Maharashtra

Bhandara

CC/21/107

मधुकर वातुजी चौधरी - Complainant(s)

Versus

ब्रान्‍च मॅनजर. नॅशनल इंश्‍योरेन्‍स कं.लि. - Opp.Party(s)

श्री.व्‍ही.एन.भोयर

16 Nov 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,BHANDARA
Near Akhil Sabhagruha, Ganeshpur Road,Bhandara
PINCODE-441904
 
Complaint Case No. CC/21/107
( Date of Filing : 14 Oct 2021 )
 
1. मधुकर वातुजी चौधरी
रा.भगतसिंह वार्ड. टाकळी. तह.जि.भंडारा
भंडारा
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. ब्रान्‍च मॅनजर. नॅशनल इंश्‍योरेन्‍स कं.लि.
सोनकुसरे भवन. जि.प.चौक. भंडारा. तह.जि.भंडारा
भंडारा
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. BHASKAR B. YOGI PRESIDENT
 HON'BLE MR. NITIN M. GHARDE MEMBER
 HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR MEMBER
 
PRESENT:श्री.व्‍ही.एन.भोयर , Advocate for the Complainant 1
 
Dated : 16 Nov 2022
Final Order / Judgement

(पारीत व्‍दारा श्रीमती वृषाली जागिरदार, मा.सदस्‍या)

 

01.    तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष नॅशनल इन्‍शुरन्‍स कंपनी कडून विमाकृत वाहनास झालेल्‍या अपघाता संबधात नुकसान भरपाई मिळावी तसेच अन्‍य अनुषंगिक मागण्‍यासाठी ग्राहक संरक्षण कायदा-2019 चे कलम-35 खाली प्रस्‍तुत तक्रार दाखल केली आहे.

 

02.   तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालील प्रमाणे-

      तक्रारकर्त्‍याचे  तक्रारी प्रमाणे तो उपरोक्‍त नमुद पत्‍त्‍यावर राहत असून किराणा सामन विक्रीचे काम करतो. त्‍याचे मालकीची शेवरलेट तवेरा हे चार चाकी वाहन असून त्‍याचा नोंदणी क्रं-MH-36/Z-0142 असा आहे. त्‍याने सदर वाहनाची पॅकेज विमा पॉलिसी क्रं-28130331206160001118 विरुध्‍दपक्ष विमा कंपनी कडून काढलेली असून विम्‍याचा कालावधी हा दिनांक-12.07.2020 ते दिनांक-11.07.2021असा आहे आणि त्‍यामुळे तो विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचा ग्राहक आहे. सदर पॅकेज पॉलिसी अंतर्गत तिस-या पक्षास झालेले नुकसान, वाहन मालक व वाहन चालक तसेच प्रवाश्‍यांना झालेले नुकसान त्‍याच बरोबर झालेले नुकसान ईत्‍यादी संबधीची जोखीम विमा पॉलिसीव्‍दारे विमा कंपनीने स्विकारलेली आहे.

 

    तक्रारकर्त्‍याने पुढे असे नमुद केले की, त्‍याचे मालकीचे उपरोक्‍त वर्णनातीत विमाकृत वाहन हे  दिनांक-22.08.2020 रोजी सायंकाळी 07.00 वाजताचे सुमारास  मौजा हरदोली वरुन तुमसर भंडारा राज्‍य मार्गा वरुन भंडारा येथे येत असताना मौजा दाभा वळणार पहेलवान धाब्‍या जवळ रानटी डूक्‍कर रोडवरुन आडवे गेल्‍याने त्‍याला वाचविण्‍यासाठी विमाकृत वाहन रोडच्‍या कडेला जाऊन असंतुलीत झाल्‍याने रोडच्‍या कडेला असलेल्‍या चिंचेच्‍या झाडावर धडकले.  सदर अपघातात तक्रारकर्ता हा जबर जखमी झाला आणि विमाकृत वाहन क्षतीग्रस्‍त झाले. अपघाता नंतर झालेल्‍या दुखापतीवर प्रथम वैद्दकीय  उपचार केलेत व  त्‍यानंतर विरुध्‍दपक्ष विमा कंपनीला विमाकृत वाहनास झालेल्‍या अपघाताची सुचना दिली. तक्रारकत्‍याने दिनांक-28.08.2020 रोजी विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे एजंटचे मार्फतीने  विमाकृत क्षतीग्रस्‍त वाहनाचे संपूर्ण दस्‍तऐवज, पोलीस पंचनामा आणि वाहन दुरुस्‍तीसाठी येणारा संभाव्‍य खर्च असे सर्व दस्‍तऐवज विरुध्‍दपक्ष विमा कंपनीकडे सादर केलेत.

 

    तक्रारकर्त्‍याने पुढे असे नमुद केले की, विमाकृत वाहनास झालेलया अपघाता नंतर त्‍याने त्‍याचे वाहनाचे इस्‍टीमेट व दुरुस्‍तीसाठी जे.एम.मोटर्स नागपूर रोड, राष्‍ट्रीय महामार्ग क्रं 6 भंडारा येथे  दिनांक-28.08.2020 रोजी ठेवले होते परंतु  दिनांक-29.08.2020 रोजी वैनगंगा नदीला  आलेल्‍या  महापुरामुळे भंडारा शहर आणि आसपासचे लगत भागात मोठया प्रमाणावर पुराचे पाणी शिरले. तक्रारकर्त्‍याने विमाकृत वाहन इस्‍टीमेट व दुरुस्‍तीसाठी ठेवले होते ते जे.एम. मोटर्स नागपूर रोड, भंडारा सुध्‍दा पुराच्‍या पाण्‍यामुळे वाहनाचे अधिक प्रमाणात  नुकसान झाले.  त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष विमा कंपनी कडे दिनांक-08.10.2020 रोजी विमाकृत वाहनाचे दुरुस्‍तीचे अंदाजपत्रक व संपूर्ण दस्‍तऐवजासह पुन्‍हा विमा दावा एजंट मार्फतीने सादर केला. तक्रारकर्त्‍याचे विमाकृत वाहन नोंदणी क्रं- MH-36/Z -0142 चे अपघातामुळे एकूण रुपये-13,20,673/- एवढया रकमेचे नुकसान झाले.   विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे सर्व्‍हेअर यांनी तक्रारकर्त्‍याचे विमाकृत क्षतीग्रस्‍त वाहनाची संपूर्ण पाहणी केली तसेच विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे  मागणी नुसार वेळोवेळी  आवश्‍यक दस्‍तजऐवज पुरविलेत परंतु  विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने विमा दाव्‍याची रक्‍कम दिली नाही.

 

    तक्रारकर्त्‍याने पुढे असे नमुद केले की, विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने  त्‍यांचे  दिनांक-15.03.2021 रोजीचे पत्राचे अनुषंगाने असे कळविले की, तक्रारकर्त्‍याने विमा दाव्‍यासोबत पाठविलेला  वाहनाचे फोटो आणि विरुध्‍दपक्ष  विमा कंपनीचे  सर्व्‍हेअर यांनी काढलेली वाहनाचे फोटो या मध्‍ये तफावत आहे तसेच विमाकृत वाहन चिंचेच्‍या झाडाला धडक  होऊन  नुकसान झालेले नसून  समोरच्‍या वाहनाचे धडके मुळे नुकसान  झाले आहे. तसेच सर्व्‍हेअर यांनी अपघाती स्‍थळा जवळील आर्यन टी शॉप मध्‍ये  विमाकृत वाहनाचे अपघाता संबधी विचारले असता तेथील लोकांनी त्‍यांना अपघाती घटने संबधी माहिती  नसल्‍याचे  कारण पुढे करुन व तक्रारकर्त्‍यास स्‍पष्‍टीकरण सादर करण्‍यास सांगून विम्‍याची  रक्‍कम देण्‍यास टाळाटाळ केली. तक्रारकर्त्‍याने दिनांक-24.03.2021 रोजीचे पत्रा नुसार  विरुध्‍दपक्ष विमा  कंपनीला उत्‍तर दिले, सदर पत्रा मध्‍ये तक्रारकर्त्‍याने असे नमुद केले की, विमाकृत वाहनास झालेल्‍या अपघाता संबधीचे दस्‍तऐवज पोलीसांनी तयार केलेले आहेत व तेच दस्‍तऐवज पोलीस घटनास्‍थळ पंचनामा विरुध्‍दपक्ष विमा कंपनीला  सादर केलेला आहे.  पोलीसांचे दसतऐवज नुसार विमाकृत वाहनास झालेला अपघात हा पहेलवान धाब्‍याजवळ झाल्‍याचे नमुद आहे परंतु विमा कंपनीचे सर्व्‍हेअर यांनी आर्यन टी  शॉप  मध्‍ये  विमाकृत वाहनास झालेल्‍या  अपघाताची चौकशी केली असल्‍याने त्‍यांना माहिती मिळाली नाही. तक्रारकर्त्‍याने  पुढे  असे नमुद केले की, क्षतीग्रस्‍त विमाकृत वाहनाचे फोटो विरुध्‍दपक्ष विमा  कंपनीचे सर्व्‍हेअर यांनी व एजंट यांनी काढलेले आहेत व विमा  कंपनी  मध्‍ये सादर केलेले आहेत त्‍यामुळे  वाहनाचे फोटो मधील तफावती संबधात तेच खुलासा करु शकतील.  विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने चुकीची कारणे पुढे करुन विमा दाव्‍याची  रक्‍कम देण्‍यास टाळाटाळ केली. विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्त्‍यास  दिनांक-27.03.2022 रोजीचे पत्र पाठवून त्‍याव्‍दारे विमा दावा नामंजूर केला. विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे त्‍याला शारिरीक  व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. म्‍हणून  शेवटी त्‍याने प्रस्‍तुत तक्रार जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल करुन विरुध्‍दपक्ष विमा कंपनी विरुध्‍द खालील  प्रमाणे मागण्‍या केल्‍यात-

 

  1. विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने  तक्रारकर्त्‍याला विमाकृत क्षतीग्रस्‍त वाहनाचे दुरुस्‍तीसाठी आलेला खर्च  रुपये-13,20,673/- विमा दावा पात्र असल्‍याचे  दिनांका पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.18 टक्‍के दराने व्‍याजासह देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

 

 

  1. तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या आर्थिक, शारिरीक व  मानसिक त्रासा बददल रुपये-50,000/- विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने  देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

 

 

  1. प्रस्‍तुत तक्रारीचा व नोटीसचा खर्च रुपये-30,000/- विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्त्‍यास  देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

 

 

  1. या शिवाय योग्‍य ती दाद त्‍याचे बाजूने मंजूर करण्‍यात यावी.

 

 

03.   विरुध्‍दपक्ष नॅशनल इन्‍शुरन्‍स कंपनीने आपले लेखी उत्‍तर जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केले. त्‍यांनी लेखी उत्‍तरा मध्‍ये असे नमुद केले की, विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे सर्व्‍हेअर यांनी जे वाहनाचे फोटो Pre- Inspection घेतले होते व Final Survey चे वेळी घेतले होते, त्‍यामध्‍ये तफावत आढळून आली म्‍हणजेच दोन्‍ही वाहन हे वेगवेगळे आहेतअसे सर्व्‍हेअर यांना आढळून आले.  तक्रारकर्त्‍याचे  विमाकृत वाहनास झालेला अपघात हा दिनांक-22.08.2020 रोजी झाला होता परंतु विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे एजंटने विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे भंडारा येथील शाखे मध्‍ये व पोलीसांना दिनांक-28.08.2020 रोजी विमाकृत वाहनास झालेल्‍या अपघाता संबधी माहिती दिली म्‍हणजेच सदर माहिती देण्‍यास सहा दिवसांचा विलंब झालेला आहे तसेच ही माहिती वाहन दुरुस्‍तीसाठी लागणा-या अंदाजपत्रका शिवाय दिलेली आहे या कारणा वरुन  सुध्‍दा विमा कंपनीने तक्रारकर्त्‍याचा  विमा दावा नामंजूर केलेला आहे.

 

     विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने पुढे असे नमुद केले की, विमा एजंटने परत एकदा तक्रारकर्त्‍याचे विमाकृत वाहनास पुराचे पाण्‍यामुळे नुकसान झाल्‍याची माहिती दिली परंतु ती सुध्‍दा वाहनास येणा-या दुरुस्‍ती संबधात अंदाजपत्रका शिवाय दिली, त्‍यामुळे विमाकृत वाहनाचे नेमके किती नुकसान झाले याची माहिती विमा कंपनीला मिळालेली नसल्‍याने विमा  कंपनीने तक्रारकर्त्‍याचा विमा दावा नामंजूर केला. तक्रारकर्त्‍याने दिनांक-13.10.2020 रोजीचे पत्रान्‍वये विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने न मागताना सुध्‍दा विलंबाचे स्‍पष्‍टीकरण दिलेले आहे. विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे सर्व्‍हेअर यांनी दिनांक-23.11.2020 रोजीच्‍या फायनल सर्व्‍हे रिपोर्टमध्‍ये स्‍पष्‍टपणे नमुद केलेले आहे की, तक्रारकर्त्‍याचे विमाकृत वाहनास जो अपघाता मुळे मार लागलेला आहे तो कोणत्‍या जनावराला आदळल्‍याने लागलेला नाही तर विमाकृत वाहन हे अन्‍य ट्रक किंवा ट्रेलर वर आदळल्‍याने झालेला आहे, यावरुन ही बाब सिध्‍द होते की, तक्रारकर्ता हा  स्‍वच्‍छ हाताने  जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष आलेला नाही करीता तक्रारकर्त्‍याची तक्रार खारीज करण्‍यात यावी. तक्रारकर्ता  हा तक्रारी मध्‍ये विमाकृत वाहनास झालेल्‍या अपघाता संबधी नुकसान भरपाई रुपये-13,20,673/- ची मागणी करीत आहे परंतु  विमाकृत वाहनाची आय.डी.व्‍ही. रुपये-7,00,000/- आहे व तक्रारकर्ता तेवढया विमा रकमेवर विमा हप्‍ता भरीत आहे, त्‍यामुळे तक्रारकर्ता मागणी प्रमाणे विमा रक्‍कम रुपये-13,20,673/- मिळण्‍यास पात्र नाही, सबब तक्रार खोटी व चुकीची  असल्‍याने खारीज करण्‍याची विनंती विरुध्‍दपक्ष विमा कंपनी तर्फे करण्‍यात आली.

 

 

04.   तक्रारकर्त्‍याची तक्रार, विरुध्‍दपक्ष  विमा कंपनीचे लेखी उत्‍तर, उभय पक्षांचा शपथेवरील पुरावा विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचा लेखी युक्‍तीवाद तसेच प्रकरणात उभय पक्षांतर्फे दाखल दस्‍तऐवजांचे जिल्‍हा ग्राहक आयोगाव्‍दारे सुक्ष्‍म अवलोकन करण्‍यात आले. तक्रारकर्त्‍या तर्फे वकील श्री विनय भोयर तर विरुध्‍दपक्ष विमा कंपनी तर्फे  वकील कु. आयुषी दलाल  यांचा  मौखीक युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला, त्‍यावरुन  जिल्‍हा ग्राहक आयोगा समोर  न्‍याय निवारणार्थ  खालील मुद्दे  उपस्थित होतात-

 

अक्रं

मुद्दा

उत्‍तर

1

तक्रारकर्त्‍याचा विमाकृत वाहनाचे दुरुस्‍तीखर्चा संबधी केलेला विमा दावा नामंजूर करुन विरुध्‍दपक्ष नॅशनल इन्‍शुरन्‍स  कंपनीने  दोषपूर्ण सेवा दिल्‍याची बाब सिध्‍द होते काय?

-होय-

2

काय आदेश

अंतीम आदेशा नुसार

 

                                                                                            :: कारणे व मिमांसा ::

मुद्दा क्रं 1 व 2

05.   तक्रारकर्त्‍याने त्‍याचे तक्रारीचे पुराव्‍यार्थ दस्‍तऐवजांच्‍या प्रती अभिलेखावर दाखल केल्‍यात.  विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे पॉलिसीचे प्रती वरुन असे दिसून येते की, तक्रारकर्त्‍याचे विमाकृत वाहन नोंदणी क्रं-MH-36/Z-0142 वाहनाची पॅकेज विमा पॉलिसी क्रं-28130331206160001118 विम्‍याचा कालावधी हा दिनांक-12.07.2020 ते दिनांक-11.07.2021 असा आहे तसेच विम्‍याची आय.डी.व्‍ही. रुपये-7,00,000/- दर्शविल्‍याचे दिसून येते.  तक्रारकर्त्‍याचे विमाकृत वाहनास अपघात झाल्‍या बाबत क्‍लेम इन्‍टीमेशन दिनांक-28.08.2020 रोजीचे पत्राची प्रत पुराव्‍यार्थ दाखल केलेली आहे. तसेच दिनांक-09.10.2020 रोजी विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे कार्यालयात वाहनाचे ईस्‍टीमेट, विमा पॉलिसी प्रत, रजिस्‍ट्रशन सर्टीफीकेट,वाहन चालक परवाना प्रत,  पोलीस पंचनामा, कॅन्‍सल्‍ड चेक इत्‍यादी दस्‍तऐवजाच्‍या प्रती पुरविल्‍या बाबत व  ते दस्‍तऐवज विरुध्‍दपक्ष विमा कंपनीला प्राप्‍त झाल्‍या बाबत पोच म्‍हणून विमा कंपनीचा शिक्‍का व सही आहे, परंतु सदर पोचवर असे नमुद केलेले आहे की, वाहनास अपघात दिनांक-22.08.2020 रोजी झालेला आहे आणि अंदापजत्रकाची प्रत दिनांक-10.07.2020 रोजीची आहे. तक्रारकर्त्‍याने जे.एम. मोटर्स भंडारा यांचे दिनांक-10.07.2020 रोजीचे अंदाजपत्रकाची प्रत पुराव्‍यार्थ दाखल केली.सदर अंदाजपत्रक एकूण रुपये-13,20,673/- एवढया रकमेचे दर्शविलेले आहे.

 

 

06.     विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे असे म्‍हणणे आहे की, तक्रारकर्त्‍याचे विमाकृत वाहनास प्रत्‍यक्ष अपघात दिनांक-22.08.2020 रोजी झाल्‍याचे पोलीस दस्‍तऐवजा वरुन दिसून येते परंतु जे.एम. मोटर्स भंडारा यांचे अंदाजपत्रकावर अपघात होण्‍याचे पूर्वीच दिनांक-10.07.2020 दर्शविलेले आहे. विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्त्‍याला विमा दावा नामंजूरीचे जे पत्र दिनांक-15.03.2021 रोजीचे दिले त्‍यामध्‍ये विमाकृत वाहनास अपघात हा दिनांक-22.08.2020 रोजी झालेला असताना एजंटचे मार्फतीने क्‍लेम बाबतची सुचना विरुध्‍दपक्ष विमा कंपनीला दिनांक-28.08.2020 रोजी ई-मेल व्‍दारे सहा दिवस विलंबाने दिली असल्‍याचे नमुद केलेले आहे. त्‍यानंतर दिनांक-08.09.2020 रोजी पुन्‍हा विरुध्‍दपक्ष कंपनीला वाहनाचे पुरामुळे झालेल्‍या नुकसानी संबधात क्‍लेम बाबत ई-मेल व्‍दारे सुचना दिली परंतु दोन्‍ही वेळेस वाहनाचे दुरुस्‍तीचे अंदाजपत्रक दिले नसल्‍याचे नमुद केलेले आहे. तसेच सदर विमा दावा नामंजूरीचे  दिनांक-15.03.2021 रोजीचे पत्रात असेही नमुद केलेले आहे की, विमा दावा दाखल करण्‍यास का विलंब झाला या बाबत विचारलेले नसताना दिनांक-13.10.2020 रोजीचे पत्रात विमा दावा  दाखल  करण्‍यास झालेल्‍या विलंबाचे स्‍पष्‍टीकरण दिलेले आहे.

 

 

07    विमाकृत वाहन दुरुस्‍तीचे अंदाजपत्रका वरील दिनांक हा अपघाता पूर्वीचा नमद केलेला आहे या विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे आक्षेपा बाबत जिल्‍हा ग्राहक आयोगाव्‍दारे स्‍पष्‍ट करण्‍यात येते की,  तक्रारकर्त्‍याचे म्‍हणण्‍या प्रमाणे त्‍याने  वाहनाचे दुरुस्‍ती संबधी जी ईस्‍टीमेटची प्रत दाखल केली त्‍यावर दर्शविलेली तारीख ही महिना दिवस आणि वर्ष अशा स्‍वरुपात असल्‍याचा खुलासा केलेला आहे, (10/07/2020 –दहावा महिना, सात तारीख आणि दोन हजार वीस वर्ष)

 

 

08.    विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे असे म्‍हणणे आहे की, वाहनाचे फोटो पाहिल्‍या नंतर असे दिसून येते की, वाहनास जबर अपघात झालेला आहे परंतु स्‍पॉट सर्व्‍हे करण्‍याची विनंती तक्रारकर्त्‍याने केली नाही. परंतु विमा दावा प्रपत्रा मध्‍ये अपघाताचे कारण जंगली डूक्‍कर आडवे गेल्‍याने त्‍याला वाचविण्‍याचे प्रयत्‍नात वाहन हे चिंचेचे झाडावर आदळले परंतु क्षतीग्रस्‍त विमाकृत  वाहनाची पाहणी केली असता वाहनास समोरुन येणा-या ट्रक किवा ट्रेलरने धडक दिलेली असावी. चिंचेच्‍या झाडाजवळ पाहणी केली असता तेथे विमाकृत वाहनाचे कोणतेही तुटलेले भाग दिसून आले नाही. अपघाताचे जवळील विरुध्‍द दिशेला असलेल्‍या एरीयन टी व नाश्‍ता सेंटर येथे चौकशी  केली असता त्‍यांनी त्‍या ठिकाणी कोणताही अपघात झाल्‍याचे पाहिले नसल्‍याचे विमा दावा नामंजूरीचे पत्रात नमुद  केलेले आहे.

 

 

09.     या संदर्भात  जिल्‍हा ग्राहक आयोगाव्‍दारे स्‍पष्‍ट करण्‍यात येते की,  तक्रारकर्त्‍याने पोलीस स्‍टेशन, वरठी, जिल्‍हा भंडारा यांनी केलेल्‍या घटनास्‍थळ  पंचनाम्‍याची प्रत पुराव्‍यार्थ दाखल केली, त्‍यामध्‍ये रान डूक्‍कर अचानकपणे रोडवर आडवा आल्‍याने रोडचे कडेला असलेल्‍या चिंचेच्‍या झाडाला तवेरा गाडी (विमाकृत वाहन) धडकल्‍याने क्षतीग्रस्‍त होऊन  नुकसान  झाले असे नमुद केलेले आहे. सदर पोलीसांचे घटनास्‍थळ पंचनाम्‍यावर अविश्‍वास ठेवण्‍याचे कोणतेही  प्रयोजन  जिल्‍हा ग्राहक आयोगास दिसून येत नाही.  तसेच दिनांक-09.10.2020 रोजी विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे कार्यालयात वाहनाचे  ईस्‍टीमेट, विमा पॉलिसी प्रत, रजिस्‍ट्रशन सर्टीफीकेट, वाहन चालक परवाना प्रत, पोलीस पंचनामा, कॅन्‍सल्‍ड चेक इत्‍यादी दस्‍तऐवजाच्‍या प्रती पुरविल्‍या बाबत व  ते दस्‍तऐवज विरुध्‍दपक्ष विमा कंपनीला प्राप्‍त झाल्‍या बाबत पोच म्‍हणून विमा कंपनीचा शिक्‍का व सही आहे, असे असताना विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे दिनांक-15 मार्च,2021 रोजीचे पत्रात तक्रारकर्त्‍याने विमाकृत वाहनाचे दुरुस्‍तीचे अंदाजपत्रक  पुरविले नाही असा जो आक्षेप घेतलेला आहे तो सदर पोच व शिक्‍क्‍यावरुन  खोटा असल्‍याचे दिसून येते. तसेच तक्रारकर्त्‍याचे असे म्‍हणणे आहे की, वाहनाचे दुरुस्‍तीचे अंदाजपत्रकाची  प्रती वरील दिनांक-10.07.2020 असा जरी असला तरी ती तारीख ही प्रथम महिना, नंतर दिवस आणि नंतर वर्ष अशी वाचण्‍यात यावी म्‍हणजेच सदर अंदाजपत्रक हे दिनांक-07 आक्‍टोंबर, 2020 रोजीचे असून ते दिनांक-09 ऑक्‍टोंबर, 2020 रोजी विरुध्‍दपक्ष विमा कंपनीला पुरविलेले आहे या तक्रारकर्त्‍याचे कथना मध्‍ये जिल्‍हा ग्राहक आयोगास तथ्‍य दिसून येते. तक्रारकर्त्‍याचे असेही म्‍हणणे आहे की, विमाकृत वाहनास झालेला अपघात हा पहेलवान धाब्‍या जवळ झालेला असून  विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने आर्यन टी शॉप मध्‍ये अपघाताची चौकशी केलेली आहे. विरुध्‍दपक्ष  विमाकंपनीने तक्रारकर्त्‍याचाविमा दावा हा अंतीमतः दिनांक-27.03.2021 रोजी नामंजूर केल्‍याचे पत्राचे प्रती वरुन दिसून येते.  विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्त्‍याचे विमाकृत वाहनास झालेल्‍या अपघाता संबधी संशय घेतल्‍या नंतर तक्रारकर्त्‍याने विमाकृत वाहनाचे फोटो पुराव्‍यार्थ दाखल केले, त्‍यामध्‍ये वाहनाचे नंबर प्‍लेटवर MH-36 Z 0142 स्‍पष्‍टपणे दिसत असून सदर वाहनाचे समोरील भागात फार मोठया प्रमाणावर तोडफोड झाल्‍याचे  स्‍पष्‍ट दिसून येते. यावरुन विमाकृत वाहनाचे फार मोठया प्रमाणात नुकसान झाल्‍याची बाब सिध्‍द होते. परंतु विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्त्‍याने सर्व दस्‍तऐवज पुरवून सुध्‍दा काहीतरी कारणे पुढे करुन  तक्रारकर्त्‍याचा विमा दावा विनाकारण नामंजूर केला असे दिसून येते.  विशेषतः पोलीसांनी तयार केलेला घटनास्‍थळ पंचनामा असताना तसेच विमाकृत वाहनास मोठया प्रमाणावर तोडफोड झालेली असताना विमा दावा नामंजूर करुन तक्रारकर्त्‍यास दोषपूर्ण सेवादिल्‍याची बाब सिध्‍द होते आणि त्‍यामुळे तक्रारकर्त्‍यास निश्‍चीतच शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावालागत आहे.

 

 

10.     वरील सर्व वस्‍तुस्थितीचा विचार करता तक्रारकर्त्‍याचे वाहनाचे विमा पॉलिसी प्रमाणे त्‍याचे विमाकृत वाहन नोंदणी क्रं-MH-36/Z-0142 वाहनाची पॅकेज विमा पॉलिसी क्रं-28130331206160001118  चे प्रतीवरुन असे दिसून येते की, वाहनाचा विम्‍याचा कालावधी हा दिनांक-12.07.2020 ते दिनांक-11.07.2021 असा असून विम्‍याची आय.डी.व्‍ही. रुपये-7,00,000/- दर्शविल्‍याचे दिसून येते, तक्रारकर्त्‍याला विमा मंजूर करताना टोटल लॉस बेसिसवर मंजूर केल्‍यामुळे  विमाकृत वाहनाचे सॉल्‍व्‍हेजची रक्‍कम वजावट होणे आवश्‍यक आहे त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याला विमाकृत वाहनाचे आय.डी.व्‍ही. अनुसार रक्‍कम रुपये-7,00,000/- मधून वाहनाचे सॉल्‍व्‍हेजची रक्‍कम रुपये-50,000/- वजा जाता उर्वरीत रक्‍कम रुपये-6,50,000/- मंजूर करणे आणि सदर विमा रकमेवर विमा दावा अंतीमतः नामंजूर केल्‍याचा दिनांक-27.03.2021 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9 टक्‍के दराने व्‍याज मंजूर करणे योग्‍य व न्‍यायोचित होईल असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे.  तक्रारकर्त्‍यास झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बाबत रुपये-10,000/- आणि तक्रारीचा खर्चरुपये-10,000/- विरुध्‍दपक्ष विमा कपंनीने तक्रारकर्त्‍यास दयावे असे आदेशित करणे योग्‍य वन्‍यायोचीत  होईल असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे.

 

 

11.   उपरोक्‍त नमुद सर्व वस्‍तुस्थिती, परिस्थितीजन्‍य पुरावे लक्षात घेता आम्‍ही प्रस्‍तुत तक्रारी मध्‍ये खालील प्रमाणे  अंतीम आदेश पारीत करीत आहोत-

 

                                                                        :: अंतीम आदेश :: 

  1. तक्रारकर्ता श्री मधुकर वातुजी चौधरी यांची तक्रार, विरुध्‍दपक्ष नॅशनल इन्‍शुरन्‍स कंपनी तर्फे शाखा व्‍यवस्‍थापक शाखा कार्यालय, भंडारा यांचे विरुध्‍द अंशतः मंजूर  करण्‍यात येते.

 

 

  1. विरुध्‍दपक्ष नॅशनल इन्‍शुरन्‍स कंपनी तर्फे शाखा व्‍यवस्‍थापक शाखा कार्यालय, भंडारा यांना आदेशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍याला विमाकृत वाहन नोंदणी क्रं-MH-36/Z-0142 ची पॅकेज विमा पॉलिसी क्रं-28130331206160001118 अन्‍वये विमा रक्‍कम म्‍हणून रुपये-6,50,000/- (अक्षरी रुपये सहा लक्ष पन्‍नास हजर फक्‍त) अदा करावे आणि सदर विमा रकमेवर विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने विमा दावा अंतीमतः नामंजूर केल्‍याचा दिनांक-27.03.2021 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9 टक्‍के दराने व्‍याज तक्रारकर्त्‍याला दयावे.

 

 

  1. जिल्‍हा ग्राहक आयोगाचे आदेशा प्रमाणे तक्रारकर्त्‍यास मंजूर विमा दावा रकमे मधून विमाकृत वाहनाचे सॉल्‍व्‍हेजची रक्‍कम वजावट झाल्‍याने विमाकृत क्षतीग्रस्‍त वाहन तक्रारकर्त्‍याचे ताब्‍यात राहिल असे आदेशित करण्‍यात येते.   

 

 

  1. विरुध्‍दपक्ष नॅशनल इन्‍शुरन्‍स कंपनी तर्फे शाखा व्‍यवस्‍थापक शाखा कार्यालय, भंडारा यांना आदेशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍याला  झालेल्‍या शारिरीक, मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/-  (अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त) आणि तक्रारीचा खर्च रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त) अशा रकमा तक्रारकर्त्‍याला  दयाव्‍यात.

 

 

  1. विरुध्‍दपक्ष नॅशनल इन्‍शुरन्‍स कंपनी तर्फे शाखा व्‍यवस्‍थापक शाखा कार्यालय, भंडारा यांना आदेशित करण्‍यात येते की, त्‍यांनी सदर आदेशाचे अनुपालन सदर निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत करावे.

 

 

  1. उभय पक्षकारांना प्रस्‍तुत निकालपत्राची  प्रथम प्रमाणित प्रत निःशुल्क उपलब्‍ध करुन दयावी

 

 

  1. उभय पक्षकार व त्‍यांचे अधिवक्‍ता यांना निर्देशित करण्‍यात येते की, त्‍यांनी जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष प्रकरणात दाखल केलेले अतिरिक्‍त संच जिल्‍हा ग्राहक आयोगाचे कार्यालयातून परत घेऊन जावेत.  
 
 
[HON'BLE MR. BHASKAR B. YOGI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MR. NITIN M. GHARDE]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.