जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 270/2021. तक्रार दाखल दिनांक : 29/11/2021. तक्रार निर्णय दिनांक : 25/07/2022.
कालावधी : 00 वर्षे 07 महिने 26 दिवस
केतन ज्ञानोबा शिरुरे, वय 29 वर्षे, व्यवसाय : नोकरी,
रा. केशव नगर, लातूर, ता. जि. लातूर. तक्रारकर्ता
विरुध्द
प्रोप्रायटर, सी.जी. लाईफ स्टाईल, शिलाई वर्ल्ड,
सर्वे नं. 32, प्लॉट नं. 5 व 6, देशमुख मार्केट रोड,
देशमुख कन्स्ट्रक्शनच्या समोर, मौजे खाडगाव, लातूर. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- श्री. अनिल के. जवळकर
विरुध्द पक्ष अनुपस्थित / एकतर्फा
आदेश
मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी की, दि.16/2/2021 रोजी त्यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडून देयक क्र. 2021/11/16282 अन्वये शर्ट, पॅन्ट, जॅकेट खरेदी केले. त्याचे जी.एस.टी. सह रु.3,471/- मुल्य झाले. तसेच कॅरी बॅगसाठी अतिरिक्त रु.11/- आकारण्यात आले. तक्रारकर्ता यांनी क्रेडीट कार्डद्वारे रु.3,482/- अदा केले. तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष यांचे नांव असणारी कॅरी बॅग स्वीकारण्याचे अमान्य करुन कॅरी बॅग व त्यावरील जी.एस.टी. मुल्य परत मागितले असता टाळाटाळ करण्यात आली. उक्त कथनाच्या अनुषंगाने रु.12.32 पैसे व्याजासह देण्याचा; अनुचित प्रथेसाठी रु.50,000/- देण्याचा; मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.50,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.20,000/- देण्याचा विरुध्द पक्ष यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ता यांनी केली आहे.
(2) प्रस्तुत प्रकरणाच्या अनुषंगाने विरुध्द पक्ष यांना सूचनापत्र प्राप्त झाले; परंतु ते जिल्हा आयोगापुढे उपस्थित राहिले नाहीत आणि लेखी निवेदनपत्र सादर केले नाही. त्यामुळे त्यांच्याविरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश करण्यात येऊन सुनावणी पूर्ण करण्यात आली.
(3) अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन करण्यात आले. तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञांचा मौखिक युक्तिवाद ऐकला.
(4) अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडून दि.16/2/2021 रोजी कपडे खरेदी केल्याचे दिसून येते. कपडे खरेदीच्या पावतीमध्ये रु.11/- अतिरिक्त नमूद केलेले आहेत. तक्रारकर्ता यांचे कथन असे की, विरुध्द पक्ष यांनी कॅरी बॅगकरिता अतिरिक्त रु.11/- आकारले असून जे अनुचित व अयोग्य आहेत. तक्रारकर्ता यांनी विधिज्ञांमार्फत सूचनापत्र पाठवून कॅरी बॅगकरिता घेतलेले मुल्य परत करण्यास विरुध्द पक्ष यांना कळविले होते. असे दिसते की, विरुध्द पक्ष यांनी विधिज्ञांच्या सूचनापत्रास उत्तर दिलेले नाही किंवा मुल्य परत केलेले नाही. तक्रारकर्ता यांचे कथन असे की, कॅरी बॅगवर विरुध्द पक्ष यांनी स्वत:च्या दुकानाचे नांव छापलेले होते आणि त्याकरिता शुल्क आकारण्यात आल्यामुळे कॅरी बॅग स्वीकारण्यास नकार दिला. चौकशीमध्ये वेळ गेल्यानंतर विरुध्द पक्ष यांनी कॅरी बॅगचे मुल्य परत करण्यास टाळाटाळ केली. हे सत्य आहे की, खरेदी केलेल्या वस्तु व साहित्य एकत्र ठेवणे आणि त्याचे वहन करण्याकरिता सोईच्या दृष्टीने पिशवी ठरू शकते. सर्वसाधारणपणे, दुकानामध्ये कागदी, कापडी, प्लास्टीक इ. प्रकारच्या कॅरी बॅग उपलब्ध करुन दिल्या जातात. कॅरी बॅगकरिता स्वतंत्र शुल्क आकारण्यासंबंधी स्पष्ट नियम दिसून येत नाहीत. परंतु ज्यावेळी दुकानदार स्वत:च्या दुकानाचे नांव कॅरी बॅगवर नमूद करतो, त्यावेळी त्याचे शुल्क आकारणी करणे अनुचित ठरते. कारण एका अर्थाने अशा कॅरी बॅगद्वारे ग्राहकांच्या माध्यमातून दुकानदार स्वत:च्या दुकानाची जाहिरात करीत असतो. दुकानाचे नांव नमूद असलेली कॅरी बॅग परत-परत वापरण्यात येऊन जन-माणसामध्ये त्या दुकानाची प्रसिध्दी होते आणि त्याचा लाभ केवळ संबंधीत दुकानदारास होतो. ग्राहकांकडून मुल्य स्वीकारुन विक्री केलेल्या कॅरी बॅगद्वारे स्वत:च्या व्यापार वृध्दीकरिता व लाभाकरिता ग्राहकांना माध्यम करण्यात येत असल्यास ते अनुचित ठरते. त्यामुळे दुकानाचे नांव असणा-या कॅरी बॅगकरिता मुल्य आकारता येणार नाही. प्रस्तुत प्रकरणामध्ये तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष यांचे दुकानाचे नांव असणारी कॅरी बॅग जिल्हा आयोगाच्या निदर्शनास आणून दिलेली आहे.
(5) विरुध्द पक्ष यांनी लेखी निवेदनपत्र सादर केलेले नाही. ग्राहक तक्रारीमध्ये नमूद वादकथनांचे खंडण केलेले नाही; किंबहुना लेखी निवेदनपत्र व पुराव्याची कागदपत्रे सादर करण्याकरिता त्यांना योग्य संधी होती. अशा स्थितीत तक्रारकर्ता यांच्या वादकथनांना व त्यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांस विरुध्द पक्ष यांच्याद्वारा आव्हानात्मक निवेदन व विरोधी पुरावा उपलब्ध नाही. उक्त विवेचनाअंती विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना त्यांच्या दुकानाचे नांव असणारी कॅरी बॅग विक्री करुन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब व सेवेमध्ये त्रुटी निर्माण केलेली आहे आणि तक्रारकर्ता हे कॅरी बॅगचे मुल्य परत मिळण्यास पात्र ठरतात.
(6) तक्रारकर्ता यांनी मा. चंदीगड केंद्रशाषित प्रदेश राज्य आयोगाच्या अपिल नं. 98/2019 'बाटा इंडिया लिमिटेड /विरुध्द/ दिनेश प्रसाद रातुरी' निर्णय दि. 22/7/2019, मा.राष्ट्रीय आयोगाच्या "बिग बझार /विरुध्द/ अशोक कुमार" 2021 (2) सी.पी.आर. 20 (एन.सी.), हैद्राबाद राज्य आयोगाच्या "बागलेकर आकाश कुमार /विरुध्द/ मोरे मेगास्टोअर रिटेल लि." ग्राहक तक्रार क्र. 310/2019 निर्णय दि. 19/2/2021 इ. न्यायनिर्णयाचा संदर्भ सादर केला. उक्त निर्णय विचारात घेतले.
(7) तक्रारकर्ता यांनी अनुचित व्यापारी प्रथेकरिता रु.50,000/-; मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.50,000/- रकमेची मागणी केलेली आहे. नुकसान भरपाईची रक्कम निश्चित करताना त्या–त्या परिस्थितीवर गृहीतक आधारीत असतात. तक्रारकर्ता हे जागृत ग्राहक आहेत. ग्राहक जागृतीमुळे अन्य ग्राहकांची पिळवणूक थांबते. तसेच वाईट व्यापारी प्रवृत्तीस आळा घालण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. विरुध्द पक्ष यांच्याद्वारे किती ग्राहकांना पिशवीकरिता शुल्क आकारण्यात आले, याबद्दल स्पष्टता नाही. परंतु विरुध्द पक्ष यांच्या नावलौकीक पाहता त्यांचे मोठ्या प्रमाणावर ग्राहक असावेत आणि त्यांना अशाप्रकारे त्यांनी स्वत:च्या दुकानचे नांव असणा-या पिशवीकरिता शुल्क आकारल्याचे ग्राह्य धरण्यात येऊन त्यांच्यावर दंडात्मक नुकसान भरपाई लादणे न्यायोचित ठरते. आमच्या मते, रु.10,000/- दंडात्मक नुकसान भरपाई योग्य असून ती रक्कम ग्राहक सहाय्यता निधीमध्ये जमा करणे उचित राहील. असे दिसते की, तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडे आवश्यक पाठपुरावा केलेला आहे. विरुध्द पक्ष यांनी दखल न घेतल्यामुळे त्यांना जिल्हा आयोगापुढे तक्रार दाखल करणे भाग पडले. अशा स्थितीमध्ये तक्रारकर्ता यांना मानसिक व शारीरिक त्रास होणे नैसर्गिक व स्वाभाविक आहे. ग्राहक तक्रार दाखल करण्याच्या कायदेशीर कार्यवाहीकरिता विधिज्ञांचा सल्ला व सहायता, प्रकरण शुल्क इ. खर्चाच्या बाबी आहेत. तसेच ग्राहक तक्रार न्यायप्रविष्ठ असताना आर्थिक खर्च व वेळेचा अपव्यय होतो. योग्य विचाराअंती मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.5,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.3,000/- मिळण्यास तक्रारकर्ता पात्र ठरतात. उक्त विवेचनाअंती खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार अशंत: मंजूर करण्यात येते.
ग्राहक तक्रार क्र. 270/2021.
(2) विरुध्द पक्ष यांनी कॅरी बॅगकरिता आकारलेले शुल्क रु.11/- तक्रारकर्ता यांना परत करावेत.
(3) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.5,000/- नुकसान भरपाई व तक्रार खर्चापोटी रु.3,000/- द्यावेत.
(4) विरुध्द पक्ष यांनी दंडात्मक नुकसान भरपाईकरिता रु.10,000/- या जिल्हा आयोगामध्ये भरणा करावेत.
(5) विरुध्द पक्ष यांनी प्रस्तुत आदेशाची अंमलबजावणी प्रस्तुत आदेश प्राप्तीपासून 45 दिवसाचे आत करावी.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-