निकालपत्र
(घोषीत द्वारा- मा. सौ. स्मिता बी.कुलकर्णी, अध्यक्ष )
1. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेविरुध्द सेवेत त्रुटीच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे.
अर्जदार यांचे तक्रारीतील कथन थोडक्यात खालील प्रमाणेः-
2. अर्जदार ही मयत शेतकरी श्याम दत्ता मुंगल यांची पत्नी आहे. अर्जदाराचे पती मयत श्याम यांचा दिनांक 06.10.2013 रोजी त्यांचे शेतातील विहीरीवर पाणी पिण्यासाठी गेले असता पाय घसरुन विहिरीत पाण्यात पडून बुडाल्याने मृत्यु झाला. पोलीस स्टेशन मुदखेड यांनी अपघात मृत्यु नोंद क्रमांक 18/2013 कलम 174 सी.आर.पी.सी.प्रमाणे नोंदवून घटनास्थळ पंचनामा केला पुढील कार्यवाही केली. मयत श्याम दत्ता मुंगल हा व्यवसायाने शेतकरी होता,त्याचे नावाने मौजे इजळी, तालुका मुदखेड, जिल्हा नांदेड येथे गट क्रमांक 355 मध्ये 76 आर एवढी शेतजमीन होती. शेतकरी या नात्याने तो महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी वैयक्तीक अपघात योजनेचा लाभार्थी होता. दिनांक 08.05.2014रोजी अर्जदाराने विमा रक्कम मिळणेसाठी विमा दावा तालुका कृषी अधिकारी कार्यालय, मुदखेड यांचेकडे दाखल केला होता. सदर दावा गैरअर्जदार क्र. 1 यांनी गैरअर्जदार क्र. 3 यांचेमार्फत गैरअर्जदार क्र. 2 विमा कंपनीकडे पाठविला होता, तो त्यांना दिनांक 11.06.2014 रोजी प्राप्त झाला. गैरअर्जदार क्र. 2 यांनी सदर प्रस्ताव फेटाळल्याचे पत्राव्दारे कळविले. प्रस्ताव फेटाळतांना विमा कंपनीने अर्जदारास प्रस्ताव योजनेतील नमूद कालावधी नंतर पाठविण्यात आलेला असल्याने अर्जदाराचा दावा विमा कंपनी ग्राह्य धरु शकत नाही असे कळवून बेकायदेशीररीत्या अर्जदाराचा विमा प्रस्ताव फेटाळून सेवेत त्रुटी दिलेली आहे. त्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केलेली आहे व मंचास विनंती केली आहे की, अर्जदाराचा अर्ज मंजूर करण्यात यावा. गैरअर्जदार यांना निर्देश देण्यात यावे की त्यांनी अर्जदारास शेतकरी अपघात विमा रक्कम रु.एक लाख द.सा.द.शे. 12 टक्के व्याजासह द्यावेत. तसेच अर्जदारास झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु.25,000/- व दावा खर्च रक्कम रु.5,000/- अर्जदारास गैरअर्जदार यांचेकडून द्यावेत.
3. गैरअर्जदार यांना नोटीस तामील झाल्यानंतर गैरअर्जदार यांनी वकीलमार्फत हजर होऊन लेखी जबाब व शपथपत्र दाखल केलेले आहे.
गैरअर्जदार क्र. 1 यांचा लेखी जबाब थोडक्यात पुढील प्रमाणेः-
4. अर्जदाराने संपूर्ण कागदपत्रे या कार्यालयात दिनांक 08.05.2014 रोजी सादर केले होते. या कार्यालयाने त्यादिवशी संपूर्ण प्रस्ताव तयार करुन या कार्यालयाचे पत्र क्र.698,दिनांक 08.05.2014 अन्वये सदर प्रस्ताव मा.जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी,नांदेड कार्यालयात सादर केला.
गैरअर्जदार क्र. 2 यांचा लेखी जबाब थोडक्यात पुढील प्रमाणेः-
5. दिनांक 05.01.2005 च्या शासन निर्णयानुसार या विमा योजनेंतर्गत नुकसान भरपाईची रक्कम अदा करण्याबाबत वाद निर्माण झाल्यास त्याबाबत समाधानकारक तोडगा काढणेसााठी आयुक्त कृषी महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती निर्णय घेईल असे ठरलेले आहे. त्यामुळे सदरील तक्रार चालविण्याचा मंचाला अधिकार नाही. योजनेप्रमाणे दावा दाखल करण्याची मुदत ही दिनांक 26.02.2014 पर्यंत होती. परंतु अर्जदाराचा दावा गैरअर्जदारास दिनांक 10.06.2014 रोजी मिळाला आहे. म्हणून गैरअर्जदाराने अर्जदाराचा दावा योग्य कारणास्तव फेटाळलेला आहे.
गैरअर्जदार क्र. 3 यांचा लेखी जबाब थोडक्यात पुढील प्रमाणेः-
6. गैरअर्जदार क्र. 3 यांना दिनांक 06.06.2014 रोजी अर्जदाराचा प्रस्ताव मिळाला व त्याचदिवशी गैरअर्जदार क्र. 3 यांनी अर्जदाराचा विमा प्रस्ताव विमा कंपनीला पुढील कार्यवाहीसाठी पाठविला. तसेच विमा कंपनीने दिनांक 13.05.2014 रोजीच्या पत्राव्दारे कळविले होते की, विमा दावा विहित कागदपत्रांसह ज्या दिनांकास तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयात दाखल होईल त्या दिनांकासतो विमा कंपनीला प्राप्त झालेला आहे असे समजण्यात येईल . तसेच विमा कंपनीने योजनेचा कालावधी संपल्यानंतरही 90 दिवसाच्या नंतर प्राप्त होणारे प्रस्ताव स्विकारणे बंधनकारक आहे. प्रस्ताव विहित मुदतीत दाखल केलेले नाही या कारणास्तव विमा कंपनीला प्रस्ताव नाकारता येणार नाही. त्यामुळे गैरअर्जदार क्र. 3 यांना जबाबदार धरण्यात येऊ नये अशी विनंती गैरअर्जदार क्र. 3 यांनी लेखी जबाबाव्दारे केलेली आहे.
7. अर्जदार व गैरअर्जदार यांनी पुराव्याकामी आपले शपथपत्र व कागदपत्रे दाखल केलेली आहेत. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकला. दोन्ही बाजूंनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता खालील गोष्टी स्पष्ट होतात.
8. अर्जदार यांचे पती मयत श्याम दत्ता मुंगल हे शेतकरी होते हे अर्जदाराने दाखल सातबारा उता-यावरुन स्पष्ट होते. अर्जदाराचे मयत पती हे शेतकरी या नात्याने महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी वैयक्तीक अपघात योजनेचा लाभार्थी होते. अर्जदाराचे पतीचा मृत्यु दिनांक 06.10.2013 रोजी झालेला असल्याचे अर्जदाराने दाखल केलेल्या पोलीस पेपर्सवरुन स्पष्ट होते. अर्जदाराने दिनांक 08.05.2013 रोजी शेतकरी जनता अपघात विमा योजनेंर्गत विमा रक्कम मिळावी म्हणुन तालुका कृषी अधिकारी, मुदखेड ,जिल्हा नांदेड यांचेकडे आवश्यक त्या कागदपत्रांसह अर्ज दाखल केलेला होता हे अर्जदाराने दाखल केलेल्या सदरच्या अर्जाच्या प्रतीवरुन स्पष्ट होते. गैरअर्जदार क्र. 2 विमा कंपनीने प्रस्ताव विहित मुदतीत प्राप्त न झाल्याने अर्जदाराचा विमा प्रस्ताव फेटाळलेला आहे. महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार अर्जदाराने विमा दावा तालुका कृषी अधिकारी यांचेकडे ज्या तारखेस दाखल केला त्या तारखेस विमा कंपनीस प्राप्त झाला असे समजण्यात येईल असे असतांनाही गैरअर्जदार यांनी अर्जदाराचा प्रस्ताव विहित मुदतीत नाही. त्यामुळे प्रस्ताव ग्राह्य धरता येत नाही असे कारण दिलेले आहे. वास्तविक पाहता गैरअर्जदार क्र. 3 यानी महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार विमा कंपनीस प्रस्ताव विहित मुदतीत प्राप्त नाहीत या कारणामुळे नाकारु नयेत असे कळविलेले आहे. मा. वरिष्ठ न्यायालयाने दिलेल्या निवाडयानुसार गैरअर्जदार यांनी विमा प्रस्ताव विहित मुदतीत प्राप्त नाहीत या तांत्रिक मुद्यावर प्रस्ताव नाकारु नयेत असे असतांनाही गैरअर्जदार क्र. 2 विमा कंपनीने अर्जदाराचा प्रस्ताव अयोग्य कारणामुळे नाकारुन सेवेत त्रुटी दिलेली आहे असे मंचाचे मत आहे. वरील विवेचनावरुन मंच खालील आदेश देत आहे.
आ दे श
1. अर्जदार यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. गैरअर्जदार क्र. 2 यांनी अर्जदारास रक्कम रु.1,00,000/- दिनांक 11.06.2014 (प्रस्ताव नाकारल्याचा दिनांक) पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह आदेश कळाल्यापासून तीस दिवसाच्या आत द्यावी.
3. गैरअर्जदार क्र. 2 यांनी अर्जदार यास सेवेत त्रुटी दिल्याबद्दल मानसिक त्रासापोटी रक्कम रु.3000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.2000/- आदेश कळाल्यापासून तीस दिवसाचे आत द्यावेत.
4. दोन्ही पक्षकारास निकालाच्या प्रती मोफत पुरविण्यात याव्यात.
5. वरील आदेशाच्या पुर्ततेचा अहवाल दोन्ही पक्षकारांनी निकालाच्या तारखेपासून 45 दिवसांच्या आत मंचात दाखल करावा. प्रकरण 45 दिवसानंतर आदेशाच्या पुर्ततेसाठी ठेवण्यात यावे.