.10.01.2006 रोजी ऑरेंज सिटी हॉस्पिटल येथे Olfactory neuroblastoma या आजारा करीता वैद्दकीय उपचार घेतले होते व सन-2006 मध्ये या रोगा करीता ऑपरेशन सुध्दा झालेले होते. ऑरेंज सिटी हॉस्पीटल यांनी दिलेल्या Death Summery यावरुन असे दिसून येते की, विमाधारक हा पुन्हा दि.13.12.2011 रोजी Olfactory neuroblastoma या आजारा करीता दवाखान्यात भरती
झाला होता व त्याच्यावर Nesal Endoscopy आणि अन्य उपचार करण्यात आले आणि दि.03.01.2012 रोजी वरील रोगामुळे त्याचा मृत्यू झाला. विमाधारकाने स्वतःचे Olfactory neuroblastoma आजारा बाबत व त्यावर घेतलेल्या वैद्दकीय उपचाराची जाणीव असून सुध्दा सन-2010 मध्ये विमा पॉलिसी घेताना माहिती लपवून ठेवली व पॉलिसी घेतली. त्यामुळे उभय पक्षां मधील पॉलिसीचा करार रद्द झालेला आहे. विमाधारक हा खरे सांगतो या विश्वासावर पॉलिसी दिली जाते. त्यामुळे परम सदभाव (Utmost good faith) हे पॉलिसीचे मूळ तत्व आहे. विमाधारक हा Olfactory neuroblastoma या आजारा पासून सन-2006 पासून ग्रस्त आहे. Olfactory neuroblastoma हा आजार नाकामधील विशेष प्रकारचा कॅन्सर आहे. विमाधारकाने सत्य वस्तुस्थिती लपवून विमा पॉलिसी काढल्यामुळे विमाधारकाचे मृत्यू नंतर विमा दावा रक्कम देय नसल्याने तक्रारकर्तीची तक्रार खारीज व्हावी, अशी विनंती विरुध्दपक्ष विमा कंपनीने केली. 04. तक्रारकर्तीने तक्रार प्रतिज्ञालेखावर सादर केली. सोबत दस्तऐवज यादी नुसार तक्रारकर्तीचे मृतक पतीचे नावे असलेल्या 03 पॉलिसीच्या प्रती, विमाधारकाचे मृत्यू प्रमाणपत्र, विरुध्दपक्ष विमा कंपनीचे विमा क्लेम फेटाळल्याचे दि.22.10.2012 रोजीचे पत्र, विरुध्दपक्ष विमा कंपनीचे नागपूर मंडल कार्यालय, नागपूरचे दि.03.12.2012 रोजीचे पत्र अशा दस्तऐवजाच्या प्रती सादर केल्यात. तसेच प्रतीउत्तरा दाखल प्रतिज्ञालेख व लेखी युक्तीवाद सादर केला.
05. विरुध्दपक्ष विमा कंपनीने प्रतिज्ञालेखावरील उत्तर सादर केले. सोबत तक्रारकर्तीचे मृतक पतीचे नावे असलेल्या 03 पॉलिसीच्या प्रती व सदर पॉलिसी संबधीने बिमा प्रस्तावाच्या प्रती, मृतक विमाधारकाचे डिसचॉर्ज कॉर्ड, डेथ समरी, डिसॉर्ज समरी, एम.आर.आय.रिपोर्ट अशा दस्तऐवजाच्या प्रती सादर केल्यात. तसेच लेखी युक्तीवाद सादर केला. 06. प्रस्तुत प्रकरणात तक्रारकर्ती तर्फे अधिवक्ता श्री मुडके तर विरुध्दपक्ष विमा कंपनी तर्फे अधिवक्ता श्रीमती नाईक यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला. 07. तक्रारकर्तीची तक्रार, वि.प.विमा कंपनीचे लेखी उत्तर, प्रकरणातील उपलब्ध दस्तऐवजांचे काळजीपूर्वक अवलोकन करण्यात आले असता, न्यायमंचाचे निर्णयार्थ उपस्थित होणारे मुद्दे व त्यावरील निष्कर्ष खालील प्रमाणे आहेत-
मुद्दा उत्तर (1) विमाधारक श्री हनुमंतसिंग डोंगरे यास पॉलिसी काढण्यापूर्वी (Pre existing disease Olfactory neuroblastoma आजार होता व तो त्याने विमा पॉलिसी काढताना लपवून ठेवल्याचे विमा कंपनीने सिध्द आहे काय?............................................होय. (2) विरुध्दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्तीचा विमा दावा नाकारुन सेवेत त्रृटी ठेवली आहे काय?.......................................................नाही. (3) अंतिम आदेश काय ?..................................... तक्रार खारीज. ::कारण मिमांसा::
मु्द्दा क्रं 1 व 2 बाबत- 08. तक्रारकर्तीचे दिवंगत पती श्री हनुमंतसिंग डोंगरे यांनी सन-2010 मध्ये विरुध्दपक्ष भारतीय जीवन बिमा निगमच्या अधिकृत अभिकर्त्या तर्फे जीवन सरल पॉलिसी अनुक्रमांक- क्रं-973759439 क्रं-973761176 आणि क्रं-973760851 काढल्यात ही बाब विरुध्दपक्ष विमा कंपनीस मान्य आहे. 09. यातील विरुध्दपक्ष विमा कंपनी तर्फे अधिवक्ता श्रीमती नाईक यांनी युक्तीवादात असे सांगितले की, तक्रारकर्तीचे मृतक पती श्री हनुमंतसिंग डोंगरे यांना Olfactory neuroblastoma हा आजार सन-2006 पासून म्हणजे सन-2010 मध्ये पॉलिसी काढण्यापूर्वी पासून होता व विमाधारक श्री हनुमंतसिंग डोंगरे यांचे मृत्यूला Olfactory neuroblastoma हा आजार प्रामुख्याने कारणीभूत आहे. परंतु विमाधारकाने पॉलिसी काढते वेळी त्यास पूर्वी पासून असलेला Olfactory neuroblastoma हा आजार विरुध्दपक्ष विमा कंपनी पासून लपवून ठेवला. पॉलिसी काढतेवेळी भरुन घेण्यात आलेल्या विमा प्रस्तावातील प्रश्न क्रं- 11(क) ते (ह) ज्यामध्ये गेल्या 05 वर्षात ज्या आजारा करीता 01 हप्त्यापेक्षा जास्त कालावधीची वैद्दकीय चिकित्सा लागते अशा आजारासाठी चिकित्साकडे उपचार घेतले आहे काय? या प्रश्नास विमाधारक यांनी “नाही” असे उत्तर दिले. सदर विमा प्रस्तावाच्या घोषणापत्राव्दारे फॉर्म मधील माहिती असत्य असल्याचे आढळून आल्यास विमा करार रद्द होईल असे घोषीत केलेले असून त्याखाली विमाधारक आणि साक्षीदाराची सही आहे. सदर प्रस्तावाच्या प्रती वि.प.ने दस्तऐवज क्रं- 4 ते 6 वर दाखल केल्या आहेत. विमाधारकाचे मृत्यू नंतर वि.प.ने केलेल्या चौकशीत विमाधारकाने दि.10.01.2006 रोजी ऑरेंज सिटी हॉस्पिटल येथे Olfactory neuroblastoma या आजारा करीता वैद्दकीय उपचार घेतले होते व सन-2006 मध्ये या रोगा करीता ऑपरेशन सुध्दा झालेले होते हे दर्शविण्यासाठी वि.प.ने ऑरेंज सिटी हॉस्पीटल, नागपूर यांनी दिलेली दि.25.01.2006 ची Discharge Summary दस्त क्रं-7 वर दाखल केली आहे. त्याचे वाचन केले असता असे दिसून येते की, श्री हनुमंतसिंग डोंगरे वरील हॉस्पीटल मध्ये उपचारासाठी दि.10.01.1006 रोजी दाखल झाले होते व त्यांना दि.25.01.2006 रोजी डिसचॉर्ज दिला होता. सदर काळात त्यांच्यावर डॉ.नन्दू कोलवाडकर यांनी व त्यांच्या चमुने ‘Olfactory neuroblastoma’ या आजारासाठी शस्त्रक्रिया केली होती. 10. वि.प.ने दाखल केलेल्या दस्तऐवज क्रं 9 ऑरेंज सिटी हॉस्पिटल रिसर्च सेंटरचे दि.10.11.2011 चे डिसचॉर्ज समरी वरुन खालील गोष्टी दिसून येतात. श्री हनुमंतसिंग डोंगरे रुग्णालयात भरती तारीख-08.11.2011 डिसचॉर्ज तारीख-10.11.2011 निदान- ‘Olfactory neuroblastoma’ उपचार तज्ञ- डॉ.नंदू कोलवाडकर पूर्वतिहास- Olfactory neuroblastoma in 2006 Diagnostic nasal endoscopy done on 2006. 11. सदर उपचाराचे काळात श्री हनुमंतसिंग यांचा दि.09.11.2011 रोजी इमेजिंग पॉईंट, नागपूर येथे MRI PNS काढण्यात आला त्याचा अहवाल वि.प.ने दस्तऐवज क्रं 10 वर दाखल केला आहे. त्यात खालील निदान निष्पन्न झाले. Operated case of olfactory neuroblastoma A lobulated variegated SOL is seen in occupying the upper 2/3rd of the nasal cavity, the ethmoidal sinuses and extending intracranial in to the anterior cranial fossa. The cribriform fossa is completely destroyed. The upper 2/3rd of nasal septum is not visualized. The inferior turbinate are normal. The medial walls of the both orbits are focally indistinct. However the lesion does not infiltrate the extra ocular muscles and does not show intraconal extension. The lesion abuts the superior oblique muscles on both sides. Retained secretions, appearing hyper intense on T1 & T2 W images are seen in both frontal sinuses. The anterior wall of the sphenoid sinus is focally breached. The rest of the sinus shows no abnormality. Mucosal thickening is seen in both maxillary antra. A small mucus retention cyst/polyp is seen in the left antrum. Operated case of olfactory neuroblastoma A lobulated variegated SOL is seen in occupying the upper 2/3rd of the nasal cavity, the ethmoidal sinuses and extending intracranial in to the anterior cranial fossa. The cribriform fossa is completely destroyed. The upper 2/3rd of nasal septum is not visualized. The inferior turbinate are normal. The medial walls of the both orbits are focally indistinct. However the lesion does not infiltrate the extra ocular muscles and does not show intraconal extension. The lesion abuts the superior oblique muscles on both sides. Retained secretions, appearing hyper intense on T1 & t2 W images are seen in both frontal sinuses. The anterior wall of the sphenoid sinus is focally breached. The rest of the sinus shows no abnormality. Mucosal thickening is seen in both maxillary antra. A small mucus retention cyst/polyp is seen in the left antrum. 12. वि.प.ने दाखल केलेल्या दस्तऐवज क्रं 8 या ऑरेंज सिटी हॉस्पिटल, नागपूरने दिलेल्या Death Summery यावरुन असे दिसून येते की, विमाधारक हा पुन्हा दि.13.12.2011 रोजी Olfactory neuroblastoma या आजारा करीता ऑरेंजसिटी हॉस्पिटल मध्ये भरती झाला होता व त्यावर उपचार करण्यात आले व दि.03.01.2012 रोजी वरील रोगामुळे त्याचा मृत्यू झाला. या दरम्यान त्यांचेवर Nesal Endoscopy व इतर आवश्यक वैद्दकीय उपचार करण्यात आले परंतु उपचारा दरम्यान विमाधारकाचा मृत्यू झाला. 13. यावरुन असे दिसून येते की, विमाधारकास सन-2006 पासून Olfactory neuroblastoma आजार होता व त्यावर घेतलेल्या वैद्दकीय उपचाराची त्यास पूर्ण जाणीव असून सुध्दा सन-2010 मध्ये विमा पॉलिसी घेताना त्याने सत्य वस्तुस्थिती लपवून विमा पॉलिसी काढल्यामुळे कराराचा भंग झाला असल्याने विमाधारकाचे मृत्यू नंतर विमा दावा रक्कम देय नाही. 14. या उलट तक्रारकर्तीचे अधिवक्ता श्री मुडके यांनी युक्तीवादात सांगितले की, वि.प.चा विमा एजंट तक्रारकर्तीचे पतीकडे आला आणि त्यास विमा पॉलिसीचे फायदे सांगून विमा पॉलिसी काढण्यास प्रवृत्त केले. प्रस्ताव भरते वेळी वि.प.च्या एजंटने त्यातील कोणताही रकाना तक्रारकर्तीच्या पतीस वाचून दाखविला नाही आणि पूर्वी कोणता आजार होता किंवा काय या बाबत कोणतीही माहिती विचारली नाही. केवळ नाव, वय, व्यवसाय व नॉमिनी एवढी माहिती विचारली आणि एजंटने स्वतःच फॉर्म भरुन अल्पशिक्षीत विमादारास प्रस्तावातील भरलेली माहिती वाचून न दाखलविता कंपनीचा व्यवसाय व त्याचे कमीशन वाढविण्यासाठी विमादाराची सही घेतली आणि प्रिमियम घेतले व त्यावरुनच वि.प.ने विमा पॉलिसी निर्गमित केल्या आहेत. त्यामुळे आता विमादाराने पूर्वीच्या आजारा बाबत माहिती दिली नाही असे खोटे कारण सांगून तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजूर करता येणार नाही कारण वि.प.त्यांच्या
एजंटच्या कृतीला जबाबदार आहे. त्यांचे म्हणणे असे आहे की, जर विमा एजंटने विचारले असते तर तक्रारकर्तीच्या पतीने सर्व माहिती सांगितली असती. 15. उपरोक्त नमुद सर्व वैद्दकीय दस्तऐवजां वरुन स्पष्ट होते की, तक्रारकर्तीचे मृतक पती यांना सर्व प्रथम ऑरेंज सिटी हॉस्पिटल मध्ये दि. 10.01.2006 रोजी भरती करण्यात येऊन दि. 25.01.2006 डिसचॉर्ज दिलेला आहे. त्यांचेवर ‘Olfactory Neuroblastoma’ साठी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर 2010 साली तक्रारकर्तीचे पतीने विमा पॉलिसीज काढल्या तेंव्हा भरलेल्या प्रस्तावामध्ये वैयक्तिक इतिवृत्त सदरात क) मागील पांच वर्षात ज्यासाठी सात दिवसां पेक्षा अधिक काळ आंतररुग्ण म्हणून राहावे लागले अशा रोगारासाठी भरती होते काय? ख) तुम्ही रोग चिकित्सेसाठी कधीही रुग्णालयात भरती होते काय? ग) पांच वर्षाच्या कालावधीत आजारपणामुळे आपण रजेवर होता काय? या व अन्य सर्व प्रश्नांची उत्तरे “नाही” अशी दिली आहेत. वि.प.ने दाखल केलेले दस्तऐवजांचा विचार करता सदर उत्तरे खरी नाहीत हे स्पष्ट होते. 16. तक्रारकर्तीचे म्हणणे असे की, प्रस्ताव अर्ज वि.प.च्या अधिकृत एजंटने भरला आणि त्याने तक्रारकर्तीच्या पतीस कोणतीही माहिती न विचारता स्वतःच्या मनाने प्रस्तावात माहिती भरली आहे व हनुमंतसिंग यांची फक्त सही घेतली आहे. तक्रारकर्तीचा विमाधारक पती शिकलेला आहे व त्याने प्रस्तावावर सही केली आहे म्हणजेच प्रस्तावातील माहिती जरी एजंटच्या हस्ताक्षरात असली तरी ती मृतक श्री हनुमंतसिंग यांच्या सांगण्या वरुन लिहिली आहे व त्यानंतर त्या बाबत श्री हनुमंतसिंग यांनी घोषणापत्रावर सही केली आहे असाच अर्थ होतो. म्हणून सदर मजकूर प्रस्तावकावर बंधनकारक आहे. सदर घोषणापत्रातील मजकूर असा की, “मी प्रस्तावात दिलेली माहिती व प्रश्नांची उत्तरे प्रश्न समजून दिलेली आहेत आणि मी कोणतीही माहिती लपवून ठेवलेली नाही. मी आणि विमा कंपनीतील करार हा सदर माहितीचे आधारे झाला असून जर माहिती असत्य सिध्द झाल्यास करार रद्द होईल आणि त्या संबधाने देण्यात आलेली रक्कम विमा कंपनी जप्त करील”. 17. श्री हनुमंतसिंग यांना 2006 साली ‘Olfactory Neuroblastoma’ हा आजार झाला होता. त्यासाठी ते दि.10.01.2006 ते 25.01.2006 या काळात 15 दिवस ऑरेंजसिटी हॉस्पिटलमध्ये भरती होते व त्यांचेवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती ही बाब त्यांनी विमा प्रस्तावा मधील प्रश्नाचे उत्तरात सांगितलेली नाही. विमा पॉलिसीज 2010 साली काढल्यावर त्यांना 08.11.2011 रोजी ‘Olfactory Neuroblastoma’ चा त्रास उदभवला व त्यासाठी ऑरेंजसिटी हॉस्पिटलमध्ये दि.08.11.2011 ते 10.11.2011 पर्यंत भरती होते. पुन्हा दि.13.12.2011 ते 03.01.2012 या काळात ऑरेंजसिटी हॉस्पिटल मध्ये वरील रोगाचे उपचारासाठी भरती झाले आणि ‘Olfactory Neuroblastoma with intracranial invasion with meningitis with cardio respiratory arrest ’ या आजाराने दि.03.01.2012 रोजी त्यांचा मृत्यू झाला.
18. एकंदरीत ज्या आजारामुळे त्यांचा मृत्यू झाला तो आजार त्यांना सन-2006 पासून होता. त्यावर त्यांनी इलाज केल्यामुळे मध्यंतरीच्या काळात सदर आजार शमलेला होता परंतु सदर आजारासाठी घेतलेल्या उपचाराची माहिती श्री हनुमंत सिंग यांनी विमा प्रस्ताव पत्रात दिली नाही. त्यामुळे घोषणापत्रात नमुद केल्या प्रमाणे सदरचा विमा करार रद्द ठरत असून सदर विम्यापोटी विमाधारकाने दिलेली रक्कम जप्त करण्याचा विमा कंपनीस अधिकार प्राप्त झाला आहे. त्यामुळे विमा प्रस्ताव दाखल करण्यापूर्वी विमाधारकास असलेल्या आजारा बाबत घेतलेल्या उपचारांची माहिती प्रस्तावात न दिल्यामुळे व विचारलेल्या प्रश्नांची खरी उत्तरे न दिल्यामुळे विमा करार रद्द झाला असल्याने तक्रारकर्तीचा विमा दावा नाकारण्याची वि.प.विमा कंपनीची कृती विमा करारातील शर्ती व अटीस अनुसरुन असल्याने ती सेवेतील न्यूनता आहे असे म्हणता येणार नाही. म्हणून मुद्दा क्रं 1 व 2 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविले आहेत. मु्द्दा क्रं 3 बाबत- 19. विमाधारक यांनी विमा प्रस्ताव सादर करण्यापूर्वी त्यास असलेल्या आजारा संबधाने केलेल्या उपाययोजने बाबत खरी व पूर्ण माहिती दिली नसल्याने विमा कंपनीने विमा पॉलिसीच्या शर्ती व अटीस अनुसरुन तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजूर केला असल्यामुळे तक्रारकर्ती तक्रारीत मागणी
केलेली कोणतीही दाद मिळण्यास पात्र नाही म्हणून मुद्दा क्रं 3 वरील निष्कर्ष नकारार्थी नोंदविला आहे. 20. उपरोक्त नमुद वस्तुस्थितीचा विचार करुन मंच खालील प्रमाणे प्रकरणात आदेश पारीत करीत आहे-
::आदेश:: 1) ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 अंतर्गत तक्रारकर्तीची तक्रार खारीज करण्यात येते. 2) उभय पक्षांनी आपआपला खर्च सहन करावा. 3) निकालपत्राची प्रमाणित प्रत उभय पक्षांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात यावी. |