जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 196/2022. तक्रार दाखल दिनांक : 06/07/2022. तक्रार निर्णय दिनांक : 11/03/2024.
कालावधी : 01 वर्षे 08 महिने 05 दिवस
तौफीक दस्तगिर शेख, वय 33 वर्षे, धंदा : व्यापार,
रा. काझी मोहल्ला, लातूर, ता. जि. लातूर. :- तक्रारकर्ता
विरुध्द
जुगलकिशोर (बबलु) तोष्णीवाल, धंदा : व्यापार,
प्रोप्रा. राधिका ट्रॅव्हल्स, यशवंतराव चव्हाण कॉम्पलेक्स,
अशोक हॉटेल, लातूर, ता. जि. लातूर. :- विरुध्द पक्ष
गणपूर्ती : श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्यक्ष
श्रीमती रेखा जाधव, सदस्य
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- डब्ल्यू. वाय. बिरादार
विरुध्द पक्ष यांचेकरिता विधिज्ञ :- यू. जे. नाईकनवरे
आदेश
श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्यक्ष यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी की, लग्नकार्यासाठी दि.29/5/2022 रोजी लातूर ते परळी जाण्या-येण्याच्या प्रवासाकरिता त्यांचा दि.15/5/2022 रोजी विरुध्द पक्ष यांच्याशी करारनामा झाला आणि त्यानुसार राधिका ट्रॅव्हल्स यांचे वाहन क्र. एम. एच. 24 ए. बी. 7219 प्रवासाकरिता देण्यात आले. प्रवास भाडे रु.11,000/- निश्चित करण्यात येऊन त्यांनी रु.2,000/- रोख अनामत जमा केले. त्याबद्दल दि.15/5/2022 रोजी पावती क्र. 008 देण्यात आली.
(2) तक्रारकर्ता यांचे पुढे कथन असे की, करारनाम्याप्रमाणे दि.29/5/2022 रोजी सकाळी 7.00 वाजता तक्रारकर्ता यांच्या निवासस्थानासमोर वाहन पाठविणे आवश्यक होते. परंतु सातत्याने संपर्क केल्यानंतर विरुध्द पक्ष यांनी सकाळी 8.30 वाजता वाहन पाठविले. तक्रारकर्ता यांनी विलंबाबद्दल चालकास विचारणा केली असता अरेरावीची भाषा वापरुन अपमान केला. पाहुण्यांना घेऊन वाहन रेणापूर नाक्याजवळील चाँद तारा मस्जीदजवळ आले असता चालकाने वाहन थांबविले आणि संपूर्ण भाडे दिल्याशिवाय वाहन पुढे नेण्यास नकार दिला. विवाहाची वेळ 10.35 असल्यामुळे विलंब होत असल्याचे सांगितले. परंतु तेथे विरुध्द पक्ष यांचा मॅनेजर येऊन त्यांनी वाहनातून खाली उतरण्यास व पूर्ण भाडे दिल्याशिवाय वाहन पुढे जाणार नसल्याचे सांगितले. कराराप्रमाणे वाहन परळी येथून लातूर येथे आल्यानंतर उर्वरीत रु.9,000/- देण्याचे ठरले होते. शेवटी वाहनातून पाहुणे उतरल्यानंतर विरुध्द पक्ष वाहन घेऊन गेले.
(3) तक्रारकर्ता यांचे पुढे कथन असे की, विवाहास विलंब होत असल्यामुळे त्यांनी पुष्कराज पेन्टाबस ट्रॅव्हल्स ॲन्ड लॉजिस्टीक यांचे वाहन बोलवून प्रवास केला. विरुध्द पक्ष यांच्या वर्तणुकीमुळे पाहण्यांमध्ये अपमानास्पद भावना निर्माण होऊन मानसिक त्रास झाला. तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष यांना विधिज्ञांमार्फत सूचनापत्र पाठवून अनामत घेतलेले रु.2,000/- व रु.1,00,000/- नुकसान भरपाई मागणी केली असता खोटे उत्तर दिले. उक्त कथनांच्या अनुषंगाने रु.1,02,000/- व्याजासह देण्याचा व रु.10,000/- ग्राहक तक्रार खर्च देण्याचा विरुध्द पक्ष यांना आदेश करावा, अशी विनंती तक्रारकर्ता यांनी केलेली आहे.
(4) विरुध्द पक्ष यांनी लेखी निवेदनपत्र दाखल केले. ग्राहक तक्रारीमध्ये नमूद बहुतांश कथने त्यांनी अमान्य केले. त्यांचे कथन असे की, परळी येथे जाण्यासाठी रु.11,000/- ठरले. तक्रारकर्ता यांनी अनामत रु.2,000/- देण्याचे मान्य केले; परंतु उर्वरीत रक्कम जमा केली नाही. दि.29/5/2022 रोजी सकाळी 6.00 वाजता वाहन क्र. एम.एच. 24 ए.बी. 7291 हे तक्रारकर्ता यांच्या घरासमोर नेले असता तक्रारकर्ता यांचे नातेवाईक व अन्य लोक जमा झाले नाहीत. नियमानुसार वाहनात डिझेल टाकणे आवश्यक असताना तक्रारकर्ता यांनी नकार दिला. तक्रारकर्ता यांनी रु.11,000/- जमा केले असते तर विरुध्द पक्ष यांनी वाहनामध्ये डिझेल टाकून पाठविले असते. वाहनामध्ये डिझेल टाकून परळी येथे जाण्यासाठी तक्रारकर्ता यांना सांगण्यात आले. परंतु तक्रारकर्ता यांनीच उध्दट वर्तन केलेले आहे. तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार खोट्या व बनावट तथ्यावर आधारीत असल्यामुळे खर्चासह रद्द करण्यात यावी, अशी विनंती केली आहे.
(5) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार, विरुध्द पक्ष यांचे लेखी निवेदनपत्र व अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे वाद-मुद्दे निश्चित करण्यात येतात आणि त्या मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
(1) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी
केल्याचे सिध्द होते काय ? नाही
(2) मुद्दा क्र.1 च्या अनुषंगाने तक्रारकर्ता अनुतोषास पात्र आहेत काय ? नाही
(3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(6) मुद्दा क्र. 1 ते 3 :- प्रामुख्याने, दि.29/5/2022 रोजी "लातूर ते परळी" प्रवासाकरिता तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष यांचे वाहन क्र. एम.एच. 24 ए.बी. 7291 ठरविले, याबद्दल उभय पक्षांमध्ये मान्यस्थिती आहे. प्रवासाकरिता एकूण रु.11,000/- शुल्क आकारण्यात आले आणि त्यापैकी रु.2,000/- अनामत दिले, याबद्दल मान्यस्थिती आढळते. प्रवासाचे उर्वरीत रु.9,000/- विरुध्द पक्ष यांना अप्राप्त होते, याबद्दल विवाद नाही. विरुध्द पक्ष यांनी दि.29/5/2022 रोजी लातूर ते परळी प्रवासाकरिता तक्रारकर्ता यांच्याकडे वाहन क्र. एम.एच. 24 ए.बी. 7291 पाठविले, याबद्दल विवाद नाही.
(7) तक्रारकर्ता यांचे कथन असे की, विरुध्द पक्ष यांच्या वाहन चालकाने रेणापूर नाक्याजवळील चाँद तारा मस्जीदजवळ वाहन थांबवून संपूर्ण भाडे दिल्याशिवाय वाहन पुढे नेण्यास नकार दिला. उलटपक्षी, विरुध्द पक्ष यांचा प्रतिवाद असा की, नियमानुसार वाहनात डिझेल टाकणे आवश्यक असताना तक्रारकर्ता यांनी नकार दिला आणि वाहनामध्ये डिझेल टाकून परळी येथे जाण्यासाठी तक्रारकर्ता यांना सांगण्यात आले. तक्रारकर्ता यांनी रु.11,000/- जमा केले असते तर विरुध्द पक्ष यांनी वाहनामध्ये डिझेल टाकून वाहन पाठविले असते, असेही विरुध्द पक्ष यांचे कथन आहे.
(8) निर्विवादपणे, प्रवासाकरिता निश्चित केलेल्या रु.11,000/- रकमेपैकी उर्वरीत रु.9,000/- विरुध्द पक्ष यांना अप्राप्त आहेत. उभयतांचा वाद-प्रतिवाद पाहता प्रवासाची उर्वरीत रक्कम देणे किंवा डिझेल टाकण्याबद्दल वाद निर्माण झाला आणि पुढील प्रवासाकरिता वाहन परळी येथे नेलेले नाही.
(9) असे दिसते की, विरुध्द पक्ष यांनी रु.2,000/- अनामत रक्कम प्राप्त झाल्यानंतर रु.9,000/- देय असताना त्यांचे वाहन प्रवासाकरिता तक्रारकर्ता यांच्या निवासस्थानाकडे वाहन पाठविलेले होते. उभय पक्षांचा वाद-प्रतिवाद पाहता तक्रारकर्ता कथन करतात त्याप्रमाणे करारनामा किंवा प्रवासाची उर्वरीत रक्कम कशाप्रकारे देय राहील, याबद्दल उचित पुरावा नाही. अशा स्थितीत, प्रवास पूर्ण झाल्यानंतर रु.9,000/- द्यावयाचे ठरले होते, हे तक्रारकर्ता यांचे कथन ग्राह्य धरणे कठीण ठरते. उलटपक्षी, विरुध्द पक्ष यांचे कथन की, वाहनामध्ये डिझेल टाकण्यास तक्रारकर्ता यांना सांगण्यात आले किंवा तक्रारकर्ता यांनी रु.11,000/- जमा केले असते तर विरुध्द पक्ष यांनी वाहनामध्ये डिझेल टाकून वाहन पाठविले असते, हे विधान विश्वासार्ह वाटते. निर्विवादपणे, तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष यांना उर्वरीत रु.9,000/- दिले नाहीत. तसेच प्रवास पूर्ण झाल्यानंतर विरुध्द पक्ष यांना रु.9,000/- द्यावयाचे ठरले होते, असाही पुरावा नाही. त्यामुळे तक्रारकर्ता यांनी वाहनामध्ये डिझेल भरण्यास नकार दिल्यामुळे विरुध्द पक्ष यांनी उर्वरीत रक्कम देण्याची किंवा डिझेल भरण्यासंबंधी केलेली सूचना अवास्तव किंवा अनुचित नाही, असे जिल्हा आयोगाचे मत आहे.
(10) वाहनास झालेला विलंब, उध्दट वर्तनाचे एकमेकांवर उभयतांद्वारे केलेल्या आरोपांच्या सिध्दतेचे दृष्टीने पुरावा नसल्यामुळे त्याची दखल घेतला येणार नाही. वाद-तथ्ये व कागदपत्रे पाहता विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी केल्याचे सिध्द होत नाही. तक्रारकर्ता अनुतोषास पात्र नसल्यामुळे ग्राहक तक्रार रद्द करणे क्रमप्राप्त ठरते. मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर नकारार्थी देऊन मुद्दा क्र.3 करिता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) ग्राहक तक्रार नामंजूर करण्यात येते.
(2) खर्चासंबंधी आदेश नाहीत.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव) (श्री. अमोल बा. गिराम)
सदस्य सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-