जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 143/2022. तक्रार दाखल दिनांक : 06/05/2022. तक्रार निर्णय दिनांक : 11/05/2023.
कालावधी : 01 वर्षे 00 महिने 05 दिवस
(1) श्री. उमाकांत पि. वैजनाथ तोंडारे, वय 56 वर्षे, व्यवसाय : शेती.
(2) सौ. शैलजा भ्र. उमाकांत तोंडारे, वय 48 वर्षे, व्यवसाय : घरकाम
व शेती, दोघेही रा. सोमनाथपूर, ता. उदगीर, जि. लातूर. तक्रारकर्ते
विरुध्द
(1) मे. गणेश कृषि सेवा केंद्र तर्फे प्रोप्रा. बालाजी बोथीकर,
नांदेड-बिदर रोड, उदगीर, जि. लातूर - 413 517.
(2) मे. जिल्हा व्यवस्थापक, महाबीज, महा. राज्य बियाणे महामंडळ
(मर्या.), जिल्हा कार्यालय, लातूर, जि. लातूर - 413 515.
(3) मे. व्यवस्थापकीय संचालक, महाबीज, महा. राज्य बियाणे महामंडळ
(मर्या.), महाबीज भवन, कृषि नगर, अकोला - 444 104. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ते यांचेकरिता विधिज्ञ :- एस. एम. मान्नीकर
विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांचेकरिता विधिज्ञ :- एस. व्ही. तापडिया
आदेश
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ते यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी की, त्यांची मौजे सोमनाथपूर येथे भुमापन क्र. 39/1/5, 39/2/5 व 53/3 मध्ये शेतजमीन आहे. दि.23/5/2020 रोजी त्यांनी विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडून विरुध्द पक्ष क्र.2 व 3 यांच्या महाबीज कंपनीच्या JS 335 बियाण्याच्या 12 पिशव्या खरेदी केल्या. बियाणे खरेदीचा पावती क्र. 733 असून त्याकरिता रु.26,400/- शुल्क दिले. बियाण्याचा बॅच नं. Oct. 19-13-3808-5147 आहे. तक्रारकर्ता क्र.1 यांनी बियाण्यासह खते खरेदी केले. दि.14/6/2020 रोजी तक्रारकर्ते यांनी सोयाबीन बियाण्याची पेरणी केली. मात्र बियाण्याची उगवणशक्ती निर्धारीत प्रमाणापेक्षा खुप कमी असल्याचे आढळून आले. त्यांच्या तक्रारीनंतर कृषि अधिका-यांनी दि.23/6/2020 रोजी शेतामध्ये प्रत्यक्ष पाहणी केली आणि अहवाल दिला. मात्र विरुध्द पक्ष यांनी नुकसान भरपाई देण्याबद्दल दखल घेतली नाही. त्यामुळे उक्त कथनाच्या अनुषंगाने रु.9,67,690/- नुकसान भरपाई व्याजासह देण्याचा व मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.43,000/- देण्याचा विरुध्द पक्ष यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ते यांनी केलेली आहे.
(2) विरुध्द पक्ष क्र.1 यांनी लेखी निवेदनपत्र दाखल केले. ग्राहक तक्रारीचे खंडन करताना तक्रारीतील बहुतांश कथने अमान्य केले. प्रथमत: तक्रारकर्ते हे 'ग्राहक' संज्ञेत येत नाहीत, अशी हरकत नोंदविली. त्यांचे कथन असे की, पावती क्र.733, दि.23/5/2020 नुसार तक्रारकर्ते यांनी सोयाबीन बियाणे लॉट क्र. JS 335 बॅच क्र. OCT-19-13-3808-5146 व 5151 च्या 12 पिशव्या व DAP खताच्या 15 पिशव्या खरेदी केल्या. त्यांनी तक्रारकर्ते यांना लॉट क्र. 5147 चे बियाणे विक्री केलेले नाही. कृषि अधिका-यांनी पंचनामा करताना त्यांना सूचनापत्र दिले नाही. पाहणी व पंचनामा एकतर्फी असल्यामुळे विरुध्द पक्ष क्र.1 यांच्यावर बंधनकारक नाही. वादग्रस्त पंचनामा व अभिप्रायामध्ये जमिनीत बियाण्यास बुरशी लागल्याचे कारण नमूद असल्यामुळे सदर बाब उगवणीवर परिणामकारक ठरते. पेरणी पध्दत योग्य न अवलंबल्यामुळे उगवणी कमी होऊ शकते. बियाण्याच्या दोषामुळे कमी उगवण झालेली नाही. समितीद्वारे पाहणी व पंचनामा करताना शासकीय परिपत्रकाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात आलेले नाही. लॉट क्र. 5147 चे 49.50 क्विंटल बियाणे बीज प्रमाणीकरण यंत्रणेने तपासणी करुन मुक्तता अहवाल दिल्यानंतर बाजारामध्ये विक्री केलेले आहे. त्याबद्दल तक्रारकर्ते यांच्याशिवाय अन्य तक्रार नाही. ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 13(ए)(क) व बियाणे कायद्याचे कलम 23(ए) प्रमाणे कार्यवाही झालेली नाही. शेताचा पोत, जमिनीची प्रत, पेरणीपूर्व तयारी, योग्य पाऊस, पेरणीसाठी अवलंबलेली पध्दत, मशागत, पेरणीपूर्व व पेरणीवेळी वापरलेली रासायनिक खते, हवामान, पेरणीच्या वेळी जमिनीतील ओल, बियाण्याची हाताळणी व साठवणूक, खोलीवर केलली पेरणी, पेरलेले बियाण्यांचे पक्षी व किटकाकडून होणारे नुकसान, जमिनीतील उष्णता इ. बाबींचा बियाण्याच्या उगवणशक्तीवर परिणाम होतो. तक्रारकर्ते यांची ग्राहक तक्रार विनाआधार असल्यामुळे खर्चासह रद्द करण्यात यावी, अशी विनंती विरुध्द पक्ष क्र.1 यांनी केलेली आहे.
(3) विरुध्द पक्ष क्र. 2 व 3 यांनी लेखी निवेदनपत्र दाखल केले. तक्रारकर्ता यांच्या ग्राहक तक्रारीचे खंडन करताना त्यांनी तक्रारीमध्ये नमूद बहुतांश कथने अमान्य केले आहेत. प्रथमत: तक्रारकर्ते हे 'ग्राहक' संज्ञेत येत नाहीत, अशी हरकत नोंदविली. त्यांचे कथन असे की, वादग्रस्त पंचनामा व अभिप्रायामध्ये नमूद मजकुरानुसार तक्रारकर्ता यांनी 4 ते 5 से.मी. खोलीवर पेरणी केलेली आहे. कृषि विद्यापिठाच्या शिफारशीनुसार 2.5 ते 3 से.मी. खोलीवर बियाण्याची पेरणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे बियाण्याच्या उगवणशक्तीवर परिणाम होतो. तक्रारकर्ते यांनी बियाणे लॉट क्र.5146 चे कागदपत्रे दाखल केले असून ग्राहक तक्रार लॉट क्र. 5147 संबंधी दाखल केली आहे. तथाकथित पाहणी व पंचनामा एकतर्फी असल्यामुळे त्यास कायदेशीर महत्व प्राप्त होत नाही. समितीने पाहणी व पंचनामा करताना शासकीय परिपत्रकाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात आलेले नाही. बीज प्रमाणीकरण यंत्रणेने लॉट क्र. 5147 चे 49.50 क्विंटल बियाणे तपासणी करुन मुक्तता अहवाल दिल्यानंतर बाजारामध्ये विक्री केले. त्याबद्दल तक्रारकर्ते यांच्याशिवाय अन्य तक्रार नाही. ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 13(ए)(क) व बियाणे कायद्याचे कलम 23(ए) प्रमाणे कार्यवाही झालेली नाही. शेताचा पोत, जमिनीची प्रत, पेरणीपूर्व तयारी, योग्य पाऊस, पेरणीसाठी अवलंबलेली पध्दत, मशागत, पेरणीपूर्व व पेरणीवेळी वापरलेली रासायनिक खते, हवामान, पेरणीच्या वेळी जमिनीतील ओल, बियाण्याची हाताळणी व साठवणूक, खोलीवर केलली पेरणी, पेरलेले बियाण्यांचे पक्षी व किटकाकडून होणारे नुकसान, जमिनीतील उष्णता इ. बाबींचा बियाण्याच्या उगवणशक्तीवर परिणाम होतो. तक्रारकर्ते यांची ग्राहक तक्रार विनाआधार असल्यामुळे खर्चासह रद्द करण्यात यावी, अशी विनंती विरुध्द पक्ष क्र.2 व 3 यांनी केलेली आहे.
(4) तक्रारकर्ते यांची ग्राहक तक्रार, विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 यांचे लेखी निवेदनपत्र, उभय पक्षांनी दाखल केलेली कागदपत्रे इ. चे अवलोकन केले असता; तसेच विद्वान विधिज्ञांचा मौखिक युक्तिवाद ऐकल्यानंतर वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे वाद-मुद्दे निश्चित करण्यात येतात आणि त्या मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
1. तक्रारकर्ते हे विरुध्द पक्ष यांचे ग्राहक आहेत काय ? होय.
2. तक्रारकर्ते यांनी विरुध्द पक्ष क्र. 2 व 3 यांचेद्वारे उत्पादीत व
विरुध्द पक्ष क्र. 1 यांच्याकडून खरेदी केलेले सोयाबीन बियाणे
दोषयुक्त असल्याचे सिध्द होते काय ? नाही.
3. तक्रारकर्ते विरुध्द पक्ष यांच्याकडून नुकसान भरपाई
मिळण्यास पात्र आहेत काय ? नाही.
4. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
कारणमीमांसा
(5) मुद्दा क्र. 1 :- सर्वप्रथम विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी अशी हरकत नोंदविली की, तक्रारकर्ते यांनी बियाणे लागवडीतून नफा मिळविण्याच्या व्यापारी उद्देशाने बियाणे खरेदी केल्यामुळे ते 'ग्राहक' संज्ञेत येत नाहीत. विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांच्या हरकतीची दखल घेतली असता, आमच्या मते, ज्यावेळी वस्तू किंवा सेवा खरेदीचा संबंध व्यवसायिक किंवा व्यापारी हेतुशी जोडला जातो, त्यावेळी प्रकरणारुप तो व्यवहार 'व्यवसायिक किंवा व्यापारी हेतूसाठी' आहे काय ? हे पहावे लागते. निश्चितच, कथित वस्तू किंवा सेवा खरेदी व्यवहार व्यापारी किंवा व्यवसायिक उद्देशासाठी आहे काय, या प्रश्नाचे उत्तर त्या-त्या प्रकरणाच्या तथ्ये आणि परिस्थितीवर अवलंबून असते. सामान्यतः 'व्यवसायिक किंवा व्यापारी हेतू' मध्ये उत्पादन / औद्योगिक क्रियाकलाप किंवा व्यवसाय-ते-व्यवसाय व्यवहार समाविष्ट असल्याचे समजले जाते. खरेदीकर्ता किंवा त्यांच्या लाभार्थ्यांना काही प्रकारचा नफा मिळवून देणे, हाच अशा व्यवहाराचा मुख्य हेतू असतो. वस्तू किंवा सेवा खरेदीचा उद्देश कोणत्याही व्यावसायिक क्रियाकलापांशी जोडला गेल्यास तो स्वयं-रोजगाराद्वारे उपजीविका निर्माण करण्यासंबंधी आहे काय ? हे सुध्दा पहावे लागेल. निर्विवादपणे, तक्रारकर्ता हे शेतकरी आहेत आणि शेती त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. ते शेतीव्यतिरिक्त अन्य व्यवसाय, व्यापार किंवा नोकरी असल्याचे दिसून येत नाही; किंबहुना विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांच्यातर्फे सिध्द करण्यात आलेले नाही. त्यामुळे उपजीविका किंवा चरितार्थ चालविण्यासाठी शेती व्यवसाय करताना शेतीनिगडीत वस्तू किंवा सेवा खरेदी केलेल्या असल्यास असे व्यवहार व्यापारी किंवा व्यवसायिक ठरणार नाहीत. अशा स्थितीत, तक्रारकर्ता यांनी नफा मिळविण्याकरिता बियाणे खरेदी केले आणि ते 'ग्राहक' संज्ञेत येत नाहीत, हा विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांचा बचाव ग्राह्य धरता येत नाही आणि मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
(6) मुद्दा क्र. 2 ते 4 :- मुद्दा क्र. 2 ते 4 एकमेकांशी निगडीत असल्यामुळे त्यांचे एकत्र विवेचन करण्यात येत आहे. तक्रारकर्ते यांच्या तक्रारीनंतर तालुका तक्रार निवारण समितीने क्षेत्रीय भेट देऊन तक्रारकर्ता यांच्या शेतजमिनीतील सोयाबीन पिकाची पाहणी करुन अहवाल व पंचनामा तयार केलेला आहे. अहवालाचे अवलोकन केले असता तालुका कृषी अधिकारी, शास्त्रज्ञ, कृषि विद्यापिठाचे प्रतिनिधी; महाबीज, अकोला यांचे प्रतिनिधी, कृषि अधिकारी (ता.कृ.अ.); कृषि अधिकारी, पं.स.; कंपनी प्रतिनिधी व तक्रारकर्ता उपस्थित असल्याचे व अहवालावर त्यांच्या स्वाक्ष-या असल्याचे दिसून येते. तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीच्या निष्कर्षानुसार सदोष बियाणे असल्यामुळे बियाण्याची उगवण कमी झाली, असे नमूद आहे.
(7) विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी शासकीय परिपत्रकाचा आधार घेऊन समिती अहवाल अमान्य केला आहे. आमच्या मते, बियाण्यासंबंधी तक्रार प्राप्त झाल्यानंतर पंचनामा व अहवाल तयार करण्यासाठी शासकीय स्तरावर तालुका तक्रार निवारण समिती ही यंत्रणा कार्यरत आहे आणि समितीमध्ये कृषी क्षेत्रातील तज्ञ व अधिकारी वर्गाचा समावेश आहे. यदाकदाचित, शासकीय परिपत्रकाचे पालन करण्यामध्ये शासकीय यंत्रणेकडून त्रुटी झाल्याचे ग्राह्य धरले तरी त्यामुळे बियाणे सदोष नव्हते किंवा अहवाल दोषपूर्ण ठरतो, असे अनुमान काढता येणार नाही.
(8) विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांचा मुख्य बचाव असा की, विरुध्द पक्ष क्र.1 यांनी देयक क्र. 733, दि. 23/5/2020 अन्वये तक्रारकर्ते यांना सोयाबीन बियाणे लॉट क्र. JS 335 बॅच क्र. OCT-19-13-3808-5146 व 5151 च्या 12 पिशव्या विक्री केल्या आहेत. मात्र तक्रारकर्ते यांनी त्यांच्याकडून बियाणे लॉट क्र. JS 335 बॅच क्र. OCT-19-13-3808-5147 खरेदी केलेले नाही. तसेच युक्तिवादादरम्यान विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांच्या विधिज्ञांनी तीव्र आक्षेप घेत तक्रारकर्ते यांनी विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडून बियाणे लॉट क्र. JS 335 बॅच क्र. OCT-19-13-3808-5147 खरेदी केलेले नाही, अस निवेदन केले. उलटपक्षी, तक्रारकर्ते यांच्या विधिज्ञांनी ग्राहक तक्रारीतील कथनांचे समर्थन केले.
(9) प्रकरणामध्ये उपस्थित मुद्दे व त्या अनुषंगाने वाद-प्रतिवाद पाहता अभिलेखावर दाखल पुराव्यांची दखल घ्यावी लागेल. असे दिसते की, तक्रारकर्ता क्र.1 यांनी दि.23/5/2020 रोजी विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडून सोयाबीन 335 बियाणे बॅच क्र. OCT-19-13-3808-5146 व 5151 च्या 12 पिशव्या खरेदी केलेल्या होत्या. तक्रारकर्ता यांनी तालुका कृषि अधिकारी, उदगीर यांच्याकडे दि.22/6/2020 रोजी दिलेल्या अर्जामध्ये सोयाबीन 335 बियाणे बॅच क्र. OCT-19-13-3808-5146 व 5151 बियाण्याचा उल्लेख केलेला आहे. तसेच विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 यांना विधिज्ञांतर्फे पाठविलेल्या सूचनापत्रामध्ये सोयाबीन जे.एस. 335 बियाणे बॅच क्र. OCT-19-13-3808-5146/ 5151 नमूद आहे. तक्रारकर्ते यांनी विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांना दि.27/7/2021 रोजी दिलेल्या तक्रारी-अर्जामध्ये सोयाबीन जे.एस. 335 बियाणे बॅच क्र. OCT-19-13-3808-5146/ 5151 असा उल्लेख आढळून येतो. उलटपक्षी, विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी अभिलेखावर लॉट क्र. OCT 19-13-3808-5146, लॉट क्र. OCT 19-13-3808-5147 व लॉट क्र. OCT 19-13-3808-5151 चे मुक्तता अहवाल दाखल केले. विरुध्द पक्ष क्र.1 यांनी श्री गुरुदत्त कृषि सेवा केंद्र, उदगीर यांच्याकडून सोयाबीन JS-335 या बियाण्यांच्या 5149, 5150, 5154, 5151, 5146, 5147 लॉटचे बियाणे खरेदी केल्याचे दिसून येते. तसेच विरुध्द पक्ष क्र.1 यांनी वेगवेगळ्या शेतकरी ग्राहकांना 5146, 5151, 5147, 5146, 5150 अशा लॉटचे बियाणे विक्री केल्याच्या पावत्या दिसून येतात. उभय पक्षांतर्फे दाखल केलेले पुरावे पाहता विरुध्द पक्ष क्र.1 यांनी शेतकरी ग्राहकांना 5146, 5151, 5147, 5146, 5150 अशा लॉटचे बियाणे विक्री केले, हे सिध्द होते.
(10) मुख्य वादविषयाकडे जाता तक्रारकर्ते यांनी कथित बियाण्याचे टॅग / लेबल दाखल केले आहेत. त्यांचे अवलोकन केले असता त्यावर Variety : JS-335; Lot No. OCT 19-13-3808-5147 असा उल्लेख आढळतो. तालुका तक्रार निवारण समितीच्या क्षेत्रीय भेटीचा अहवाल व पंचानाम्यामध्ये लॉट नं. OCT-19-13-3808-5147 असा उल्लेख स्पष्टपणे नमूद करण्यात आलेला आहे.
(11) उभयतांचे वाद-प्रतिवाद व दाखल पुरावे पाहता तक्रारकर्ता क्र.1 यांनी विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडून सोयाबीन 335 बियाणे बॅच क्र. OCT-19-13-3808-5146 व 5151 च्या 12 पिशव्या खरेदी केल्या, हे सिध्द होत असले तरी त्यांनी लॉट क्रमांक OCT-19-13-3808-5147 बियाणे पेरणी केल्याचे दिसून येते. तक्रारकर्ता क्र.1 यांनी खरेदी केलेले बियाणे व त्यांनी पेरणी केलेले बियाणे यामध्ये स्पष्ट तफावत दिसून येते.
(12) तक्रारकर्ते यांनी मा. सर्वोच्च न्यायालयाच्या 'मे. नॅशनल सिडस् कार्पोरेशन लि. /विरुध्द/ एम. मधुसुदन रेड्डी', सिव्हील अपील नं. 7543/2004, निर्णय दि. 16/1/2012 या निवाड्याचा संदर्भ सादर केला. उक्त न्यायनिर्णयामध्ये बियाणे परीक्षणासाठी उचित प्रयोगशाळेकडे पाठविण्यासह अन्य तत्वे दिसून येतात.
(13) विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांच्या कथनाप्रमाणे बियाणे नमुना विश्लेषणाकरिता प्रयोगशाळेकडे पाठविलेला नाही. ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदीनुसार ज्यावेळी वस्तुमध्ये दोष असल्याची आयोगाकडे तक्रार प्राप्त होते, त्यावेळी दोषयुक्त वस्तू उचित प्रयोगशाळेकडे परिक्षणासाठी पाठविणे आवश्यक आहे. विरुध्द पक्ष क्र.2 व 3 हे वादकथित सोयाबीन बियाण्याचे उत्पादक आहेत आणि विरुध्द पक्ष क्र.1 विक्रेते आहेत. असे दिसते की, तक्रारकर्ता यांनी सोयाबीन बियाण्याचा नमुना उचित प्रयोगशाळेद्वारे तपासणीसाठी जिल्हा मंचामध्ये सादर केला नाही, ही बाब सत्य मानली तरी एखादे बियाणे उगवणार नाही, असे गृहीत धरुन बियाण्याचा काही भाग जतन करुन ठेवावा, अशी अपेक्षा शेतक-याकडून ठेवणे रास्त नाही.
(14) वाद-तथ्ये, संबंध्द तथ्ये व कागदपत्रे पाहता तक्रारकर्ता क्र.1 यांनी विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडून खरेदी केलेले सोयाबीन 335 बियाणे बॅच क्र. OCT-19-13-3808-5146 व 5151 पेरणी केले, असे सिध्द होण्याकरिता उचित व पुरेसा पुरावा उपलब्ध नाही. पुराव्याअभावी विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडून खरेदी केलेल्या बियाण्यामध्ये दोष होता, हे सिध्द होत नाही. त्या अनुषंगाने विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 नुकसान भरपाई देण्याकरिता जबाबदार नाहीत, या निष्कर्षाप्रत येऊन आम्ही मुद्दा क्र.2 व 3 चे उत्तर नकारार्थी देतो आणि मुद्दा क्र.4 करिता खालीलप्रमाणे आदेश करीत आहोत.
आदेश
(1) ग्राहक तक्रार नामंजूर करण्यात येते.
(2) खर्चासंबंधी आदेश नाहीत.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-