Dated the 22 Sep 2015
न्यायनिर्णय
(द्वारा श्री. ना.द.कदम -मा.सदस्य)
- सामनेवाले क्र. 1 सहकारी बँक आहे. तक्रारदार हे वसई येथील रहिवासी असून सामनेवाले क्र. 1 यांचे बचतखातेधारक आहेत. तक्रारदारांनी न दिलेल्या धनादेशाचे अधिदान सामनेवाले बँकेने केल्याने प्रस्तुत वाद निर्माण झाला आहे.
- तक्रारदारांच्या तक्रारीमधील कथनानुसार, तक्रारदार हे सामनेवाले बँकेचे गेल्या 30 वर्षांपासून बचतखातेधारक आहेत. श्री. रामकृष्ण ठाकूर हे तक्रारदारांचे मित्र असून त्यांना तक्रारदारांचे बॅंकेचे सर्व व्यवहार माहित होते. सदर रामकृष्ण ठाकूर यांनी तक्रारदारांचे लेटरहेड चोरुन नेऊन त्यावर तक्रारदारांच्या खोटया सहया करुन सामनेवाले बँकेकडून तक्रारदारांच्या बचतखात्यासंबधी चेकबुक तसेच डुप्लीकेट पासबुक घेतले. त्या चेकबुकमधील काही धनादेशावर तक्रारदारांची बनावट स्वाक्षरी करुन सामनेवाले बॅंकेमधून रु. 1.37 लाख वेगवेगळया 16 धनादेशाद्वारे काढले. तक्रारदारास ही बाब ज्ञात झाल्यावर त्यांनी सामनेवाले बँकेच्या निदर्शनास सदरील बाब आणून दिली. तथापी, सामनेवाले बँकेने कोणतीही कृती न केल्याने प्रस्तुत तक्रार दाखल करुन रु. 1,37,000/-, 18% व्याजासह मिळावे, रु. 1 लाख मानसिक त्रासाबद्दल मिळावी व तक्रार खर्च रु. 10,000/- मिळावा अशा मागण्या केल्या आहेत.
- तक्रारदारांनी दि. 16/09/2014 रोजी अर्ज दाखल करुन तक्रारीमधून सामनेवाले क्र. 2 रामकृष्ण बी. ठाकुर यांना वगळण्यास परवानगी मिळण्यासाठी अर्ज दाखल केला व दि. 16/09/2014 रोजी मंचाने मंजूर केला.
- सामनेवाले क्र. 1 यांनी लेखी कैफियत दाखल करुन तक्रारदारांचे सर्व आक्षेप फेटाळतांना असे नमूद केले आहे की तक्रारदारांनी तक्रारीमध्ये नमूद केल्याप्रमाणे त्यांच्या परिचयाच्या व्यक्तीनेच धनादेशाद्वारे फोर्जरी केली आहे. तक्रारदारांनी त्या व्यक्तीविरुध्द पोलिस तक्रारही दाखल केली आहे. प्रस्तुत तक्रारीमध्ये हस्ताक्षर तज्ञामार्फत धनादेशावरील सहीची पडताळणी तज्ञ व्यक्तीकडून करणे, साक्षीदाराचे साक्षीपुरावे नोंद करणे, उलट तपासणी करणे, साक्षीदारांचे साक्षी पुरावे नोंद करणे याबाबी गुंतागुंतीच्या असल्याने संक्षिप्त कार्यपध्दती असलेल्या ग्राहक मंचापुढे सदर तक्रार चालू शकत नाही. त्यामुळे फेटाळण्यात यावी. सामनेवाले यांनी असेही नमूद केले आहे की, तक्रारदारांनी आपल्या लेटरहेडद्वारे असे नमूद केले होते की, चेक रिक्विझिशनींग स्लिप गहाळ झाल्याने त्यांनी लेटरहेडद्वारे केलेल्या विनंतीवरुन लेटरहेडधारकास चेक रिक्विझिशनींग स्लिप देण्यात आली. ती भरुन तक्रारदारांनी सही करुन सादर केल्यानंतर चेकबुक देण्यात आले. तक्रारदारांनी सदर चेकबुक मिळाले नसल्याचा आक्षेप घेतला आहे. परंतु आपल्या म्हणण्याच्या पृष्ठयर्थ कोणताही पुरावा दाखल केला नाही. दि. 26/02/2010 ते दि. 31/05/2010 या कालावधी दरम्यान तक्रारदारांना दिलेल्या उपरोक्त नमूद धनादेशांपैकी 16 धनादेशाद्वारे तक्रारदारांच्या बचत खात्यामधून रु. 1.37 लाख काढण्यात आले असल्याचे नमूद केले आहे. सदरील सर्व चेक ‘सेल्फ’ म्हणून काढण्यात आले होते. सदर सर्व चेकवरील पुढील व मागील बाजूस तक्रारदारांची तसेच रामकृष्ण ठाकूर यांची सही असल्याने त्याचे अधिदान सामनेवाले क्र. 2 यांना करण्यता आले होते. सदरील चेकशिवाय अन्य कांही चेकचे अधिदान सामनेवाले क्र. 2 यांना करण्यात आले होते. कारण सामनेवाले क्र. 2 यांची तक्रारदारांनी एजंट म्हणून सेवा घेतली होती हे स्पष्ट होते. यासंदर्भात सामनेवाले क्र. 2 यांचेकडे चौकशी केली असता सामनेवाले क्र. 2 यांनी दि. 09/02/2010 रोजीच्या पत्रान्वये असे कळविले आहे की सर्व धनादेशाद्वारे त्यांनी स्विकारलेले पैसे तक्रारदारांना लगेचच देण्यात आले होते. सामनेवाले क्र. 2 यांचे सदरील पत्र सामनेवाले क्र. 1 यांनी दाखल केले आहे. सामनेवाले यांनी तक्रारदारांच्या सहीची खातरजमा करुनच अधिदान केल्याने व तक्रारदारांना ती रक्कम मिळाली असल्याने तक्रारदारांची तक्रार ही अयोग्य असल्याने फेटाळण्यात यावी.
- तक्रारदारांनी पुरावा शपथपत्राची पुरसिस दाखल केली. सामनेवाले यांनी पुरावा शपथत्र, लेखी युक्तीवाद व अतिरिक्त लेखी युक्तीवाद दाखल केला. प्रस्तुत मंचाने तक्रारदार व सामनेवाले यांवे वाद प्रतिवाद, लेखी युक्तीवाद तसेच कागदपत्रांचे वाचन केले. शिवाय उभय पक्षांचा तोंडी युक्तीवादही ऐकण्यात आला. त्यावरुन प्रकरणामध्ये खालीलप्रमाणे निष्कर्ष निघतातः अ.
- तक्रारदार हे सामनेवाले क्र. 1 यांचे बचत खातेधारक असल्याचे तसेच प्रस्तुत प्रकरणातील विवादीत कोरे धनादेश तक्रारदारांचे प्रतिनिधी रामकृष्ण ठाकूर यांस दिल्याचे तसेच या धनादेशापैकी 16 धनादेशाचे अधिदान तक्रारदारांच्या प्रतिनिधीस केल्याचे सामनेवाले यांनी मान्य केले आहे.
- तक्रारदारांनी आपल्या तक्रारीमध्ये सुरुवातीलाच असे स्पष्ट केले आहे की, तक्रारीतून वगळण्यात आलेले सामनेवाले क्र. 2 श्री. रामकृष्ण ठाकूर यांचेशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. सामनेवाले क्र. 2 यांनी तक्रारदारांचे लेटरहेड चोरुन त्याचा वापर करुन सामनेवाले बँकेकडून धनादेशाची मागणी केली व प्राप्तही केले. त्या धनादेशावर सामनेवाले क्र. 2 यांनी खोटया सहया करुन 16 धनादेशांद्वारे तक्रारदारांच्या बनावट सहया असल्याबाबत हस्ताक्षर तज्ञाचा शपथेवरचा अहवालही तक्रारदारांनी सादर केला आहे. तथापि, सदर अहवाल पुरावा म्हणून ग्राहय धरण्यासाठी व मंचामध्ये दाखल करण्यासाठी तक्रारदारांनी परवानगी घेतली नाही किंवा तसा अर्जही दाखल केला नाही. त्यामुळे हस्ताक्षर तज्ञाचा अहवालही प्रस्तुत प्रकरणाच्या प्रोसिडींगजचा भाग म्हणून विचारात घेता येणार नाही.
सामनेवाले यांच्या सदरील आक्षेपाच्या अनुषंगाने मंचाच्या अभिलेखाचे तसेच रोजनाम्याचे अवलोकन केले असता, तक्रारदारांनी सादर केलेला तज्ञाचा नमूद अहवाल पुरावा शपथपत्र किंवा अतिरिक्त पुरावा शपथपत्र म्हणून दाखल केल्याचे दिसून येत नाही. शिवाय सदर तज्ञाचा अहवाल प्रोसिडिंग्जचा पार्ट म्हणून मंचाने स्विकारल्याची नोंदही आढळून येत नाही. तयामुळे सामनेवाले यांच्या आक्षेपानुसार तज्ञाचा अहवाल विचारात घेता येत नाही.
- याअगोदर नमूद केल्याप्रमाणे तक्रारदारांनी असे स्पष्टपणे नमूद केले आहे की, सामनेवाले क्र. 2 रामकृष्ण ठाकूर यांनी तक्रारदारांचे लेटरहेड चोरुन त्याद्वारे चेकबुक दिले व त्याआधारे बनावट सहया करुन तक्रारदारांची फसवणूक केली. तक्रारदारांचे सदरील स्वयंकथन विचारात घेतल्यास प्रस्तुत प्रकरणात फसवणूक करुन पैशांचा अपहार केल्याचे स्पष्ट होते. अशा प्रकरणामध्ये साक्षीपुराव्याची नोंद करणे, उलट तपास तसेच अन्य तत्सम प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. ग्राहक मंचापुढील कामकाज हे संक्षिप्त (summary) स्वरुपाचे असल्याने उपरोक्त नमूद दीर्घ प्रकियेची पूर्तता ग्राहक मंचाने करणे अभिप्रेत नाही. त्यामुळे अशाप्रकारचे किचकट प्रक्रिया आणि गुंतागुंतीच्या बाबींचा समावेश असलेली प्रकरणे मंचापुढे चालू शकत नाही. सबब, सामनेवाले यांनी सदर प्रकरण ग्राहक मंचापुढे चालविण्याच्यासंदर्भात घेतलेला आक्षेप योग्य असल्याचे मंचाचे मत आहे.
यासंदर्भात रिव्हीजन पिटीशन क्र. 2479/2008 निकाल दि. 24/07/2013 युको बँक विरुध्द श्री. एस.डी. वाधवा हे प्रकरण निपटारा करतांना मा. राष्ट्रीय आयोगाने ब्राईट ट्रान्सपोर्ट कार्पोरेशन वि. सांगली सहकारी बँक लि. II 2012 CPJ 151 NC निकाल दि. 12/01/2012 या प्रकरणातील न्यायतत्व विचारात घेऊन असे स्पष्टपणे नमूद केले आहे की, फसवणूकीच्या प्रकरणामध्ये पुरावा नोंदविणे उलट तपासणी करणे इ. गुंतागुंतीच्या बाबी ग्राहक मंचापुढे चालविता येत नाहीत.
(ड) तक्रारदारांनी तक्रारीमध्ये रामकृष्ण ठाकूर यांनी फसवणूक करुन तक्रारदाराच्या बचत खात्यामधून खोटया सहयाच्याआधारे 16 धनादेशांद्वारे रु. 1.37 लाख काढल्याचा आरोप केला आहे. तथापि सामनेवाले यांनी वादग्रस्त 16 धनादेशांव्यतिरिक्त अन्य 3 धनादेशही दाखल केले असून सदर धनादेश क्र. 782227 दि. 17/02/2010 रु. 5,000/-, 782228 दि. 23/01/2010 रु. 5,000/- व धनादेश क्र. 782230 दि. 06/02/2010 रक्कम रु. 10,000/- हे सर्व 3 ही धनादेश ‘सेल्फ चेक’ म्हणून तक्रारदारांनी दिले होते व या सर्व धनादेशांची एकूण रक्कम रु. 20000/- श्री. रामकृष्ण ठाकूर यांनी स्विकारली असल्याचे धनादेशावरील नोंदणीनुसार स्पष्ट होते. परंतु सदर 3 धनादेशाचा उल्लेख तक्रारदारांनी तक्रारीमध्ये केला नाही. म्हणजेच श्री. रामकृष्ण ठाकूर हे तक्रारदारांच्या बँकेसंदर्भातील आर्थिक व्यवहार तक्रारदारांच्या संमतीने करीत होते ही बाब स्पष्ट होत असतांना तक्रारदारांनी वादग्रस्त 16 धनादेशांबाबत श्री. रामकृष्ण ठाकूर यांजकडून फसवणूक झाल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे तक्रारीमधील सर्व घटनांबाबत साशंकता निर्माण होते. याशिवाय असे विशेषपणे नमूद करावेसे वाटते की, तक्रारदारांनी हस्ताक्षर तज्ञाचा अहवाल दाखल केला असला तरी, धनादेशावरील तथाकथित बनावट सहया व तक्रारदारांच्या तक्रारीमधील सहया यामध्ये उघडया डोळयाने दिसेल इतका फरक दिसून येत नाही. त्यामुळे बँक कर्मचा-यांनी निष्काळजीपणा करुन अधिदान केले या निष्कर्षाप्रत मंच येऊ शकत नाही.
(इ) प्रस्तुत प्रकरणामध्ये तक्रारदारांनी हस्ताक्षर तज्ञाचा अहवाल दाखल केला असला तरी उपरोक्त नमूद बाबींचा विचार केल्यास संक्षिप्त स्वरुपाची प्रक्रिया अवलंबून तक्रारदारांच्या प्रकरणास प्रस्तुत मंचामार्फत
न्याय देणे योग्य होणार नाही असे मंचाचे मत असल्याने तक्रारदारांस अन्य न्यायिक प्रक्रियेचा अवलंब करण्याची मुभा देणे योग्य होईल असे मंचास वाटते. उपरोक्त चर्चेनुसार व निष्कर्षानुसार खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतोः
आ दे श
- तक्रार क्र. 241/2011 नामंजूर करण्यात येत आहे.
- खर्चाबाबत आदेश नाही.
- आदेशाच्या प्रती उभय पक्षांना विनाविलंब विनाशुल्क देण्यात याव्यात.
- तक्रारीचे अतिरिक्त संच असल्यास तक्रारदारांना परत करावे.