जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 55/2021. तक्रार दाखल दिनांक : 17/02/2021 तक्रार निर्णय दिनांक : 24/11/2021.
कालावधी : 00 वर्षे 09 महिने 07 दिवस
कॅफे चोको क्रेझ प्रा.लि., संचालक : गजेंद्र मधुकर ताथोडे,
वय 34 वर्षे, धंदा : व्यापार, रा. दुकान नं. 3/5, कॅफे चोको क्रेझ,
सिल्वर आर्च बिल्डींग, नंदी स्टॉप, लातूर, ह.मु. सर्व्हे नं. 78/1, 1440,
शेड नं.6, पंढरीनाथ इंडस्ट्रीयल इस्टेट, शिवने, पुणे - 411 023. तक्रारकर्ता
विरुध्द
(1) बजाज अलाइंझ जनरल इन्शुरन्स कं.लि., कस्टमर झोन,
पहिला मजला, टॉवर-1, समर्थ अशोक मार्ग, येरवाडा, पुणे-411006.
(2) इंडो मोबाईल सेल्स ॲन्ड सर्व्हीसेस प्रा.लि., इंडो हाऊस प्लॉट
नं.52, एम.आय.डी.सी., लातूर - 413 531. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : मा. श्री. कमलाकर अ. कोठेकर, अध्यक्ष
मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
मा. श्रीमती रेखा जाधव, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- आकाश ब. जाधव
न्यायनिर्णय
मा. श्री. कमलाकर अ. कोठेकर, अध्यक्ष यांचे द्वारा (न्यायकक्षामध्ये) :-
(1) तक्रारकर्त्याच्या वकिलांचे निवेदन विचारात घेतले. या प्रकरणात वाहनाची खरेदी व्यापारी उद्देशाने झाल्याचे दिसते. जरी तक्रारीत असे निवेदन असले की वाहन उपजीविका भागविण्यासाठी खरेदी केली, परंतु हे वाहन व्यक्तिगत नावांने खरेदी न करता व्हॅल्यू फुडस् या फर्मच्या नांवाने खरेदी केल्याचे दिसते. तसेच तक्रारीतील पुढील मजकुरावरुन असे दिसते की, त्यांचीच दुसरी फर्म कॅफे चोको क्रेझ प्रा.लि. अशी आहे. व्हॅल्यू फुडस् या नांवावरुन वाहन कॅफे चोको क्रेझ प्रा.लि. या नांवावर करण्यासंबंधी देखील मजकूर दिसतो. वाहन ज्या फर्मच्या नांवाने खरेदी केले, ती व्हॅल्यू फुडस् ही फर्म तक्रारकर्त्याचे उपजीविका भागविण्याचे साधन आहे की नाही, याबाबतचा स्पष्ट खुलासा नाही. तसेच दोन फर्म दिसतात. फर्मच्या व्यापाराकरिता वाहन खरेदी केले, असेही तक्रारीवरुन स्पष्ट होते. त्यावरुन असा निष्कर्ष प्राथमिकरित्या काढण्यात येतो की, वाहन व्यापारी उद्देशाने खरेदी करण्यात आलेले आहे, जे की फर्मच्या नांवाने खरेदी करुन नंतर दुस-या फर्मला वर्ग करण्यात आले. दोन्ही फर्म तक्रारकर्ता गजेंद्र यांच्या उपजीविकेचे साधन आहे, अशा बद्दलचा सध्या तरी पुरेसा स्पष्ट तपशील आढळून येत नाही आणि म्हणून या आयोगासमोर तक्रार चालू शकत नाही.
आदेश
(1) तक्रार दाखल करुन न घेता ती फेटाळण्यात येते.
(श्रीमती रेखा जाधव) (श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्री. कमलाकर अ. कोठेकर)
सदस्य सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-
(संविक/श्रु/241121)