Dated the 13 Aug 2015
एम.ए.क्रमांक-18/2013 खाली आदेश.
द्वारा- श्री.म.य.मानकर...................मा.अध्यक्ष.
1. तक्रारदार यांनी सामनेवाले विमा कंपनी यांच्या विरुध्द त्यांचे चोरीस गेलेल्या वाहनाच्या बाबत तक्रार दाखल केली. त्या तक्रारीस दाखल करण्या करीता विलंब झाल्यामुळे विलंब माफीचा अर्ज दाखल केला त्या अर्जाची नोटीस प्राप्त झाल्यानंतर सामनेवाले हजर झाले व अर्जास सविस्तर जबाब दाखल केला.
2. तक्रारदार यांच्यातर्फे वकील श्री.के.के.मिश्रा व गैरअर्जदार यांच्यातर्फे वकील श्री.बालाजी उमाटे यांना ऐकण्यात आले.
3. संचिकेची पाहणी करण्यात आली, तक्रारदार यांच्याप्रमाणे त्यांचे वाहन चालक वाहन क्रमांक-एमएच-04-डीके-4542 यामध्ये ऑईल ता.05.02.2010 रोजी भरल्यानंतर ते मालनपुर जिल्हा बिंड (मध्यप्रदेश) येथे पोहोचविण्यासाठी गेले. डिलेव्हरी ता.10.02.2010 ला पोहोचण्याची शक्यता होती, परंतु तक्रारदारास ता.12.02.2010 रोजी माल न पोहोचल्याबाबत सुचना प्राप्त झाली. तक्रारदार यांनी ट्रक व चालकाबाबत चौकशी केली व पोलीस स्टेशनला रिपोर्ट देण्यासाठी ता.14.02.2010 रोजी गेले असता त्यांचा रिपोर्ट लिहून घेण्यात आले नाही व त्यांना शोध घेण्याचे सांगण्यात आले. परंतु वाहन व वाहन चालक मिळून आले नाही. तक्रारदार यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्याकडे ता.10.03.2010 रोजी तक्रार दाखल केली. परंतु पोलीसांमार्फत काहीही कार्यवाही न झाल्यामुळे त्यांनी न्यायालयामार्फत आदेश प्राप्त केल्यानंतर ता.23.03.2010 रोजी प्रथम खबरी क्रमांक-94/2010 नोंदविण्यात आला. तक्रारदार यांनी वाहनाचा विमा असलेल्या सामनेवाले यांच्याकडे चोरीबाबत दावा दाखल केला. परंतु माहिती देण्यास विलंब झाल्यामुळे तक्रारदारास त्याबाबत विचारण्यात आले व त्यांचा दावा का नामंजुर करण्यात येऊ नये असे ता.05.04.2010 च्या पत्रान्वये कळविण्यात आले. त्यानंतर तक्रारदार यांनी सामनेवाले यांस ता.21.04.2011 रोजी पत्र पाठवुन जबाब कळविला. पोलीसांनी तपास बंद करुन फायनल रिपोर्ट दाखल केला व त्याची प्रत सुध्दा सामनेवाले यांना पाठविण्यात आली. सामनेवाले यांच्याकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे सामनेवाले यांना कायदेशीर नोटीस ता.06.03.2013 रोजी देण्यात आली. तक्रारदार यांच्याप्रमाणे यासर्व कारणांमुळे तक्रार दाखल करण्यास 429 दिवसांचा विलंब झाला आहे तो क्षमापित करण्यात यावा.
4. तक्रारदार यांना वाहनाबाबत ता.12.02.2010 रोजी कळविण्यात आले होते. तक्रारदार यांच्याप्रमाणे पोलीसांनी त्यांचा एफ.आय.आर. नोंदवुन घेतला नाही. परंतु तक्रारदार यांनी या घटनेबाबत सामनेवाले यांना पॉलिसीच्या अटींप्रमाणे का ताबडतोब कळविले नाही त्याचे कोणतेही समाधानकारक उत्तर नमुद केलेले नाही. तक्रारदार यांनी अंदाजे दिड महिन्यांनंतर घटनेबाबत सामनेवाले यांना सुचित केले व सामनेवाले यांचे पत्र प्राप्त झाल्यावर त्याचे उत्तर तक्रारदार यांनी एका वर्षांनी दिले. सामनेवालेतर्फे कोणताही प्रतिसाद मिळत नसतांना व सामनेवाले यांनी विलंबाबाबत तक्रारदार यांना 7 दिवसात जबाब देण्यास कळविले होते. परंतु तक्रारदार यांना त्यांस एका वर्षापेक्षा जास्त अवधी घेतला. तक्रारदार यांनी ता.21.04.2011
रोजी पत्र पाठविल्यानंतर ही तक्रार ता.12.04.2013 रोजी दाखल करण्यात आली आहे. सामनेवाले यांनी तक्रारदार यांच्या दाव्यासंबंधी कार्यवाही प्रदिर्घ अवधी करीता न केल्यामुळे तसेच तक्रारदार यांना त्यांचा दावा का नाकारण्यात येऊ नये असे कळविल्यावर सुध्दा तक्रारदार यांनी त्याबाबत तक्रार कालावधीमध्ये दाखल करणे आवश्यक होते. सामनेवाले यांनी त्यांची भुमिका आधिच स्पष्ट केली होती. अशा परिस्थितीत आमच्या मते तक्रारदार यांनी प्रदिर्घ अवधी करीता प्रतिक्षा करण्याची काहीही आवश्यकता नव्हती. तक्रारदार यांनी नमुद केलेले कारण पुरेसे व समाधानकारक वाटत नाही.
सबब, आम्ही खालील आदेश पारित करीत आहोत.
- आदेश -
1. तक्रारदार यांचा अर्ज नामंजुर करण्यात येतो.
2. तक्रार क्रमांक-140/2013 मुदतीची बाधा येत असल्याने ग्राहक संरक्षण कायदयाचे
कलम-24 अ प्रमाणे दाखल करुन घेण्यात येत नाही.
3. खर्चाबाबत आदेश नाहीत.
4. संकीर्ण अर्ज क्रमांक-18/2013 व मुळ तक्रार क्रमांक-140/2013 वाद सुचितुन काढून
टाकण्यात यावे.
5. आदेशाच्या प्रती उभयपक्षकारांना विनामुल्य व विनाविलंब पोस्टाने पाठविण्यात याव्यात.
6. तक्रारीचे अतिरिक्त संच असल्यास तक्रारदार यांना परत करण्यात यावे.
ता.13.08.2015
जरवा/