निकालपत्र
(घोषीत द्वारा- मा. श्री आर. एच. बिलोलीकर, सदस्य )
1. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्या विरुध्द सेवेत त्रुटी दिल्याच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे आहे.
2. अर्जदार हा सिडको नांदेड येथील रहिवाशी असून तो मयत पंचफुलाबाई भ्र. विश्वनाथ माळवे यांचा पती आहे. अर्जदाराची पत्नी मयत पंचफुलाबाई हिने तिच्या हयातीत गैरअर्जदार 1 यांच्याकडून विमा पॉलिसी घेतली होती. सदर पॉलिसीचे नांव ‘इन्व्हेस्ट गेन विथ रायडर’ असे होते. त्यासाठी 2,806/- चा प्रिमियम भरलेला होता. सदर पॉलिसीचा क्रमांक 0238509008 असा असून पॉलिसीचा कालावधी दिनांक 19/11/2011 पासून ते दिनांक 19/11/2030 असा होता. सदर पॉलिसीत अर्जदाराचे नांव नॉमिनी म्हणून नोंदविलेले आहे. सदर पॉलिसी अंतर्गत पॉलिसीच्या मुदतीत विमाधारकाचे निधन झाल्यास संबंधीत वारसास अथवा नॉमिनीस पॉलिसीनुसार विमा रक्कम रु.4,00,000/- देण्यात येणार होती. तसेच सदर पॉलिसी अंतर्गत 15 वर्षाच्या मुदतीत विमाधारकाचे निधन न झाल्यास कोणतीही रक्कम मिळणार नव्हती. सदर पॉलिसी ही ‘नॉन रिफंडेबल मनी’ अशा सदरात मोडणारी आहे. पॉलिसी घेतेवेळी अर्जदाराचे वय ठरविण्यासाठी गैरअर्जदार 1 यांनी निवडणूक ओळखपत्र व टी.सी. ची प्रत ई. कागदपत्रे जोडण्यास सांगितले होते. त्यानुसार गैरअर्जदार यांनी अर्जदार यांचे पत्नीच्या टी.सी.च्या आधारावर पॉलिसीवर अर्जदाराच्या पत्नीचा जन्म दिनांक 01/06/1960 असा टाकलेला आहे. सदर पॉलिसी काढल्यानंतर अर्जदाराच्या पत्नीने नियमितपणे न चुकता हप्ते वेळोवेळी भरलेले होते. अर्जदाराच्या पत्नीने सदर पॉलिसी काढल्यापासून 6 हप्ते भरलेले होते. दिनांक 19/06/2013 रोजी अर्जदार यांचे पत्नीस –हदयाचा धक्का बसला व त्यातच तिचे निधन झाले. अर्जदाराने दिनांक 08/07/2013 रोजी आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह गैरअर्जदार 1 यांच्याकडून पत्नीच्या मृत्युबद्दलची नुकसान भरपाई मिळण्यासाठी विमा दावा दाखल केला. विमा दावा दाखल करुनही गैरअर्जदार यांनी रक्कम देण्यास टाळाटाळ केली. दिनांक 27/01/2014 रोजी गैरअर्जदाराने अर्जदारास दिनांक 20.12.2013 रोजी लिहिलेले पत्र मिळाले. सदर पत्रात अर्जदाराचा विमा दावा नामंजूर केल्याचे कळविलेले आहे. अर्जदाराच्या पत्नीचे वय उपलब्ध असलेल्या कागदपत्रावरुन व अर्जदाराच्या पत्नीने भरुन दिलेल्या फॉर्ममध्ये 16 वर्षाची तफावत आहे. या कारणास्तव क्लेम नामंजूर केल्याचे दिसून येते. अर्जदाराच्या मयत पत्नीचे वय हे टी.सी. प्रमाणे बरोबर आहे. त्याची कोणतीही शाहनिशा न करता गैरअर्जदार यांनी विमा रक्कम देण्याचे टाळण्यासाठी व त्याची जबाबदारी टाळण्यासाठी चुकीचे कारण दर्शवून विमा रक्कम देण्याचे नाकारलेले आहे. अर्जदारचे मयत पत्नीच्या जन्माची तारीख टी.सी.वर दिनांक 01.06.1960 अशी स्पष्ट नमूद आहे. असे असतांना देखील गैरअर्जदाराने अर्जदारास विमा रक्कम देण्याचे नाकारुन सेवेत त्रुटी दिलेली आहे. म्हणून अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केलेली आहे व मंचास विनंती केलेली आहे की, अर्जदाराचा अर्ज मंजूर करुन अर्जदारास ‘इन्व्हेस्ट गेन विथ रायडर’ ही पॉलिसी क्रमांक 0238509008 नुसार विमा रक्कम रु. 4,00,000/- दिनांक 19/06/2013 पासून 12 टक्के व्याजासह गैरअर्जदाराकडून देण्याचा आदेश करावा. तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 25,000/- व दावा खर्चापोटी रक्कम रु. 10,000/- देण्यात आदेश करावा.
3. गैरअर्जदार यांना मंचाची नोटीस प्राप्त झाल्यानंतर गैरअर्जदार हे आपल्या वकीलामार्फत हजर होऊन आपले लेखी म्हणणे दाखल केले.
गैरअर्जदार यांचे थोडक्यात म्हणणे पुढील प्रमाणे आहे.
4. अर्जदाराचा अर्ज ग्राहक कायदयांतर्गत येत नसल्यामुळे कालमर्यादेत नसल्यामुळे व गैरअर्जदाराने अर्जदारास कोणतीही सेवा त्रुटी दिलेली नसल्यामुळे अर्जदाराचा तक्रार अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा. गैरअर्जदाराचे थोडक्यात म्हणणे असे की, मयत पंचफुलाबाई विश्वनाथ माळवे यांनी गैरअर्जदाराकडून पॉलिसी घेत असतांना वयाचा दाखला म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मोरेगांव ता. किनवट जि. नांदेड तर्फे शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र दाखल केलेले होते व त्या प्रमाणपत्रावरुन असे दिसून येते की, मयत पंचफुलाचे वय पॉलिसी घेतेवेळी 60 वर्षापेक्षा कमी होते. जी की, पॉलिसीची मुख्य अट आहे. पंचफुलाबाईचे वय 60 वर्षे पेक्षा कमी असल्यामुळे गैरअर्जदाराने सदरील पॉलिसी पंचफुलाबाई माळवे यांना दिली होती. दिनांक 02/06/2013 रोजी पंचफुलाबाई माळवे यांचे पतीने गैरअर्जदार यांना कळविले की, पंचफुलाबाई माळवे हिचे दिनांक 19/06/2013 रोजी हर्ट अटॅकने निधन झाले. त्यानंतर गैरअर्जदार यांनी डी.एस.आर. इन्व्हेस्टीगेशन पुणे यांना सदर प्रकरणामध्ये मयत पंचफुलाबाई माळवे यांच्या टी.सी.च्या सत्यतेबाबत सखोल चौकशी करण्याचा आदेश दिला. सदर डी.एस.आर. इन्व्हेस्टीगेशन यांनी त्यांचा अहवाल दिनांक 18/12/2013 रोजी गैरअर्जदार यांना सादर केला व सोबत मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मोरेगांव ता. किनवट यांनी दिलेले प्रमाणपत्र व त्याच बरोबर डी.एस.आर. कमिशनरचे नावाने पत्र देवून कळविले की, पंचफुलाबाई माळवे / पंचफुलाबाई हनमंतराव शितावार या नावाची विदयार्थीनीची नोंद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोरेगांव येथील निर्गम रजिस्टरवर नोंद नाही. यावरुन असे दिसून येते की, मयत पंचफुलाबाई माळवे यांनी गैरअर्जदाराकडून पॉलिसी घेत असतांना वय कमी दाखविण्याकरिता शाळा सोडल्याचा दाखला तयार करुन गैरअर्जदाराकडून पॉलिसी घेतलेली आहे. पंचफुलाबाई माळवे यांच्या इलेक्शन कार्डावर वय 55 वर्षे दाखविलेले आहे. यावरुन असे सिध्द होते की, सन 2011 मध्ये म्हणजेच पॉलिसी घेतली तेव्हा तिचे वय 60 वर्षाापेक्षा जास्त होते. बनावट कागदपत्राआधारे पंचफुलाबाई माळवे यांनी सदर पॉलिसी घेतलेली आहे. म्हणून प्रस्तुतच्या प्रकरणामध्ये अर्जदार हे सदर पॉलिसी अंतर्गत गैरअर्जदार यांच्याकडून कोणतीही रक्कम मिळण्यास पात्र नाहीत. म्हणून गैरअर्जदाराने अर्जदाराच्या नुकसान भरपाईचा अर्ज फेटाळून लावला जो कायदयाने योग्य आहे व मंचास विनंती केली आहे की, अर्जदाराचा अर्ज गैरअर्जदार यांच्याविरुध्द खर्चासह फेटाळण्यात यावा.
5. अर्जदार व गैरअर्जदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पुष्टयर्थ आपले शपथपत्र व कागदपत्र दाखल केली आहेत. दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकला. दोन्ही बाजुंनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता पुढील बाबी स्पष्ट होतात.
6. अर्जदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे हे गैरअर्जदार यांना मान्य आहे. अर्जदाराच्या पत्नीने गैरअर्जदार यांच्याकडून “Bajaj Allianze Invest Gain Economy” हया पॉलिसीच्या अंतर्गत sum assured दोन लाख रुपयांची पॉलिसी घेतली होती हे गैरअर्जदार यांना मान्य आहे. पॉलिसीच्या जोखीम सुरुवातीची तारीख 19.11.2011 अशी असून पॉलिसीची परिपक्वता दिनांक 19.08.2030 असा आहे व पॉलिसीचा हप्ता रु.2877.79 चा आहे. वरील नोंदी हया गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या Premium schedule मध्ये नोंदविलेल्या आहेत. सदर Schedule चे अवलोकन केले असता “personal details” या सदरात पुढील माहिती
Age Age at entry date of birth Gender
Admitted 51 years 01.06.1960 Female
यावरुन हे स्पष्ट आहे की, गैरअर्जदाराने विमाधारकाचे वय 51 वर्षे हे मान्य केलेले आहे व या वयाच्या आधारावर गैरअर्जदाराने विमाधारकाचा Premium ठरवलेला आहे. त्यानुसार विमाधारकाने सहा प्रिमियम/हप्ते देखील भरलेले आहेत.
विमाधारकाचा मृत्यु दिनांक 19.06.2013 रोजी झालेला आहे हे अर्जदार यांनी दाखल केलेल्या मृत्युप्रमाणपत्रावरुन स्पष्ट आहे. विमाधारकाचा मृत्यु हा विमा पॉलिसीच्या कालावधीत झालेला असल्याने अर्जदार हा विमा रक्कम मिळणेस पात्र आहे असे मंचाचे मत आहे. गैरअर्जदाराने अर्जदारास सदर रक्कम देण्याचे नाकारलेले आहे हे अर्जदार यांनी दाखल केलेल्या दिनांक 20.12.2013 च्या गैरअर्जदाराच्या Rejection letter वरुन स्पष्ट आहे
विमा दावा देण्याचे नाकारतांना गैरअर्जदाराने पुढील कारण दिलेले आहेः-
“Due to under statement of age by 16 years by submission of fake documents at issuance”
अर्जदाराने दिलेले सदरचे कारण योग्य नाही कारण अर्जदाराने Proposal form भरतांना शाळा सोडल्याचा दाखला व मतदार ओळखपत्र हे दोन्ही कागदपत्रे गैरअर्जदार यांचेकडे दाखल केलेली होती. हे गैरअर्जदार यांनी अर्जदारास दिलेल्या दिनांक 19.11.2011 च्या पत्रांवरुन स्पष्ट आहे. शाळा सोडल्याच्या दाखल्यावरुन दिनांक 19.11.2011 म्हणजे पॉलिसी सुरु होतांना विमाधारकाचे वय हे 51 वर्षे असल्याचे स्पष्ट आहे आणि मतदार ओळखपत्रानुसार विमाधारकाचे दिनांक 19.11.2011 रोजी वय हे 70 वर्ष असल्याचे स्पष्ट आहे. एवढा फरक असतांना देखील गैरअर्जदाराने विमाधारकाचे वय 51 वर्षे हे शाळा सोडल्याच्या दाखल्यानुसार मान्य करुन पॉलिसीचा हप्ता ठरवून विमाधारकाचा विमा काढलेला आहे.
विमाधारकाच्या वयाबद्दल एवढा फरक असून देखील आणि ते गैरअर्जदार यांना ज्ञात असून त्याबद्दल चौकशीची गरज असतांना देखील गैरअर्जदाराने त्याची चौकशी केलेली नाही व विमाधारकाचे मृत्यु नंतर गैरअर्जदाराने विमाधारकाने चुकीची माहिती दिली म्हणून चौकशी केली जे की, अयोग्य व बेकायदेशीर आहे असे मंचाचे मत आहे.
शाळा सोडल्याचा दाखला हाच वयासाठी योग्य पुरावा समजला जातो व मतदार ओळखपत्र हे वयासाठीचा योग्य पुरावा म्हणुन समजला जात नाही.
गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या शाळेचे दिनांक 17.12.2013 चे प्रमाणपत्र व दिनांक 10.10.2013 चे पत्र याला योग्य पुरावा म्हणून ग्राह्य धरता येणार नाही कारण सदर प्रमाणपत्र देणा-या मुख्याध्यापकांचे तसेच चौकशी अधिकारी यांचे शपथपत्र गैरअर्जदाराने दाखल केलेले नाही. तसेच टी.सी. व चौकशी अधिकारी यांनी प्राप्त केलेले शाळेचे प्रमाणपत्र या दोन्हीमधील शाळा व गावाच्या नावामध्ये भिन्नता आहे.
अर्जदार हा पॉलिसी प्रमाणे विमा रक्कम (sum assured ) रुपये दोन लाख मिळणेस पात्र आहे व ती रक्कम गैरअर्जदाराने अर्जदारास देण्याचे टाळून अर्जदारास सेवेत त्रुटी व मानसिक त्रास दिलेला आहे.
वरील विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1. अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2. गैरअर्जदार यांनी अर्जदारास विमा रक्कम रु.2,00,000/- आदेश तारखेपासून 30 दिवसांच्या आत दयावेत.
3. गैरअर्जदार यांनी अर्जदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी रु.3,000/- व दावा खर्चापोटी रु.2,000/- आदेश तारखेपासून 30 दिवसांच्या आत दयावेत.
4. आदेशाची पूर्तता झाल्याबद्दलचा अहवाल दोन्ही पक्षांनी 45 दिवसानंतर मंचात दाखल
करावा.प्रकरण 45 दिवसानंतर पुन्हा आदेशाच्या पूर्ततेच्या अहवालासाठी ठेवले जाईल.
5. निकालाच्या प्रती दोन्ही पक्षकारास मोफत देण्यात याव्यात.