निकालपत्र
(घोषीत द्वारा- मा. श्री आर. एच. बिलोलीकर, सदस्य )
अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्या विरुध्द सेवेत त्रुटी दिल्याच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे आहे.
अर्जदार मोहंमद आमेर पि. अब्दुल गफ्फार शेख हा व्यवसायाने शिंपी असून आपली आई, पत्नी व तिन मुलांसोबत गरीबीच्या परिस्थित आपली गुजरान करतो. अर्जदाराने एका कंपनीचे काम केल्यानंतर त्या कंपनीने अर्जदाराला रु.500/- चा चेक दिला होता. सदर चेक वटण्यासाठी अर्जदाराला बँकेत खाते उघडणे जरुरीचे होते. अर्जदाराने गैरअर्जदार 1 व 2 यांच्याकडे दिनांक 17/01/2011 रोजी बँकेत खाते उघडले. त्याचा खाते क्रमांक 60061237410 असा आहे. गैरअर्जदार 1 व 2 यांनी अर्जदारास बँकेचे खाते उघडते वेळी बँकेच्या अटी व नियम सांगितले होते. त्याप्रमाणे कमीत कमी 100/- रुपये खात्यावर असणे आवश्यक होते. खात्यात 100/- रुपये नसल्यास चार्जेस लावण्यात येतील असे सांगितले होते. अर्जदाराने 200/- रुपये भरुन बचत खाते चालू केले होते. त्यानंतर दिनांक 19/01/2011 रोजी बँकेत 500/- रुपयाचा चेक वटविण्यासाठी टाकला व सदर दिवशी अर्जदाराच्या खात्यात 700/- रुपये शिल्लक होते. त्यानंतर अर्जदाराने दिनांक 24/01/2011 रोजी त्याच्या खात्यातून रु. 300/- काढले व 400/- रुपये खात्यात शिल्लक राहिले. नंतर दिनांक 21/10/2014 रोजी अर्जदाराच्या नातेवाईकाने अर्जदाराच्या आईला दवाखान्याच्या इलाजासाठी म्हणून रु.5,000/- पुसद येथून अर्जदाराच्या खात्यावर टाकले. सदरील 5000/- काढण्यासाठी अर्जदार बँकेत गेले असता अर्जदाराला माहीत झाले की, अर्जदाराच्या खात्यातून रु.2,773/- चार्जेस म्हणून काढण्यात आले. त्यावेळी अर्जदाराने पासबुकाची एन्ट्री करुन घेतली. पासबुकातील एन्ट्री वरुन अर्जदारास हे माहीत झाले की, दि. 31/03/2011 पर्यंत 400/- रुपये शिल्लक होते. परंतू गैरअर्जदाराने पासबुकावरील नियमांचे उल्लंघन करुन दिनांक 30/06/2011 ला 221/- रुपये व दिनांक 30/09/2011 रोजी 186/- रुपये बेकायदेशीर काढून घेतले व अर्जदाराच्या खात्यात 0.00 रक्कम शिल्लक ठेवण्यात आली. तसेच अर्जदाराच्या खात्यात रु. 5,000/- जमा झाल्याची संधी बघून एका एकी अर्जदाराच्या बचत खात्यातून 2,773/- रुपये बेकायदेशीर काढण्यात आले. अर्जदाराने सदर कृत्याबद्दल गैरअर्जदार 2 कडे चौकशी केली असता असे सांगण्यात आले की, तुम्ही खात्यात पुरेशी रक्कम न ठेवल्याने सदर रक्कम काढण्यात आली आहे. अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडून लावलेल्या चार्जेस बद्दलचा पूर्ण तपशील मागितला असता गैरअर्जदाराने कोणतेही सहकार्य न करता आम्ही रिझर्व बँकेच्या आधीन राहून तुमचे पैसे काढलेले आहेत अशी उडवाउडवीची उत्तरे देवून बँकेच्या वाचमनला बोलावून अर्जदाराचा अपमान करुन तेथून हाकलून देण्यात आले. अशाप्रकारे अर्जदाराचे आर्थिक नुकसान करुन मानसिक व शारीरिक त्रास देण्यात आला आहे. अर्जदाराचे पुढे असे म्हणणे आहे की, गैरअर्जदाराच्या पासबुक नियमाप्रमाणे चेकबुक न घेणारे बचत खातेधारकाला खात्यात 100/- रुपये शिल्लक न ठेवल्यास खातेधारकाला रु.10/- प्रति अर्धा वर्ष चार्जेस घेण्यात येतील असे दिसून येते. अर्जदाराने आजपर्यंत चेकबुक घेतलेले नाही अथवा बँकेच्या दुस-या कोणत्याही सुविधेचा लाभ घेतलेला नाही. अर्जदार हा पासबुकाच्या नियमाप्रमाणे रक्कम भरण्यास तयार आहे. अर्जदार हा गरीब असल्याने त्याचा अपमान करुन बँकेतून हकलून देवून गैरअर्जदार 2 यांनी अर्जदारास प्रचंड आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रास दिलेला आहे त्यामुळे अर्जदाराने मंचास विनंती केली आहे की, अर्जदाराच्या खात्यातून बेकायदेशीररित्या गैरअर्जदाराने दि. 21/10/2014 रोजी काढून घेतलेली रक्कम एकूण रु. 2,773/- काढण्यात आलेल्या तारखेपासून 18 टक्के व्याजासह अर्जदारास परत करण्याचा आदेश गैरअर्जदारास दयावा. विनाकारण रक्कम काढून तसेच अर्जदारास मानसिक, शारीरिक, आर्थिक त्रास दिल्यामुळे अर्जदारास झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासापोटी रक्कम रु.20,000/- व दावा खर्चापोटी रक्कम रु.10,000/- गैरअर्जदाराने देण्याबाबत आदेश व्हावा.
गैरअर्जदार यांना मंचाची नोटीस प्राप्त झाल्यानंतर गैरअर्जदार हे आपल्या वकीलामार्फत हजर होऊन आपले लेखी म्हणणे दाखल केले. गैरअर्जदार यांचे थोडक्यात म्हणणे पुढील प्रमाणे आहे.
गैरअर्जदार बँक ऑफ महाराष्ट्र ही संस्था बँकींग कंपनीज ( Aequisition and Transfer of under takings) कायदा 1970 नुसार स्थापन झालेली आहे. तिचे केंद्रीय कार्यालय पुणे येथे आहे व तिची एक शाखा तारासिंग मार्केट, नांदेड येथे आहे. दि. 01/04/2011 पासून बँकेने बचत खात्यामध्ये कमीत कमी किती शिल्लक असावी याबद्दलचा नियम बदलून बचत खात्यात कमीत कमी शिल्लक रु.1000/- एवढी असावी अशी नियमात सुधारणा केली. बँकेने केलेल्या नियमातील बदलाची सुचना बँकेच्या वेबसाईटवर तसेच बँकेच्या प्रत्येक शाखेमध्ये नोटीस बोर्डावर प्रसिध्दीस देण्यात आलेली होती. या नियमानुसार रु.1000/- ची शिल्लक खात्यावर नसेल तर रु.200/- दर तिमाहीस चार्जेस लावल्या जातील. तसेच दि. 1/09/2013 पासून वरील नियमात पण सुधारणा करण्यात आली. या सुधारणेनुसार रु.1000/- ची कमीत कमी शिल्लक खात्यावर नसेल तर रु. 70/- दरमहा प्रत्येकवेळी चार्जेस लावण्यात येतील. या बदलाबाबतची सुचना बँकेच्या वेबसाईटवर तसेच शाखेतील नोटीस बोर्डावर प्रसिध्दीस देण्यात आलेली होती. वरील नियमातील बदलानुसार बँकेने जे चार्जेस वसूल केले आहेत ते बरोबरच आहेत. त्यामुळे अर्जदाराच्या सेवेत कोणत्याच प्रकारची त्रुटी दिलेली नसल्यामुळे बँक नुकसान भरपाई देणे लागत नाही. गैरअर्जदाराने मंचास विनंती केली आहे की, प्रकरणाची सर्व सत्यपरिस्थिती लक्षात घेवून अर्जदाराचा अर्ज गैरअर्जदाराविरुध्द खर्चासह रद्द करावा.
अर्जदार व गैरअर्जदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पुष्टयार्थ आपले शपथपत्र व कागदपत्र दाखल केली आहेत. दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकला. दोन्ही बाजुंनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता पुढील बाबी स्पष्ट होतात.
अर्जदार मोहंमद आमेर पि. अब्दुल गफ्फार शेख हा गैरअर्जदार बँकेचा ग्राहक होता हे अर्जदाराने दाखल केलेल्या त्याच्या खात्याच्या पासबुकाच्या झेरॉक्स प्रतीवरुन सिध्द होते. अर्जदाराची मुख्य तक्रार अशी आहे की, अर्जदाराच्या खात्यावर मिनीमम बॅलन्स नाही म्हणून रक्कम रु.2,773/- बँकेने काढून घेतले व त्यामुळे त्याच्या आईच्या इलाजास्तव जमा झालेले पैसे वापरता आले नाही व मनस्ताप झाला. अर्जदार यांनी दाखल केलेल्या पासबुकातील उता-याचे अवलोकन केले असता पुढील बाबी स्पष्ट होतात.
दिनांक 31/03/2011 रोजी 400/- रुपये बॅलेन्स होते. दिनांक 30/06/2011 रोजी मिनीमम बॅलन्स सदराखाली रक्कम रु. 221/- अर्जदाराच्या खात्यातून काढण्यात आले. त्यानंतर दिनांक 30/09/22011 रोजी देखील 186/- रुपये या सदराखाली काढण्यात आले व बॅलन्स 0.00 वर नेवून ठेवण्यात आले. तसेच दिनांक 21/10/2014 रोजी अर्जदाराने रु.5,000/- भरल्यानंतर 2,773/- रुपये याच सदराखाली काढण्यात आले. असे एकूण रक्कम रु. 3,180/- मिनीमम बॅलन्सच्या सदराखाली काढण्यात आले. अर्जदाराने सदर पासबुकामधील बँकेचे Revised rules w.e.f. 01.08.2006 ची झेरॉक्स प्रत दाखल केलेली आहे. अर्जदारास सदर पासबुक हे दिनांक 17.01.2011 रोजी देण्यात आलेले आहे.
सदर नियमातील पहिला नियम पुढील प्रमाणे आहे.
Sr. No. | Particular | Charges |
1 | A. Without Cheque book Savings Bank Account (Minimum bal. Rs. 100/- Pension A/c Rs. 20/-) | Rs. 10/- per half year will be recovered at the time of Int. application if minimum balance is not maintained. |
| B. With Cheque book Savings Bank Account (Minimum bal. Rs. 500/- Pension A/c Rs. 250/-) | Rs. 25/- per half year will be recovered at the time of Int. application if minimum balance is not maintained. |
हयावरुन हे स्पष्ट होते की, प्रस्तुतच्या खात्यात 100/- रुपये पेक्षा कमी बॅलन्स (शिल्लक असल्यास) ग्राहकाकडून 10/- रुपये प्रती सहा महिने याप्रमाणे व्याज देत असतांना वसुल केले जातील परंतू प्रस्तुतच्या प्रकरणांत बँकेने 400/- रुपये बॅलन्स असतांना देखील अगोदार 221/- रुपये व नंतर 186/- रुपये अर्जदाराच्या खात्यातून काढले त्यामुळे अर्जदाराच्या खात्यात 0.00 बॅलन्स राहिले. नंतर मिनीमम बॅलन्सचे कारण दाखवून दिनांक 21/10/2014 रोजी 2,773/- रुपये काढले. गैरअर्जदाराचे सदरचे कृत्य हे बेकायदेशीर आहे कारण अर्जदाराच्या खात्यात पासबुकवर लिहिलेल्या नियमानुसार मिनीमम बॅलन्स होते. तरीपण गैरअर्जदाराने अर्जदाराच्या खात्यातून पैसे परस्पर अर्जदाराच्या विनंती शिवाय काढले.
पासबुकात दिलेल्या नियमाचे बारकाईने अवलोकन केले असता त्यामध्ये मिनीमम बॅलन्स नसेलतर 10/- रुपये प्रती सहा महिने ते देखील व्याज देत असतांना रक्कम वसुल करण्यात येतील असे स्पष्ट लिहिलेले आहे. याचाच अर्थ असा की, बँकेला देखील अर्जदाराच्या विनती/परवानगीशिवाय अर्जदाराच्या खात्यातून पैसे काढता येत नाहीत.(Cannot withdraw) त्यांना ती रक्कम वेगळी वसूल करावी लागेल. (recover) प्रस्तुतच्या प्रकरणात गैरअर्जदार यांनी अर्जदाराच्या खात्यात नियमानुसार बॅलन्स असताना देखील पैसे खात्यातून काढले आहेत. तसेच त्याच नियमानुसार त्यांना वसुलीचा अधिकार दिलेला असताना म्हणजेच ग्राहकांच्या खात्यातून पैसे काढण्याचा अधिकार नसतांना ग्राहकाच्या खात्यातून त्याच्या विनंती / परवानगीशिवाय पैसे काढलेले आहेत.
बँकेचा ग्राहक बँकेमध्ये विश्वासाने स्वतःचे पैसे ठेवतो. त्याच्या खात्यातून त्याच्या विनंती/परवानगी शिवाय पैसे काढण्याचा त्याने बँकेला अधिकार दिलेला नसतो. तसेच प्रस्तुत प्रकरणात ग्राहकाचे सेव्हींग खाते आहे कर्ज खाते नाही. प्रस्तुत प्रकरणात गैरअर्जदार बँकेने आपल्या म्हणण्यामध्ये बँकेच्या सदर कृत्याचे समर्थन केलेले आहे व दिनांक 01/04/2011 पासून कमीत कमी शिल्लक 1000/- रुपये एवढी असावी अशी नियमात सुधारणा केलेली आहे असे म्हटलेले आहे व रु.1000/- शिल्लक नसतील तर रु.200/- दर तिमाही प्रमाणे चार्जेस लावल्या जातील असे म्हटले आहे. तसेच दिनांक 01/09/2013 पासून वरील नियमात आणखी सुधारणा केलेली असून 1000/- रुपयापेक्षा कमी शिल्लक खात्यावर असल्यास दरमहा 70/- रुपये प्रमाणे चार्जेस लावण्यात येतील असे म्हटले आहे. गैरअर्जदार यांनी आपल्या हया कथनाबद्दल कोणताही लेखी पुरावा मंचासमोर दाखल केलेला नाही किंवा कोणताही नियम दाखल केलेला नाही. तसेच जर बँकेचे बॅलन्स बद्दल नियम बदलले असतील तर बदललेले नियम प्रत्येक ग्राहकाला कळविणे बंधनकारक आहे. प्रस्तुत प्रकरणामध्ये गैरअर्जदार यांनी बदललेले नियम अर्जदारास कळविले होते याबद्दलचा कोणताही पुरावा मंचासमोर दिलेला नाही म्हणून गैरअर्जदाराच्या सदरच्या म्हणण्यास काहीही अर्थ नाही असे मंचाचे मत आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदाराच्या खात्यात नियमानुसार मिनीमम बॅलन्स असतांना देखील अर्जदाराच्या परवानगीशिवाय त्याच्या खात्यातून पैसे काढून घेवून बेकायदेशीर कृत्य केले आहे व तसे करुन त्यास सेवेत त्रुटी दिलेली आहे व मानसिक त्रास दिलेला आहे, असे मंचाचे मत आहे.
वरील विवेचनावरुन मंच पुढील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1. अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2. गैरअर्जदार यांनी अर्जदारास आदेश तारखेपासून 30 दिवसांच्या आत रक्कम रु. 2,773/- परत दयावेत.
3. गैरअर्जदार यांनी अर्जदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व दावा खर्चापोटी रु.2,500/- आदेश तारखेपासून 30 दिवसांच्या आत दयावेत.
4. आदेशाची पूर्तता झाल्याबद्दलचा अहवाल दोन्ही पक्षांनी 45 दिवसानंतर मंचात दाखल करावा.प्रकरण 45 दिवसानंतर पुन्हा आदेशाच्या पूर्ततेच्या अहवालासाठी ठेवले जाईल.
5. निकालाच्या प्रती दोन्ही पक्षकारास मोफत देण्यात याव्यात.